श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २१ वा

गुणदोषव्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण म्हणाले भक्ती, ज्ञान आणि कर्म हे माझ्या प्राप्तीचे तीन मार्ग आहेत ते सोडून चंचल इंद्रियांच्याद्वारे जे क्षुद्र भोग भोगीत राहातात, ते वारंवार जन्ममृत्यूरूप संसाराच्या चक्रात फिरत राहातात. आपापल्या अधिकारानुसार धर्मांचे ठिकाणी दृढ निष्ठा ठेवणे याला गुण म्हटले आहे आणि याविरूद्ध वागणे हाच दोष आहे गुण आणि दोष यांच्या स्वरूपाविषयी हाच निश्चय आहे. सर्व वस्तू सारख्याच असल्या, तरी पदार्थांचे गुणदोष शुभअशुभ किंवा शुद्धअशुद्ध हे भेद, पदार्थ योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्यासाठी केलेले असतात. हे उद्धवा ! धर्मानुसार कर्मे करणार्‍यांच्या धर्मासाठी, व्यवहारासाठी आणि शरीरनिर्वाहासाठी मी हा आचार सांगितला आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतेच ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत सर्व प्राण्यांच्या शरीरांना मूळ कारण आहेत अशा तर्‍हेने सर्व स्थावरजंगम शरीरांच्या दृष्टीने समान आहेत आणि सर्वांचा आत्मासुद्धा एकच आहे. हे उद्धवा ! सर्वांचे देह समान असले तरी वेदाने त्यांची नावे आणि रूपे वेगवेगळी सांगितली आहेत कारण त्यांनी त्या नामरूपानुसार आचरण करून आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीला आळा घालून चारही पुरूषार्थांची सिद्धी करून घ्यावी, म्हणून. हे श्रेष्ठ उद्धवा ! देश, काल इत्यादींबद्दल आणि पदार्थांच्याबद्दल जे गुणदोषांचे विधान सांगितले गेले आहे, ते कर्म नियमितरूपाने व्हावे, यासाठी. ज्या देशात काळवीट नसतील आणि जेथील लोक ब्राह्मणभक्त नसतील, तो देश अपवित्र होय काळवीट असले तरी जेथे संतपुरूष राहातात, तेवढाच भाग सोडून अंग, वंग, कलिंग इत्यादी देश अपवित्र होत तसेच असंस्कृत लोक राहात असलेला किंवा रेताड प्रदेशही अपवित्रच होय. जेव्हा कर्म करण्यास योग्य अशी सामग्री मिळून कर्मही होऊ शकेल, ती वेळ चांगली समजावी आणि ज्यावेळी सामग्री न मिळाल्याने किंवा अन्य कारणाने कर्म होऊ शकत नाही, तो काळ वाईट होय. पदार्थांची शुद्धी किंवा अशुद्धी, द्रव्य, वचन, संस्कार, काल, अधिकपणा किंवा कमीपणा यांमुळेही होते. शक्ती आणि असमर्थता, बुद्धी आणि वैभव यांनुसार जे दोष उत्पन्न होतात, त्यांचा ठिकाणी आणि अवस्था पाहूनच विचार केला जातो. धान्य, लाकूड, हाडे, सूत, रस, सोने, पारा इत्यादी तेजस्वी पदार्थ, चामडे, घडा इत्यादी मातीच्या बनविलेल्या वस्तू, वेळेनुसार आपोआप हवा लागल्याने, आगीत जाळल्याने, मातीने घासल्याने किंवा पाण्याने धुतल्याने शुद्ध होतात पदार्थांची कधी अनेक पदार्थांनी तर कधी एकानेसुद्धा शुद्धी होते. जर एखाद्या वस्तूला एखादा अशुद्ध पदार्थ चिकटला तर ज्या कृतीने त्या पदार्थाचा वास किंवा लेप जाईल आणि ती वस्तू पूर्वीप्रमाणे होईल, तेव्हा ती शुद्ध समजावी. स्नान, दान, तपश्चर्या, वय, सामर्थ्य, संस्कार, कर्म आणि माझे स्मरण केल्याने चित्ताची शुद्धी होते यांद्वारा शुद्ध होऊन ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी आपल्या विहित कर्मांचे आचरण करावे. गुरूमुखाने ऐकून योग्य तर्‍हेने जाणून घेतल्याने मंत्राची आणि मला समर्पित केल्याने कर्माची शुद्धी होते उद्ववा ! अशा रीतीने देश, काल, पदार्थ, कर्ता, मंत्र आणि कर्म या सहा गोष्टी शुद्ध असल्यास धर्म आणि अशुद्ध असल्यास अधर्म होतो. शास्त्रविधिनुसार गुणही दोष ठरतो आणि दोषही गुण ठरतो एकाच वस्तूविषयी हा गुणदोषांचा नियम पाहिला तर लक्षात येते की, हे गुणदोष वास्तविक नसून कल्पित आहेत. (परंतु शास्त्राने सांगितलेले असल्याने त्यांना प्रामाण्य आहे). सुरापानासारखे कर्म पापजनक असले तरी ते पतितांसाठी पातक ठरत नाही. (यतीसाठी स्त्रीसंग हा दोष असला तरी) गृहस्थांसाठी तो आवश्यक गुण आहे जे जमिनीवरच झोपले आहेत, ते तेथून कोठे पडतील ? (त्याचप्रमाणे पतित हे दुराचरणाने आणखी पतित ते काय होतील ?). ज्या ज्या पदार्थांपासून मनुष्याचे चित्त निवृत्त होते, त्या त्या वस्तूच्या बंधनातून तो मुक्त होतो हा निवृत्तिरूप धर्मच माणसांसाठी परम कल्याणाचे साधन आहे कारण हा शोक, मोह आणि भय नाहीसा करणारा आहे. (१-१८)

