श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २५ वा

तिन्ही गुणांच्या वृत्तींचे निरूपण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पुरूषश्रेष्ठा कोणत्या गुणामुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो, ते मी तुला सांगतो लक्ष देऊन ऐक. मनः संयम, इंद्रियनिग्रह, सहिष्णूता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयउपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता इत्यादी सत्त्वगुणाच्या वृत्ती होत. इच्छा, प्रयत्‍न, गर्व, लोभ, ताण, अपेक्षा, भेदबुद्धी, विषययोग, युद्ध इत्यादीसाठी गर्वयुक्त उत्साह, आपल्या यशावर प्रेम, हास्य, पराक्रम, हट्टाने उद्योग करणे इत्यादी रजोगुणाच्या वृत्ती होत. क्रोध, लोभ, मिथ्या भाषण, हिंसा, याचना, पाखंड, श्रम, भांडण, शोक, मोह, विषाद, दीनता, निद्रा, आशा, भय आळस इत्यादी तमोगुणीच्या वृत्ती होत. अशाप्रकारे मी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या बहुतेक वृत्तींचे वर्णन केले आता त्यांच्या मिश्रणाने ज्या वृत्ती निर्माण होतात, त्यांचे वर्णन ऐक. उद्धवा ! तीन गुणांच्या मिश्रणानेच "मी" आणि "माझे" या प्रकारची बुद्धी उत्पन्न होते मन, शब्दादी विषय, इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने वृत्तींचा वव्यहार होतो. जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम हे पुरूषार्थ साध्य करण्यात तत्पर असतो, तेव्हा त्याला सत्त्वगुणापासून श्रद्धा, तमोगुणापासून धन आणि रजोगुणापासून प्रेम यांची प्राप्ती होतेे हेही गुणांचेच मिश्रण होय. जेव्हा माणूस सकाम कामात किंवा गृहस्थाश्रमात किंवा स्वधर्मापालनात निष्ठा ठेवून ती ती कामे करतो, त्यावेळी सुद्धा त्याचे ठिकाणी तिन्ही गुणांचे मिश्रण आहे, असे समजावे. (१-८)

माणसाच्या ठिकाणी शमदमादी गुणांवरून सत्त्वगुण, कामादी प्रवृत्तींवरून रजोगुण आणि कामक्रोध इत्यादींवरून तमोगुण प्रबल आहे, असेे समजावे. पुरूष असो की स्त्री, जेव्हा निष्काम भावनेने आपल्या नित्यनैमित्तिक कर्मांनी माझी आराधना करते, तेव्हा ती व्यक्ती सत्त्वगुणी समजावी. सकाम भावनेने आपल्या कर्मांनी माझे भजनपूजन करणारा रजोगुणी होय आणि जो शत्रुनाश इत्यादीसाठी माझे पूजन करतो, तो तमोगुणी समजावा. सत्त्व, रज, तम हे तीन गुण जीवाचे आहेत, माझे परमात्म्याचे नव्हेत. हे प्राण्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात त्यांमध्ये आसक्त झाल्याने जीव संसारबंधनात बांधला जातो. सत्त्वगुण हा प्रकाशदायी, निर्मल आणि शांत आहे. तो जेव्हा रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून वाढतो, तेव्हा पुरूष सुख, धर्म, ज्ञान इत्यादींनी युक्त होतो. रजोगुण भेदबुद्धीला कारणीभूत आहे आसक्ती आणि प्रवृत्ती हा त्याचा स्वभाव आहे जेव्हा तमोगुण आणि सत्त्वगुण यांच्यावर मात करून रजोगुण वाढतो, तेव्हा मनुष्य दुःख, कर्म, यश आणि आर्थिक संपन्नता यांनी युक्त होतो. अज्ञान हे तमोगुणाचे स्वरूप आहे. आळस आणि बुद्धीची मूढता हे त्याचे स्वभाव हाेेत जेव्हा तो वाढून सत्त्वगुण आणि रजोगुणाला मागे टाकतो, तेव्हा माणूस आकांक्षा शोक, मोह, हिंसा, निद्रा, आळस यांना वश होतो. जेव्हा चित्त प्रसन्न असते, इंद्रिये शांत असतात, देह निर्भय असतो आणि मनामध्ये आसक्ती नसते, तेव्हा सत्त्वगुण वाढलेला आहे असे समजावे माझ्या प्राप्तीचे सत्त्वगुण हे साधन आहे. जेव्हा कर्म करीत असताना जीवाची बुद्धी चंचल, ज्ञानेंद्रिये असंतुष्ट, कम]द्रिये अस्वस्थ आणि मन भ्रांत होते, तेव्हा रजोगुणाचा जोर वाढला आहे, असे समजावे. चित्त जेव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारा शब्द इत्यादी विषय योग्य रीतीने समजण्यास असमर्थ ठरेल आणि खिन्न होऊन निराश होईल, मन सुन्न होईल, तसेच अज्ञान आणि खेद यांची वाढ होईल, तेव्हा तमोगुण वाढला आहे, असे समजावे. (९-१८)

