श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ६ वा

परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणतात - चराचरात स्वत:ला पाहाणार्‍या आणि समदर्शी व्यासनंदन श्रीशुक मुनींनी सांगितलेले ऐकून परीक्षिताने मस्तक लववून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि हात जोडून तो त्यांना म्हणाला. (१)

राजा म्हणाला - भगवन ! करुणेचे मूर्तिमंत स्वरूप अशा आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी, अनंत अशा श्रीहरींचे स्वरूप आणि लीला साक्षात सांगितल्या. आपल्या कृपेने मी कृत्यकृत्य झालो. अनेक दु:खांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यांवर भगवन्मय महात्म्यांची कृपा होणे, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, असे मला वाटते. ज्या पुराणात भगवान श्रीहरींचे वर्णन केले आहे, ते हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकले. (२-४)

गुरुवर्य ! आपण मला परम शांतिस्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिले. आता मला तक्षक इत्यादी कोणापासूनही मृत्यूचे भय वाटत नाही. ब्रह्मन ! आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करीन आणि कामनांचे संस्कार नाहीशा झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करीन. आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान कायमचे नाहीसे झाले. भगवंतांच्या परम कल्याणरूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडविला. (५-७)

सूत म्हणतात - असे म्हणून राजाने महर्षी श्रीशुकांची पूजा केली. नंतर ते परीक्षिताचा निरोप घेऊन बरोबरीच्या मुनींसह तेथून निघून गेले. राजर्षी परीक्षितानेसुद्धा स्वत:च अंतरात्म्याला परमात्म्यात एकरूप करून तो त्याच्या ध्यानात मग्न झाला. त्यावेळी त्याचा श्वासोच्छ्वासही चालत नव्हता. जणू एखादा वृक्ष असावा , तसा तो भासत होता. तो गंगातीरावर पूर्वेकडे टोके असलेल्या कुशासनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. त्याची आसक्ती आणि संशय नाहीसे झाले होते. आता तो ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतारूप महायोगामध्ये स्थिर होऊन ब्रह्मस्वरूप झाला. (८-१०)

ऋषींनो ! क्रुद्ध मुनिकुमार श्रृंगीने , परीक्षिताला दंश करण्यासाठी पाठविलेला तक्षक राजाकडे येत असता, वाटेत त्याने कश्यप नावाच्या एका ब्राह्मणाला पाहिले. सापाचे विष उतरविण्यात तो निष्णात होता. त्याला पुष्कळ धन देऊन तृप्त करून तक्षकाने तेथूनच परत पाठविले. नंतर इच्छेनुसार रूप धारण करू शकणार्‍या तक्षकाने ब्राह्मणाचे रूप घेऊन राजाजवळ जाऊन पुन्हा सर्परूप घेऊन त्याला दंश केला. त्या‍आधीच राजर्षी ब्रह्मरूप झाला होता. आता तक्षकाच्या विषाच्या आगीने त्याचे शरीर सर्वांदेखतच तत्काळ जळून भस्म झाले. (११-१३)

तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशांमध्ये मोठा हाहाकार माजला. परीक्षिताची परमगती पाहून देवता, असुर, माणसे इत्यादी सर्वजण आश्चर्यचकित झाले. देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व आणि अप्सरा गायन करू लागल्या. "उत्तम, उत्तम" असे म्हणत देव पुष्पवर्षाव करू लागले. (१४-१५)

