|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २३ वा
एका तितिक्षू ब्राह्मणाचा इतिहास - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत, अशा यदुश्रेष्ठ मुकुंदांना परम भगवद्भक्त उद्धवाने जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नाची प्रशंसा करून त्याला म्हटले. (१) भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे बृहस्पतिशिष्या ! दुर्जनांच्या कटुवाणीच्या आघाताने घरे पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरूष या जगात सहसा सापडत नाही. माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणांनी होते, तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही. उद्धवा ! यासंबंधी एक मोठा पुण्यकारक इतिहास सांगतात, तो मी तुला सविस्तर सांगतो लक्षपूर्वक ऐक. एका भिक्षूला दुष्टांनी अतिशय त्रास दिला त्यावेळी त्याने आपले धैर्य सोडले नाही आणि हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे, असे समजून आपल्या मनातील भाव प्रगट केला होता. (२-५) अवन्तिनगरात एक ब्राह्मण राहात होता शेती, व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती तो अतिशय कंजूष, कामी, लोभी आणि रागीट होता. (६) त्याने आपले जातीबांधव किंवा अतिथी यांना कधी गोड शब्दांनीही सुखविले नाही तर मग खाऊपिऊ घालण्याची गोष्ट तर दूरच राहो ! कधीही धर्मेकर्मे न होणार्या घरात तो राहात असे आणि योग्यवेळी सुद्धा सुखोपभोगांनी आपल्या शरीराला सुखी करीत नसे. त्याचा कंजूषपणा आणि वाईट स्वभाव यांमुळे त्याचे पुत्रकन्या, बंधूबांधव, नोकरचाकर, पत्नी इत्यादी सर्वजण दुःखी असत त्यामुळे ते त्याच्या मनाला बरे वाटेल असे काहीही करीत नसत. इहलोक आणि परलोक अशा दोहोंनाही मुकलेल्या व यक्षासारखी धनाची केवळ राखण करणार्या त्याच्यावर धर्मकर्मांच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवता रागावल्या. हे उदार उद्धवा ! पंचमहायज्ञाच्या देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्वपुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग व परिश्रम करून मिळवलेले धनही नष्ट झाले. उद्धवा ! त्या अधम ब्राह्मणाचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले, काही चोरांनी चोरून नेले काही दैवी कोपाने नष्ट झाले, काही काळाच्या प्रभावाने नाहीसे झाले, काही इतर माणसांनी घेतले आणि उरलेसुरलेेले धन राजाने काढून घेतले. अशा प्रकारे त्याची सर्व संपत्ती निघून गेली त्याने धर्म जोडला नाही की सुखोपभोग घेतले नाहीत इकडे त्याच्या सोयर्याधायर्यांनी सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली, आता त्याला भयानक चिंतेने घेरले. धन नाहीसे झाल्यामुळे सतत त्याच काळजीने त्या बिचार्याला मनात खेद उत्पन्न झाला अश्रूमुळे त्याचा गळा दाटून येऊ लागला परंतु यामुळेच त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कट वैराग्य उत्पन्न झाले. (७-१३) आता तो ब्राह्मण मनात म्हणू लागला की, "अरेरे ! मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्ट दिले ! जे धन मिळविण्यासाठी मी कठीण परिश्रम केले, त्याने ना धर्म साधला, ना सुखोपभोग !. कंजूष माणसाला धनापासून बहुधा कधीच सुख मिळत नाही या लोकी तो धन मिळविणे आणि त्याच्या रक्षणाच्या चिंतेने कष्टी होतो आणि मेल्यानंतर धर्म न केल्याकारणाने नरकात जातो. जसे अंगावरील थोडेसेही कोड सुंदर स्वरूप बिघडवून टाकते, त्याचप्रमाणे थोडासासुद्धा लोभ यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशंसनीय गुण नष्ट करतो. माणसांना धन मिळविणे, त्यात वाढ करणे, ते जपून ठेवणे, ते खर्च होणे, त्याचा नाश होणे किंवा उपभोग घेणे, अशा सर्वच बाबतीत परिश्रम, भय, चिंता आणि भ्रम यांच्याशीच सामना करावा लागतो. चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे पंधरा अनर्थ मुनष्यांच्या ठिकाणी धनामुळेच होतात, असे मानले गेले आहे म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे, त्याने अर्थ नावाच्या अनर्थाला लांबच ठेवावे. बांधव, स्त्रिया, वडील, मित्र असे जे जे स्नेहबंधनाने एकरूप होऊन राहातात, ते सर्वजण धनामुळे इतके दुरावले जातात की, ताबडतोप ते एकमेकांचे शत्रू होतात. हे लोक थोडयाशा धनासाठी सुद्धा प्रक्षुब्ध आणि क्रुद्ध होतात एकमेकांशी स्पर्धा करू लागतात आणि एकदम मैत्री तोडून एकमेकांच्या जिवावर उठतात. देवतांनीही इच्छा करावी, असा मनुष्यजन्म आणि त्यातही श्रेष्ठ असे ब्राह्मणत्व होऊनही जे त्याचा अनादर करून आपल्या खर्या स्वार्थाला तिलांजली देतात, ते अशुभ गतीला जातात. मोक्ष आणि स्वर्गाचे द्वारे असे मनुष्यशरीर मिळूनही अनर्थाचे घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा