|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २४ वा
सांख्ययोग - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीभगवान म्हणतात, प्राचीन काळच्या ऋषींनी ज्याचा निश्चय केला आहे, ते सांख्यशास्त्र मी तुला सांगतो हे जाणले असता मनुष्य काल्पनिक भेदरूप भ्रम ताबडतोब सोडून देतो. अगदी सुरूवातील जेव्हा प्रलयकाल होता, तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळून एकच तत्त्व होते नंतर जेव्हा कृतयुग आले, तेव्हाही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मतत्त्व होते. कोणत्याही प्रकारचा भेद नसलेले ते सत्य ब्रह्म होते, मन किंवा वाणी यांना ते कळत नव्हते माया आणि तीत प्रतिबिंबित झालेल्या जीवाच्या रूपाने दृश्य आणि द्रष्टा या दोन भागात ते विभागले गेले. त्यांपैकी एका वस्तूला प्रकृती म्हणतात तिनेच जगामध्ये कार्य आणि कारण अशी दोन रूपे धारण केली दुसरी वस्तू म्हणजे ज्ञानस्वरूप जीवात्मा त्याला पुरूष म्हणतात. जीवांच्या शुभअशुभ कर्मांनुसार मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध केले तेव्हा तिच्यापासून सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण प्रगट झाले. त्यांच्यापासून क्रियाशक्तिप्रधान सूत्र आणि ज्ञानशक्तिप्रधान महतत्त्व हे प्रगट झाले हे दोघे एकमेकांत मिसळलेलेच आहेत महत्तत्त्वापासून अहंकार उत्पन्न झाला हा अहंकारच जीवांना मोह उत्पन्न करतो. तो अहंकार सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा आहे पंचतन्मात्रा, इंद्रिये आणि मन ही अहंकाराची कार्ये आहेत म्हणून तो जडचेतन असा उभयात्मक आहे. तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यांपासून पंच महाभूते उत्पन्न झाली राजस अहंकारापासून इंद्रिये आणि सात्त्विक अहंकारापासून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अकरा देवता प्रगट झाल्या. माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यांनी ब्रह्मांडरूप अंडे उत्पन्न केले हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे. जेव्हा ते अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले, तेव्हा मीच नारायणरूपाने त्यात विराजमान झालो माझ्या नाभीपासून विश्वकमळाची उत्पत्ती झाली त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाला. विश्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची व त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली. देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूतप्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरविले या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महर्लोक इत्यादी सिद्धींची निवासस्थाने ठरविली. ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्यासाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या गती प्राप्त होतात. योग, तपश्चर्या आणि संन्यास यांचेद्वारा महर्लोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोकरूप उत्तम गती प्राप्त होते आणि भक्तियोगाने माझे परम धाम प्राप्त होते. हे कर्मयुक्त जग कर्मफल देणार्या कालरूप माझ्यामुळे या गुणप्रवाहात कधी वर तर कधी अधोगतीला जाते. लहानमोठे, कृशस्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात, ते सर्व प्रकृती आणि पुरूष या दोघांच्या संयोगानेच. (१-१६) ज्याच्या सुरूवातीला आणि शेवटी जे असते, तेच मध्ये असते आणि तेच सत्य आहे कार्य ही फक्त व्यवहारासाठी केलेली कल्पना आहे जशी बांगड्याकुंडले इत्यादी सोन्याची कार्ये किंवा घडागाडगे इत्यादी मातीची कार्ये पहिला कारण पदार्थ ज्या परम कारणाच्या आधाराने पुढील कार्यपदार्थाला उत्पन्न करतो, तेच परमकारण केवळ सत्य असते कारण तेच कार्याच्या आधी आणि शेवटीही असते. (जसा भिजलेला मातीचा गोळा घड्याचे कारण असतो पण तो मूळ माती या परमकारणाच्या आधाराने घडारूप कार्याचे कारण बनतो भिजलेल्या गोळ्याच्या आधी माती, गोळ्यात माती, घड्यात माती आणि घडा फुटल्यावरही मातीच असते म्हणून मातीच सत्य होय). या प्रपंचाचे उपादनकारण प्रकृती आहे, आधार परमात्मा आहे आणि यांना प्रगट करणारा काल आहे प्रकृती, परमपुरूष आणि काल ही तिन्ही रूपे खरे पाहता ब्रह्मस्वरूपच आहेत आणि तेच शुद्ध ब्रह्म मी आहे. जोपर्यंत परमात्म्याची ईक्षणशक्ती आपले काम करीत राहाते, तोपर्यंत जीवांच्या कर्मभोगासाठी कारणकार्यरूपाने हे विविध सृष्टिचक्र अखंड चालू राहाते. (१७-२०) मी कालरूपाने हे ब्रह्मांड व्यापलेले असते, तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती व संहार होत असतात जेव्हा मी प्रलय करण्याचा संकल्प करतो, तेव्हा ब्रह्मांड भुवनांसह विनाशाला योग्य होते. विनाशाच्या वेळी प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये, अन्न बीजामध्ये, बीज भूमीमध्ये आणि भूमी गंधतन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते. गंध पाण्यामध्ये, पाणी आपला गुण जाेे रस त्यामध्ये, रस तेजामध्ये आणि तेज रूपामध्ये लीन होऊन जाते. रूप वायूमध्ये, वायू स्पर्शामध्ये, स्पर्श आकाशामध्ये आणि आकाश शब्दतन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते इंद्रिये आपापल्या अधिष्ठात्या देवतांमध्ये आणि शेवटी राजस अहंकारामध्ये समाविष्ट होऊन जातात. हे सौम्य ! राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकाररूप मनामध्ये, शब्दतन्मात्रा महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेला त्रिविध अहंकार, महतत्त्वामध्ये लीन होऊन जातो. हे महतत्त्व आपल्याला कारण असलेल्या त्रिगुणांमध्ये लीन होऊन जातेे गुण प्रकृतीमध्ये आणि प्रकृती अविनाशी कालामध्ये लीन होऊन जाते. काल मायामय जीवामध्ये आणि जीव माझ्यामध्येअजन्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो. आत्मा मात्र आपल्या स्वरूपातच स्थित राहातो तो विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या अधिष्ठानामुळे जाणला जातो. अशा प्रकारे विवेकदृष्टीने जो पाहातो, त्याच्या चित्तामध्ये भेदविषयक भ्रम कसा निर्माण होईल आणि झालाच तरी हृदयात कसा टिकू शकेल ? सूर्योदयानंतर आकाशात अंधकार राहू शकेल काय ? कार्य आणि कारण या दोघांचाही साक्षी असणार्या मी सृष्टीची उत्पत्ती ते प्रलय आणि प्रलयापासून उत्पत्तीपर्यंतचे सांख्यशास्त्र तुला सांगितले यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा संशय नाहीसा होतो. (२१-२९) अध्याय चोविसावा समाप्त |