|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १७ वा
वर्णाश्रम धर्म निरूपण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] उद्धव म्हणाला हे कमलनयन श्रीकृष्णा ! आपण पूर्वी वर्णाश्रमांचे आचार पाळणार्या माणसांसाठी तसेच सर्वच माणसांसाठी तुमच्या भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला होत्या, त्या त्या स्वधर्माचे अनुष्ठान कसे केल्याने माणसांना आपली भक्ती प्राप्त होईल, ते मला सांगावे. ह प्रभो ! महाबाहो माधवा ! पूर्वी आपण हंसरूपाने ब्रह्मदेवांना परमधर्माचा उपदेश केला होता. हे रिपुदमना ! पुष्कळ काळ निघून गेल्याकारणाने यावेळी पूर्वी सांगितलेला तो धर्म मृत्यूलोकातून जवळजवळ नाहीसा झाल्यासारखाच आहे. हे अच्युता ! ब्रह्मदेवाच्या ज्या सभेतही वेदादिक कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात, तेथे सुद्धा आपल्याखेरीज दुसरा कोणीही, आपला हा धर्म तयार करणारा, तो सांगणारा व त्याचे रक्षण करणारा नाही मग पृथ्वीवर कसा असेल ? (१-५) हे मधुसूदना ! या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे आणि उपदेशक असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावर हा लुप्त धर्म कोण सांगेल ? म्हणून सर्व धर्म जाणणार्या हे प्रभो ! आपली भक्ती प्राप्त करून देणारा हा धर्म ज्याला जसा आचरणे योग्य आहे, तसा सांगावा. (६-७) श्रीशुक म्हणतात आपल्या भक्तशिरोमणी उद्धवाने जेव्हा असा प्रश्न विचारला, तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यांच्या कल्याणासाठी त्यांना सनातनधर्माचा उपदेश केला. (८) भगवान श्रीकृष्ण म्हणाले - हे उद्धवा ! तुझा हा धर्मविषयक प्रश्न सर्व वर्णांच्या व आश्रमांच्या माणसांना परम कल्याणस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे म्हणून मी तुला त्या धर्मांविषयी सांगतो ऐक. या कल्पाच्या आरंभी, सत्ययुगात सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता त्यावेळी सर्वजण जन्मतःच कृतकृत्य होते म्हणूनच त्याचे नाव कृतयुग असेही आहे. त्यावेळी फक्त प्रणवच. (ॐकार) वेद होता आणि तपश्चर्या, पावित्र्य, दया व सत्य अशा चार चरणांनी युक्त असा मीच बैलाचे रूप धारण केलेला धर्म होतो त्यावेळचे निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करीत होते. हे उद्धवा ! त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारा ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे तीन वेद प्रगट झाले त्यांपासून होता, अध्वर्यू व उद्गाता हे कर्मरूप तीन भेद असणार्या यज्ञांच्या रूपाने मी प्रगट झालो. विराट पुरूषाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्रांची उत्पत्ती झाली त्यांचा स्वधर्म हीच त्यांना ओळखण्याची खूण होती. विराट पुरूषरूप माझ्या जघनभागापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षःस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून संन्यासाश्रमाची उत्पत्ती झाली. (९-१४) या वर्ण आणि आश्रमांच्या माणसांचे स्वभावसुद्धा त्यांच्या जन्माच्या ठिकाणांनुसार उत्तम, मध्यम आणि अधम असे झाले. शम, दम, तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मणवर्णाचे स्वाभाविक धर्म होत. तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मणभक्ती आणि