जनमेजयाने जेव्हा ऐकले की, आपल्या पित्याला तक्षकाने दंश केला, तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला. आणि तो ब्राह्मणांसह विधिपूर्वक अग्निकुंडामध्ये सापांचे हवन करू लागला. सर्पसत्राच्या प्रज्वलित अग्नीमध्ये मोठ-मोठे सर्प भस्मसात होताना पाहून तक्षक भयभीत होऊन इंद्राला शरण गेला. तेव्हा अजूनही तक्षक आलेला नाही, असे पाहून राजा जनमेजय ब्राह्मणांना म्हणाला, " तो नीच तक्षक अजून भस्मसात कसा झाला नाही ? " ब्राह्मण म्हणाले, " राजेंद्रा ! शरण आलेल्या तक्षकाचे इंद्र रक्षण करीत आहे. त्याने तक्षकाला स्वत:जवळ स्थिर ठेवलेले असल्याने तो अग्निकुंडात पडत नाही. " ते ऐकून बुद्धिमान जनमेजय ऋत्विजांना म्हणाला, " ब्राह्मणांनो ! आपण इंद्रासह तक्षकाला अग्निकुंडात का आणून टाकीत नाही ? " ते ऐकून ब्राह्मणांनी त्या यज्ञामध्ये आहुती म्हणून इंद्रासह तक्षकाला येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले- " अरे तक्षका ! मरुद्गणांचा सहचर इंद्र याच्यासह तू या अग्निकुंडात ताबडतोब येऊन पड. " ब्राह्मणांनी जेव्हा असा कठोर मंत्र म्हटला , तेव्हा इंद्र, आपल्या स्थानापासून निघाला. विमानात तक्षकासह बसलेला इंद्र काय करावे, हे न कळून अतिशय गोंधळून गेला. आकाशातून विमानात तक्षकासह बसलेला इंद्र अग्निकुंडात येऊन पडू लागलेला पाहून, अंगिरानंदन बृहस्पती राजा जनमेजयाला म्हणाले. हे नरेंद्रा ! सर्पराज तक्षकाला मारणॆ तुला शक्य नाही. कारण हा अमृत प्याला आहे, म्हणून अजरामर झाला आहे. (१६-२४)

हे राजन ! जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसारच जीवन, मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात. कर्माव्यतिरिक्त दुसरा कोणीही, कोणालाही सुख-दुख देऊ शकत नाही. हे जनमेजया ! साप, चोर, आग, वीज पडणे, तहान-भूक, रोग इत्यादी निमित्ताने प्राणी मरण पावतात. हा सर्व प्रारब्ध -कर्माचाच भोग होय. राजन ! म्हणून हे अभिचारिक कर्म बंद कर. पुष्कळसे निरपराध साप मेले. नाहीतरी सर्व प्राणी आपापले प्रारब्ध-कर्मच भोगत असतात. (२५-२७)

 सूत म्हणतात - महर्षी बृहस्पतींच्या म्हणण्याचा आदर करुन जनमेजयाने “ठीक आहे.” असे म्हणून सर्प-सत्र बंद केले आणि बृहस्पतींची पूजा केली. ही सर्व त्या भगवान विष्णूंची अनिर्वचनीय महामाया होय. हिच्यामुळेच भगवंतांचे स्वरूपभूत जीव, क्रोध इत्यादी गुणवृत्तींच्या द्वारे मोहाने शरीरांवर रागद्वेश इत्यादी करतात. पण आपल्या प्रयत्‍नाने हिच्यापासून परावृत्त होऊ शकत नाहीत. हा दंभी आहे, अशा प्रकारची बुद्धी ही माया होय. आत्मज्ञानी लोक जेव्हा आत्मचर्चा करु लागतात, तेव्हा ती त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये निर्भयरूपाने प्रकाशित होत नाही. मायेच्या आश्रयाने राहणारे निरनिराळ्या प्रकारचे विवाद तसेच संकल्प-विकल्पात्मक मन जेथे नाही, तेच परमात्मतत्व होय. कर्म, ते करण्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याचे फळ या तिघांनी वेढलेला अहंकारात्मक जीव, हे सर्व ज्याच्यामध्ये नाही, तो आत्मस्वरूप परमात्मा कोणाकडून बाधित होत नाही की, कोणाचा बाधक होत नाही. म्हणून मुनीने मनाच्या मायामय वृत्तींचा बाध करून आत्मस्वरूपामध्ये विहार करावा. मुमूक्षू, परमपदाव्यतिरिक्त सर्व वस्तूंचा “नेति-नेति” या श्रुतिवचनाने निषेध करून जी वस्तू प्राप्त करून घेतात, की जिचा कधी निषेध होऊ शकत नाही आणि कधी त्यागही होऊ शकत नाही, ती वस्तू म्हणजे भगवंतांचे परमपद आहे, असे सर्व महात्मे सांगतात. आपले चित्त एकाग्र करणारे पुरुष अंतःकरणाची अशुद्धी नाहीशी करून अनन्य प्रेमभावाने परिपूर्ण अशा ह्रदयाने त्याच परमपदाला आलिंगन देऊन आणि त्यातच विलीन होऊन जातात. ज्यांच्या अंतःकरणात शरीराबद्दल अहंभाव नाही आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घर इत्यादी पदार्थांविषयी ममता नाही, त्याच लोकांना भगवान विष्णूंच्या या परमपदाची प्राप्ती होते. हे परमपद मिळविण्यासाठी दुसर्‍याचे कटू बोलणे सहन करावे. कोणाचाही अपमान करू नये. या शरीराविषयी आसक्ती ठेवून कोणाशीही वैर करू नये. अकुंठित ज्ञान असणार्‍या श्रीव्यासांना नमस्कार असो. त्यांच्या चरणकमलांचे ध्यान करूनच मला या श्रीमद्‌भागवत-महापुराणाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. (२८-३५)

