श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ३१ वा

श्रीभगवंतांचे स्वधामगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! नंतर ब्रह्मदेव, शिवपार्वती, इंद्र इत्यादी देव, प्रजापतींसह सनकादिक मुनी, पितर, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, नाग, चारण, यक्ष, राक्षस, किन्नर, अप्सरा तसेच मैत्रेय इत्यादी ब्राह्मण, भगवंतांचे परमधामप्रस्थान पाहाण्यासाठी अतिशय उत्सुकतेने तेथे आले ते सर्वजण श्रीकृष्णांचा जन्म आणि लीलांचे गायन करीत होते त्यांच्या विमानांनी सर्व आकाश भरून गेले होते मोठ्या भक्तिभावाने ते भगवंतांवर पुष्पवर्षाव करीत होते. (१-४)

सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच विभूतिस्वरूप असलेल्या पितामह ब्रह्मदेव इत्यादींना पाहून स्वतःला आत्मस्वरूपात स्थिर केले आणि आपले कमळनेत्र बंद करून घेतले. (५)

भगवंतांचा श्रीविग्रह उपासकांच्या धारणा आणि ध्यानासाठी परम मंगलमय असा आश्रय आहे म्हणून अग्निमय योगधारणेने तो न पाळता ते आपल्या धामाला निघून गेले. त्यावेळी स्वर्गामध्ये नगारे वाजू लागले आणि आकाशातून पुष्पवर्षाव होऊ लागला त्यांच्या पाठोपाठ पृथ्वीवरून सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती आणि लक्ष्मीसुद्धा निघून गेली. (६-७)

जेव्हा भगवान आपल्या धामामध्ये प्रवेश करू लागले, तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देवसुद्धा मनालाही न कळणार्‍या त्यांना पाहू शकले नाहीत या घटनेचे त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. जेव्हा ढगांमधून वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होऊन जाते, माणसांना तिचे जाणे कळत नाही, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचा आपल्या धामातील प्रवेश देव पाहू शकले नाहीत. ब्रह्मदेव, शंकर, इत्यादी देव भगवंतांची ही योगमय गती पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांची स्तुती करीत आपापल्या लोकी निघून गेले. (८-१०)

परीक्षिता ! एखाद्या नटाप्रमाणे भगवंतांचे मनुष्याप्रमाणे जन्म घेणे, निरनिराळ्या लीला करणे व अंतर्धान पावणे हा सर्व त्यांनी मायेने केलेला अभिनय आहे ते स्वतःच या जगाची निर्मिती करून, त्यात प्रवेश करून विहार करतात आणि त्याचा संहार करून शेवटी आपल्या महिम्यातच राहातात. शरणागतवत्सल जे, यमपुरीत गेलेल्या गुरूपुत्राला त्याच शरीराने घेऊन आले, ब्रह्मास्त्राने जळालेले तुझे शरीर ज्यांनी जिवंत केले, काळाचासुद्धा महाकाळ असलेल्या भगवान शंकरांना ज्यांनी युद्धामध्ये जिंकले, स्वतःच्या अपराधी व्याधालाही ज्यांनी सदेह स्वर्गाला पाठविले, ते स्वतःच्या रक्षणाला असमर्थ होते काय ? संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहाराचे असाधारण कारण व सर्व शक्तींना धारण करणारे भगवान आपले शरीर शिल्लक ठेवू इच्छित नव्हते कारण आत्मनिष्ठ योग्याने मर्त्य शरीरात गुंतून न राहाता, आत्मस्वरूपात कसे राहावे, याचा आदर्श त्यांना जगापुढे ठेवायचा होता. जो पुरूष प्रातःकाळी उठून भगवान श्रीकृष्णांच्या परमधामगमनाच्या या कथेचे एकाग्रतेने भक्तिपूर्वक कीर्तन करील, त्याला भगवंतांचे तेच सर्वश्रेष्ठ परमपद प्राप्त होईल. (११-१४)

इकडे दारूक भगवान श्रीकृष्णांच्या विरहाने व्याकूळ होऊन द्वारकेला आला आणि त्याने वसुदेव व उग्रसेन यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण अश्रूंनी भिजवून टाकले. परीक्षिता ! त्याने यादवांच्या विनाशाचा सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून लोक अतिशय दुःखी झाले आणि. (काही) शोकावेगाने मूर्च्छितही होऊन पडले. श्रीकृष्णांच्या वियोगाने व्याकूळ झालेले ते लोक कपाळ बडवून घेत, जेथे त्यांचे बांधव निष्प्राण होऊन पडले होते, तेथे तत्काळ जाऊन पोहोचले. देवकी, रोहिणी आणि वसुदेव, आपले पुत्र श्रीकृष्ण व बलराम तेथे न दिसल्याने शोकावेगाने बेहोष झाले. भगवद्‌विरहाने व्याकूळ होऊन त्यांनी तेथेच प्राण सोडले. (काही) स्त्रियांनी आपापल्या पतींची प्रेते ओळखून त्यांना हृदयाशी धरले आणि त्यांच्याबरोबरच त्या चितेवर चढल्या. बलरामांच्या पत्‍न्यांनी त्यांच्या शरीराला कवटाळून, वसुदेवांच्या पत्‍न्यांनी त्यांच्या शवाला घेऊन आणि भगवंतांच्या सुनांनी प्रद्युम्न इत्यादी पतींच्या देहांसह अग्नीमध्ये प्रवेश केला भगवान श्रीकृष्णांच्या रूक्मिणी इत्यादी राण्या त्यांच्या ध्यानात मग्न होऊन अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्या. (१५-२०)

आपला प्रियतम आणि सखा असलेल्या श्रीकृष्णांच्या विरहाने सैरभैर झालेल्या अर्जुनाने त्यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या आत्मज्ञानपर उपदेशाचे स्मरण करून आपले मन सावरले. अर्जुनाने वंश नष्ट झालेल्या मृत यादवांची अंत्यक्रिया विधिपूर्वक क्रमशः करविली. महाराज ! भगवंतांनी सोडलेली द्वारका समुद्राने त्यांचे निवासस्थान सोडून एका क्षणात सगळी बुडवून टाकली. भगवान श्रीकृष्ण तेथेच अजूनही सदैव निवास करतात ते स्थान केवळ स्मरणाने सर्व पापताप नाहीसे करणारे आणि सर्व मंगलांचेही मंगल करणारे आहे. तेथे ज्या स्त्रिया, मुले, वृद्ध इत्यादी वाचले होते, त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला तेथे सर्वांची यथायोग्य व्यवस्था लावली आणि अनिरूद्धाचा पुत्र वज्र याला तेथे राज्याभिषेक केला. राजन ! तुझ्या आजोबांना अर्जुनाकडून यादवसंहार समजला, तेव्हा त्यांनी तुला राज्याभिषेक केला आणि ते सारे महाप्रयाणाला निघून गेले. (२१-२६)

देवाधिदेव श्रीविष्णूंचे हे अवतार आणि कर्मे यांचे जो मनुष्य श्रद्धेने पठन करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य भगवान श्रीहरींचे असे सुंदर अवतार आणि अद्‌भुत लीला, तशाच परमानंदमय बाललीला ज्या येथे व अन्य पुराणांत वर्णन केलेल्या आहेत, त्यांचे श्रवणपठन करतो, तो परमहंसांचे अंतिम प्राप्तव्य असलेल्या श्रीकृष्णांची पराभक्ती प्राप्त करून घेतो. (२७-२८)

अध्याय एकतिसावा समाप्त
॥ इति एकादशः स्कन्धः समाप्तः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ हरिः ॐ तत्सत्‌ ॥

GO TOP