ऐश्वर्य हे क्षत्रिय वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. आस्तिकता, दानशूरपणा, दंभ नसणे, ब्राह्मणांची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे, हे वैश्य वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. ब्राह्मण, गायी आणि देवतांची निष्कपट भावनेने सेवा करणे आणि त्यातून जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असणे, हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. अपवित्रता, खोटे बोलणे, चोरी करणे, ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करणे, खोटेनाटे भांडण करणे, काम, क्रोध, लोभ यांच्या आहारी जाणे, हे अंत्यजाचे स्वभाव होत. सर्व वर्णांसाठी सर्वसाधारण धर्म हेच आहेत की, मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा न करणे, सत्यावर अढळ राहाणे, चोरी न करणे, कामक्रोधलोभापासून दूर राहाणे आणि प्राणिमात्रांचे कल्याण होईल, तेच करणे. (१५-२१) ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी गर्भधान इत्यादी संस्कारांनी प्रारंभ करून क्रमाने यज्ञोपवीत संस्काररूप दुसरा जन्म प्राप्त करून गुरूकुलात राहावे तेथे इंद्रियांवर संयम ठेवून आचार्यांनी बोलावल्यावर वेदांचे अध्ययन करावे. मेखला, मृगचर्म, दंड, रूद्राक्षमाळ, यज्ञोपवीत आणि कमंडलू धारण करावे डोक्यावर जटा ठेवाव्यात दंतधावन आणि वस्त्रे धुणे या गोष्टी हौस म्हणून करू नयेत रंगीत आसनावर बसू नये आसनासाठी वगैरे कुश घ्यावेत. स्नान, भोजन, हवन, जप आणि मलमूत्र त्याग करतेवेळी मौन पाळावे काख आणि गुप्तेंद्रियाजवळील केस काढू नयेत तसेच नखेही कधी काढू नयेत. पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे स्वतः कधीही वीर्यपात करू नये जर कधी वीर्यस्खलन झालेच, तर पाण्याने स्नान करून, प्राणायाम करून गायत्री मंत्राचा जप करावा. ब्रह्मचर्याने पावित्र्य पाळून एकाग्रतेने अग्नी, सूर्य, आचार्य, गाय, ब्राह्मण, गुरू, वृद्धजन आणि देवतांची उपासना करावी तसेच सायंकाळी आणि प्रातःकाळी मौन धारण करून संध्योपासना व गायत्री मंत्राचा जप करावा. आचार्याना माझेच स्वरूप मानावे त्यांचा कधीही अपमान करू नये त्यांना साधारण मनुष्य समजून त्यांच्याकडे दोषदृष्टीने पाहू नये कारण गुरू सर्वदेवमय आहेत. सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणून ती गुरूंसमोर ठेवावी तसेच इतरही गुरूदेवांना अर्पण करावे त्यांची आज्ञा झाल्यावरच त्याचा उपयोग करावा. अशा प्रकारे स्वतःकडे कमीपणा घेऊन शुश्रूषा करून आचार्यांची आज्ञा पालन करण्यात नेहमी तत्पर असावे.आचार्य कुठे जात असतील, तर त्यांच्या मागे मागे चालावे ते झोपल्यानंतर त्यांच्या जवळपास झोपावे ते बसले असतील तर त्यांच्या आज्ञेची वाट पाहात, हात जोडून, जवळच उभे राहावे. विद्याध्ययन संपेपर्यंत सर्व सुखोपभोगांपासून दूर राहून गुरूकुलात या प्रकारे वागत राहावे आणि ब्रह्मचर्यव्रत कधीही खंडित होऊ देऊ नये. (२२-३०) ब्रह्मचार्याची वेदांच्या निवासस्थानीब्रह्मलोकात जाण्याची इच्छा असेल तर त्याने जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन आचार्यांच्या सेवेमध्येच समर्पित करावे. असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्मतेजाने संपन्न होतो आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याने अग्नी, गुरू, आपले शरीर आणि सर्व प्राण्यांचे ठायी मज परमात्म्याची उपासना करावी सर्वत्र एकच परमात्मा आहे, असा भाव ठेवावा. ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्याशांनी स्त्रीकडे पाहाणे, तिला स्पर्श करणे, तिच्याशी बोलणे किंवा थट्टामस्करी करणे इत्यादींपासून लांब राहावे मैथुन करणार्या प्राण्यांकडे पाहू नये. प्रिय उद्धवा ! शुचिता, आचमन, स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थसेवन, जप, सर्व प्राण्यांच्या ठायी मलाच पाहाणे, मन, वाणी तसेच शरीराचा संयम हे नियम सर्व आश्रमांनाच लागू आहेत अस्पृशांना न शिवणे, अभक्ष्य वस्तू न खाणे आणि ज्यांच्याशी बोलू नये त्यांच्याशी न बोलणे, हे नियमसुद्धा या सर्वांसाठी आहेत. (३१-३५) नेष्ठिक ब्रह्मचारी ब्राह्मणाने या नियमांचे पालन केल्याने तो अग्नीसारखा तेजस्वी होतो तीव्र तपश्चर्येमुळे त्याच्या वासना भस्म होऊन जातात अंतःकरण शुद्ध होते आणि तो माझा भक्त होतो. (३६) प्रिय उद्धवा ! ब्रह्मचारी जर गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छित असेल, तर त्याने विधिपूर्वक वेदाध्ययन संपवून गुरूंना दक्षिणा द्यावी आणि त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावा. त्यानंतर ब्रह्मचार्याने गृहस्थाश्रमात किंवा वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा तो ब्राह्मण असेल तर संन्याससुद्धा घेऊ शकतो किंवा क्रमाने एका आश्रमातून दुसर्या आश्रमात प्रवेश करावा मत्परायण भक्ताने याहून वेगळ्या प्रकारे वागू नये. (३७-३८) गृहस्थाश्रमाचा स्वीकार करू इच्छिणार्याने आपल्याला अनुरूप व उत्तम लक्षणांनी संपन्न अशा कुलीन कन्येशी विवाह करावा ती वयाने लहान आणि आपल्याच वर्णाची असावी अन्य वर्णाची कन्या वरावयाची असल्यास आपल्याहून खालच्या वर्णाची वरावी. यज्ञयाग, अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे परंतु दान घेणे, अध्यापन करणे आणि यज्ञाचे पौरोहित्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. दान घेण्यामुळे तपश्चर्या, तेज आणि यश यांचा ह्रास होतो असे वाटले, तर ब्राह्मणाने अध्यापन आणि यज्ञ करविणे याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा किंवा या दोन वृत्तींमध्येही काही दोष वाटत असेल तर धान्याची कणसे तोडल्यावर शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले दाणे वेचून त्यांवर उदरनिर्वाह करावा. ब्राह्मणाचे हे शरीर तुच्छ विषयभोग भोगण्यासाठी नसून जन्मभर कठीण तपश्चर्या करून शेवटी अनंत आनंदस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे. (३९-४२) जो ब्राह्मण आपल्या महान धर्मांचे निष्कामभावाने पालन करतो आणि शेतात तसेच बाजारात पडलेलेसांडलेले धान्याचे दाणे वेचून त्यांवर संतोषपूर्वक आपला उदरनिर्वाह करतो, त्याचबरोबर आपले सर्वस्व मला समर्पित करून कोठेही आसक्ती ठेवीत नाही, तो घरात राहूनही शांतिरूप असे परमपद प्राप्त करून घेतो. संकटात सापडून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या ब्राह्मण भक्ताला जे संकटातून सोडवितात, त्यांची मी ताबडतोब, समुद्रात बुडणार्यांची नाव जशी सुटका करते, तशी सर्व आपत्तींमधून सुटका करतो. जसा एक गजराज दुसर्या हत्तींचे रक्षण करतो, त्याप्रमाणे राजाने पित्याप्रमाणे आपल्या