|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १६ वा
भगवंतांच्या विभूतींचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] उद्धव म्हणाला भगवन ! आपण स्वतः परब्रह्म आहात, आपल्याला आदी नाही की अंत नाही आपण मायेचे आवरण नसलेले अद्वितीय तत्त्व आहात सर्व पदार्थांची उत्पत्ती, स्थिती, रक्षण आणि प्रलय यांना कारणीभूत आपणच आहात उच्चनीच अशा सर्व प्राण्यांमध्ये आपण आहात, परंतु ज्यांनी आपले मन आणि इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवली नाहीत, ते आपल्याला जाणू शकत नाहीत ब्रह्मवेत्ते लोकच यथार्थरूपाने आपली उपासना करतात. मोठमोठे ऋषी आपल्या ज्या विभूतींची भक्तीने उपासना करून सिद्धी प्राप्त करून घेतात, त्या विभूती आपण मला सांगाव्यात. हे प्रभो ! आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात आपण त्यांच्यामध्ये स्वतःला गुप्त ठेवून लीला करीत असता आपण सर्वांना पाहाता, पंरतु जगातील प्राणी आपल्या मायेने मोहित झाल्यामुळे आपल्याला पाहात नाहीत. हे अचिंत्य ऐश्वर्यसंपन्न प्रभो ! पृथ्वी, स्वर्ग, पाताळ तसेच दिशांदिशांमध्ये आपल्या प्रभावांनी युक्त अशा ज्या ज्या विभूती आहेत, त्या आपण मला सांगाव्यात प्रभो ! मी आपल्या चरणकमलांना वंदन करतो ही सर्व तीर्थांनाही तीर्थपण देणारी आहेत. (१-५) श्रीभगवान म्हणाले - हे उद्धवा ! प्रश्न विचारणार्यांमध्ये तू श्रेष्ठ आहेस कुरूक्षेत्रावरील युद्धाच्या वेळी शत्रूंशी युद्ध करण्यास तयार झालेल्या अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता. (६) राज्यासाठी कुटुंबियांना मारणे हे निंद्य आणि अधर्माचे कृत्य आहे, असे वाटून सामान्य माणसाप्रमाणे तो असा विचार करीत होता की, "मी मारणारा आहे आणि हे सर्वजण मरणारे आहेत" असा विचार करून तो युद्धापासून परावृत्त झाला होता. तेव्हा मी रणभूमीवर अनेक युक्त्या सांगून वीराग्रणी अर्जुनाची समजूत घातली होती त्यावेळी अर्जुनानेसुद्धा तू मला विचारलास, तोच प्रश्न विचारला होता. उद्धवा ! मी या सर्व प्राण्यांचा आत्मा, सृहृद आणि नियमन करणारा आहे मीच हे सर्व चराचर आहे आणि याच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाला कारणही मीच आहे. गतिशील पदार्थांची गती मी आहे गणना करणार्यांमध्ये काळ मी आहे गुणांची साम्यावस्था जी प्रकृती, ती मी आहे गुणी लोकांचा नैसर्गिक गुण मी आहे. गुणयुक्त पदार्थांमध्ये ज्ञानशक्तिप्रधान वस्तूंतील महत्तत्त्व मी आहे आणि क्रियाशक्तिप्रधान सूत्रात्मा मी आहे सूक्ष्म वस्तूंमध्ये जीव मी आहे अजिंक्य वस्तूंंमध्ये मन मी आहे. वेदांचा अध्यापक हिरण्यगर्भ मी आहे मंत्रांमध्ये ‘अउम‘ या तीन मात्रांनी युक्त असा ॐकार मी आहे अक्षरांमध्ये अकार आणि छंदांमध्ये त्रिपदा गायत्री मी आहे. सर्व