श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २० वा

ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धव म्हणाला हे कमलनयन श्रीकृष्णा ! कर्मांचे गुणदोष पाहूनच वेदांनी विधिनिषेध सांगितले आहेत आणि शिवाय वेद ही आपलीच ईश्वराची वाणी आहे. वेदांनीच वर्णाश्रमांचे भेद, प्रतिलोम. (कनिष्ठ वर्णाच्या व्यक्तीने उच्चवर्णीय कन्येशी विवाह करणे) आणि अनुलोम. (उच्च वर्णाच्या व्यक्तीने कनिष्ठ वर्णाच्या कन्येशी विवाह करणे) यांमुळे होणारा वर्णसंकर, द्रव्य, देश, आयुष्य, काल, स्वर्ग आणि नरक हे सर्व सांगितले आहे. अशाप्रकारे विधिनिषेध सांगणारे आपलेच वेदवाणीरूप वचन गुणदोषांमधील भेद पाहून आचरल्याशिवाय माणसांचे परमकल्याण कसे करणार ? हे सर्वशक्तीमान परमेश्वरा ! आपले वेदच पितर, देव, माणसे यांना कल्याणाचा मार्ग दाखविणारे डोळे आहेत कारण या डोळ्यांनीच स्वर्ग, मोक्ष, जगाचे कारण इत्यादी अन्य प्रमाणांनी न कळणार्‍या वस्तू व त्यांची साधने दिसतात. गुणदोषांमधील भेददृष्टी वेदवाणीच आहे कोणा माणसाची नव्हे आणि वेदांनी भेददृष्टीचा निषेधही केला आहे यामुळेच माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे. (१-५)

भगवान श्रीकृष्ण म्हणाले मीच मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन योगांचा उपदेश केला आहे याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय कोठेही नाही. ज्यांनी कर्मे आणि त्यांची फळे यांपासून विरक्त होऊन त्यांचा त्याग केला आहे, ते ज्ञानयोगाचे अधिकारी होत याउलट ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले नसते, उलट त्यांची कामना असते, त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितला आहे. पण जो मनुष्य अत्यंत विरक्तही नाही आणि अतिशय आसक्तही नाही, तसेच ज्याला पूर्वपुण्याईमुळे माझ्या कथा इत्यादींमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते, त्याला भक्तीयोगाने सिद्धी प्राप्त होते. जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही किंवा जोपर्यंत माझ्या कथांचे श्रवणकीर्तन इत्यादींविषयी श्रद्धा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कर्मे करावीत. उद्धवा ! आपापल्या वर्णाश्रमधर्मानुसार फळाची आशा न करता यज्ञादी सत्कर्मे केली आणि निषिद्ध कर्मे केली नाहीत, तर त्याला स्वर्गनरकात जावे लागत नाही. आपल्या धर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवणारा या देहात राहूनच निषिद्ध कर्मे न करण्याने पवित्र होतो त्याला विशुद्ध ज्ञान प्राप्त होते किंवा त्याचे भाग्य असल्यास त्याला माझी भक्ती प्राप्त होते. स्वर्गातील देव आणि नरकातील लोकसुद्धा या मनुष्यदेहाची इच्छा करतात कारण हे शरीरच ज्ञान किंवा भक्ती यांचे साधन आहे स्वर्गीय किंवा नारकीय शरीरे फक्त भोगसाधने आहेत. विचारवंताने स्वर्ग, नरक किंवा या देह यांपैकी कशाचीही कामना करू नये कारण देहात अहंबुद्धी बाळगल्यामुळेच त्याच्याकडून प्रमाद घडतात. या शरीराला मरण असूनही ते परमात्मप्राप्ती करून देणारे आहे, असा विचार करून माणसाने सावधपणे मृत्यू येण्यापूर्वीच पुनर्जन्म टाळण्याचा प्रयत्‍न करावा. हे शरीर एक वृक्ष आहे यावर घरटे तयार करून जीवरूपी पक्षी त्यात राहातो पक्षी जसा तुटणारे झाड सोडून सुरक्षित जागी उडून जातो, त्याप्रमाणेच या शरीरवृक्षाला सुद्धा यमासारखे निर्दय पुरूष रात्रंदिवस तोडतच असलेले पाहून व त्यामुळे आपले आयुष्य क्षीण होत असलेले जाणून विषयलंपट नसलेला जीव भयकंपित होऊन शरीराची आसक्ती सोडून देतो व परमात्मतत्त्व जाणून घेऊन शांत होतो. सर्व फळांची प्राप्ती करून देणारे पण मिळण्यास अत्यंत कठीण असे मानवशरीर ही एक सुदृढ नाव आहे गुरूंना तिचे कर्णधार करून आणि मलाच अनुकूल वायू करून जो मनुष्य या संसारसागरातून पार होत नाही, तो आत्मघातकीच होय. (६-१७)

