|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २९ वा
भागवत धर्मांचे निरूपण आणि उद्धवाचे बदरिकाश्रमाला जाणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] उद्धव म्हणाला हे अच्युता ! मन ज्याच्या ताब्यात नाही, त्याच्यासाठी ही योगसाधना करणे अतिशय अवघड आहे, असे मला वाटते म्हणून आपण जेणे करून माणूस सहजपणे परमपद प्राप्त करू शकेल, असा सोपा उपाय मला सांगा. हे कमलनयना ! बहुतेक योगी जेव्हा आपले मन एकाग्र करू लागतात, तेव्हा वारंवार प्रयत्न करूनही मन वश न झाल्यामुळे खिन्न होतात त्यांना मनोनिग्रहाच कष्ट तेवढे होतात. हे कमलनयना ! हे विश्वेश्वरा ! म्हणूच सारासार विचार करणारे भक्त आनंदाचा वर्षाव करणार्या आपल्या चरणकमलांचा आनंदाने आश्रय घेतात परंतु जे योगकर्मांनीच सिद्धी मिळवू इच्छितात, अशा अहंकारी लोकांची बुद्धी आपल्या मायेने भ्रष्ट झाल्यामुळे ते आपल्या चरणकमलांचा आश्रय घेत नाहीत. हे अच्युता ! आपण सर्वांचे बंधू आहात आपण आपल्या अनन्य शरणागत भक्तांच्या अधीन होता, यात काय आश्चर्य ! ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल, ज्यांनी चरणकमल ठेवलेल्या चौरंगावर आपले दिव्य मुकुट घासतात, तेच आपण रामावतारामध्ये वानरांबरोबर मित्राप्रमाणे वागलात ! हे प्रभो ! आपण सर्वांचे प्रियतम स्वामी आणि आत्मा आहात शरणागतांना सर्वस्व देणारे आहात आपण भक्तांसाठी जे केले, ते जाणणारा कोण बरे आपल्याला सोडील ? तसेच आपला विसर पाडणार्या विषयसुखांच्या मागे कोण लागेल ? आपल्या चरणकमलांच्या धुळीचे उपासक असणार्या आम्हांला दुर्लभ असे काय आहे बरे ? हे ईश्वरा ! आपण केलेल्या उपकारांचे स्मरण होऊन अधिकाधिक आनंदित होणारे आत्मज्ञानी ब्रह्मदेवाचे आयुष्य जरी त्यांना मिळाले, तरीसुद्धा ते आपल्या उपकारांची परतफेड करू शकणार नाहीत जे आपण मनुष्यांच्या अंतरंगात आत्मरूपाने आणि बाहेर आचार्यांच्या रूपाने राहून त्यांचे पाप नाहीसे करता व त्यांच्यापुढे स्वतःला प्रकट करता. (१-६) श्रीशुकदेव म्हणतात भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेव इत्यादी ईश्वरांचे सुद्धा ईश्वर आहेत तेच आपल्या शक्तींनी ब्रह्मदेव, विष्णू आणि रूद्र यांचे रूप धारण करून जगाची उत्पत्ती, स्थिती, लयरूप खेळ खेळतात उद्धवाने अत्यंत प्रेमाने भरलेल्या चित्ताने त्यांना असे विचारले, तेव्हा त्यांनी मोहक हसून मोठ्या प्रेमाने सांगण्यास प्रारंभ केला. (७) श्रीभगवान म्हणाले छान ! मी तुला माझे अत्यंत मंगलमय धर्म सांगतो त्यांचे श्रद्धापूर्वक आचरण केल्याने मनुष्य जिंकण्यास अत्यंत कठीण अशा संसाररूप मृत्यूला सहज जिंकून घेतो. मनुष्याने आपली सगळी कर्मे माझ्यासाठीच करावीत आणि ती करतेवेळी माझे स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा त्यामुळे त्याचे मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल आणि त्याचे मन व आत्मा माझ्याच धर्मांमध्ये रममाण होतील. साधुजन ज्या पवित्र ठिकाणी