|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ७ वा
अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणतात - सुमंतुमुनी अथर्ववेदाचे ज्ञानी होते. आपली संहिता त्यांनी आपला शिष्य कबंध याला शिकविली. कबंधाने त्या संहितेचे दोन भाग करून पथ्य आणि वेददर्श यांना ती शिकविली. वेददर्शाचे शौक्लायनी, ब्रह्मबली, मोदोश आणि पिप्पलायनी या नावाचे शिष्य होते. आता पथ्याच्या शिष्यांची नावे ऐका. शौनका ! कुमुद, शुनक आणि अथर्ववेत्त जाजली असे पथ्याचे तीन शिष्य होते. अंगिरा गोत्राचा शुनक याचे बभ्रू आणि सैंधवायन असे दोन शिष्य होते. त्यांनी दोन संहितांचे अध्ययन केले. अथर्ववेदाच्या आचार्यांमध्ये यांच्याखेरीज सैंधवायन इत्यादींचे शिष्य सावर्ण्य इत्यादी, तसेच नक्षत्रकल्प, शांती, कश्यप, आंगिरस इत्यादी पुष्कळ विद्वान होऊन गेले. आता मी तुम्हांला पौराणिकांच्यासंबंधी ऐकवितो. (१-४) त्रय्यारुणी, कश्यप, सावर्णी, अकृतव्रण, वैशंपायन आणि हारीत असे सहा पुराणांचे आचार्य प्रसिद्ध आहेत. व्यासांचे शिष्य असलेल्या माझ्या वडिलांच्याकडून हे एक-एक संहिता शिकले होते. या सहाही आचार्यांकडून मी सर्व संहितांचे अध्ययन केले. याखेरीज आण्खी चार मूळ संहिता, कश्यप, सावर्णी, परशुरामांचे शिष्य अकृतव्रण आणि मी अशा चौघांनी शिष्य असलेल्या श्रीरोमहर्षणाकडून यांचे अध्ययन केले. (५-७) शौनका ! ब्रह्मर्षींनी वेद आणि शास्त्रे यांनुसार पुराणांची लक्षणे सांगितली आहेत, ती लक्षपूर्वक ऐक. शौनका ! पुराणे जाणणारे विद्वान असे सांगतात की, पुराणांची सर्ग, विसर्ग, वृत्ती, रक्षा, मन्वन्तर, वंश, वंशानुचरित, संस्था (प्रलय), हेतू (ऊती) आणि अपाश्रय अशी दहा लक्षणे आहेत. काही आचार्य पुराणांची पाचच लक्षणे मानतात. दोघांचेही म्हणणे बरोबर आहे; कारण महापुराणांची दहा लक्षणे असतात आणि लहान पुरणांची पाच. जेव्हा मूळ प्रकृतीतील साम्यावस्थेत असलेले गुण प्रक्षुब्ध होतात, तेव्हा महत्तत्त्वाची उत्पत्ती होते. महत्तत्त्वापासून तामस, राजस, आणि सात्विक असा तीन प्रकारचा अहंकार निर्माण होतो. यापासूनच या उत्पत्तिक्रमाला ‘सर्ग’ म्हणतात. परमेश्वराच्या कृपेने सृष्टि-निर्मितिचे सामर्थ्य प्राप्त करून घेऊन महत्तत्त्व इत्यादींनी, पूर्वकर्मानुसार उत्पन वासनानुरूप केलेली, जी कार्यरूप चराचर शरीरात्मक जीवाची उत्पत्ती तिला ‘विसर्ग’ म्हणतात. एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न व्हावे, तसे ते होते. हालचाल करणार्या प्राण्यांची, स्थिर पदार्थ ही ‘वृत्ती’ म्हणजेच जीवननिर्वाहाची सामग्री होय. तिच्यापैकी काही माणसांनी स्वतःच्या इच्छेनुसार तर काही शास्त्राच्या आज्ञेनुसार निश्चित केली आहे. (८-१३) युगायुगामध्ये