|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १९ वा
ज्ञान, भक्ती आणि यमनियमादी साधनांचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीभगवान म्हणतात फक्त तर्कावर अवलंबून न राहता ज्याने उपनिषदादी शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करून आत्मसाक्षात्कार करून घेतला आहे, त्याने हे विश्व ही केवळ माझ्यावर भासणारी माया आहे हे जाणून नंतर ते ज्ञानसुद्धा माझ्यातच सोडून द्यावे. ज्ञानी पुरूषाचे ध्येय, फळ, त्याच्या प्राप्तीचे साधन, स्वर्ग आणि मोक्षसुद्धा मीच आहे माझ्याशिवाय दुसर्या कोणत्याही पदार्थावर तो प्रेम करीत नाही. ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न असलेले सिद्धपुरूषचा माझ्या खर्या स्वरूपाला जाणतात, म्हणून ज्ञानी मला सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहे ज्ञानी पुरूष ज्ञानाने मला आपल्या अंतःकरणात धारण करतो. ज्ञानाच्या एका अंशानेसुद्धा जी सिद्धी मिळू शकते, ती तपश्चर्या, तीर्थयात्रा, जपजाप्य, दान किंवा अन्य कोणत्याही पवित्र क्रियांनी पूर्णपणे मिळत नाही. (१-४) म्हणून उद्धवा ! तू ज्ञानसहित आत्मस्वरूपाला जाणून घे आणि नंतर ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन भक्तिभावाने माझे भजन कर. मुनींनी ज्ञानविज्ञानरूप यज्ञाने आपल्याच अंतःकरणात असलेल्या सर्व यज्ञांचा अधिपती अशा मला उद्देशून यज्ञ करून परम सिद्धी मिळविली आहे. हे उद्धवा ! देह, इंद्रिये व देवता यांचा समुदाय असलेले शरीर ही केवळ माया आहे याचाच तू आश्रय घेतला आहेस हे आधी व शेवटी नसून मध्येच असते जन्म इत्यादी सहा विकारसुद्धा याचेच असतात जे आधी असत नाही, शेवटी असत नाही, ते मध्येही असत नाही अशा या शरीराशी तुझा काय संबंध आहे ? (५-७) उद्धव म्हणाला ! हे विश्वेश्वरा ! हे विश्वमूर्ते ! आपण विशुद्ध, विपुल आणि सनातन तसेच वैराग्य आणि विज्ञानाने युक्त अशा ज्ञानाचे वर्णन केले आता महापुरूष जे समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या भक्तियोगाविषयी मला सांगावे. हे प्रभो ! या घोर संसारमार्गावर मी तिन्ही तापांनी होरपळून अत्यंत दुःखी झालो आहे अशावेळी आपल्या छत्रासारख्या चरणकमलांना शरण जाण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही कारण आपले हे चरणकमलच अमृताचा वर्षाव करून शरणागतांना अभय देणारे आहेत. हे महानुभाव ! मी या संसाररूप विहिरीत क्षुद्र विषयरूप पाण्याने सुखोपभोगरूप तहान भागवण्यासाठी आलो व तीत पडलो तेथेच कालरूपी सर्पाने मला दंश केला आता आपणच कृपा करून याला वर काढा आणि याला मुक्त करणार्या आपल्या अमृतवाणीने ओलाचिंब करून टाका. (८-१०) श्रीकृष्ण म्हणाले असेच हे पूर्वी अजातशत्रू युधिष्ठिराने धार्मिकशिरोमणी भीष्मांना विचारले होते त्यावेळी आम्ही सर्वजण तेथे उपस्थित होतो. भारतीय युद्ध संपल्यावर धर्मराज आपल्या आप्तेष्टांच्या संहाराने शोकविह्वळ झाला होता तेव्हा त्याने भीष्मांकडून पुष्कळ धर्मांचे विवरण ऐकल्यानंतर, मोक्षाच्या साधनांसंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावेळी भीष्मांच्या तोंडून ऐकलेले धर्म मी तुला सांगतो ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण आहेत. उद्धवा ! ज्या ज्ञानाने, प्रकृती, पुरूष, महत्तत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही