श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ५ वा

श्रीशुकदेवांनी केलेला अंतिम उपदेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - या श्रीमद्‌भागवत पुराणामध्ये ब्रह्मदेव ज्यांच्या रजोगुणातून आणि शंकर तमोगुणातून प्रगट झाले आहेत त्या विश्वात्मा भगवान श्रीहरींचेच वारंवार वर्णन आलेले आहे. हे राजन ! आता तू ’मी मरेन’ हा अज्ञान्यासारखा विचार सोडून दे. शरीरासारखा तू पूर्वी कधीही जन्मलेला नाहीस. आणि तुझा जन्म न झाल्यामुळे शरीरासारखा आज तू नष्टही होणार नाहीस. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर आणि अंकुरापासून बीजाची उत्पत्ती होते, त्याप्रमाणे तू पुत्र-पौत्रादिकांच्या रूपानेही पुन्हा उत्पन्न होणार नाहीस. कारण, लाकडापासून अग्नी जसा वेगळा असतो, त्याचप्रमाणे तूसुद्धा शरीर इत्यादींहून वेगळा आहेस. (१-३)

जसे स्वप्नात स्वत:चे मस्तक छाटलेले दिसते, पण ते खोटे असते, त्याचप्रमाणे जागृतीतही मरण इत्यादी सर्व शरीराच्याच अवस्था दिसतात. आत्म्याच्या नव्हेत. त्या पाहाणारा आत्मा जन्म-मृत्यू-विरहित असतो. जसे घडा फुटल्यावर घटकाश महाकाशरूप होते. त्याचप्रमाणे देहपात झाल्यावर मुळचा ब्रह्मरूप जीवच पुन्हा ब्रह्म होतो. मनच आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्मांची निर्मिती करते आणि त्या मनाची निर्मिती करणारी अविद्याच जीवाला संसारात अडकवण्याला कारणीभूत आहे. जोपर्यंत तेल, समई, वात आणि अग्नीचा संयोग असतो, तोपर्यंतच दिव्यामध्ये दीपकपण आहे, त्याचप्रमाणे जोपर्यंत आत्म्याचा कर्म, मन, शरीर आणि त्यात राहाणार्‍या चैतन्याशी संबंध असतो, तोपर्यंतच त्याला जीवपण असते. आणि रजोगुण, सत्त्वगुण तसेच तमोगुण यांच्या वृत्तींमुळे त्याला उत्पन्न , स्थितीयुक्त व नष्ट व्हावे लागते. परंतु देहातील स्वयंप्रकाशी आत्म्याचा नाश होत नाही; कारण तो कार्य-कारणाच्या पलीकडील आहे. तो आकाशाप्रमाणे सर्वांचा आधार , नित्य, निश्चल आणि अनंत आहे. म्हणून त्याच्यासारखा तोच आहे. (४-८)

हे राजन ! तू परमात्म्याच्या चिंतनाने भरलेल्या आपल्या विवेकी बुद्धीने आपल्याच अंत:करणात असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घे. तू मृत्यूंचाही मृत्यू ईश्वर आहेस. म्हणून ब्राह्मणाच्या शापाने प्रेरित झालेला तक्षक तुला भस्म करू शकणार नाही. इतकेच नव्हे, तर मृत्यूचे कोणतेही कारण तुझ्याजवळही फिरकू शकणार नाही. " मीच परम धाम ब्रह्म आहे. परम पद ब्रह्म मीच आहे" याचे अनुसंधान ठेवल्याने तू स्वत:ला आपल्या निरुपाधिक स्वरूपात स्थिर करशील. (९-११)

त्यावेळी आपल्या विषारी जिभांनी ओठांच्या कडा चाटीत आलेला तक्षक तुझ्या पायाला चावला, तरी तो तुला दिसणार नाही. इतकेच नव्हे, तर तुला आपले शरीर आणि सारे विश्व स्वत:हून वेगळे भासणार नाही. कारण तुला त्यावेळी स्वत:सह सर्व ब्रह्मच अनुभवाला येईल. हे आत्मस्वरूप परीक्षिता ! विश्वात्मा भगवंतांच्या लीलेसंबंधी तू जे विचारले होतेस ना, त्याचे मी तुला उत्तर दिले. आता आणखी काय ऐकू इच्छितोस? (१२-१३)

अध्याय पाचवा समाप्त

GO TOP