भगवान पशु-पक्षी, मनुष्य, ऋषी, देवता इत्यादी रूपांमध्ये अवतार धारण करून वेद-धर्माला विरोध करणार्यांचा संहार करतात. त्यांची ही अवतार-लीला म्हणजे ‘रक्षा’ होय. मनू, देवता, मनुपुत्र, इंद्र, सप्तर्षी आणि भगवंतांचा अंशावतार या सहा गोष्टींनी युक्त असलेल्या वेळेला ‘मन्वन्तर’ म्हणतात. ब्रह्मदेवापासून जितक्या राजांची उत्पत्ती झाली, त्यांच्या भूत, भविष्य आणि वर्तमानकालीन संततीला ‘वंश’ म्हणतात. ते राजे तसेच त्यांच्या वंशजांच्या चरित्राचे नाव ‘वंशानुचरित’ असे आहे. या ब्रह्मांडाचा स्वभावतःच प्रलय होतो. नैमित्तिक, प्राकृतिक, नित्य आणि आत्यंतिक असे त्याचे चार भेद आहेत. यांनाच तत्वज्ञ विद्वान ‘संस्था’ म्हणतात. पुराणांच्या लक्षणांमध्ये ‘हेतू’ नावाने ज्याचा व्यवहार होतो, तो जीवच आहे. कारण वास्तविक तोच सर्ग-विसर्ग इत्यादींचा हेतू आहे. म्हणजेच अविद्येने तो कर्मे करणारा आहे. काही विद्वान त्याला अनुशयी म्हणजे प्रकृतीमध्ये निद्रा करणारा असे म्हणतात तर काहीजण त्याला अव्याकृत म्हणजेच प्रकृतिरूप आहे, असे म्हणतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जीवाच्या वृत्तींचे अभिमानी असणारे विश्व, तैजस आणि प्राज्ञ या मायामय रूपांमध्ये भासणारे आणि या अवस्थांच्या पलीकडील तुरीय तत्त्वामध्येसुद्धा असणारे जे ब्रह्म त्यालाच येथे ‘अपाश्रय’ म्हटले आहे. घटादी पदार्थांमध्ये माती इत्यादी द्रव्ये समाविष्ट असतात व त्याहून बाहेरही असतात किंवा नाम व आकार यांमध्ये केवळ सत्ता असते, पण ती त्याहून बाहेरही असते, त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थांत ब्रह्म उपादान कारण म्हणून समाविष्ट असते व निमित्त कारण म्हणून बाहेरही असते, त्यालाच ‘अपाश्रय’ म्हणतात. चित्त जेव्हा योगाभ्यासाने तिन्ही वृत्तींचा त्याग करून शांत होते, तेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो आणि आत्मवेत्ता पुरूष कर्म-वासना आणि कर्मप्रवृत्ती या दोहोंपासून निवृत्त होतो. (१४-२१) हे ऋषींनो ! इतिहासतज्ञ विद्वानांनी अशा लक्षणांनी युक्त अशी लहान-मोठी अठरा पुराणे सांगितली आहेत. त्यांची नावे अशी आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, लिंगपुराण, गरूडपुराण, नारदपुराण, भागवतपुराण, अग्निपुराण, स्कंदपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, मार्कंडेयपुराण, वामनपुराण, वराहपुराण, मत्स्यपुराण, कुर्मपुराण आणि ब्रह्मांडपुराण अशी ती अठरा होत. शौनका ! व्यासांच्या शिष्यपरंपरेने जी वेद-पुराणे पुढील पिढ्यांपर्यंत नेली, ते मी तुला सांगितले. हे वर्णन ऐकणारांच्या आणि वाचणार्यांच्या ब्रह्मतेजाची अभिवृद्धी करते. (२२-२५) अध्याय सातवा समाप्त |