निवास करीत असतील तेथेच माझ्या भक्तजनांनी राहावे आणि देवता, असुर, किंवा मनुष्यांपैकी जे माझे भक्त असतील, त्यांच्या आचरणाचे अनुकरण करावे. पर्वकाळ, यात्रा आणि महोत्सवांचे वेळी सर्वांबरोबर किंवा एकट्याने नृत्य, गायन, वाद्ये इत्यादींनी महाराजांना शोभून दिसतील, अशा थाटामाटात माझी यात्रा इत्यादी महोत्सव करावेत. अंतःकरण शुद्ध करून माणसाने आकाशासारख्या आतबाहेर परिपूर्ण तसेच आवरणशून्य अशा मलापरमात्म्यालाच सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही असल्याचे पाहावे. हे निर्मलबुद्धी उद्ववा ! जो फक्त ह्याच ज्ञानदृष्टीने सर्वांना माझेच स्वरूप मानून त्यांचा आदर करतो, त्याप्रमाणे ब्राह्मण व चांडाळ, चोर व ब्राह्मणभक्त, सूर्य व ठिणगी तसेच कृपाळू आणि क्रूर अशा सर्व ठिकाणी समान दृष्टी ठेवतो, त्यालाच खरा ज्ञानी समजले पाहिजे. जेव्हा अशा प्रकारे नेहमी सर्व स्त्रीपुरूषांचे ठिकाणी माझीच भावना केली जाते, तेव्हा थोड्याच दिवसात साधकाच्या चित्तातील स्पर्धा, ईर्ष्या, तिरस्कार आणि अहंकार हे दोष नाहीसे होतात. आपलेच लोक आपल्याला हसले, तरी तिकडे लक्ष न देता लोकलज्जा व देहदृष्टी सोडून कुत्रा, चांडाळ, गाय, गाढव इत्यादींना साष्टांग नमस्कार करावा. जोपर्यंत सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझी भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे मन, वाणी आणि शरीराच्या सर्व कर्मांनी माझी उपासना करीत राहावे. हे उद्धवा ! जेव्हा अशा प्रकारे सगळीकडे ईश्वरदृष्टी केली जाते, तेव्हा थोड्यात दिवसात त्याला ज्ञान होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू लागते अशी दृष्टी झाल्यावर सगळे संशय आपोआप नाहीसे होतात अशा प्रकारे माझा साक्षात्कार करून घेऊन तो संसारातून विरक्त होतो. माझ्या प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन मी हेच मानतो की, सर्व चराचरांत मन, वाणी व शरीराच्या सर्व वृत्तींनी माझीच भावना करावी. हे उद्धवा ! या भागवतधर्माची एकदा सुरूवात केल्यानंतर कोणतेही विघ्न आले, तरी जराही उणीव राहात नाही कारण हा धर्म निष्काम व निर्गुण असल्यामुळे मी सर्वोत्तम ठरवला आहे. हे उद्धवा ! इतकेच काय, पण भय, शोक इत्यादींमुळे उत्पन्न होणारी पळणे, रडणे, अशी निरर्थक कामे सुद्धा निष्काम भावनेने मला परमात्म्याला समर्पित केली असता ती सुद्धा धर्म ठरतात. असत्य आणि नाशिवंत शरीराने सत्य आणि अमृतस्वरूप अशा मला परमात्म्याला प्राप्त करून घेणे हाच बुद्धिमंतांचा विवेक आणि हेच आत्मज्ञान्यांचे ज्ञान होय. (८-२२) ब्रह्मविद्येचे हे संपूर्ण रहस्य मी थोडक्यात तसेच विस्तारपूर्वक तुला सांगितले हे रहस्य देवतांना सुद्धा मिळणे अतिशय अवघड आहे. ज्या सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध रीतीने ज्ञानाचे वर्णन मी वारंवार तुला सांगितले त्याचे मर्म जो जाणतो, त्याच्या अंतःकरणातील संशय नाहीसा होऊन तो मुक्त होतो. तुझ्या प्रश्नांची