सर्व प्रजेचे कष्टांपासून रक्षण करावे, त्यांचा उद्वार करावा, आणि धीरगंभीर राहून स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा. अशा प्रकारचा राजा सर्व पापांपासून मुक्त होऊन सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून स्वर्गात जातो आणि इंद्राबरोबर सुखोपभोग घेतो. एखादा ब्राह्मण दारिद्य्राने गांजला असेत तर त्याने वैश्यवृत्तीचा आश्रय घेऊन त्या परिस्थितीतून मार्ग काढावा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले, तर तलवार हातात घेऊन क्षत्रिय वृत्तीनेही आपला उदर निर्वाह चालवावा, परंतु कोणत्याही परिस्थितीत नीच लोकांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. याचप्रमाणे प्रजापालनाने क्षत्रिय आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल, तर त्याने वैश्यवृत्तीने व्यापार करून निर्वाह करावा अतिशय घोर आपत्तीत सापडला असेल तर त्याने शिकार करून किंवा ब्राह्मणांचा व्यवसाय अध्यापन करून निर्वाह करावा परंतु नीचांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. प्रतिकूल काळात वैश्याने सुद्धा शूद्रांची वृत्तीसेवा करून आपला उदरनिर्वाह चालवावा आणि शूद्रानेसुद्धा चटया विणणे इत्यादी कामे करून आपले जीवन चालवावे परंतु प्रतिकूल काळ संपताच कनिष्ठ वर्णाच्या वृत्तीने उदरनिर्वाह करण्याचा लोभ करू नये. गृहस्थाने ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकबली, भूतयज्ञ आणि अन्नदानाने अतिथियज्ञ इत्यादींच्या द्वारे माझेच स्वरूप असणारे ऋषी, देवता, पितर, मनुष्य इत्यादींचे दररोज पूजन करावे. गृहस्थाने दैवाने प्राप्त झालेल्या किंवा न्यायमार्गाने मिळविलेल्या धनाने आपले कुटुंबीय किंवा आश्रमाला असलेले नोकर इत्यादींना कोणत्याही प्रकारे पीडा न देता विधीनुसार यज्ञ करावे. (४३-५१) गृहस्थाने कुटुंबामध्ये आसक्त होऊ नये स्वधर्माचरण व भगवद्भजन करण्याची टाळाटाळ करू नये बुद्धिमान पुरूषाने या जगातील वस्तूंप्रमाणे परलोकांतील भोगसुद्धा नाशवानच आहेत, असे समजावे. स्त्रीपुत्र, आप्तेष्ट इत्यादींचा संबंध पाणपोईवर भेटलेल्या वाटसरूंसारखा समजावा प्रत्येक देहात तो वेगवेगळा असतो जसे झोप असेपर्यंतच स्वप्न असते, तसा हा देह असेपर्यंतच संबंध असतात. असा विचार करून गृहस्थाने गृहस्थाश्रमात अडकू नये एखादा पाहूणा तात्पुरता राहातो, त्याप्रमाणे राहावे जो शरीराबद्दल मीपण आणि घर इत्यादींमध्ये ममता ठेवीत नाही, त्याला गृहस्थाश्रम बंधनकारक होत नाही. भक्ताने गृहस्थोचित शास्त्रोक्त कर्मांनी माझी आराधना करीत घरी राहावे किंवा पुत्रवान असेल तर वानप्रस्थ आश्रमात किंवा संन्यास स्वीकारावा. जे लोक गृहस्थाश्रमात आसक्त असतात, पुत्र, धन इत्यादींच्या इच्छेतच अडकून व्याकूळ होतात, तसेच मूर्खपणाने स्त्रीलंपट आणि कंजूष बनून ‘मीमाझे‘ या भावनेमुळे कर्मबंधनाने बांधले जातात. ते असा विचार करतात, "अरेरे ! माझे आईवडील वृद्ध झाले आहेत, माझ्या पत्नीची मुले अजून लहान आहेत माझ्याशिवाय अनाथ, दीन आणि दुःखी झालेले हे कसे जगतील बरे ?". अशा प्रकारे घरदारासंबंधीच्या वासनांनी ज्याचे चित्त विचलित झालेले असते, तो मूर्ख मनुष्य विषयभोग घेऊन कधी तृप्त होत नाही आणि त्यांचेच मरणसमयी चिंतन करीत मेल्यानंतर घोर नरकात जाऊन पडतो. (५२-५८) अध्याय सतरावा समाप्त |