श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ४ था

चार प्रकारचे प्रलय -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! परमाणूपासून दोन परार्धापर्यंतच्या काळाचे स्वरूप आणि युगांचे परिमाण मी तुला सांगितले. आता तू कल्पाची स्थिती आणि त्याचे प्रलय यांचे वर्णनसुद्धा ऐक. राजन ! एक हजार चतुर्युगे मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ब्रह्मदेवाच्य या एका दिवसाला कल्प म्हणतात. एका कल्पामध्ये चौदा मनू होतात. कल्पाच्या शेवटी तितकाच काळपर्यंत प्रलय राहतो. त्याला ब्रह्मदेवाची रात्र म्हणतात. त्यावेळी या तिन्ही लोकांचा प्रलय होतो. याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. या प्रलयाच्या वेळी सगळे विश्व आपल्यात सामावून घेऊन ब्रह्मदेव आणि शेषशायी भगवान शयन करतात. अशा प्रकारे रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र होता होता जेव्हा ब्रह्मदेवाच्या गणनेनुसार शंभर वर्षे होतात, तेव्हा महत्तत्त्व , अहंकार आणि पंचतन्मात्रा या सात प्रकृती मूळ प्रकृतीत विलीन होऊन जातात. (१-५)

राजन ! याला प्राकृतिक प्रलय म्हणतात. या प्रलयामध्ये , प्रलयाचे कारण निर्माण झाल्यावर हे ब्रह्मांड आपले स्थूलरूप सोडून देऊन कारणरूपात मिसळून जाते. परीक्षिता ! प्रलयाची वेळ आल्यावर ढग शंभर वर्षे पाऊस पाडीत नाहीत. त्यामुळे अन्नाच्या अभावी तहान-भुकेने व्याकूळ होऊन प्राणी एकमेकांना खाऊ लागतात. अशा प्रकारे काळाच्या उपद्रवामुळे पिडलेली सगळी प्रजा हळू हळू कमी होत जाते. प्रलयकालीन सूर्य आपल्या प्रचंड किरणांनी समुद्र, प्राण्यांची शरीरे आणि पृथ्वीवरील सगळा रस शोषून घेतो आणि पुन्हा तो रस पृथ्वीवर सोडत नाही. त्यावेळी संकर्षणांच्या मुखातून प्रलयकालीन अग्नी प्रगट होतो. वेगवान वायूमुळे तो अग्नी आणखी वाढतो. तो पृथ्वीच्या खालील भागातील सात लोक भस्म करून टाकतो. खालून येणारे आगीचे प्रचंड लोळ आणि वरून येणारी सूर्याची प्रचंड उष्णता, यांमुळे त्यावेळी वर-खाली, चारही बाजूंनी जळणारे ब्रह्मांड पेटलेल्या शेणाच्या गोवर्‍यांप्रमाणे वाटू लागते. त्यानंतर प्रलयकालीन प्रचंड वायू शेकडो वर्षे वाहात राहतो. त्या काळातील आकाश धुरने आणि धुळीने भरलेले असते. त्यानंतर असंख्य रंगी-बेरंगी ढग अतिशय मोठ्याने गर्जना करून शेकडो वर्षेपर्यंत पाऊस पाडीत राहातात. त्यावेळी ब्रह्मांडाच्या आतील सर्व जग जलमय होते. (६-१३)