मी चांगल्या रीतीने उत्तरे दिली जो ही प्रश्नोत्तरे विचारपूर्वक आत्मसात करील, तो वेदांचेही परम रहस्य असलेले सनातन परब्रह्म प्राप्त करून घेईल. जो माझ्या भक्तांना हे चांगल्या रीतीने स्पष्ट करून सांगेल, त्या ज्ञानदात्याला मी माझे स्वरूपसुद्धा देऊन टाकतो. उद्धवा ! जो आमचा हा परम पवित्र संवाद उत्तम रीतीने दररोज वाचील आणि दुसर्यांना या ज्ञानदीपाने माझे दर्शन घडवील तो पवित्र होईल. जो कोणी एकाग्र चित्ताने हे नित्य श्रद्धापूर्वक ऐकेल, त्याला माझी परमभक्ती प्राप्त होईल आणि तो कर्मबंधनातून मुक्त होईल. प्रिय सखया ! ब्रह्माचे स्वरूप तू चांगल्या रीतीने समजून घेतलेस ना ! आणि तुझ्या चित्तातील मोह व शोक दूर झाले ना ? हे ज्ञान तू दांभिक, नास्तिक, लबाड, श्रद्धा नसलेल्या, भक्तिहीन आणि उद्धट पुरूषाला कधीही सांगू नकोस. जो या दोषांपासून मुक्त असेल, ब्राह्मणभक्त असेल, प्रेमळ असेल, साधू असेल आणि पवित्र आचरणाचा असेल, त्यालाच हा संवाद सांगावा माझ्याबद्दल भक्ती असणार्या स्त्रीशूद्रांनाही हे ज्ञान द्यावे. अमृतपान केल्यावर जसे काहीही पिण्यासारखे शिल्लक राहात नाही, त्याचप्रमाणे हे जाणून घेतल्यावर जिज्ञासूला आणखी काहीही जाणून घेण्याचे शिल्लक राहात नाही. प्रिय उद्धवा ! मनुष्याला ज्ञान, कर्म, योग, व्यापार आणि राजनीती यांपासून ज्या चतुर्विध पुरूषार्थांची प्राप्ती होते, ती सर्व तुझ्यासारख्या अनन्य भक्तांसाठी मीच आहे. मनुष्य जेव्हा सगळी कर्मे टाकून फक्त मला शरण येतो तेव्हा तो मला अतिशय प्रिय होतो. (त्यावेळी त्याला काय देऊ आणि काय नको असे मला होते) मग मी त्याला अमृतत्त्व प्राप्त करून देतो आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. (२३-३४) श्रीशुक म्हणतात भगवान श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून ज्याला योगमार्ग कळला अशा उद्धवाचे डोळे अश्रूंनी भरून आले प्रेमावेगाने त्याचा गळा दाटून आला, हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला त्याच्याच्याने काहीही बोलवेना. हे राजा ! प्रेमावेगाने द्रवलेले चित्त त्याने धैर्यपूर्वक आवरले स्वतःला अत्यंत भाग्यवान मानीत त्याने यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून प्रार्थना केली. (३५-३६) उद्धव म्हणाला हे प्रभो, आपण माया व ब्रह्मदेव यांचेही मूळ कारण आहात मी ज्या महान मोहरूपी अंधारात सापडलो होतो, तो अंधार तुमच्या सान्निध्यात कुठल्या कुठे पळून गेला जो अग्नीजवळ जातो, त्याला थंडी, अंधार यांचे भय कोठून असणार ? दयाळू अशा आपण मलाआपल्या सेवकालाविज्ञानरूपी दिवा पुन्हा दिला आपले उपकार जाणणारा कोण बरे आपले चरणकमल सोडून दुसर्याला शरण जाईल ? आपणच आपल्या मायेने सृष्टीची वृद्धी करण्यासाठी मला अगोदर दाशार्ह, वृष्णी, अंधक आणि सात्वतवंशी यादवांशी दृढ स्नेहपाशांनी बांधले होते आणि आज आपणच आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीने ते पाश तोडून टाकलेत. हे