मनुष्य सापडेल ? जो मनुष्य देव, ऋषी, पितर, प्राणी, बांधव, कुटुंबीय आणि धनाचे दुसरे भागीदार यांना त्यांचा हिस्सा देत नाही किंवा स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही, धनाचे रक्षण करणार्या यक्षाप्रमाणे असणारा तो कंजूष अधोगतीला जातो. ज्यांनी विवेकी लोक मोक्षसुद्धा प्राप्त करून घेतात, तीच आयुष्य, धन आणि बळ ही साधने मी मूर्खाने धन मिळविण्याच्या प्रयत्नात व्यर्थ खर्च केली आता वृद्धापकाळी मी काय करणार ? विद्वानसुद्धा धनाच्या व्यर्थ हव्यासाने नेहमी दुःखी का होतात बरे ! हा संसार निश्चितच कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे. (१४-२६) काळाच्या विक्राळ दाढेत सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारे, सुखभोग किंवा ते पूर्ण करणारे, तसेच पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्मे यांपासून काय लाभ आहे ? (२७) सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले, यात काहीच शंका नाही म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य दिले वैराग्यच आत्म्याला संसारसागरातून पार करणारी नाव आहे. जर माझे आयुष्य शिल्लक असेल, तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईन आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चर्येने सुकवून टाकवीन किंवा ज्ञानाने लयाला जाईन. तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संमती देवोत राजा खट्वांगाने नाही का दोन घटकांमध्येच भगवद्धामाची प्राप्ती करून घेतली !". (२८-३०) भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या अवंतिनिवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने अशाप्रकारे मनोमन निश्चय करून मीमाझेपणाची गाठ तोडून टाकली यानंतर तो शांत होऊन, मौन धारण करून संन्यासी झाला. आपले मन, इंद्रिये आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला भिक्षेसाठी तो शहरांत किंवा खेड्यांत कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे. उद्धवा ! तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला होता त्याला पाहाताच दुष्ट लोक निरनिराळ्या प्रकारे त्याला पीडा देत. कोणी त्याचा त्रिदंड हिसकावून घेई, कोणी भिक्षापात्र, कोणी कमंडलू, कोणी आसन, कोणी रूद्राक्षमाळ, कोणी झोळी कोणी लंगोटी तर कोणी छाटी काढून घेत. काहीजण त्याला वस्तू देऊन तर काहीजण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेत तो जेव्हा मधुकरी मागून आणून गावाबाहेर नदीकिनारी जेवावयास बसत असे, तेव्हा काही नीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्रविसर्जन करीत तर कधी थुंकत ते लोक अशा तर्हेने त्या मौनी अवधूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे भाग पाडीत आणि एवढे करूनही जेव्हा तो काहीच बोलत नसे, तेव्हा त्याला मारहाणही करीत. काहीजण त्याला ‘चोर‘ म्हणून धाकदपटशा दाखवीत काही जण त्याला ‘बांधा, बांधून टाका,‘ म्हणत दोरीने बांधीत. काहीजण त्याची निर्भर्त्सना करीत म्हणत, "याची संपत्ती निघून गेली म्हणून नातलगांनी याला घराबाहेर काढले तेव्हा या लबाडाने धर्माचे सोंग घेऊन हा धंदा सुरू केला अहो, हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखा आहे असे असून मौन धारण करून हा बकसंन्यासी आपले काम साधून घेत आहे. कोणी त्याचा उपहास करीत, तर कोणी त्याच्यावर अपानवायू सोडीत ज्याप्रमाणे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात किंवा पिंजर्यामध्ये बंद करतात, त्याचप्रमाणे ते लोक त्याला बांधीत किंवा कोंडून ठेवीत. कधी त्याला ताप इत्यादीमुळे देहाचे दुःख, कधी थंडीऊन इत्यादी दैवी कष्ट, तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमान इत्यादीद्वारे भौतिक पीडा सहन कराव्या लागत परंतु तो, "हे सर्व आपल्या पूर्वकर्मांचे फळ असल्याने आपल्याला हे अवश्य भोगले पाहिजे," असे मानत असे. अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करीत, तरीसुद्धा तो सात्त्विक धैयाने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राही तो म्हणू लागला. (३१-४२) ब्राह्मण म्हणाला माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत, देवता नाहीत, शरीर नाही, ग्रह नाहीत, कर्म नाही की काल नाही मनच त्याला खरे कारणीभूत आहे, असे श्रुती सांगतात तेच जीवाला या संसारचक्रात फिरवीत असते. हे अतिशय बलवान मनच कामक्रोधादी विकार निर्माण करते त्यामुळे सात्त्विक, राजस आणि तामस अशी अनेक प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला विविध गती प्राप्त होतात. क्रियाशील मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्तिप्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षीरूपाने पाहातो परंतु जीवा आत्म्याच्या ठिकाणी संसार भासविणार्या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखांचा उपभोग घेत संसारात बांधला जातो. (४३-४५) दान, स्वधर्माचे पालन, यमनियम,वेदाध्ययन, सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे. ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले, त्याला दान इत्यादींची काय आवश्यकता आहे, सांग ना ! परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे, त्याने दानादी कर्मे केली, तरी त्यांचा काय उपयोग ? मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिये वश होतात इंद्रिये मनाला वश करू शकत नाहीत कारण मन हा बलवानांपेक्षाही बलवान भयंकर आहे जो या मनावर नियंत्रण मिळवतो, तो देवांचाही देव होतो. मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे त्याचे रागादिक वेग असह्य आहेत ते मर्मस्थानेच घायाळ करते त्याला जिंकल्याशिवायच मूर्ख लोक दुसर्यांशी व्यर्थ भांडणे करून त्यांना शत्रू, मित्र किंवा उदासीन ठरवितात. अविवेकी माणसे या केवळ मनःकल्पित शरीराला ‘मीमाझे‘ मानून हा मी आणि हा दुसरा या भ्रमाने या शेवट नसलेल्या संसारात भटकत राहातात. (४६-५०) मनुष्यच सुखदुःखाला कारणीभूत आहे असे मानले, तर त्याचा आत्म्याशी काय संबंध ? कारण सुखदुःख देणारेही भौतिक शरीर आणि भोगणारेसुद्धा भौतिक शरीरच ! एखादे वेळी आपल्या दातांनीच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावे ? दुःख देण्याला देवता कारण आहे असे मानले, तरी आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे ? कारण सर्वांच्या शरीरांमध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारीही ठरते जसे आपल्याच एका अवयवाने दुसर्या अवयवाला इजा केली, तर माणसाने कोणावर रागवावे ? सुखदुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले, तर त्याचा इतरांशी काय संबंध ? तो त्याचाच स्वभाव ठरेल कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखी काहीही नाही काही भासमान होत असेल, तर ते खोटे आहे म्हणून सुखदुःखही नाहीत मग रागाचे कारणच काय ? सुखदुःख देणारे ग्रह आहेत असे मानले, तर अजन्मा अशा आत्म्याला सुखदुःख देण्यास कारणीभूत ठरू शकत नाहीत कारण जी शरीरे ज्या लग्नावर जन्मतात, त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याने तो क्रोध कोणावर करणार ? जर कर्मांनाच सुखदुःखाचे कारण मानले तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध ? कारण जी एकच वस्तू चेतन व अचेतन असेत, तेथेच कर्म घडते देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला, तरी केवळ साक्षी आहे म्हणून कर्मच संभवत नाही मग तो कोणावर क्रोध करील. काळ हा सुखदुःख देणारा आहे असे मानले, तर काळ आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही जसा अग्नी आपल्याच ज्वाळेला जाळू शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करून शकत नाही काळाहून आत्मा वेगळा मानला तरी आत्म्याला सुखदुःखात्मक द्वंद्व नाही मग तो कोणावर रागावेल ? प्रकृतीच्या पलीकडे आत्म्याला कोणाच्याही द्वारे, कोठेही, कोणत्याही प्रकारे, द्वंद्वाचा स्पर्श होत नाही जशी नसलेला संसार दाखविणार्या अहंकाराला सुखदुःखादी द्वंद्वे निर्माण होतात, असे ज्ञान झालेला योगी कोणालाही भीत नाही. प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनिष्ठेचा आश्रय घेतला होता, तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन. (५१-५८) भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या ब्राह्मणाचे फक्त धनच नव्हे, तर सगळे क्लेशसुद्धा नाहीसे झाले आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यास घेऊन पृथ्वीवर अशा रीतीने भटकत होता त्याला दुष्टांनी पुष्कळ त्रास दिला, तरीसुद्धा तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही मौन धारण केलेल्या अवधूताने त्यावेळी या ज्ञानाचे चिंतन केले. मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही दुसरा दुःख देतो, हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे हे सगळे जग आणि यातील मित्र, उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पिलेले आहेत. म्हणून बाबा रे ! माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव बस्स ! सर्व योगसाधनेचे हेच सार आहे. भिक्षूने गाइलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो दुसर्यांना ऐकवितो आणि यानुसार वागतो, तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही. (५९-६२) अध्याय तेविसावा समाप्त |