|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २८ वा
परमार्थनिरूपण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] भगवान श्रीकृष्ण म्हणतात दुसर्याच्या स्वभावाची किंवा कामांची प्रशंसा करू नये किंवा निंदा करू नये कारण प्रकृती आणि पुरूष या दोघांपासून उत्पन्न झालेले विश्व एकरूपच आहे. जी व्यक्ती दुसर्याच्या स्वभावाची किंवा कर्माची निंदास्तुती करते, ती द्वैतदृष्टीमुळे परमार्थ मार्गापासून तत्काळ भ्रष्ट होते. इंद्रिये झोपलेली असतात, त्या वेळी देहात राहाणारा जीव ज्ञानशून्य होतो कधीकधी पाहातो किंवा गाढ निद्रेत पूर्ण ज्ञानशून्य होऊन जातो त्याप्रमाणे द्वैत दृष्टीच्या माणसाची स्थिती असते. प्रत्यक्षात द्वैत नावाची वस्तूच नाही, तर तिच्याबाबतीत चांगले किंवा वाईट म्हणणे हा सर्व शब्दांचा खेळ आहे म्हणून द्वैत खोटे आहे ती केवळ मनाची कल्पना आहे. सावली, प्रतिध्वनी आणि दोरीवर सापाचा आभास हे तिन्हीही खरे नसतात, परंतु ते आपापले कार्य करतातच त्याप्रमाणे देह इत्यादी पदार्थ सुद्धा खोटे आहेत, पण ते प्राण्यांना मरेपर्यंत भीती देतच असतात. हे संपूर्ण विश्व आत्माच आहे तोच सर्वशक्तिमान, सर्वांचा नियन्ता व सर्वरूप आहे तो स्वतःच उत्पन्न होणारा व उत्पन्न करणारा आहे तो स्वतःच स्वतःचे रक्षण करतो आणि स्वतःच स्वतःचा संहारही करतो. अशा रीतीने आत्म्याशिवाय इतर कोणतीही वस्तू सिद्ध होत नाही तरीसुद्धा आत्म्याहून वेगळा असा जो देहइंद्रियअन्तःकरणरूप तीन प्रकारचा भेद दिसतो, तो निराधार आहे परंतु नसतानाही जो आत्म्याच्या ठिकाणी तीन प्रकारांनी भासतो, त्याला तू त्रिगुणात्मक मायेचेच कार्य समज. ज्ञानविज्ञानाने युक्त असा हा माझा उपदेश जाणून विद्वान कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही तो सूर्याप्रमाणे सगळीकडे समभावाने वागतो. प्रत्यक्ष, अनुमान, शास्त्र, महापुरूषांची वचने व आत्मानुभूती या प्रमाणांनी सर्व दृश्य वस्तू उत्पत्ती आणि शेवट यांनी युक्त आहेत, म्हणजेच त्या नसल्यासारख्या आहेत म्हणून अनासक्त होऊन जगामध्ये राहावे. (१-९) उद्धवाने विचारले भगवन ! आत्मा हा साक्षी असून स्वयंप्रकाशित आहे तो काहीही करीत नाही आणि देह दृश्य असून अचेतन आहे, म्हणून तोही काही करू शकत नाही परंतु त्याचा अनुभव तर येतो, तो कोणाला ? आत्मा अविनाशी, निर्गुण, शुद्ध, आतबाहेर परिपूर्ण आणि अग्नीप्रमाणे स्वयंप्रकाशी आहे आणि शरीर, लाकडासारखे अचेतन आहे तर मग जन्ममृत्यूरूप संसार कोणाला ? (१०-११) भगवान श्रीकृष्ण म्हणाले जोपर्यंत आत्म्याचा संबंध देह, इंद्रिये आणि प्राण यांच्याशी असतो, तोपर्यंत अज्ञानी माणसाला हे जग असत्य असूनही सत्य वाटते. जसे स्वप्नात अनेक पदार्थ नसूनही