उद्धवा ! सत्त्वगुण वाढल्यावर देवतांचे, रजोगुण वाढल्यावर असुरांचे आणि तमोगुण वाढल्यावर राक्षसांचे बळ वाढते. (वृत्तींमध्ये सुद्धा अनुक्रमे सत्त्व इत्यादी गुण वाढल्यावर देवत्व, असुरत्व आणि राक्षसत्वप्रधान, निवृत्ती, प्रवृत्ती किंवा मोह यांचे प्राबल्य दिसून येते). सत्त्वगुणामुळे जागृती, रजोगुणामुळे स्वप्न आणि तमोगुणामुळे सुषुप्ती असते, असे समजावे तुरीय अवस्था आत्मरूप असल्याने या तिहींमध्ये साक्षित्वाने एकरूप होऊन व्याप्त असते. वेदाभ्यासामध्ये तत्पर असणारे ब्राह्मण सत्त्वगुणाच्याद्वारे उत्तरोत्तर वरच्या लोकांमध्ये जातात तमोगुणामुळे जीवांना वृक्ष इत्यादींपर्यंतची अधोगती प्राप्त होते आणि रजोगुणामुळे मनुष्यशरीर प्राप्त होते. सत्त्वगुणांच्या वृद्धीत मृत्यू आला असता स्वर्गाची प्राप्ती होते, रजोगुणाच्या वृद्धीत मृत्यू आलेल्याला मनुष्यलोक मिळतो आणि तमोगुणाची वृद्धी असताना ज्याला मृत्यू येतो, त्याला नरकाची प्राप्ती होते परंतु जे त्रिगुणातीत असतात, त्यांना माझीच प्राप्ती होते. जेव्हा आपल्या धर्मानुसार केलेले कर्म निष्काम किंवा मला समर्पित केले जाते, तेव्हा ते सात्त्विक होते ज्या कर्माच्या अनुष्ठानामध्ये एखाद्या फळाची अपेक्षा असते, तेव्हा ते राजस होते आणि कर्म करण्यात एखाद्याला त्रास देणे इत्यादी भाव असतो, तेव्हा ते तामसिक होते. एकमेवाद्वितीय आत्म्याचे ज्ञान हे सात्त्विक ज्ञान होय देहयुक्त आत्मा कर्ता, भोक्ता आहे असे समजणे, हे राजस ज्ञान आहे आणि केवळ शरीरालाच आत्मा मानणे, हे तामस ज्ञान आहे आणि गुणातीत ज्ञान हे माझ्या स्वरूपाचे खरे ज्ञान होय. वनात राहणे हा सात्त्विक निवास आहे, गावामध्ये राहाणे राजस आहे आणि जुगार इत्यादी चालणार्‍या घरात राहाणे हा तामस आहे आणि माझ्या मंदिरात राहाणे हा निर्गुण निवास आहे. अनासक्त भावाने कर्म करणारा सात्त्विक होय अत्यंत आसक्त होऊन कर्म करणारा राजस होय कोणताही विचार न करता कर्म करणारा तामस होय आणि फक्त मलाच शरण येऊन कर्म करणारा निर्गुण समजावा. आत्मज्ञानविषयक श्रद्धा सात्त्विक, कर्मविषयक श्रद्धा राजस, अधर्माच्या ठिकाणी श्रद्धा तामस आणि माझी सेवा करण्यामध्ये श्रद्धा ही निर्गुण होय. (१९-२७)

आरोग्यदायी, पवित्र आणि अनायासे मिळालेले भोजन सात्त्विक होय जिभेला रूचकर वाटणारे अन्न राजस होय आणि दुःखदायी व अपवित्र आहार तामस जाणावा. आत्मचिंतनाने प्राप्त होणारे सुख सात्त्विक, विषयांपासून प्राप्त होणारे राजस, मोह आणि दीनतेने प्राप्त होणारे सुख तामस आणि जे सुख माझ्या आश्रयाने मिळणारे ते गुणातीत समजावे. (२८-२९)

वस्तू, स्थान, फल, काल, ज्ञान, कर्म, कर्ता, श्रद्धा अवस्था, निरनिराळी शरीरे आणि निष्ठा हे सर्व त्रिगुणात्मकच आहे. हे पुरूषश्रेष्ठा ! पुरूष आणि प्रकृती यांच्या आश्रयाने असणारे सर्व पदार्थ गुणमय आहेत मग ते इंद्रियाच्या अनुभवाचे असोत, शास्त्रांनी सांगितलेले असोत अथवा बुद्धीने विचार केलेले असोत. जीवाला योनी किंवा गती त्या त्या गुणकर्मानुसार मिळतात हे सौम्य ! जो जीव चित्तात उत्पन्न होणार्‍या विकारांवर विजय मिळवतो, तो भक्तियोगाने माझ्यामध्ये निष्ठा ठेवतो आणि त्यामुळे माझे स्वरूप प्राप्त करून घेतो. म्हणून शहाण्या माणसांनी तत्त्वज्ञान आणि साक्षात्कार यांची प्राप्ती करून देणारे हे मनुष्यशरीर मिळाल्यावर गुणांची आसक्ती दूर करून माझेच भजन करावे. विचारवंताने सावध राहून सत्त्वगुण अंगीकारून रजोगुण आणि तमोगुण यांवर विजय मिळवावा इंद्रियांवर ताबा मिळवावा आणि आसक्ती सोडून माझ्या भजनी लागावे. चित्तवृत्ती शांत करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सत्त्वगुणावरसुद्धा विजय मिळवावा, अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीव आपला जीवभाव सोडतो आणि माझ्याशी एकरूप होतो. जीवभावातून मुक्त झालेला जीव अंतःकरणात उत्पन्न होणार्‍या विकारांपासूनही मुक्त होतो आणि ब्रह्मस्वरूप माझ्याशी एकरूप होऊन पूर्ण होतो मग त्याचे कोठेही येणेजाणे होत नाही. (३०-३६)

अध्याय पंचविसावा समाप्त

GO TOP