नऊ, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कम]द्रिये आणि एक मन ही अकरा, पाच महाभूते आणि तीन गुण ही आठ, अशी ही एकूण अठ्ठावीस तत्त्वेच सर्व कार्यांमध्ये आहेत, तसेच या सर्वांमध्ये एकच परमात्मतत्त्व व्यापून आहे, असे पाहिले जाते, तेच परोक्ष ज्ञान होय, हे माझे निश्चित मत आहे. ही अठ्ठावीस तत्त्वे न पाहाता त्यांत व्यापून असलेले एक परमात्मतत्त्वच अनुभवणे याला विज्ञान. (साक्षात्कार) म्हणतात तसेच त्याच तत्त्वापासून त्रिगुणात्मक पदार्थांची उत्पत्ती, स्थिती व लय होतात, हे जाणावे. अशा प्रकारे जे परमात्मतत्त्व सुरूवातीला आणि शेवटी असते, तेच एका कार्यातून दुसर्या कार्यात अनुस्यूत होत राहाते आणि प्रलयकाळी उत्पन्न झालेले सर्व आपल्यामध्ये विलीन करून घेतल्यावर शेवटी जे शिल्लक राहाते, तेच ‘सत्‘ तत्त्व होय. वेद, प्रत्यक्ष, इतिहास आणि अनुमान या चारही प्रमाणांनी भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही म्हणून विवेकी पुरूष भेदबुद्धीचा त्याग करतो. जसे या लोकातील भोग नाशवान आहेत, त्याप्रमाणे यज्ञादी कर्मांच्या फलस्वरूप मिळणारी स्वर्गादी ब्रह्मलोकापर्यंतची सर्व सुखे अमंगल, दुःखदायी आणि नाशवान आहेत, असे विवेकी माणसाने जाणावे. (११-१८) हे पुण्यशील उद्धवा ! भक्तियोगाचे स्वरूप मी तुला यापूर्वीच सांगितले आहे; परंतु तो ऐकण्याची तुला अतिशय आवड आहे म्हणून मी तुला माझी भक्ती प्राप्त होण्याचे श्रेष्ठ साधन सांगतो. माझ्या अमृतमय कथांविषयी श्रद्धा ठेवावी नेहमी माझ्या गुणांचे आणि नामांचे संकीर्तन करावे माझी पूजा करण्यात अत्यंत निष्ठा ठेवावी आणि स्तोत्रांच्याद्वारे माझी स्तुती करावी. माझ्या सेवेमध्ये आदर ठेवावा मला साष्टांग नमस्कार करावा माझ्या भक्तांची पूजा विशेष रीतीने करावी आणि सर्व प्राण्यांमध्ये मला पाहावे. आपले सर्व व्यवहार फक्त माझ्यासाठीच करावेत वाणीने माझ्याच गुणांचे वर्णन करावे आणि आपले मन मलाच अर्पण करून सर्व कामना सोडून द्याव्यात. धन, भोग आणि सुखाचा माझ्यासाठी त्याग करावा आणि यज्ञ, दान, हवन, जप, व्रत आणि तप असे सर्व काही माझ्यासाठीच करावे. उद्धवा ! जे लोक या धर्मांचे पालन करून मला समर्पित होतात, त्यांच्या हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो मग त्याला आणखी काय मिळायचे शिल्लक राहणार ? (१९-२४) धर्माचे अशा प्रकारे पालन करण्याने चित्तामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी होते आणि ते शांत होऊन आत्मचिंतन करू लागते त्यावेळी भक्ताला धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य स्वतःहून प्राप्त होते. तेच मन जेव्हा मिथ्या प्रपंचात रमून इंद्रियांसह इकडेतिकडे भरकटू लागते, तेव्हा ते चित्त रजोगुणाने व्यापून नश्वर विषयांत गुंतते तेव्हा त्याची स्थिती वरील स्थितीच्या उलट होते. उद्धवा ! ज्याच्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते, तोच धर्म होय ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा साक्षात्कार होतो, तेच ज्ञान होय विषयांपासून अलिप्त राहाणे हे वैराग्य होय आणि अणिमादी सिद्धी हेच ऐश्वर्य होय. (२५-२७) उद्धवाने विचारले हे रिपुसूदना ! यम आणि नियम किती प्रकारचे आहेत ? हे श्रीकृष्णा ! शम म्हणजे काय ? दम म्हणजे काय ? हे प्रभो ! तितिक्षा आणि