श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २७ वा

क्रियायोगाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धव म्हणाला हे भक्तवत्सल श्रीकृष्णा ! जे भक्तजन, ज्या प्रकारे, ज्या उद्देशाने, आपली पूजा अर्चा करतात, तो आपल्या आराधनेचा क्रियायोग आपण मला सांगा. देवर्षी नारद, भगवान व्यास आणि आचार्य बृहस्पती इत्यादी मुनी वारंवार हे मनुष्याच्या परम कल्याणाचे साधन आहे, असे सांगतात. सर्वप्रथम आपल्याच मुखारविंदातून बाहेर पडलेला हा क्रियायोग ब्रह्मदेवांनी भृग इत्यादी पुत्रांना आणि भगवान शंकरांनी पार्वतीदेवीला सांगितला होता. हे मर्यादारक्षक प्रभो ! हाच क्रियायोग सर्व वर्ण आणि सर्व आश्रमांच्यासाठी उपयुक्त असून परम कल्याणकारी आहे, असे मी समजतो किंबहुना स्त्रीशूद्रांसाठी सुद्धा हाच सर्वश्रेष्ठ उपाय असावा. हे कमलनयन श्यामसुंदरा ! आपण शंकर इत्यादी जगदीश्वरांचेसुद्धा ईश्वर आहात आणि मी आपलाच प्रेमी भक्त आहे म्हणून कर्मबंधनातून मुक्त करणारा हा विधी आपण मला सांगावा. (१-५)

भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा ! कर्मकांडांच्या विस्ताराला काही मर्यादाच नाही म्हणून मी थोडक्यात पहिल्यापासून याचे वर्णन करतो. वैदिक, तांत्रिक आणि मिश्र असे माझ्या पूजेचे तीन विधी आहेत या तिन्हीपैंकी जो अनुकूल वाटेल, त्या विधीने भक्ताने माझी आराधना करावी. माणसाने आपल्या अधिकारानुसार सर्वप्रथम शास्त्रोक्तविधीने द्विजत्व प्राप्त करून घ्यावे नंतर श्रद्धा आणि भक्तीने युक्त होऊन कोणत्या प्रकारे माझी पूजा करावी, ते तू माझ्याकडून समजून घे. भक्तिपूर्वक, निष्कपट भावाने आपला पिता आणि गुरूरूप अशा माझी पूजासामग्रीने मूर्ती, वेदी, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय किंवा ब्राह्मण या ठिकाणी भावना व्यक्त करून आराधना करावी. उपासकाने सकाळी दात घासून शरीरशुद्धीसाठी अगोदर स्नान करावे आणि नंतर वैदिक व तांत्रिक मंत्रांनी माती, भस्म इत्यादी लावून पुन्हा स्नान करावे. यानंतर वेदोक्त संध्यावंदन इत्यादी नित्यकर्म करावे त्यानंतर माझ्या आराधनेचाच दृढ संकल्प करून वैदिक आणि तांत्रिक निधींनी कर्मबंधनातून सोडविणारी माझी पूजा करावी. पाषाण, लाकूड, सुवर्ण, माती, चित्र, वाळू, मन आणि रत्‍न असे माझ्या मूर्तीचे आठ प्रकार आहेत. स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या प्रतिमा हे माझे मंदिर होय उद्धवा ! स्थिर प्रतिमेची पूजा करताना दररोज आवाहन आणि विसर्जन करू नये. अस्थिर प्रतिमेच्या बाबतीत आवाहनविसर्जन करावे किंवा करू नये परंतु वाळूच्या प्रतिमेचे मात्र केले पाहिजे माती, चित्र इत्यादी प्रतिमांवर फुलाने पाणी शिंपडावे इतर सर्व प्रकारच्या मूर्तींना मात्र स्नान घालावे. प्रतिमा इत्यादींंध्ये सुप्रसिद्ध पदार्थांनी माझी पूजा करावी परंतु निष्काम भक्तांनी मिळेल त्या वस्तूंनी पूजा करावी किंवा हृदयामध्ये मानसिक पूजा करावी. हे उद्धवा ! मूर्तीलाच स्नान, वस्त्र, अलंकार इत्यादी घालावेत स्थंडिलावर मंत्रांनी अंगदेवता आणि प्रमुख देवतांची स्थापना करून पूजा करावी तसेच अग्नीमध्ये पूजा करावयाची असेल, तर तूपमिश्रित हविर्द्रव्याच्या आहुती द्याव्यात. सूर्याला अर्घ्य, उपस्थान अत्यंत प्रिय आहे तसेच पाण्यामध्ये पाण्याने तर्पण इत्यादीचे मला प्रिय आहे अभक्ताने मला पुष्कळ काही दिले तरी त्याने मी संतुष्ट होत नाही परंतु माझ्या भक्ताने मला श्रद्धने पाणी सुद्धा अर्पण केले तरी मला ते अत्यंत आवडते तर मग गंध फुले, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण केले, तर काय सांगावे. (६-१८)