शौनकाने म्हटले - हे सूत महोदय ! वेदांचे आचार्य असणार्‍या महात्म्या वेदव्यासांच्या पैल इत्यादी शिष्यांनी किती प्रकारांनी वेदांचे भाग केले, हे आपण आम्हांला सांगावे. (३६)

सूत म्हणाले - ब्रह्मन ! परमेष्ठी ब्रह्मदेव जेव्हा पूर्वसृष्टीचे ज्ञान संपादन करण्यासाठी एकाग्रचित्त झाले, त्यावेळी त्यांच्या ह्रदयाकाशातून नाद उमटला. जीव जेव्हा आपल्या मनोवृत्ती रोखतो, तेव्हा त्यालासुद्धा त्या अनाहत-नादाचा अनुभव येतो. (३७)

हे ब्रह्मर्षे ! योगी ज्या नादाची उपासना करून त्याच्या प्रभावाने अंतःकरणातील द्रव्य(अधिभूत), क्रिया (अध्यात्म) आणि कारक (अधिदैव) रूप दोष नाहीसे करून, मोक्ष प्राप्त करून घेतात, त्याच अनाहत नादापासून ‘अ’ कार, ‘उ’ कार आणि ‘म’ कार रूप तीन मात्रांनी युक्त असा ॐकार प्रगट झाला. हा ॐकार हेच प्रकृतीचे अव्यक्तातून व्यक्तरूपात प्रगट होणे. हा स्वयंप्रकाशी असून परब्रह्माचा बोध करून देणारा आहे. जेव्हा कान ऐकत नसतात, तेव्हासुद्धा जो हा ॐकार ऐकतो, तसेच सर्व इंद्रियांच्या अभावीही ज्याला ज्ञान असते, जो परमात्म्यापासून ह्रदयाकाशात प्रगट होऊन वेदरूप वाणीला अभिव्यक्त करतो, तोच हा ॐकार. आपला आश्रय असणार्‍या परब्रह्माचा ॐकार हा साक्षात वाचक आहे आणि तो सर्व मंत्र, उपनिषदे आणि वेदांचे सनातन बीज आहे. (३८-४१)

