श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २६ वा

पुरूरव्याची वैराग्योक्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या मलाआनंदस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. जीव ज्ञाननिष्ठेने गुणमय जीवयोनीपासून कायमचा मुक्त झाला असता वास्तविक नसूनही दिसणार्‍या केवळ मायास्वरूप गुणांच्या पसार्‍यात राहूनही त्यांच्यामुळे बांधला जात नाही कारण त्या गुणांना वास्तविक अस्तित्वच नाही. जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात, अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये कारण त्यांचे अनुकरण करणार्‍यांची अधोगतीच होते जसा एखादा आंधळा दुसर्‍या आंधळ्याच्या साहाय्याने वाटचाल करू लागला, तर त्याची जशी स्थिती होते, तशीच याचीही होते. परम यशस्वी सम्राट पुरूरवा प्रथम उर्वशीच्या विरहाने वेडापिसा झाला होता पण नंतर शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आले तेव्हा तो म्हणाला. आपल्याला सोडून निघून जाणार्‍या उर्वशीच्या मागे राजा पुरूरवा नग्न अवस्थेत वेड्यासारखा अतिशय विव्हळ, होऊन, जात जात म्हणू लागला "हे निष्ठुरहृदये प्रिये थांब, थांब". उर्वशीने त्याचे चित्त आकर्षून घेतले होते क्षुद्र विषयांच्या सेवनामध्ये तो इतका बुडून गेला होता की, कित्येक वर्षाच्या रात्री आल्या आणि गेल्या तरी त्याला त्याचे ज्ञान नव्हते. (६)

पुरूरवा म्हणाला अरेरे ! माझा किती हा मूर्खपणा ! कामवासनेने चित्त कलुषित झालेल्या आणि उर्वशीने गळ्याला मिठी घातलेल्या माझ्या आयुष्याची किती वर्षे फुकट गेली, कळलचे नाही. हिच्या सहवासात सूर्य मावळला की उगवला हेही मला समजत नसे अरेरे ! कित्येक वर्षाचे दिवसच्या दिवस निघून गेले हिने मला पुरते लुटले ! अहो ! माझ्या मनातील मोह इतका वाढला की, ज्याने चक्रवर्ती महापुरूष असलेल्या मला स्त्रियांचे खेळणे केले. प्रजेवर सत्ता चालवणार्‍या मला आणि माझ्या राजसिंहासनाला गवताच्या काडीप्रमाणे सोडून उर्वशी निघून चालली असता मी वेडा होऊनउघडा रडतकढत तिच्या पाठीमागे निघालो. गाढवाप्रमाणे मारलेल्या लाथा सहन करूनही मी त्या स्त्रीच्या पाठीमागे निघालो ! अशा स्थितीत माझ्या ठिकाणी प्रभाव, तेज आणि स्वामित्व कसे राहू शकेल बरे ? स्त्रियांनी ज्याचे मन चोरले, त्याची विद्या, तपश्चर्या, त्याग, शास्त्राभ्यास, एकांतात राहाणे किंवा मौन, सारे सारे निष्फळच आहे. स्वार्थ न कळणार्‍या, तरीसुद्धा स्वतःला पंडित समजणार्‍या मज मूर्खाचा धिक्कार असो ! अरेरे ! मी सम्राट असूनही स्त्रियांनी मला गाढवबैलासारखे आपल्या अधीन केले. अनेक वर्ष उर्वशीचे अधरामृत सेवन करूनही माझी कामवासना तृप्त झाली नाही जसा आहुतीमागून आहुती दिल्या तरी अग्नी तृप्त होत नाही. कुलटेने चोरलेल्या चित्ताला जीवन्मुक्तांचे स्वामी, इंद्रियातीत अशा भगवंताखेरीज कोण मुक्त करू शकेल ? वैदिक सूक्तांनी उर्वशीने मला चांगल्या रीतीने उपदेश करूनसुद्धा मन ताब्यात नसलेल्या मज मूर्खाच्या मनातील तो भयंकर मोह नाहीसा झाला नाही ! दोरीचे स्वरूप न जाणल्याने तिच्याजागी सापाची कल्पना करून जो भयग्रस्त होतो, त्याला दोरी काय करणार ! मनच जर माझ्या ताब्यात नाही, तर मी तिला का दोष द्यावा ? कुठे ते मलिन, दुर्गंधीने भरलेले अपवित्र शरीर आणि कुठ ते सुकुमारता, इत्यादी फुलासारखे गुण ! परंतु मी अज्ञानाने वाइटाला चांगले मानले !. हे शरीर मात्यापित्यांच्या मालकीचे की पत्‍नीच्या ? हे मालकाचे की अग्नीचे की कुत्रीगिधाडांचे ? हे आपले की बांधवांचे ? खूप विचार केला तरी हे निश्चित ठरवता येत नाही. अशा अपवित्र, तुच्छ शरीराच्या ठिकाणी माणूस आसक्त होऊन म्हणतो की, अहाहा ! स्त्रीचे मुख, नाक आणि हास्य किती सुंदर आहे !. हे शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायू, मेद, मज्जा आणि हाडे यांचा समूह असून ते मलमूत्र व पुवाने भरलेले आहे यामध्ये रममाण होणार्‍या माणसांत आणि किड्यांत अंतर कुठे राहिले ? म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे असेल अशा विवेकी मनुष्याने स्त्रिया आणि स्त्रीलंपट यांची संगत करू नये विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगानेच मनात विकार उत्पन्न होतात, एरव्ही नाही. जी वस्तू कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही, तिच्याबद्दल विकार उत्पन्न होत नाही जे विषयांबरोबर इंद्रियांचा संयोग होऊ देत नाहीत, असे मन निश्चल होऊन शांत होते म्हणून इंद्रियांचा स्त्रिया किंवा स्त्रीलंपट यांच्याशी संबंध येऊ देऊ नये माझ्यासारख्यांची गोष्ट कशाला, पण मोठमोठ्या विद्वानांच्या बाबतीत सुद्धा त्यांची इंद्रिये आणि मन विश्वास ठेवण्याजोगी नसतात. (७-२४)