महायोगेश्वरा ! मी आपणांस नमस्कार करतो आता आपण शरण आलेल्या माझ्यावर अशी कृपा करा की, ज्यायोगे आपल्या चरणकमलांवर माझी अनन्य भक्ती कायम राहील. (३७-४०) भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा ! माझ्या आज्ञेने तू आता माझ्या बदरिकाश्रमामध्ये जा तेथे माझ्या चरणकमलांचे तीर्थ असलेल्या अलकनंदेचे स्नानपान केले असता तू पवित्र होशील. अलकनंदेच्या दर्शनाने तुझे सारे पाप नाहीसे होईल उद्धवा ! तू तेथे वल्कले नेस, वनातील कंदमुळे, फळे खा आणि कोणतीही अपेक्षा न करता, आत्मानंदात राहा. थंडीऊन, सुखदुःख इत्यादी द्वंद्वे सहन कर सदाचरणाने इंद्रिये ताब्यात ठेव चित्त शांत व बुद्धी स्थिर ठेव आणि माझे स्वरूपज्ञान आणि अनुभव यात डुंबत राहा. मी तुला जो उपदेश केला, त्याचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत राहा आपली वाणी आणि चित्त माझे ठिकाणी स्थिर कर आणि मी सांगितलेल्या भागवत धर्मांमध्ये रममाण हो शेवटी तू त्रिगुणांमुळे मिळणार्या गती पार करून त्यांच्याही पलीकडे असणार्या मला मिळशील. (४१-४४) श्रीशुक म्हणतात - ज्यांचे ज्ञान संसारभ्रम दूर करते, त्या श्रीकृष्णांनी उद्धवाला असा उपदेश केला, तेव्हा त्याने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले भगवंतांच्या उपदेशाने त्याचे सुखदुःखादी द्वंद्व नाहीसे झाले होते असे असूनही तेथून जातेवेळी त्याचे हृदय प्रेमाने भरून आले त्यामुळे आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांतून वाहाणार्या अश्रुधारांनी त्याने भगवंतांचे चरणकमल भिजवून टाकले. ज्यांच्यावरील प्रेम सोडणे अत्यंत कठीण, अशा भगवंतांना सोडून जाण्याच्या कल्पनेने व्याकूळ झालेला उद्वव त्यांना सोडू शकत नव्हता तरीही त्यांच्या आज्ञेमुळे त्याला अत्यंत जड अंतःकरणाने जावे लागले, जाताना त्याने भगवंतांच्या चरणपादूका आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि त्यांना वारंवार प्रणाम करीत तो तेथून निघाला. भगवंतांचा परमप्रेमी भक्त उद्धव, हृदयामध्ये त्यांना धारण करून बदरिकाश्रमात पोहोचला आणि तेथे त्याने जगताचे एकमेव बंधू भगवान श्रीकृष्ण यांच्या उपदेशानुसार तपोमय जीवन व्यतीत करून त्यांचे स्वरूप प्राप्त करून घेतले. योगेश्वरसुद्धा ज्यांच्या चरणांच्या सेवेत रत असतात, अशा श्रीकृष्णांनी भगवद्भक्त उद्धवाला आनंदसागराचे सार असे हे ज्ञानामृत सांगितले जो श्रद्धेने याचे थोडेसेही सेवन करतो, तो तर मुक्त होतोच शिवाय त्याच्या संगतीने सगळे जग मुक्त होते. भ्रमर ज्याप्रमाणे फुलांचे सार असलेल्या मध एकत्र करतो, त्याप्रमाणे वेद प्रगट करणार्या श्रीकृष्णांनी भक्तांना संसारातून मुक्त करण्यासाठी, हे वेदांचे सार असणारे श्रेष्ठ ज्ञानविज्ञान साररूपाने सांगितले तसेच समुद्रातून अमृत काढून जरारोगादी भय दूर करण्यासाठी ते भक्तांना पाजले अशा श्रीकृष्ण नाव असणार्या श्रेष्ठ आदिपुरूषांना मी नमस्कार करतो. (४५-४९) अध्याय एकोणतिसावा समाप्त |