उपासकाने आधी पूजेची सामग्री एकत्रित करून ठेवावी नंतर पूर्वेकडे टोक असलेले कुशासन अंथरून, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून त्यावर बसावे मूर्ती स्थिर असेल तर तिच्यासमोर बसावे नंतर पूजा करावी. प्रथम अंगन्यास आणि करन्यास करावे नंतर मूर्तीमध्ये मंत्रन्यास करून हाताने निर्माल्य काढून मूर्ती पुसून घ्यावी नंतर भरलेला कलश, प्रोक्षणपात्र इत्यादींची पूजा करावी. प्रोक्षणपात्रातील पाण्याने पूजेची सामग्री आणि आपले शरीर यांवर प्रोक्षण करावे त्यानंतर पाद्य, अर्घ्य व आचमनासाठी, कलशामधून तीन पात्रात पाणी भरून घेऊन त्यात योग्य त्या वस्तू घालाव्यात. पूजा करणार्‍याने यानंतर तिन्ही पात्रे अनुक्रमे हृदयमंत्र, शिरोमंत्र आणि शिखामंत्राने अभिमंत्रित करून शेवटी गायत्रीमंत्राने तीनही अभिमंत्रित करावीत. यानंतर प्राणायामाने प्राणवायू आणि शरीरातील अग्नी शुद्ध करून हृदयकमलामध्ये, सूक्ष्म अशा माझ्या श्रेष्ठ जीवकलेचे ध्यान करावे जिचे सिद्धांनी ॐकारातील नादाच्या शेवटी ध्यान केले आहे. भगवंतांचा तेजोमय अंश माझ्या हृदयात आहे त्या आत्मस्वरूप जीवकलेने सगळे शरीर व्यापून गेल्यावर मानसिक उपचारांनी तिची पूजा करावी त्यानंतर तन्मय होऊन आवाहन करावे आणि प्रतिमा इत्यादींमध्ये तिची स्थापना करावी नंतर मंत्रांनी प्रतिमेवर न्यास करून माझी पूजा करावी. माझ्यासाठी धर्म इत्यादी नऊ गुणांनी युक्त आसन तयार करावे त्या आसनावर एक अष्टदळ कमळ तयार करून त्याचा मध्यभाग पिवळा करावा त्यावर मूर्ती ठेवून पाद्य, आचमनीय, अर्घ्य इत्यादी उपचार अर्पण करावेत याप्रमाणे भोग आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी वैदिक आणि तांत्रिक मंत्रांनी माझी पूजा करावी. (१९-२६)

सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, कौमोदकी गदा, खड्‌ग, बाण, धनुष्य, नांगर, मुसळ या आठ आयुधांची आठ दिशांना पूजा करावी व कौस्तुभमणी, वैजयंतीमाला आणि श्रीवत्सचिन्हाची वक्षःस्थळावर पूजा करावी. नंद, सुनंद, प्रचंड, चंड, महाबल, बल, कुमुद आणि कुमदेक्षण या आठ पार्षदांची आठ दिशांना, गरूडाची समोर, दुर्गा, विनायक, व्यास आणि विष्वक्‌सेन यांची चार कोपर्‍यात स्थापना करून पूजा करावी डावीकडे गुरूंची, पूर्वादी दिशांमध्ये क्रमाने इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आपल्याकडे तोंड करून स्थापना करावी व प्रोक्षण, अर्घ्य इत्यादी अर्पण करून पूजा करावी. (२७-२९)

