श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय २ रा

कलियुगाचे धर्म -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल. कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल, त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील. धर्म आणि न्याय यांच्याबाबतीत शक्ती प्रभावी ठरेल. विवाहसंबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील. व्यवहारात कपटालाच महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरुन ठरेल. ब्राह्मण्याची ओळख ’जानवे’ एवढीच असेल. बाह्य वेषावरूनच आश्रम ठरेल आणि बाह्य वेषावरूनच दुसर्‍या आश्रमात प्रवेश करणे असेल. पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल. गरिबी हेच दुर्जनत्त्वाचे लक्षण असेल. आणि दांभिकपणा हेच साधुत्वाचे लक्षण असेल. एकमेकांची पसंती हाच विवाहसंस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. (१-५)

लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील. डोक्यावर केस राखणे हे सौ‍ंदर्याचे चिन्ह समजले जाईल. आपले पोट भरणे हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल. कुटुंबाचे पालन-पोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळविण्यासाठी धर्माचरण केले जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल, तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांपैकी जो बलाढ्य असेल, तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिऊन प्रजा डोंगर-दर्‍यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला , कंदमुळे, मांस, मध, फळे-फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरील. कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षाव होईल. कधी तुफान होईल, कधी उष्णता वाढेल, तर कधी पूर येतील. या उत्पातांनी आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल. लोक तहान-भूक, रोग व अनेक प्रकारच्या चिंतांनी दु:खी होतील. कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस वर्षे असेल. (६-११)

कलिकाळाच्या दोषांमुळे प्राण्यांची शरीरे लहान आणि रोगग्रस्त होऊ लागतील. वर्ण आणि आश्रम यांचे धर्म सांगणारा वेदमार्ग नष्टप्राय होऊन जाईल. धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहील. राजे चोरांसारखे लोकांना लुबाडतील . चोरी, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करून लोक उपजीविका चालवितील. चारही वर्णांचे लोक शूद्रांप्रमाणे होतील. गाई शेळ्यांप्रमाणॆ लहान शरीराच्या आणि कमी दूध देणार्‍या असतील. आश्रमही घरांसारखे होतील. वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानले जाईल. (१२-१४)

धान्यांची रोपे आखूड होत जातील. मोठी झाडे शमीच्या झाडांप्रमाणे कमी उंचीची व दाट सावली नसलेली होतील. ढगांमध्ये विजाच जास्त चमकतील. घरेही सुनी सुनी होतील. अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वत: सत्त्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील. (१५-१६)

सर्वशक्तीमान , सर्वस्वरूप, चराचराचे गुरू भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात. त्या काळी शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असणार्‍या विष्णूयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कल्की नावाने भगवान अवतार घेतील. अष्टमहासिद्धींना संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय , चराचर जगताचे स्वामी भगवान, देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा नायनाट करतील. अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवरून संचार करतील आणि राजे म्हणवणार्‍या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील. (१७-२०)

जेव्हा सर्व लुटारूंचा संहार होईल, तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील. त्यांच्या हॄदयामध्ये सत्त्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे त्यांची संतती बलवान होऊ लागेल. धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील, तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी संतती सात्विक होईल. जेव्हा चंद्र , सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील, त्यावेळी सत्ययुगाची सुरुवात होईल. (२१-२४)

चंद्रवंश आणि सूर्यवंशामध्ये जितके राजे होऊन गेले किंवा होतील, त्या सर्वांचे मी थोडक्यात वर्णन केले. तुझा जन्म झाल्यापासून नंदाला राज्याभिषेक होईपर्यंत एक हजार एकशे पंधरा वर्षे होतील. जेव्हा आकाशात सप्तर्षींचा उदय होतो, तेव्हा प्रथम त्यातील दोनच तारे दिसतात. त्यांच्यामध्ये दक्षिणोत्तर रेषेवर मध्यभागी एक नक्षत्र दिसते. सप्तर्षी नक्षत्राबरोबर मनुष्यांची शंभर वर्षेपर्यंत राहातात. ते तुझ्या जन्माच्यावेळी आणि आतासुद्धा मघा नक्षत्रात आहेत. (२५-२८)