देवांमध्ये इंद्र, आठ वसूंमध्ये अग्नी, बारा आदित्यांमध्ये विष्णू आणि अकरा रूद्रांमध्ये शंकर मी आहे. मी ब्रह्मषर्मींध्ये भृगू, राजर्षीमध्ये मनू, देवर्षीमध्ये नारद आणि गाईंमध्ये कामधेनू आहे. मी सिद्धेश्वरांमध्ये कपिल, पक्ष्यांमध्ये गरूड, प्रजापतींमध्ये दक्ष प्रजापती आणि पितरांमध्ये अर्यमा आहे. हे उद्धवा ! मी दैत्यांमध्ये दैत्यराज प्रह्लाद, नक्षत्रांचा आणि वनस्पतींचा राजा चंद्र मी आहे यक्षराक्षसांंमध्ये मी कुबेर आहे. गजेंद्रांमध्ये ऐरावत नावाचा हत्ती, जलचरांचा राजा वरूण, तापणार्या आणि प्रकाश देणार्यांमध्ये सूर्य आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे. मी घोड्यांमध्ये उच्चैःश्रवा, धातूंमध्ये सोने, दंड करणार्यांमध्ये यम आणि सर्पांमध्ये वासुकी आहे. हे पुण्यशील उद्ववा ! मी नागराजांमध्ये शेषनाग, शिंग आणि दाढा असलेल्या प्राण्यांमध्ये मुख्य सिंह, आश्रमांमध्ये संन्यास आणि वर्णांमध्ये ब्राह्मण आहे. मी तीर्थे आणि नद्यांमध्ये गंगा, जलाशयांमध्ये समुद्र, शस्त्रांमध्ये धनुष्य तसेच धनुर्धार्यांमध्ये त्रिपुरारी शंकर आहे. (७-२०) मी निवासस्थानांमध्ये सुमेरू पर्वत, दुर्गम स्थानांमध्ये हिमालय, वनस्पतींमध्ये पिंपळ आणि धान्यांमध्ये सातू आहे. मी पुरोहितांमध्ये वसिष्ठ, वेदवेत्त्यांमध्ये बृहस्पती, सर्व सेनापतींमध्ये कार्तिक स्वामी तसेच सन्मार्गप्रवर्तकांमध्ये भगवान ब्रह्मदेव आहे. पंचमहायज्ञांमध्ये ब्रह्मयज्ञ मी आहे, व्रतांमध्ये अहिंसाव्रत आणि शुद्ध करणार्या पदार्थांमध्ये नित्यशुद्ध वायू, अग्नी, सूर्य, जल, वाणी व आत्मा मी आहे. योगांमध्ये मनोनिरोधरूपी समाधियोग मी आहे जिंकण्याची इच्छा करणार्यांची गुप्त मसलत मी आहे आत्मानात्मविवेकाच्या चर्चेमधील ब्रह्मविद्या मी आहे वादविवाद करणार्यांमधील विकल्प मी आहे. मी स्त्रियांमध्ये मनुपत्नी शतरूपा, पुरूषांमध्ये स्वायंभुव मनू, मुनीश्वरांमध्ये नारायण आणि ब्रह्मचार्यांमध्ये सनत्कुमार आहे. धर्मांमध्ये सन्यासधर्म मी आहे कल्याण करून घेऊ इच्छिणार्यांची अंतर्मुख वृत्ती मी आहे कोणतीही गोष्ट गुप्त राखण्यासाठी लागणारी मधुर वाणी आणि मौन मी आहे, ज्याच्या शरीरापासून स्त्रीपुरूषांची पहिली जोडी उत्पन्न झाली, तो ब्रह्मदेव मी आहे. नेहमी जागृत असणार्यांमध्ये संवत्सररूप काळ मी आहे, ऋतूंमध्ये वसंत, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि नक्षत्रांमध्ये अभिजित. (उत्तराषाढाचा चौथा व श्रवणाचा पहिला चरण याला अभिजित नाव आहे) मी आहे. मी युगांमध्ये सत्ययुग, विवेकी पुरूषांमध्ये महर्षी देवल व असित, व्यासांमध्ये द्वैपायन व्यास आणि विद्वानांमध्ये बुद्धिमान शुक्राचार्य आहे. मी षड्गुणैश्वर्य संपन्नांमध्ये वासुदेव, भगवद्भक्तांमध्ये तू. (उद्वव), किंपुरूषांमध्ये