तेव्हा पाणी, पृथ्वीचा गुण गंध शोषून घेते. गंध हा गुण पाण्यात विलीन झाल्यावर पृथ्वीचा प्रलय होतो. राजन ! यानंतर तेजतत्त्व जलाचा गुण रस शोषून घेते आणि जल नीरस होऊन तेजामध्ये विलीन होते. त्यानंतर वायू तेजाचा गुण रूप याला ग्रासतो, तेव्हा ते तेज रूपरहित होऊन वायूमध्ये लीन होते. आता आकाश वायूचा गुण जो स्पर्श त्याला आपल्यामध्ये सामावून घेते आणि वायू स्पर्शहीन होऊन आकाशात विलीन होतो. यानंतर तामस अहंकार आकाशाचा गुण जो शब्द त्याला ग्रासतो आणि आकाश शब्दहीन होऊन त्यात विलीन होते. याच रीतीने तैजस अहंकार इंद्रियांना आणि वैकारिक अहंकार इंद्रियांच्या देवतांना आणि इंद्रियांच्या वृत्तींना आपल्यामध्ये लीन करून घेतो. त्यानंतर महत्तत्त्व अहंकाराला आणि सत्त्व इत्यादी गुण महतत्त्वाला ग्रासतात. परीक्षिता ! नंतर काळाच्या प्रेरणेने अव्य्क्त प्रकृती गुणांना ग्रासते. तीच प्रकृती जगाचे कारण आहे. ती अव्यक्त, अनादी, अनंत, नित्य आणि अविनाशी आहे. तिच्यावर काळाच्या अवयवांचा परिणाम होत नाही. कारण त्यावेळी प्रकृतीमध्ये वाणी, मन, सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण, महत्तत्त्व इत्यादी हे विकार, प्राण, बुद्धी, इंद्रिये, त्यांच्या देवता इत्यादी काहीच राहात नाही. त्यावेळी स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था नसतात. आकाश, जल, पृथ्वी, वायू, अग्नी आणि सूर्यसुद्धा नसतात. सर्व काही निद्रिस्तासारखे , शून्यासारखे असते. त्या अवस्थेला तर्कसुद्धा करणे शक्य नसते. त्या अव्यक्तालाच जगाचे मूलभूत तत्त्व असे म्हणतात. या अवस्थेचे नाव ’प्राकृत प्रलय’ असे आहे. त्यावेळी पुरुष आणि प्रकृती या दोहोंच्या शक्ती काळाच्या प्रभावाने क्षीण होतात आणि असहाय्यपणे आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. (१४-२२)

यावेळी बुद्धी, इंद्रिये आणि त्यांच्या विषयांच्या रूपामध्ये त्यांचे अधिष्ठान असलेले ज्ञानच भासते. त्या सर्वांना प्रारंभही आहे व शेवटही आहे. ते दिसू शकतात आणि आपल्या अधिष्ठानातून वेगळी अशी त्यांना सत्ताही नाही. म्हणून ते सर्वथैव खोटे होत. जसे दिवा, डोळे आणि रूप हे तिन्हीही तेजाहून वेगळे नाहीत. त्याचप्रमाणे बुद्धी, इंद्रिये आणि त्यांचे विषय अधिष्ठानस्वरूप ब्रह्मापेक्षा वेगळे नाहीत. मात्र ते ब्रह्म, या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. (२३-२४)

परीक्षिता ! जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या बुद्धीच्याच अवस्था आहेत. म्हणून यांचे कारण जो अंतरात्मा तो विष्व , तैजस आणि प्राज्ञरूपाने वेगवेगळा भासतो. पण ती केवळ मायाच होय. हे विश्व, उत्पत्ती आणि प्रलयाने युक्त असल्यामुळे अवयवयुक्त आहे. जसे आकाशात ढग कधी असतात कधी नसतात. त्याचप्रमाणे हे विश्व ब्रह्माचे ठिकाणी कधी भासते, कधी भासत नाही. परीक्षिता ! जगात सर्व अवयवयुक्त पदार्थ नसले, तरी त्यांचे अवयव खरे असतात. जसे वस्त्र नाहीसे झाले, तरी त्याचे कारण असलेले सूत शिल्लक राहातेच. (त्याचप्रमाणे कार्यरूप जगाच्या अभावीसुद्धा कारणरूप ब्रह्म राहू शकते. ) वास्तविक ब्रह्मामध्ये जो हा कार्यकारणभाव दिसतो, तोसुद्धा केवळ भ्रम आहे. कारण, कार्यभाव आणि कारणभाव हे सापेक्ष असून यांचा आरंभ आणि शेवट असतो. म्हणून यांना वास्तविक अस्तित्व नाही. जरी प्रपंचरूप कार्य भासत असले, तरी ते अधिष्ठान असलेल्या आत्म्याहून जराही वेगळे नाही. जर याला आत्म्यापेक्षा वेगळे मानले, तर तो चिद्रूप आत्म्याप्रमाणे स्वयंप्रकाशित मानावा लागेल आणि अशा स्थितीत तो आत्म्याप्रमाणेच (सत्य) असल्याचे सिद्ध होईल. सत्य वस्तू ब्रह्मामध्ये अनेकता आहे, असे एखाद्या अज्ञानी माणसाला वाटले, तरी त्याचे ते वाटणे म्हणजे, महाकाश आणि घटाकाश आकाशातील सूर्य आणि पाण्यात प्रतिबिंब पडलेला सूर्य किंवा बाहेरील वायू आणि आतील वायू यांच्यामध्ये भेद आहे, असे वाटाण्यासारखेच आहे. (२५-३०)

