|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १८ वा
वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे धर्म - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीकृष्ण म्हणतात गृहस्थाश्रमी मनुष्य जर वानप्रस्थआश्रमात जाऊ इच्छित असेल, तर त्याने आपल्या पत्नीला पुत्रांकडे सोपवावे किंवा आपल्याबरोबर घेऊन जावे आणि आपल्या आयुष्याचा तिसरा भाग वनातच राहून शांत चित्ताने व्यतीत करावा. वनातील पवित्र कंदमुळे आणि फळे खाऊनच त्याने उदरनिर्वाह करावा वस्त्रांऐवजी झाडांच्या साली, झाडांची पाने, मृगचर्म यांचाच उपयोग करावा. केस, लव, नखे आणि दाढीमिशारूप शरीरावरील मळ काढू नये दात दंतमंजन इत्यादीने घासू नयेत पाण्यात शिरून दिवसातून तीन वेळा स्नान करावे आणि जमिनीवरच झोपावे. उन्हाळ्यात चार बाजूला अग्निकुंडे पेटवून त्यामध्ये राहून डोक्यावर ऊन घ्यावे हे पंचाग्निसाधन होय पावसाळ्यात अंगावर पावसाचा मारा सहन करावा थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत पाण्यात बुडून राहावे अशा रीतीने राहून तप करावे. अग्नीत भाजलेले अन्न किंवा काळानुसार पिकलेली फळे खाऊन भूक भागवावी ते बारीक करण्याची आवश्यकता असेल, तर उखळामध्ये घालून किंवा दगडांनी ठेचून कुटावे, किंवा दातांनी चावून खावे. देश, काळ आणि आपल्या शरीराची कुवत पाहून पोट भरण्यासाठी लागणारी सर्व सामग्री स्वतःच जमवावी दुसर्यांनी दिलेल्या वस्तू वापरू नयेत. वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेल्याने वनातील वस्तूंनीच चरू, पुरोडाश इत्यादी हविष्यान्न तयार करावे त्याचपासून त्या त्या वेळच्या गोष्टी कराव्यात वेदविहित पशुबलीने माझे यजन करू नये. वानप्रस्थाश्रमीयांसाठी वेदवेत्त्यांनी अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, तसेच चातुर्मास्य याग इत्यादी गृहस्थाश्रमाप्रमाणेच करावेत, असे सांगितले आहे. अशा प्रकारे तपाचे आचरण करीत कृश झालेला मुनी तपोमूर्तिस्वरूप माझी आराधना करून प्रथम ऋषिलोकात जातो व नंतर तेथून माझ्या लोकी येतो. जो मनुष्य अतिशय कष्टाने केलेली आणि मोक्ष देणारी ही महान तपश्चर्या क्षुद्र फळांच्या प्राप्तीसाठी करतो, त्याच्याइतका मूर्ख कोण असेल बरे ? (१-१०) जेव्हा वानप्रस्थाश्रमी आपल्या आश्रमाच्या नियमांचे पालन करण्यास असमर्थ होतो, म्हातारपणामुळे त्याचे शरीर थरथर कापू लागते, तेव्हा भावनेने अंतःकरणात यज्ञाच्या अग्नींची स्थापना करावी आणि आपले मन माझे ठिकाणी लावून अग्नीत प्रवेश करावा. कर्मांचे फळ म्हणून जे लोक प्राप्त होतात, ते नरकाप्रमाणे दुःखपूर्ण आहेत, असे वाटून जर पूर्ण वैराग्य आले, तर विधिपूर्वक अग्नींचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. ज्याला संन्यास घ्यावयाचा असेल त्याने शास्त्रानुसार मला उद्देशून यज्ञ करावा नंतर आपले सर्वस्व ऋत्विजाला देऊन टाकावे यज्ञाचे अग्नी आपल्या प्राणात विलीन करावेत आणि नंतर कसलीही अपेक्षा न ठेवता संन्यास ग्रहण करावा. जेव्हा ब्राह्मण संन्यास ग्रहण करू लागतो, तेव्हा देव स्त्रीपुरूषादिकांच्या रूपाने त्याच्या संन्यासग्रहणामध्ये विघ्न आणतात, कारण ते असा विचार करतात की, "हा आमची अवहेलना करून, परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहे". (११-१४) संन्याशाने वस्त्र धारण केलेच, तर फक्त लंगोटी व त्यावर एक लहानशी छाटी असावी संकटकाळ नसेल तर त्याने फक्त दंड आणि कमंडलू या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पूर्वी टाकलेली वस्तू बाळगू नये. डोळ्यांनी पाहून जमिनीवर पाऊल टाकावे पाणी वस्त्राने गाळून प्यावे, सत्याने पवित्र अशीच वाणी