कर्मामध्ये दोष पाहून त्यांचा उबग आल्यामुळे विरक्त झालेल्या योग्याने इंद्रियांवर ताबा मिळवून अभ्यासाने आपले मन स्थिर करावे. स्थिर करताना जर मन चंचल होऊन इकडेतिकडे भटकू लागले, तर ताबडतोब आळस न करता त्याची समजूत घालून ते आपल्या ताब्यात आणावे. इंद्रिये आणि प्राण यांच्यावर विजय मिळवून मनाच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नये नंतर सत्त्वसंपन्न बुद्धीने मनाला आपल्या ताब्यात घ्यावे. घोडेस्वार जसा प्रथम घोड्याच्या कलाने घेऊन नंतर त्याला आपल्या इच्छेप्रमाणे चालवतो, त्याचप्रमाणे मनाचे भाव जाणून घेऊन मनाला आपल्या ताब्यात ठेवणे हाच खरा योग होय. सांख्यशास्त्रामध्ये प्रकृतीपासून शरीरापर्यंत पदार्थांच्या उत्पत्तीचा जो क्रम सांगितला आहे आणि ज्या क्रमाने त्यांचा प्रकृतीमध्ये लय सांगितला आहे, त्यांचे मन स्थिर होईपर्यंत सतत चिंतन करावे. जो मनुष्य विषयांचा उबग आल्याने संसारातून विरक्त झाला आहे आणि जो गुरूंचा उपदेश चांगल्या प्रकारे जाणून घेऊन आत्मस्वरूपाच्याच चिंतनात मग्न राहातो, त्याचे मन चंचलता सोडून देते. यम, इत्यादी योगमार्गांनी, आत्मविद्येने किंवा माझ्या भक्तीने मन चिंतनास योग्य अशा परमात्म्याचे चिंतन करू लागते याखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही. (१८-२४)

जर एखादेवेळेस योग्याकडून एखादा प्रमाद घडलाच, तर त्याने ते पाप योगसाधनेनेच जाळून टाकावे यासाठी त्याला दुसर्‍या प्रायश्चित्ताची आवश्यकता नाही. स्वधर्माचे निष्ठेने आचरण करणे, हाच गुण आहे स्वभावतःच अशुद्ध असणार्‍या कर्मांच्या आसक्तीचा त्याग करण्यासाठीच त्यांच्यातील गुणदोष दाखवून त्यांचे नियमन केले आहे. (२५-२६)

माझ्या कथांमध्ये ज्याला श्रद्धा आहे आणि ज्याला सर्व कर्मांविषयी वैराग्य उत्पन्न झाले आहे, तसेच ज्याला सर्व विषय दुःखरूप आहेत, हेही माहीत आहे, पण तो ते सोडू शकत नसला, तरी त्याने दृढनिश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने माझे भजन करावेच मात्र विषयसेवन करताना परिणामी ते दुःख देणारे आहेत, असे मानून त्यांच्यात दोषच पाहावेत. अशा प्रकारे मी सांगितलेल्या भक्तियोगाने निरंतर माझे भजन करण्यामुळे मी त्या साधकाच्या हृदयात येऊन बसतो त्यामुळे हृदयातील सर्व वासना नष्ट होतात. अशा तर्‍हेने जेव्हा त्याला माझ्या सर्वात्म्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याच्या हृदयातील अज्ञान दूर होते त्याचे सर्व संशय छिन्नविच्छिन्न होतात आणि कर्मवासना सर्वथैव क्षीण होऊन जातात. (३०) असा माझ्या भक्तीने युक्त असलेला जो योगी माझ्याच चिंतनात मग्न राहातो, त्याला ज्ञान किंवा वैराग्य नसले, तरी इहलोकी त्याचे कल्याण निश्चितपणे होते. कर्म, तपश्चर्या, ज्ञान, वैराग्य, योगाभ्यास, दानधर्म आणि अन्य कल्याणसाधनांनी जे प्राप्त होऊ शकते, ते सर्व, माझा भक्त माझ्या भक्तियोगाने स्वर्ग, मोक्ष किंवा माझे वैकुंठधाम यांपैकी ज्याची इच्छा करतो, ते सहजासहजी मिळवितो. माझे अनन्य प्रेमी, धीर, साधू भक्त स्वतः तर कशाचीच इच्छा करीत नाहीत किंबहुना मी त्यांना कैवल्य, किंवा पुनर्जन्माचा अभाव जरी देऊ केला, तरी तोसुद्धा ते घेऊ इच्छित नाहीत. कशाचीही अपेक्षा न करणे यालाच श्रेष्ठ निःश्रेयस म्हणतात म्हणून ज्याला कोणतीही कामना किंवा अपेक्षा नाही, त्याचीच माझे ठिकाणी भक्ती निर्माण होते. जे बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या परमात्मतत्त्वाला प्राप्त झाले आहेत, त्या माझ्या समदर्शी महात्म्यांचा आणि माझ्या अनन्यप्रेमी भक्तांचा, या विधिनिषेधांद्वारे होणार्‍या पुण्यपापांशी काहीही संबंध असत नाही. अशा प्रकारे जे लोक मी सांगितलेल्या या ज्ञान, भक्ती आणि कर्ममार्गाचा आश्रय घेतात, ते माझ्या परमकल्याणस्वरूप अशा धामाला प्राप्त होतात कारण परब्रह्मतत्त्व त्यांनी जाणलेले असते. (२७-३७)

अध्याय विसावा समाप्त

GO TOP