दिसतात, परंतु जाग येताच ते सर्व नाहीसे होतात, त्याचप्रमाणे जागेपणी सर्व विषय खोटे असले, तरीसुद्धा त्यांचे नेहमी चिंतन करीत राहिल्याने ते खरे वाटतात त्यामुळे संसार नाहीसा होत नाही. जोपर्यंत माणूस स्वप्न पाहात असतो, तोपर्यंत त्याला मोठमोठ्या संकटांशी सामना करावा लागतो परंतु जेव्हा तो जागा होतो, तेव्हा स्वप्नातील ती संकटे त्याला पीडा देत नाहीत. जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी मीमाझेपण आहे, तोपर्यंतच शोक, हर्ष, क्रोध, लोभ, मोह, इच्छा इत्यादी विकार त्याला दिसतात आणि जन्ममृत्यूचे दुःख भोगावे लागते आत्म्याचा यांच्याशी काहीही संबंध नाही. देह, इंद्रिये, प्राण आणि मन यांमध्ये राहाणारा आत्माच जेव्हा गुण आणि कर्मांनी युक्त असलेल्या लिंगशरीराचा अभिमान धरतो, तेव्हा त्याला जीव म्हणतात हा जीवरूप आत्माच सूत्रात्मा, महत्तत्त्व इत्यादी पुष्कळशा नावांनी ओळखला जातो तो काळाच्या अधीन होऊन संसारात येजा करतो. अहंकारामुळे मन, वाणी, प्राण, शरीर यांच्या ठिकाणी होणारी कर्मे देव, मनुष्य इत्यादी अनेक रूपांमध्ये दिसत असली तरी त्यांना काहीच मूळ नाही विवेकी मनुष्य सर्व दृष्टींनी तृष्णारहित होऊन, उपासनेच्या साण्यावर धार लावलेल्या ज्ञानरूपी खड्गाने या अहंकारवृक्षाला तोडून जगामध्ये वावरतो. जे या जगताच्या सुरूवातीला आणि शेवटी आहे, केवळ तेच मध्येसुद्धा आहे ते म्हणजे या विश्वाला प्रकाशित करणारे व विश्वाचे कारण असलेले ब्रह्म होय ते वेद, स्वधर्माचरण, स्वानुभव, उपदेश, आणि तर्क यांच्या साह्याने जाणून घेणे, हेच ज्ञान होय. (१२-१८) सोन्यापासून कंकणे, कुंडले इत्यादी अलंकार तयार होतात, परंतु ते अलंकार बनण्यापूर्वी व मोडल्यानंतर सोनेच असतात मध्ये केवळ त्याचेच कंकणकुंडल इत्यादी अनेक नावांनी व्यवहार केले जातात तेव्हाही ते सोनेच असते त्याप्रमाणे या जगताच्या प्रारंभी, अंती आणि मध्ये अनेक नावेरूपे असलेला मीच असतो. हे उद्ववा ! जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांनी युक्त मन, त्या अवस्थांना कारण असणारे तीन गुण आणि त्या त्रिगुणांचे कार्य असणारे अध्यात्म, अधिभूत व अधिदैव असे त्रिविध विश्व ज्या चौथ्या परमात्मतत्त्वामुळे अनुभवाला येते व समाधि अवस्थेत या त्रिविधतेचा अनुभव येत नसला तरी ते तत्त्व असते, तेच सत्य होय. जे अगोदरही नव्हते आणि शेवटीही राहाणार नाही, ते जग मध्येही नाहीच ते फक्त नाममात्र आहे जे जे ज्या कारणापासून उत्पन्न झाले व ज्याच्यामुळे अनुभवाला येते, ते ते सर्व कारणस्वरूपच आहे, असा माझा दृढ निश्चय आहे. ही जी कार्यरूप राजस सृष्टी दिसते, ती नसूनही दिसत आहे कारण ही स्वयंप्रकाश ब्रह्मच आहे म्हणून इंद्रिये, विषय, मन आणि पंचमहाभूते