उच्चारावी आणि मनाला पवित्र वाटेल, असेच आचरण करावे. उद्धवा ! वाणीचा मौन, शरीराचा काम्यकर्मत्याग आणि मनाचा प्राणायाम, हे दंड होत ज्याच्याजवळ हे तिन्ही दंड नाहीत, तो केवळ बांबूचे दंड घेऊन संन्यासी होत नाही. संन्याशाने निंदित आणि पतित सोडून चारही वर्णांकडून भिक्षा स्वीकारावी प्रथम न ठरवता फक्त सात घरातून भिक्षा स्वीकारावी भिक्षेमध्ये जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असावे. अशा प्रकारे भिक्षा घेऊन गावाबाहेर जलाशयावर जावे तेथे हातपाय धुऊन पाण्याने प्रोक्षण करून भिक्षा पवित्र करावी नंतर शास्त्रोक्त पद्धतीने भिक्षेचे भाग ज्यांनात्यांना देऊन जे शिल्लक राहील, ते मौन धारण करून सर्व खावे. संन्याशाने सगळीकडे एकट्यानेच फिरावे कोठेही आसक्ती ठेवू नये इंद्रिये ताब्यात ठेवावीत आत्म्याशीच खेळावे आत्मप्रेमातच तन्मय असावे, प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने वागावे आणि परमात्म्याला सगळीकडे समदृष्टीने पाहात राहावे. संन्याशाने निर्जन पण निर्भय अशा एकांतात राहावे माझ्यावरील प्रेमाने त्याचे हृदय विशुद्ध असावे त्याने स्वतःला माझ्यापासून अभिन्न समजावे. त्याने आपल्या ज्ञाननिष्ठेने चित्ताचे बंधन आणि मोक्ष यासंबंधी विचार करावा व असा निश्चय करावा की, विषयोपभोगासाठी इंद्रियांचे चंचल होणे, हे बंधन आहे आणि त्यांना नियंत्रणाखाली ठेवणे, हाच मोक्ष होय. म्हणून संन्याशाने मन आणि पाचही इंद्रिये यांना जिंकावे, भोग हे क्षुद्र आहेत असे समजून त्यांच्याबाबत विन्मुख असावे आणि आत्म्यातच परम आनंदाचा अनुभव घ्यावा अशा प्रकारे माझ्याशी एकरूप होऊन राहावे. पवित्र देश, नद्या, पर्वत, वने, आणि आश्रमांनी परिपूर्ण अशा पृथ्वीवर फिरत राहावे फक्त भिक्षेसाठीच नगर, गाव, गौळवाडा किंवा यात्रेकरूंच्या समूहात जावे. शक्यतो वानप्रस्थींच्या आश्रमातूनच भिक्षा मागून आणावी कारण शेतात पडलेल्या दाण्यांपासून ते अन्न शिजवतात म्हणून ते पवित्र असते आणि ते खाल्ल्याने चित्त शुद्ध होऊन ताबडतोब मोह नष्ट होतो. (१५-२५) संन्याशाने दृश्य जगाला सत्य मानू नये कारण ते नाश पावते कोठेही आसक्ती नसावी इहलोकी किंवा परलोकी काहीही करण्याची इच्छा बाळगू नये. संन्याशाने आत्म्यामध्ये दिसणारे मन, वाणी आणि प्राण यांचा संघात असलेले हे जग म्हणजे माया आहे, असा निश्चय करून त्याचा त्याग करावा व आत्मस्वरूपात स्थिर राहून त्याचे कधीही स्मरण करू नये. ज्ञाननिष्ठ, विरक्त अथवा कशाचीच अपेक्षा नसलेला माझा भक्त यांनी आश्रम किंवा त्याची चिह्ने यांचा त्याग करावा व शास्त्राने सांगितलेल्या विधिनिषेधांचीही पर्वा न करता स्वच्छंदपणे वागावे. बुद्धिमान असूनही त्याने बालकाप्रमाणे खेळावे, हुशार असूनही मूर्खाप्रमाणे राहावे, विद्वान असूनही वेड्यासारखे बडबडावे आणि वेदवेत्ता असूनही पशूप्रमाणे वागावे. त्याने वेदाविषयी ऊहापोह करू नये, पाखंडी नसावे, तर्कवितर्क करू नये आणि कोरड्या वादविवादात कोणाचीही बाजू घेऊ नये. त्याने धैर्यवान असावे त्यामुळे कोणाचाही त्याला त्रास वाटणार नाही आणि तोही कोणाला त्रास देणार नाही एखाद्याने त्याची निंदा केली तरी त्याने ती प्रसन्न मनाने सहन करावी, कोणाचाही अपमान करू नये एखाद्या पशूप्रमाणे आपल्या शरीरासाठी कोणाशीही वैर करू नये. पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या पात्रांमध्ये एकच चंद्र जसा वेगवेगळा दिसतो, त्याचप्रमाणे एकच परमात्मा सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही राहिलेला आहे सर्वांचा आत्मा एकच आहे आणि सर्व प्राण्यांची शरीरेसुद्धा एकाच समान तत्त्वांनी बनलेली आहेत म्हणून