ऐपत असेल तर दररोज चंदन, वाळा, कापूर, केशर आणि अगुरू इत्यादी सुगंधित वस्तूंनी सुवासित केलेल्या पाण्याने मला स्नान घालावे आणि त्यावेळी स्वर्णघर्मानुवाक, महापुरूषविद्या, पुरूषसूक्त आणि राजनादी साममंत्रांनी अभिषेक करावा. माझ्या भक्ताने वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार घालावेत केशराने वेलबुट्टी काढावी फुलांचा हार, चंदन इत्यादी प्रेमपूर्वक मला वाहून सुशोभित करावे. उपासकाने श्रद्धापूर्वक मला पाद्य, आचमन, चंदन, फुले, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात. शक्य असेल तर गूळ, खीर, तूप, करंज्या, अनरसे, मोदक, हलवा, दही, वरण इत्यादी विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. भगवंतांच्या मूर्तीचे दात घासावेत, तेल व उटणे लावून अभ्यंग स्नान घालावे अंग चोळावे आरसा दाखवावा, नैवेद्या दाखवावा आणि सामर्थ्य असेल तर दररोज किंवा उत्सवाच्या वेळी नृत्य, गीते इत्यादी सादर करावीत. शास्त्रोक्त विधीने तयार केलेल्या मेखला, खोली आणि वेदीने युक्त कुंडामध्ये अग्नीची स्थापना करावी त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून हाताने परिसमूहन करावे. नंतर दर्भपरिस्तरणे ठेवून त्यावर पर्युक्षण करावे यानंतर विधिपूर्वक अन्वाधान करावे अग्नीच्या उतरेकडे होमाला उपयुक्त अशा ठेवलेल्या पात्रांवर व द्रव्यांवर प्रोक्षणीपात्रातील पाण्याने प्रोक्षण करावे त्यानंतर अग्नीमध्ये माझे या प्रकारे ध्यान करावे. "माझी शांत मूर्ती तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकत आहे चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म शोभत आहेत पीतांबर कमळातील केसराप्रमाणे शोभून दिसत आहे. मस्तकावर मुगुट, मनगटात कडी, कमरेला करदोटा आणि बाहूंंमध्ये बाजूबंद झगमगत आहेत वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिह्न आहे गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे गळ्यात वनमाळा रूळत आहे". असे ध्यान करून पूजा करावी त्यानंतर वाळलेल्या समिधांवर तुपाचा अभिधार करून त्यांच्या आहुती द्याव्या तसेच आघारहोम करून तुपाच्या दोन आहुतींनी हवन करावे त्यानंतर तूप घातलेल्या हविर्द्रव्याने "ॐनमो नारायणाय" या अष्टाक्षरी मंत्राने किंवा पुरूषसूक्ताच्या सोळा मंत्रांनी हवन करावे नंतर होमकर्त्याने धर्म इत्यादी देवतांना उद्देशून विधिपूर्वक मंत्रांनी हवन करावे तसेच शेवटी स्विष्टकृत आहुती द्यावी. (३०-४१)