हे शौनका ! ‘अ’, ‘उ’, आणि ‘म’ हे ॐकाराचे तीन वर्ण आहेत. हेच तीन वर्ण सत्व, रज, तम, या तीन गुणांना, ऋक्‌, यजुः, साम या तीन नावांना, भूः, भुवः, स्वः या तीन अर्थांना आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन वृत्तींना धारण करतात. यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी यापासूनच अंतःस्थ (य, र, ल, व), ऊष्म (श, ष, स, ह), स्वर (‘अ’पासून ‘औ’ पर्यंत) तसेच र्‍हस्व आणि दीर्घ इत्यादी लक्षणांनी युक्त अशी वर्णमाला उत्पन्न केली. त्याच वर्णमालेच्या योगाने त्यांनी आपल्या चार मुखांपासून होता, अध्वर्यू, उद्राता आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म सांगण्यासाठी ॐकार आणि वेदाध्ययनामध्ये कुशल असणार्‍या आपल्या ब्रह्मर्षी पुत्रांना वेदांचे शिक्षण दिले. धर्माचा उपदेश करणार्‍या त्यांनी नंतर आपल्या पुत्रांना ते शिकविले. (४२-४५)

त्यानंतर त्यांच्याच नैष्ठिक ब्रह्मचारी शिष्य-प्रशिष्यांच्या द्वारे चारही युगांमध्ये परंपरेने वेदांचे रक्षण होत राहिले. द्वापर युगाच्या शेवटी महर्षींनी त्यांचे विभागसुद्धा केले. ब्रह्मवेत्त्या ऋषींनी कालमानानुसार लोकांचे आयुष्य, शक्ती आणि बुद्धी कमी होत असलेली पाहून आपल्या ह्रदयात विराजमान असलेल्या परमात्म्याच्या प्रेरणेने वेदांचे अनेक विभाग केले. (४६-४७)

हे भाग्यवान शौनका ! या वैवस्वत मन्वन्तरामध्ये सुद्धा ब्रह्मदेव, शंकर इत्यादी लोकपालांच्या प्रार्थनेवरून, अखिल विश्वाला जीवन देणार्‍या भगवंतांनी, धर्माचे रक्षण करण्यासाठी पराशरांपासून सत्यवतीच्या ठिकाणी आपले अंशांश-कलास्वरूप अशा व्यासांच्या रूपामध्ये अवतार घेऊन वेदांचे चार विभाग केले. ज्याप्रमाणे मण्यांच्या राशीतून वेगवेगळ्या जातीचे मणी निवडून वेगवेगळे केले जातात, त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यासांनी मंत्र-समुदयांमधून निरनिराळ्या विषयानुसार मंत्रांचे वर्गीकरण करून त्यातून ऋग्‌, यजुः, साम आणि अथर्व या चार संहिता तयार केल्या व आपल्या चार शिष्यांना बोलावून प्रत्येकाला एकेका संहितेचे शिक्षण दिले. त्यांनी पहिली ऋक्संहिता पैलाला, यजुःसंहिता वैशंपायनाला, सामवेद जैमिनीला आणि अथर्ववेद सुमंतू नावाच्या शिष्याला शिकविला. शौनका ! पैल मुनीने आपल्या संहितेचे दोन विभाग करून एक इंद्रप्रमितीला आणि दुसरा बाष्कल याला शिकविला. त्यानेसुद्धा आपल्या शाखेचे चार विभाग करून ते आपले शिष्य बोध्य, याज्ञवक्ल्य, पराशर आणि अग्निमित्र यांना शिकवले. संयमशील इंद्रप्रमितीने प्रतिभाशाली मांडूकेय ऋषीला आपली संहिता शिकविली. मांडूकेयाचा शिष्य देवमित्राने सौभरी इत्यादी ऋषींना वेद शिकविले. मांडूकेयाच्या मुलाचे नाव शाकल्य. त्याने आपल्या संहितेचे पाच विभाग करून ते वात्स्य, मुद्रल, शालीय, गोखल्य आणि शिशिर नावांच्या शिष्यांना शिकविले. शाकल्याचा आणखी एक जातूकर्ण्यमुनी नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या संहितेचे तीन विभाग करून ते, त्यासंबंधीच्या निरूक्तासह, बलाक, पैज, वैताल आणि विरज या नावाच्या आपल्या शिष्यांना शिकविले. बाष्कलाचा पुत्र बाष्कली याने सर्व शाखांपासून “वालखिल्य” नावाची एक शाखा रचली. ती बालायनी, भज्य आणि कासार यांनी आत्मसात केली. या ब्रह्मर्षींनी ऋग्वेदाच्या या शाखा आत्मसात केल्या. वेदांच्या विभाजनाचा हा इतिहास जो माणूस श्रवण करतो,त्याची सर्व पापांपासून सुटका होते. (४८-६०)