इत्यादी विविध नामरूपे ब्रह्म होत. अशा प्रकारे ब्रह्माचा विचार करणार्या सर्व साधनांच्या द्वारा कुशलतापूर्वक दुसर्या वस्तूचे पूर्णपणे निराकरण करून, आत्म्याबद्दलचा संशय दूर करून आणि सर्व तर्हेच्या कामनांचा त्याग करून आत्मानंदात मग्न असावे. हे शरीर पृथ्वीचे कार्य असल्यामुळे आत्मा नव्हे त्याचप्रमाणे इंद्रिये त्यांच्या देवता, प्राण, वायू, जल, अग्नी म्हणजे आत्मा नव्हे मन म्हणजे सुद्धा आत्मा नव्हे कारण ते अन्नाचे कार्य आहे बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, पृथ्वी, शब्दादी विषय आणि तीन गुणांची साम्यावस्था अशी जी प्रकृती, हे सर्वसुद्धा आत्मा नव्हेत. (१९-२४) जसे आकाशात ढग आले काय नि गेले काय ! त्यामुळे सूर्याची काय लाभहानी आहे ? त्याचप्रमाणे ज्याला माझ्या स्वरूपाचे योग्य रीतीने ज्ञान आले, त्याची त्रिगुणात्मक इंद्रिये एकाग्र झाली म्हणून त्यापासून त्याला काय फायदा होणार आहे ? आणि चंचल झाली म्हणून काय तोटा होणार आहे ? जसे आकाशाला वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ही भूते आकाशात असली तरी यांचे गुण त्याला चिकटत नाहीत किंवा ऋतूंचे गुणही त्याला चिकटत नाहीत त्याचप्रमाणे सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाच्या वृत्ती व कर्मे हे सर्व अविनाशी आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत जो यांचे ठिकाणी अहंकार धरतो, त्यालाच यांच्यामुळे जगाच्या फेर्यात फिरावे लागते. असे असूनही जोपर्यंत माझा सुदृढ भक्तियोग साध्य होऊन त्यायोगे मनाचा रजोगुणरूप मळ कायमचा निघून जात नाही, तोपर्यंत या मायानिर्मित गुणांची संगत सर्वथैव सोडली पाहिजे. (२५-२७) जसे, योग्य निदान झाले नाही, तर रोग पुन्हा पुन्हा डोके वर काढून माणसाला त्रास देतो, त्याप्रमाणे ज्या मनातील वासना आणि कर्मांचे संस्कार नाहीसे झाले नाहीत आणि जो विषयांत आसक्त आहे, अशा अर्धवट योग्याला या वासना त्रास देतच राहातात. देवतांनी मनुष्यरूपात निर्माण केलेल्या विघ्नांनी कदाचित सामान्य योगी योगापासून भ्रष्ट झाला, तरी आपल्या पूर्वाभ्यासाच्या योगाने तो पुन्हा योगाभ्यासच करू लागतो कर्मांमध्ये त्याची प्रवृत्ती होत नाही. जीव कोणाच्या तरी प्रेरणेने मरेपर्यंत कर्मे करतो आणि त्यांचे हर्ष, विषाद इत्यादी परिणाम मनावर करून घेतो परंतु आत्मज्ञानी संसारात असूनही हर्षशोक इत्यादी विकारांनी विचलित होत नाही कारण परमानंदाच्या साक्षात्कारामुळे त्याच्या सर्व आशा नष्ट झालेल्या असतात. (२८-३०) जो आता स्वरूपात स्थित झाला त्याला, आपण उभे आहोत की बसलेले आहोत, चालत आहोत की झोपलेले आहोत, मलमूत्र त्यागीत आहोत की भोजन करीत आहोत की आणखी काही स्वाभाविक कर्मे