हनुमान आणि विद्याधरांमध्ये सुदर्शन आहे. रत्नांमध्ये पद्मराग, सुंदर वस्तूंमध्ये कमळाची कळी, तृणांमध्ये कुश आणि हविर्द्रव्यांमध्ये गाईचे तूप मी आहे. मी व्यापार करणार्यांमध्ये राहाणारी लक्ष्मी, कपटाने खेळ करणार्यांमध्ये द्यूत, सहनशील लोकांची सहनशीलता आणि सात्त्विक पुरूषांचा सत्त्वगुण आहे. मी बलवानांमधील उत्साह आणि पराक्रम, भगवद्भक्तांमधील भक्तियुक्त निष्काम कर्म आणि वैष्णवांना पूज्य अशा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरूद्ध, नारायण, हयग्रीव, वराह, नृसिंह आणि वामन या नऊ मूर्तीमध्ये पहिली व श्रेष्ठ मूर्ती वासुदेव आहे. मी गंधर्वामध्ये विश्वावसू, अप्सरांमध्ये पूर्वचित्ती, पर्वतांमध्ये स्थैर्य आणि पृथ्वीमध्ये शुद्ध गंध तन्मात्रा आहे. मी पाण्यामध्ये तन्मात्रा रस, तेजस्वी पदार्थांमध्ये अग्नी, सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांमध्ये प्रभा आणि आकाशाचा गुण शब्द आहे. मी ब्राह्मणभक्तांमध्ये बली, वीरांमध्ये अर्जुन आणि प्राण्यांमध्ये त्यांची उत्पत्ती, स्थिती व लय आहे. चालणे, बोलणे, मलत्याग, घेणे, आनंद उपभोगणे, स्पर्श, पाहाणे, स्वाद घेणे, ऐकणे, वास घेणे ही कामे करणार्या सर्व इंद्रियांची शक्ती मीच आहे. पृथ्वी, वायू, आकाश, जल, तेज, अहंकार, महतत्त्व, पंचमहाभूते, जीव, अव्यक्त प्रकृती, सत्त्व, रज, तम हे सर्व विकार आणि त्यांच्याही पलीकडे असणारे ब्रह्म मीच आहे. या तत्त्वांची गणना, लक्षणांच्या द्वारे त्यांचे ज्ञान व तत्त्वज्ञानरूप त्यांचे फळुसद्धा मीच आहे मीच ईश्वर, जीव, गुण आणि गुणी आहे मीच सर्वांचा आत्मा आहे आणि सर्वरूपसुद्धा आहे माझ्या व्यतिरिक्त कोणताच पदार्थ कोठेही नाही. मी कालान्तराने का असेना, परमाणूंचीसुद्धा गणना करू शकेन, परंतु अनंत कोटी ब्रह्मांडे रचणार्या माझ्या विभूतींची गणना मला करता येणार नाही. जेथे जेथे तेज, श्री, कीर्ती, ऐश्वर्य, लज्जा, त्याग, सौंदर्य, सौभाग्य, पराक्रम, तितिक्षा आणि विज्ञान असेल तो तो माझाच अंश आहे, असे समज. (२१-४०) उद्धवा ! मी या सर्व विभूती तुला संक्षेपाने सांगितल्या वास्तविक या काल्पनिक आहेत कारण वाणीने सांगितलेली कोणतीही वस्तू पारमार्थिक दृष्ट्या खरी नसते. म्हणून तू वाणी, मन प्राण आणि इंद्रियांना ताब्यात ठेव सात्त्विक बुद्धीने प्रपंचाकडे लागलेल्या बुद्धीला आवर मग तुला संसाराच्या जन्ममृत्यूच्या मार्गावर भटकावे लागणार नाही. जो साधक बुद्धीच्या द्वारा वाणी आणि मनाला पूर्णपणे ताब्यात ठेवत नाही, त्याचे व्रत, तप आणि ज्ञान कच्च्या घड्यात भरलेल्या पाण्याप्रमाणे नाहीसे होते. म्हणून भक्ताने मत्परायण होऊन, भक्तियुक्त बुद्धीने, मन, वाणी आणि प्राणांचा संयम करावा असे केल्याने तो कृतकृत्य होतो. (४१-४४) अध्याय सोळावा समाप्त |