वैशंपायनाच्या काही शिष्यांचे नाव चरकध्वर्यू होते. यांनी आपल्या गुरूदेवांच्या ब्रह्महत्या-पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी एका व्रताचे अनुष्ठान केले. म्हणून यांचे नाव चरकाध्वर्यू पडले. वैशंपायनाचा एक शिष्य याज्ञवल्क्य होता. तो आपल्या गुरूंना म्हणाला - “अहो भगवन ! या चरकाध्वर्यूंच्या अंगी फारच थोडी शक्ती आहे. या व्रतपालनाने कितीसा लाभ होणार ? आपल्या प्रायश्चित्तासाठी मी फार कडक तपश्चर्या करीन.” याज्ञवल्क्यमुनीचे हे म्हणणे ऐकून वैशंपायनाला अतिशय क्रोध आला. तो म्हणाला, “बस कर ! ब्राम्हणांचा अपमान करणार्‍या तुझ्यासारख्या शिष्याची मला आवश्यकता नाही. माझ्याकडून जे काही अध्ययन केलेस, ते ताबडतोब टाकून जा !” देवराताचा पुत्र याज्ञवल्क्याने गुरूजींनी सांगताच त्यांनी शिकविलेला यजुर्वेद ओकून टाकला आणि तो तिथून निघून गेला. यजुर्वेद टाकलेला मुनींनी पाहिला, तेव्हा तो घेण्याच्या लालसेने त्यांनी तित्तिर पक्ष्याचे रूप घेऊन ती संहिता घेतली. यजुर्वेदाच्या या सुंदर शाखा तैत्तिरीय नावाने प्रसिद्ध झाल्या. शौनका ! नंतर याज्ञवल्क्याने गुरूंच्याजवळही नसतील, अशा श्रुती मिळविण्यासाठी भगवान सूर्यांची स्तुती केली. (६१-६६)