जसे, व्यवहारामध्ये माणूस एकाच सोन्याचे कंकण, कुंडल, इत्यादी अनेक रूपात रूपांतर करतो, त्याचप्रमाणे विद्वान लोक लौकिक आणि वैदिक वाणीने इंद्रियातीत असणर्‍या आत्मस्वरूप भगवंतांचेसुद्धा अनेक रूपांमध्ये वर्णन करतात. ढग सूर्यापासून उत्पन्न होतो आणि सूर्यामुळेच प्रकाशित होतो. तरीसुद्धा तो सूर्याचाच अंश असलेल्या डोळ्याला, सूर्याच्या दर्शनात अडथळा निर्माण करतो. त्याचप्रमाणे अहंकारसुद्धा ब्रह्मापासूनच उत्पन्न झाला आहे, ब्रह्मामुळेच प्रकाशित होतो आणि ब्रह्माचाच अंश असलेल्या जीवाला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यात बाधक ठरतो. सूर्यापासून निर्माण होणारे ढग जेव्हा विखुरले जातात, तेव्हा डोळा आपलेच स्वरूप असलेल्या सूर्याचे दर्शन घेण्यास समर्थ होतो. तसाच , जेव्हा ज्ञानाने आत्म्याची उपाधी असणारा अहंकार नाहीसा होतो, तेव्हा जीवाला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. परीक्षिता ! जीव जेव्हा या विवेकाच्या शस्त्राने मायामय अहंकाराचे बंधन तोडून टाकतो आणि आपल्या एकरस आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारामध्ये स्थिर होतो, त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. (३१-३४)

हे शत्रुदमना ! तत्त्वज्ञानी लोक, ब्रह्मादिक सर्व चराचराचे उत्पत्ती आणि प्रलय नेहमीच चालू असतात, असे सांगतात. नदीप्रवाहाप्रमाणे कालरूप प्रवाहाच्या वेगाने क्षणाक्षणाला बदलणारे जे देहादी पदार्थ त्यांच्या ज्या बदलणार्‍या अवस्था तेच त्यांचे उत्पत्ती आणि प्रलय होत. आकाशातील तारे जसे नेहमी फिरत असतात, परंतु त्यांचे फिरणे स्पष्टपणे दिसत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांचे स्वरूप असलेल्या ह्या अनादी-अनंत काळामुळे पदार्थांच्या क्षणाक्षणाला बदलणार्‍या अवस्था जाणवत नाहीत. (हाच नित्य प्रलय होय. ) परीक्षिता ! नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय अशा चार प्रकारच्या प्रलयांचे वर्णन मी तुला सांगितले. काळाची गती ही अशी आहे. (३५-३८)

हे कुरुश्रेष्ठा ! विश्व-विधाता, सर्व प्राणी आणि शक्तींचे आश्रय असणार्‍या भगवान नारायणांच्या या सर्व लीला-कथा मी तुला थोडक्यात सांगितल्या त्यांचे पूर्ण वर्णन ब्रह्मदेवसुद्धा करू शकणार नाही. (३९)

जे लोक तरण्यास अत्यंत कठीण अशा संसार-सागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात, त्यांना भगवंतांच्या कथाश्रवणाखेरीज दुसरी नौका नाही. तसेच जे लोक अनेक प्रकारच्या दु:खाग्नीने होरपळले आहेत, त्यांच्यासाठी भगवान पुरुषोत्तमांच्या कथारूप रसाच्या सेवनाखेरीज दुसरे कोणतेही रसायन नाही. हे श्रीमद्‌भागवतपुराण सनातन ऋषी नारायणांनी पूर्वी देवर्षी नारदांना सांगितले आणि त्यांनी कृष्णद्वैपायनांना प्रसन्न होऊन मला या वेदतुल्य श्रीभागवतसंहितेचा उपदेश केला. हे कुरुश्रेष्ठा ! यानंतर काही काळाने जेव्हा शौनकादी ऋषी नैमिषाराण्यामध्ये दीर्घकाळ चालणार्‍या सत्राचा प्रारंभ करतील, तेव्हा त्यांनी विचारल्यावरून पुराणांचा वक्ता सूत त्यांना ही संहिता सांगेल. (४०-४३)

अध्याय चवथा समाप्त

GO TOP