भगवान श्रीकृष्ण म्हणतात राजराजेश्वर पुरूरव्याच्या मनामध्ये जेव्हा अशा तर्‍हेचे उद्‌गार उमटू लागले, तेव्हा त्याने उर्वशीलोक सोडून दिला आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्याचा मोह नाहीसा झाला नंतर त्याने आपल्या हृदयातच आत्मस्वरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला व तो शांत झाला. म्हणून बुद्धिमान पुरूषाने दुःसंग सोडून देऊन सत्संग धरावा संतपुरूष सदुपदेशाने मनातील आसक्ती नष्ट करतात. संतांना कशाचीही अपेक्षा नसते त्यांचे चित्त माझे ठायी जडलेले असते ते अत्यंत शांत आणि समदर्शी असतात त्यांचे ठिकाणी मीमाझेपणा नसतो सुखदुःखादी द्वंद्वे त्यांना बाधत नाहीत तसेच ते कशाचाही संग्रह करीत नाहीत. हे भाग्यवान उद्धवा ! संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणार्‍या माझ्या कथा चालतात जे त्या ऐकतात, त्यांचे सगळे पाप नाहीसे होते. जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझ्या कथांचे श्रवण, गायन आणि कौतुक करतात, तसेच जे माझेच चिंतन करतात, तेच माझी भक्ती प्राप्त करून घेतात. अनंत गुणांचा आश्रय, आनंदानुभवस्वरूप अशा ब्रह्मरूप माझी भक्ती ज्याला प्राप्त झाली, त्या सत्पुरूषाला दुसरे मिळवावयाचे काय शिल्लक राहाते ? ज्याने अग्नीचा आश्रय घेतला, त्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी नसते, त्याप्रमाणे जे संतांना शरण जातात, त्यांची जडता, संसारभय आणि अज्ञान नाहीसे होते. जशी पाण्यात बुडणार्‍या लोकांना बळकट नौकाच आश्रय असते, त्याप्रमाणे जे या घोर संसारसागरात गटांगळ्या खातात, त्यांच्यासाठी ब्रह्मवेत्ते शांत संतच आश्रय होत. जसे अन्नच प्राण्यांचे प्राण आहे, दीनांचा रक्षण करणारा मी आहे, माणसांचे परलोकामध्ये धर्म हेच धन आहे, त्याचप्रमाणे संसारामुळे भयभीत झालेल्यांसाठी संतजनच रक्षणकर्ते आहेत. जसा सूर्य उदय पावून लोकांच्या डोळ्यांना पाहाण्याची शक्ती देतो, त्याप्रमाणे संतपुरूष स्वतःला आणि भगवंतांना पाहाण्याची दृष्टी देतात संत हे अनुग्रहशील देवता आहेत संत आपले हित इच्छिणारे सुहृद आहेत संत आपले प्रियतम आत्मा आहेत किंबहुना संत म्हणजे मीच आहे. अशा रीतीने पुरूरव्याला आत्मसाक्षात्कार होताच त्याचे उर्वशीलोकाचे आकर्षण नाहीसे झाले त्याच्या सर्व आसक्ती नष्ट झाल्या आणि आत्म्यात रममाण होऊन तो या पृथ्वीवर वावरू लागला. (२५-३५)

अध्याय सव्विसावा समाप्त

GO TOP