|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १ ला
कलियुगातील राजवंशांवे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षिताने विचारले - मुनिवर्य ! यदुवंशभूषण श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणत्या वंशाचे राज्य झाले, ते मला सांगा. (१) श्रीशुक म्हणाले- राजा ! जरासंधाचा पिता बृहद्रथ याच्या वंशात पुरंजय नावाचा शेवटचा राजा होईल. त्याचा मंत्री शुनक त्या राजाला मारून आपला पुत्र प्रद्योत याला राजा करील. प्रद्योताचा पुत्र पालक, पालकाचा विशाखयूप, विशाखयूपाचा राजक आणि राजकाचा पुत्र नंदिवर्धन होईल. हे पाच ’प्रद्योतन’ एकशे अडतीस वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. (२-४) यानंतर शिशुनाग नावाचा राजा होईल. त्याचा पुत्र काकवर्ण, त्याचा क्षेमधर्मा आणि त्याचा पुत्र क्षेत्रज्ञ होईल. क्षेत्रज्ञाचा विधिसर, त्याचा अजातशत्रू, त्याचा दर्भक आणि दर्भकाचा पुत्र अजय होईल. अजयाचा नंदिवर्धन आणि त्याचा महानंदी. शिशुनागवंशामधील हे दहाच राजे तीनशे साठ वर्षे पृथ्वीवर राज्य करतील. परीक्षिता ! महानंदीला शूद्र पत्नीपासून नंद नावाचा बलवान पुत्र होईल. महानंदी हा ’महापद्म’ नावाच्या निधीचा अधिपती होईल. क्षत्रिय राजांचा तो नाश करील. तेव्हापासून बहुधा राजे शूद्र आणि अधार्मिक होतील. (५-९) महापद्म हा पृथ्वीवर एकछत्री अंमल करील. त्याची आज्ञा कोणीही मोडणार नाही. जणू दुसरा परशुरामच असा तो क्षत्रियांचा विनाश करील. सुमाल्य इत्यादी त्याचे आठ पुत्र होतील. ते सर्व राजे होऊन शंभर वर्षेपर्यंत या पृथ्वीचा उपभोग घेतील. चाणक्य नावाचा कोणी एक ब्राह्मण विख्यात नऊ नंदांना मारवील. त्यांचा नाश झाल्यावर कलियुगामध्ये मौर्यवंशी राजे पृथ्वीचे राज्य करतील. तोच ब्राह्मण चंद्रगुप्त मौर्याला राजपदाचा अभिषेक करील. त्याचा पुत्र वारिसार आणि त्याचा अशोकवर्धन होईल. त्याचा पुत्र सुयश, सुयशाचा संगत, संगताचा शालिशूक आणि शालिशूकाचा सोमशर्मा होईल. सोमशर्म्याचा शतधन्वा आणि शतधन्व्याचा पुत्र बृहद्र्थ होईल. हे कुरुवंशविभूषणा ! मौर्यवंशाचे हे दहा राजे कलियुगामध्ये एकशे सदतीस वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र , शुंग राजाचा वध करून स्वत: राजा होईल. त्याचा मुलगा अग्निमित्र आणि अग्निमित्राचा सुज्येष्ठ होईल. सुज्येष्ठाचा वसुमित्र, वसुमित्राचा भद्रक, भद्रकाच पुलिंद, पुलिंदाचा घोष आणि घोषाचा पुत्र वज्रमित्र होईल. वज्रमित्राचा भागवत आणि त्याचा पुत्र देवभूती होईल. शुंगवंशाचे हे दहा राजे शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ पृथ्वीचे पालन करतील. (१०-१८) परीक्षिता ! त्यानंतर पृथ्वी कण्ववंशाकडे जाईल. हे राजे कमी गुणवान असतील. शुंगवंशाचा राजा देवभूती हा स्त्रीलंपट असेल. त्याचा मंत्री कण्ववंशी बुद्धिमान वसुदेव त्याचा वध करील आणि स्वत: राज्य करील. त्याचा पुत्र भूमित्र, त्याचा नारायण आणि नारायणाचा सुशर्मा या नावाने प्रसिद्ध होईल. कण्ववंशातील हे चार राजे कलियुगातील तीनशे पंचेचाळीस वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. कण्ववंशी सुशर्म्याचा बली नावाचा एक शूद्र सेवक शुशर्म्याला मारून तो काही काळ स्वत: पृथ्वीवर राज्य करील. तो अंध्रजातीचा व दुष्ट असेल. यानंतर त्याचा भाऊ कृष्ण हा राजा होईल. कृष्णाचा