याज्ञवल्क्य म्हणाले- हे भगवन सूर्यदेवा ! मी आपणास नमस्कार करीत आहे. आपण संपूर्ण जगाचे आत्मा आणि कालस्वरूप आहात. ब्रह्मदेवापासून गवतापर्यंत जे जरायुज, अंडज, स्वदेज आणि उभ्दिज्ज असे चार प्रकारचे प्राणी आहेत, त्या सर्वांच्या ह्रदयाच्या आत आणि बाहेर आकाशासारखे व्यापलेले असूनही आपण उपाधींच्या धर्मापासून अलिप्त राहाणारे अद्वितीय भगवान आहात. आपणच क्षण, लव, निमेष इत्यादी अवयांनी संघटित झालेल्या संवत्सरांच्या द्वारा तसेच पाण्याचे ग्रहण व विसर्जन यांच्याद्वारे सर्व लोकांची जीवनयात्रा चालवीत आहात. (या ठिकाणी ‘तत्सवितुर्वरेण्यम्‌’ चा आशय आहे.) हे प्रभो ! आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहात. जे लोक दररोज तीन वेळा वेदामध्ये सांगितल्यानुसार आपली उपासना करतात, त्यांची सर्व पापे आणि दुःखांची बीजे आपण भस्मसात करून टाकता. हे सूर्यदेवा !आपण सर्व सृष्टीचे मूळ कारण तसेच सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचे स्वामी आहात. म्हणून आम्ही आपल्या या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रतेने ध्यान करीत आहोत. (या ठिकाणी ‘भर्गो देवस्य धीमहि’ चा आशय आहे.) आपण सर्वांचे आत्मा आणि अंतर्यामी आहात. जगातील चराचर आश्रित आहे. आपणच त्यांच्या अचेतन मन, इंद्रिये आणि प्राणांचे प्रेरक आहात. ( या ठिकाणी ‘धियो यो नः प्रचोदयात्‌’ चा आशय आहे.) हा लोक दररोज अंधकाररूप अजगराच्या विक्राळ दाढेत सापडून प्रेतासारखा होऊन जातो. आपण परम दयाळू आहात. म्हणूनच आपल्या फक्त दृष्टिनेच याला सचेतन करता आणि वेळोवेळी परम कल्याणाचे साधन असलेल्या धर्मानुष्ठानमध्ये लावून त्यांना आत्माभिमुख करीत असता. राजा जसा दुष्टांना भयभीत करीत आपल्या राज्यामध्ये फिरत असतो, त्याचप्रमाणे आपणसुद्धा दुष्टांना भयभीत करीत विचरण करीत असता. सर्व दिक्पाल चारही बाजूंनी ठिकठिकाणी कमळाच्या कळीप्रमाणे असणार्‍या आपल्या ओंजळींनी आपल्याला पूजासामग्री समर्पित करीत असतात. भगवन ! आपली दोन्हीही चरणकमले तिन्ही लोकांच्या गुरूंनी वंदिली आहेत. आजपर्यंत कोणालाही न मिळालेल्या यजुर्वेदाची प्राप्ती व्हावी, म्हणून मी आपल्या त्या चरणयुगलांना शरण आलो आहे. (६७-७२)

सूत म्हणतात - अशी स्तुती केली, तेव्हा प्रसन्न होऊन भगवान सूर्यांनी घोड्याच्या रूपात प्रगट होऊन आतापर्यंत कोणालाही प्राप्त न झालेला यजुर्वेद त्याला दिला. याज्ञवल्क्यमुनीने त्या यजुर्वेदाच्या पंधरा शाखांची रचना केली. त्याच वाजसनेय नावाने प्रसिद्ध आहेत. काण्व, माध्यंदिन इत्यादी ऋषींनी त्या ग्रहण केल्या. (७३-७४)

सामवेदी जैमिनीचा पुत्र सुमंतुमुनी आणि नातू सुन्वान होता. जैमिनीने त्यांना प्रत्येकी एक-एक संहिता शिकविली. जैमिनी मुनीचा सुकर्मा नावाचा श्रेष्ठ शिष्य होता. एका वृक्षाच्या पुष्कळ फांद्या असतात, त्याप्रमाणे सुकर्म्याने सामवेदाच्या एक हजार संहिता रचल्या. सुकर्माचे शिष्य, कोसलदेशचा हिरण्यनाभ, पौष्यंजी व ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आवन्त्य हे होते. त्यांनी या शाखा आत्मसात केल्या. पौष्यंजी आणि आवन्त्य यांचे पाचशे शिष्य होते. ते उत्तरेकडील राहाणारे असल्याने त्यांना औदीच्य सामवेदी म्हणत. त्यांनाच प्राच्य सामवेदी असेही म्हणतात. पौष्यजींचे लौगाक्षी, मांगली, कुल्य, कुसीद आणि कुक्षी नावाचे आणखीही शिष्य होते. त्यांपैकी प्रत्येकाने शंभर शंभर संहितांचे अध्ययन केले. हिरण्यनाभाचा कृत नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या शिष्यांना चोवीस संहिता शिकविल्या. संयमी आवन्त्याने राहिलेल्या संहिता आपल्या शिष्यांना दिल्या. (७५-८०)

अध्याय सहावा समाप्त

GO TOP