करीत आहोत, या गोष्टींचा पत्ता नसतो. ज्ञानी पुरूष हे मिथ्या इंद्रियांचे विषय जरी पाहात असला, तरी ते अनेक असल्यामुळे तर्काने मिथ्या ठरवतो किंबहुना त्यांना आत्म्यापासून वेगळे असल्यामुळे सत्य मानीत नाही जाग आल्यावर जसे नाहीसे झालेले स्वप्नातील पदार्थ कोणी सत्य मानीत नाही. उद्धवा ! अनेक प्रकारचे गुण आणि कर्मे यांनी युक्त हा देह, इंद्रिये इत्यादी पदार्थ अज्ञानामुळे आत्म्यापासून वेगळे नाहीत, असे वाटत होते परंतु ज्ञानामुळेच ते अज्ञान दूर होते आत्मा घेतलाही जात नाही किंवा टाकलाही जात नाही. जसा सूर्योदय माणसांच्या दृष्टीचा अंधार नाहीसा करतो, तो नवीन काही निर्माण करीत नाही त्याचप्रमाणे माझे खरे ज्ञान मनुष्याच्या बुद्धीतील अज्ञान नाहीसे करते एवढेच. हा आत्मा स्वयंप्रकाशित, अजन्मा, अप्रमेयस्वरूप, महाअनुभूतिस्वरूप आहे सर्व अनुभूती त्याचेच ठिकाणी अनुभवाला येतात हा आत्मा एक आहे अद्वितीय आहे त्याच्या बाबतीत वाणी मूक झाल्यावर तोच शिल्लक राहातो कारण त्याच्याच प्रेरणेमुळे वाणी आणि प्राण हे आपापले कार्य करतात. (३१-३५) अद्वितीय आत्मतत्त्वामध्ये भेदाची कल्पना केली जाते, तेच अज्ञान होय या भ्रमालाही आत्म्याशिवाय दुसरे अधिष्ठानच नाही. जे स्वतःला पंडित समजतात असे लोक नामरूपामुळे जे ग्रहण केले जाते ते हे पंचमहाभूतत्मक द्वैत जग सत्य आहे, असे मानतात परंतु पदार्थांशिवायच त्यांना येणारा हा अनुभव असल्यामुळे तो सत्य नाही. (३७) एखाद्या साधकाच्या शरीराला योगसाधना पूर्ण होण्याच्या अगोदरच जर रोग इत्यादी उपद्रव उत्पन्न झाले, तर त्याने पुढील उपाय करावेत. काही उपद्रव योगधारणेने, काही धारणायुक्त आसनांनी आणि काही तपश्चर्या, मंत्र, औषधे इत्यादींनी नाहीसे करावेत. काही विघ्ने माझे चिंतन व नामसंकीर्तन इत्यादींनी नष्ट करावीत काही अकल्याण करणारी विघ्ने महापुरूषांची सेवा करून हळूहळू दूर करावीत. काही बुद्धीमान योगी विविध उपाय योजून हे शरीर सुदृढ आणि तारूण्यवस्थेत स्थिर करून अणिमादी सिद्धी प्राप्त करण्यासाठी योगसाधना करतात परंतु शहाणे लोक या विचाराला मान्यता देत नाहीत कारण तो एक निरर्थक प्रयत्न आहे झाडाला लागलेल्या फळाप्रमाणे या शरीराचासुद्धा निश्चितपणे नाश होणार असतो. अखंड योगसाधना करीत राहिल्याने शरीर जरी सुदृढ झाले, तरीसुद्धा बुद्धिमान पुरूषाने साधना करण्याचे थांबवून त्यातच सुंतष्ट राहाता कामा नये माझ्या प्राप्तीसाठी त्याने नेहमीच प्रयत्नशील असावे. जो योगी माझा आश्रय घेऊन, या योगसाधनेमध्येच निमग्न राहातो, त्याला कोणतेही विघ्न डळमळीत करू शकत नाही त्याच्या सर्व इच्छा नष्ट होतात आणि आत्मानंदाच्या अनुभूतीमध्ये तो मग्न होऊन जातो. (३८-४४) अध्याय अठ्ठाविसावा समाप्त |