धैर्य, हे काय आहे ? दान, तपश्चर्या, शौर्य, सत्य, ऋत त्याग, कल्याणकारी धन, यज्ञ आणि दक्षिणा यांचे स्वरूप काय आहे ? श्रीमान केशवा ! पुरूषांचे खरे बळ कोणते ? भग आणि लाभ म्हणजे काय ? विद्या, लज्जा, श्रेष्ठ श्री, तसेच सुख व दुःख हे काय आहे ? पंडित आणि मूर्ख यांची लक्षणे कोणती ? सन्मार्ग आणि कुमार्ग म्हणजे काय ? स्वर्ग आणि नरक हे काय आहेत ? बंधू कोणाला मानावे ? घर म्हणजे काय ? धनवान कोण आणि निर्धन कोण ? कंजूष कोण आहे ? ईश्वर कोणाला म्हणतात ? हे भक्तवत्सल प्रभो ! आपण माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या त्याचबरोबर यांच्या विरोधी जे पदार्थ आहेत, त्यांच्याविषयीही सांगा. (२८-३२) श्रीकृष्ण म्हणाले अहिंसा, सत्य, चोरी न करणे आसक्ती नसणे, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे ‘यम‘ होत अंतःशुद्धी बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथिसेवा, माझे पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरूसेवा, हे ‘नियम‘ अशा प्रकारे यम आणि नियम या दोन्हींची संख्या प्रत्येकी बारा आहे हे उद्धवा ! जे लोक यांचे पालन करतात, त्यांना हे त्यांच्या इच्छेनुसार फळे देतात. बुद्धी माझ्या ठायी स्थिर करणे म्हणजेच ‘शम‘ होय इंद्रियांच्या संयमाचे नाव ‘दम‘ आहे दुःख सहन करण्याला ‘तितिक्षा‘ म्हणतात जीभ आणि जननेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणे हेच ‘धैर्य’ होय. सर्वांना अभय देणे हेच परम ‘दान‘ आहे कामनांचा त्याग म्हणजेच ‘तप‘ आपल्या वासनांवर विजय मिळवणे म्हणजेच ‘शूरता‘ समदर्शन हे ‘सत्य‘ होय. मधुर भाषणाला महात्म्यांनी ‘ऋत‘ म्हटले आहे कर्मांमध्ये आसक्त न होणे म्हणजेच ‘पावित्र्य‘ कामनांचा त्याग हाच ‘संन्यास‘. धर्म हेच माणसांचे कल्याणकारी ‘धन‘ आहे मी परमेश्वर ‘यज्ञ‘ आहे ज्ञानाचा उपदेश करणे म्हणजेच ‘दक्षिणा‘ होय प्राणायाम हेच श्रेष्ठ ‘बळ‘ होय. माझे ऐश्वर्यच ‘भग‘ आहे माझी भक्ती हाच उत्तम ‘लाभ‘ आहे, जिच्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांमधील भेद नाहीसा होतो, तीच खरी ‘विद्या‘ समजावी पाप करण्याची घृणा वाटणे, याचेच नाव ‘लज्जा‘ असे आहे. निरपेक्षता इत्यादी गुणच ‘श्री‘ होय सुखदुःखाच्या पलीकडे जाणे म्हणजेच ‘सुख‘ विषयांची कामना हेच ‘दुःख‘ समजावे आणि बंधन व मोक्षाचे तत्त्व जाणणे हेच ‘पांडित्य‘ होय. शरीर इत्यादींना ‘मी‘ मानणारा तो ‘मूर्ख‘ होय माझी प्राप्ती करून देतो, तोच खरा ‘मार्ग‘ होय चित्ताची बहिर्मुखता हाच ‘कुमार्ग‘ होय सत्त्वगुणाची वृद्धी म्हणजेच ‘स्वर्ग‘ आणि सखया ! तमोगुणाची वृद्धीच ‘नरक‘ होय गुरूच खरा ‘बंधू‘ होय आणि तो गुरू मी आहे हे मनुष्यशरीर हेच खरे ‘घर‘ आहे तसेच जो गुणांनी संपन्न आहे तोच ‘धनवान‘ समजावा. जो असंतुष्ट असतो तो ‘दरिद्री‘ होय इंद्रिये ताब्यात नसलेला तो ‘कृपण‘ होय ज्याची चित्तवृत्ती विषयांमध्ये आसक्त नाही, तोच ‘ईश्वर‘ याच्या उलट जो विषयांमध्ये आसक्त आहे, तोच ‘असमर्थ‘. उद्धवा ! तू जितके प्रश्न विचारले होतेस, त्या सर्वांची मी उत्तरे दिली गुण आणि दोषांची वेगवेगळी लक्षणे मी तुला किती म्हणून सांगू ? सगळ्यांचा सारांश एवढाच की, गुण आणि दोष पाहात राहाणे हाच सर्वात मोठा दोष आहे आणि गुणदोषांकडे दृष्टी न देणे हाच सर्वात मोठा गुण होय. (३३-४५) अध्याय एकोणिसावा समाप्त |