भगवान विष्णूंचा सत्वमय श्रीकृष्णरूप अवतार जेव्हा परमधामाकडे गेला, तेव्हाच कलियुगाने या जगात प्रवेश केला. त्यामुळेच माणसे पापात रममाण झाली. जोपर्यंत लक्ष्मीपतींच्या चरणकमलांचा स्पर्श पृथ्वीला होत होता, तोपर्यंत कलियुग पृथ्वीवर येऊ शकले नाही. ज्यावेळी सप्तर्षी मघा नक्षत्राभोवती फिरतात, त्याचवेळी कलियुग सुरू होते. देवतांच्या कालगणनेनुसार कलियुगाचे आयुष्य बाराशे वर्षांचे म्हणजेच माणसांच्या कालगणनेनुसार चार लक्ष बत्तीस हजार वर्षांचे आहे. जेव्हा सप्तर्षी मघा नक्षत्रातून पूर्वाषाढा नक्षत्रात गेलेले असतील, त्यावेळी पृथ्वीवर नंदांचे राज्य असेल. तेव्हापासून कलियुगाची वाढ होऊ लागेल. इतिहासवेत्त्या विद्वानांचे म्हणणे आहे की, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी परम धामाकडे प्रयाण केले, त्याच दिवशी त्याच वेळी कलियुगाची सुरुवात झाली. परीक्षिता ! देवतांच्या कालगणनेनुसार जेव्हा एकहजार वर्षे होऊन जातील, तेव्हा कलियुगाच्या शेवटच्या दिवसात पुन्हा माणसांची मने, सात्विक वृत्ती वाढून आपले खरे स्वरूप जाणतील. तेव्हापासून सत्ययुगाची पुन्हा सुरुवात होईल. (२९-३४)

मी तुला पृथ्वीवरील मनुवंशाचे वर्णन करून सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक युगामध्ये ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांचीसुद्धा वंशपरंपरा असते, असे समज. राजन ! जे पुरुष आणि महात्मे यांचे मी तुला वर्णन करून सांगितले, त्यांची फक्त नावे आहेत. गोष्टींच्या रूपात असलेल्या त्यांची फक्त कीर्तीच पृथ्वीवर आहे. शंतनूचा भाऊ देवापी आणि इक्ष्वाकुवंशातील मरू हे सध्या कलाप नावाच्या गावात आहेत. ते तीव्र योगबमाने युक्त असे आहेत. कलियुगाच्या शेवटी, वासुदेवांच्या आज्ञेवरून ते पुन्हा येथे येतील आणि पूर्वीप्रमाणेच वर्णाश्रमधर्माची स्थापना करतील. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत. याच क्रमाने ती आपापल्या वेळी पृथ्वीवरील प्राण्यांवर आपला प्रभाव पाडतात. परीक्षिता ! मी तुला जे वर्णन करून सांगितले, ते सर्व , तसेच इतर राजेसुद्धा या पृथ्वीला ’माझी माझी’ म्हणत शेवटी मरून गेले. राजा हे नाव असलेल्याही या शरीराचे शेवटी किडा, विष्ठा किंवा राख यातच रूपांतर होते. त्यासाठी जो कोणत्याही प्राण्याला त्रास देतो, त्याला आपला स्वार्थच समजत नाही. कारण शेवटी आपल्याला नरकच मिळणार, हे त्याला कळत नाही. ते लोक असा विचार करतात की, आपले पूर्वज ज्या अखंड पृथ्वीवर राज्य करीत होते, ते आता माझ्या ताब्यात कसे राहील आणि माझ्यानंतर माझा मुलगा, नातू किंवा माझे वंशज कशा त-हेने याचा उपभोग घेतील? ते मूर्ख ह्या अग्नी, पाणी आणि मातीच्या शरीराला आपले मानतात आणि ही पृथ्वी आपली मानतात. शेवटी ते हे शरीर आणि जग दोन्ही सोडून स्वत: अदृश्य होतात. परीक्षिता ! ज्या ज्या राजांनी स्वसामर्थ्याने या पृथ्वीचा उपभोग घेतला, त्या सर्वांना काळाने फक्त कथेत शिल्लक ठेवले. (३५-४४)

अध्याय दुसरा समाप्त

GO TOP