नंतर भगवंतांची पूजा करून त्यांना नमस्कार करावा आणि नंदसुनंद इत्यादी पार्षदांना आठही दिशांकडे हवनकर्मांग बली द्यावा नंतर परब्रह्मस्वरूप भगवान नारायणांचे स्मरण करून "ॐनमो नारायणाय" या भगवतस्वरूप मूलमंत्राचा जप करावा. त्यानंतर भगवंताना आचमन द्यावे आणि शेष नैवेद्याचा विष्वक्सेनाला नैवेद्य दाखवावा यानंतर मुखशुद्धीसाठी सुगंधी तांबूल अर्पण करून मंत्रपुष्पे वाहावीत. माझ्या लीलांचे गायन करावे, त्यांचे वर्णन करावे आणि माझ्या लीलांचा अभिनय करावा हे सर्व करताना प्रेमोन्मत्त होऊन नाचावे माझ्या कथा स्वतः ऐकाव्यात आणि दुसर्‍यांना ऐकवाव्यात आणि हे करताना प्रपंचाला काही वेळापुरते तरी विसरून जावे. प्राचीन ऋषींनी किंवा सामान्य भक्तांनी रचलेल्या लहानमोठ्या स्तोत्रांनी माझी स्तुती करून प्रार्थना करावी की, "हे भगवान ! आपण प्रसन्न व्हावे" असे म्हणून साष्टांग दंडवत घालावा. आपले मस्तक माझ्या चरणांवर ठेवावे आणि आपल्या दोन्ही हातांनी चरण धरून म्हणावे "भगवान ! या संसारसागरात मी बुडू लागलो आहे मृत्यूरूपी मगर माझा पाठपुरावा करीत आहे भयग्रस्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे हे प्रभो ! आपण माझे रक्षण करावे". अशा प्रकारे स्तुती करून मला अर्पण केलेला फुलांचा हार मोठ्या आदराने आपल्या मस्तकावर ठेवावा नंतर विसर्जन करावयाचे असेल तर अशी भावना करावी की, प्रतिमेतून एक दिव्य ज्योत निघून ती आपल्या हृदयस्थ ज्योतीमध्ये लीन झाली आहे. जेव्हा जेथे ज्या प्रतिमा इत्यादींमध्ये श्रद्धा निर्माण होईल, तेव्हा तेथे, माझे पूजन करावे कारण मी सर्वात्मा असल्यामुळे सर्व प्राण्यांच्या तसेच आपल्याही हृदयात आहे. (४२-४८)

जो मनुष्य अशा प्रकारे वैदिक, तांत्रिक पद्धतींनी माझी पूजा करतो, तो, हा लोक आणि परलोक अशा दोन्ही ठिकाणी इच्छित सिद्धी प्राप्त करून घेतो. आर्थिक सामर्थ्य असेल, तर उपासकाने सुंदर पक्के मंदिर बांधावे आणि त्यात माझ्या प्रतिमेची स्थापना करावी सुंदर फुलांचे बगीचे लावावेत, दररोजची पूजा, यात्रा आणि उत्सवांची व्यवस्था करावी. जो मनुष्य विशेष उत्सव किंवा दररोजची पूजा नेहमी चालू राहावी, म्हणून शेती, बाजार, नगर किंवा गाव माझ्या नावाने करून देतो, त्याला माझ्यासारख्या ऐश्वर्याची प्राप्ती होते. माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने पृथ्वीचे एकछत्री राज्य, मंदिर बांधल्याने त्रैलोक्याचे राज्य, पूजा इत्यादींची व्यवस्था केल्याने ब्रह्मलोक आणि हे तीनही केल्याने माझी समानता प्राप्त होते. जो निष्कामभावाने माझी पूजा करतो, त्याला माझा भक्तियोग प्राप्त होतो आणि त्या निरपेक्ष भक्तियोगाने तो मलाच प्राप्त करून घेतो. जो आपण दिलेले किंवा दुसर्‍याने दिलेले देवता किंवा ब्राह्मणाच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतो, तो कोट्यावधी वर्षापर्यंत विष्ठेतील किडा होतो. जे लोक अशा कामांमध्ये मदत करतात, प्रेरणा देतात किंवा सहमत होतात तेसुद्धा मरणानंतर वरील व्यक्तीप्रमाणेच त्या कर्माच्या फळाचे भागीदार होतात आणि त्यांचा सहभाग त्यात अधिक असेल, तर फळसुद्धा त्यांना अधिक मिळते. (४९-५५)

अध्याय सत्ताविसावा समाप्त

GO TOP