त्यांमध्ये मूलद्रव्यसुद्धा एकच आहे, असा विचार करावा. (२६-३२) संन्याशाने एखादे दिवशी भोजन मिळाले नाही तरी दुःखी होऊ नये किंवा मिळाले तरी हर्ष मानू नये त्याने धैर्य धरून भोजन मिळणे अगर न मिळणे हे प्रारब्धाच्या अधीन आहे, असे समजावे. भिक्षेसाठी प्रयत्न करणे योग्यच आहे कारण त्यामुळेच प्राण्यांचे रक्षण होते प्राण वाचले तरच तत्त्वाचा विचार करता येईल आणि तत्त्वविचाराने तत्त्वज्ञान होऊन मुक्ती मिळेल. संन्याशाने प्रारब्धानुसार चांगले अगर वाईट, भिक्षान्न मिळेल, तेच खावे वस्त्र आणि अंथरूणपांघरूणसुद्धा जे मिळेल, त्यावरच काम भागवावे. ज्ञानी पुरूषाने पावित्र्य, आचमन, स्नान किंवा इतर नियम शास्त्राची आज्ञा म्हणून पाळू नयेत मी ईश्वर सर्व कर्मे जशी लीलया करतो, तशी त्याने सहज जमल्यास करावीत. ज्ञानी पुरूष भगवंतांना सगळीकडे पाहातो म्हणून त्याची भेददृष्टी मावळलेली असते शरीर सुटण्यापूर्वी कदाचित अशी भेददृष्टी वाढली, तरीसुद्धा मरणानंतर तो मलाच येऊन मिळतो. (३३-३७) जितेंद्रिय पुरूषाचा जेव्हा असा निश्चय होतो की, विषयांच्या भोगांचे फळ दुःखच आहे, तेव्हा त्याने विरक्त व्हावे आणि माझ्या प्राप्तीचे साधन त्याला माहीत नसेल तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना त्याने शरण जावे. श्रद्धावान व गुरूंचे दोष न पाहाणार्या गुरूभक्त शिष्याने जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, तोपर्यंत मलाच गुरूंच्या रूपामध्ये पाहून त्यांची आदराने सेवा करावी. परंतु ज्याने पाच इंद्रिये आणि मन या सहांवर विजय मिळविला नाही, ज्याचे इंद्रियरुपी घोडे आणि बुद्धीरूपी सारथी हे दोघेही बिघडलेले आहेत, तसेच ज्याच्या हृदयात ज्ञान व वैराग्य नाही, तो जर त्रिदंडी संन्याशाचा वेष धारण करून आपले पोट भरत असेल, तर तो संन्यासधर्माचा नाशच करीत आहे, असे समजावे शिवाय तो देवांना, स्वतःला आणि आपल्या हृदयात असलेल्या मला फसविण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतात म्हणून इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांना तो गमावून बसतो. संन्याशाचे मुख्य धर्म शांती आणि अहिंसा, वानप्रस्थाचे मुख्य धर्म तपश्चर्या आणि तत्त्वविचार गृहस्थाश्रमीचे मुख्य धर्म प्राण्यांचे रक्षण व यज्ञयाग आणि ब्रह्मचार्याचा मुख्य धर्म गुरूंची सेवा होय. फक्त ऋतुकाळीच आपल्या स्त्रीशी सहवास करणार्या गृहस्थाचेसुद्धा ब्रह्मचर्य, तपश्चर्या, पवित्र्य, संतोष आणि सर्व प्राण्यांबद्दल प्रेमभाव हे मुख्य धर्म होत माझी उपासना तर सर्वांनीच केली पाहिजे. अशा प्रकारे जो अनन्य भावाने आपल्या वर्णाश्रमधर्मांच्या द्वारा माझ्या सेवेत तत्पर आणि सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझीच भावना करतो, त्याला माझी दृढ भक्ती प्राप्त होते. उद्धवा ! सर्व लोकांचा स्वामी, सर्वांची उत्पत्ती आणि प्रलयांचे परम कारण ब्रह्म अशा मला तो अखंड भक्तीच्याद्वारा प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे तो गृहस्थ आपल्या धर्मांचे पालन करून आपले अंतःकरण चांगल्या तर्हेने शुद्ध करून माझे स्वरूप जाणतो आणि ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन लवकरच मला प्राप्त करून घेतो. मी तुला हा वर्णाश्रमांचे पालन करणार्यांच्या आचारधर्म सांगितला आहे हे करताना जर तो माझ्या भक्तीने संपन्न असेल, तर त्याला खात्रीने मोक्षाची प्राप्ती होते. हे उद्ववा ! तू मला जो प्रश्न विचारला होतास, त्याचे उत्तर मी दिले आणि आपल्या धर्माचे पालन करणारा भक्त परब्रह्मस्वरूप अशा मला कशा रीतीने प्राप्त होतो, तेही सांगितले. (३८-४८) अध्याय अठरावा समाप्त |