पुत्र श्रीशांतकर्ण आणि त्याचा पौर्णमास होईल. पौर्णमासाचा लंबोदर आणि लंबोदराचा पुत्र चिबिलक होईल. त्याचा मेघस्वाती , त्याचा अटमान, त्याचा अनिष्टकर्मा, त्याचा हालेय, त्याचा तलक, त्याचा पुरीषभीरू आणि त्याचा पुत्र सुनंदन होईल. सुनंदाचा पुत्र चकोर होईल. चकोराला ’बहु’ नावाचे आठ पुत्र होतील. त्यांपैकी शिवस्वाती हा वीर असेल. त्याचा गोमतीपुत्र आणि त्याचा पुत्र पुरीमान होईल. त्याचा मेद:शिरा, मेद:शिराचा शिवस्कंद, शिवस्कंदाचा यज्ञश्री, यज्ञश्रीचा विजय आणि विजयाचे चंद्रविज्ञ आणि लोमधी नावाचे दोन पुत्र होतील. परीक्षिता हे तीस राजे चारशे छपन्न वर्षेपर्यंत पृथ्वीचे राज्य उपभोगतील. (१९-२८) यानंतर अवभृती नगरीचे सात आभीर, दहा गर्दभी आणि सोळा कंक (राजे) पृथ्वीवर राज्य करतील. हे अतिशय लोभी असतील. यानंतर आठ यवन आणि चौदा तुर्क राजे राज्य करतील. त्यानंतर दहा गुरुंड आणि अकरा मौन राजे होतील. परीक्षिता ! मौनांच्या खेरीज इतर सर्वजण एक हजार नव्व्याण्णव वर्षेपर्यंत पृथ्वीचा उपभोग घेतील. तसेच अकरा मौन राजे तीनशे वर्षेपर्यंत पॄथ्वीवर शासन करतील. ते गेल्यावर किलिकिला नावाच्या नगरीत भूतनंद, वंगिरी, शिशुनंदी, त्याचा भाऊ यशोनंदी आणि प्रवीरक हे एकशे सहा वर्षे राज्य करतील. (२९-३३) त्यांना बाह्लिक नावाचे तेरा पुत्र होतील. त्यांच्यानंतर पुष्पमित्र नावाचा क्षत्रिय आणि त्याचा पुत्र दुर्मित्र यांचे राज्य असेल. बाह्लिक वंशातील राजे एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करतील. त्यांपैकी सात आंध्रदेशाचे व सात कोसल देशाचे अधिपती होतील. काही विदूर भूमीचे शासक तर काही निषध देशाचे राजे होतील. (३४-३५) यानंतर विश्वस्फूर्जी मगध देशाचा राजा होईल. हा दुसरा पुरंजय, ब्राह्मण इत्यादी वर्णांचे पुलिंद, यदू, मद्र इत्यादी म्लेंच्छांसारख्या जातींमध्ये रूपांतर करील. हा इतका दुष्ट असेल की, तो तीन वर्णांशिवाय असलेल्या जनतेची स्थापना करील . आपल्या शौर्याने तो क्षत्रियांचा विध्वंस करील आणि पद्मवतीपुरी या राजधानीत हरिद्वारापासून प्रयागपर्यंतच्या पृथ्वीचे राज्य करील. हळू हळू सौराष्ट्र , अवंती, आभीर, शूर, अर्बुद आणि मालव देशांतील ब्राह्मण संस्कारशून्य होतील. तसेच राजेसुद्धा शूद्रतुल्य होतील. सिंधुतट, चंद्रभागेचा तट, कौंतीपुरी आणि काश्मीर परिसरावर प्राधान्येकरून शूद्रांचे , संस्कार व ब्रह्मतेज नाहीसे झालेल्या ब्राह्मणांचे , तसेच म्लेंच्छांचे राज्य असेल. (३६-३९) परीक्षिता ! हे राजे आचार-विचाराच्या बाबतीत म्लेंच्छांसारखे असतील. हे सर्वजण एकाच वेळी निरनिराळ्या प्रांतांमध्ये राज्ये करतील. हे सगळे अधार्मिक, खोटारडे, कंजूष आणि रागीट असतील. हे दुष्ट लोक स्त्रिया, मुले, ब्राह्मण यांना मारून टाकण्यात संकोच करणार नाहीत. दुसर्यांच्या स्त्रिया आणि धन हडप करण्यासाठी हे नेहमी उत्सुक असतील. यांची उन्नती किंवा अध:पतन होण्यास वेळ लागणार नाही. हे हलक्या मनाचे व अल्पायुषी असतील. हे संस्कारहीन कर्तव्यशून्य रजोगुण-तमोगुणाने व्यापलेले , राजाच्या रूपातील म्लेंच्छ प्रजेला खाऊन टाकतील. (४०-४२) राजेच असे असतील, तेव्हा देशातील प्रजेचा स्वभाव, आचरण आणि बोलणे - चालणेही तसेच असेल. राजांकडून त्रस्त झालेली प्रजा आपापसातसुद्धा एकमेकांना त्रास देऊन नष्ट होईल. (४३) अध्याय पहिला समाप्त |