विषयांवर गुणांचा आरोप करण्याने त्या विषयांबद्दल माणसाला आसक्ती उत्पन्न होते आसक्ती वाटल्याने ते मिळविण्याची इच्छा निर्माण होते आणि मग त्या कामनापूर्तीमध्ये बाधा निर्माण झाल्यास लोकांमध्ये कलह होऊ लागतो. कलहामुळे सहन होणार नाही एवढा क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे बुद्धीवर अज्ञानाचे आवरण पसरते या अज्ञानामुळे मनुष्याची कार्याकार्याचा निर्णय करणारी चेतनाशक्ती ताबडतोब लुप्त होते. हे साधो ! चेतना शक्ती लुप्त झाल्याने मनुष्य असून नसल्यासारखा होतो एखाद्या मूर्छा आलेल्या किंवा मेलेल्याप्रमाणे त्याची अवस्था होते अशा स्थितीत तो स्वार्थाला पूर्ण मुकतो. विषयांचे चिंतन करता करता ते स्वतःला ओळखत नाही की दुसर्‍याला त्याचे जीवन वृक्षाप्रमाणे ज्ञानशून्य होते लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याच्या शरीरात श्वास चालू असतो इतकेच. (१९-२२)

लहान मुलाला औषध आवडावे, म्हणून त्याला प्रलोभन दाखवावे, त्याचप्रमाणे वेदांमध्ये सांगितलेली फलश्रुती वास्तविक कल्याणकारक नसली, तरी मोक्षाविषयी रूची निर्माण करण्यासाठी असते. मनुष्यांची मने जन्मतःच स्वतःचे अकल्याण करणार्‍या विषय, इंद्रिये आणि आप्तेष्टांमध्ये आसक्त असतात. आपले परम कल्याण न जाणणार्‍या व देवादी योनिरूप पापमार्गात भटकणार्‍या किंबहुना आणखी पापे करून वृक्षपाषाणादी योनीत जाणार्‍या माणसांना हितचिंतक वेद त्याच विषयांत कसा प्रवृत्त करील बरे ? काही अज्ञानी लोक वेदांचा हा अभिप्राय समजून न घेता वरवर गोड वाटणार्‍या फलश्रुतीला भुलतात, परंतु वेदांचे रहस्य जाणणारे मात्र असे सांगत नाहीत. विषयांची इच्छा करणारे दीनहीन, लोभी पुरूष, स्वर्ग इत्यादी फुलांनाच फळे समजतात अग्नीच्याद्वारा सिद्ध होणार्‍या यज्ञ इत्यादी कर्मांना भुलतात त्यामुळे त्यांना शेवटी देवलोक, पितृलोक इत्यादींचीच प्राप्ती होते त्यांना आत्मस्वरूपाची कधीच ओळख होत नाही. कर्माची प्रशंसा करून त्यायोगे इंद्रियांना तृप्त करणारे लोक ज्या परमात्म्यापासून हे विश्व उत्पन्न झाले आहे, त्या हृदयातच विराजमान असणार्‍या मला पाहात नाहीत जसे आंधळ्यांना जवळचेही दिसत नाही. "हिंसेची आवड असेल तर फक्त यज्ञासाठीच हिंसा करा," असे सांगून स्वाभाविक हिंसक प्रवृत्तीला जो मी वेदवाणीच्या द्वारा आळा घातला आहे, ते माझे मत लक्षात न घेऊन, विषयलोलुप दुष्ट लोक हिंसेच्या खेळात पशूंना मारतात आणि त्यांच्या योगाने देव, पितर आणि भूतपतींना उद्देशून यज्ञ करतात. (२३-३०)

स्वर्ग इत्यादी लोक स्वप्नासारखे नाशवंत आहेत परंतु त्यांची वर्णने कानाला गोड वाटतात त्यामुळे तेथील भोगांची आशा मनात बाळगून त्यासाठी माणसे आपल्याजवळील धन खर्च करून टाकतात व्यापारी जसा अधिक नफ्याच्या आशेने समुद्रप्रवासासारखी साहसे करून आपले मूळ भांडवलसुद्धा गमावून बसतो. सत्त्वरजतमोगुणी लोक त्याच गुणांच्या इंद्रादी देवतांची उपासना करतात परंतु तशी माझी उपासना करीत नाहीत. ते अशी कल्पना करतात की, "आम्ही या लोकी यज्ञांचेद्वारा देवतांचे यजन करून स्वर्गांमध्ये जाऊ आणि तेथे दिव्य पदार्थांचा उपभोग घेऊ त्यानंतर जेव्हा पुन्हा आम्हांला जन्म मिळेल, त्यावेळी आम्ही मोठ्या कुलीन श्रीमंत परिवारात जन्म घेऊ अशाप्रकारे भुलविणार्‍या वेदवाणीने त्यांचे चित्त मोहित होते अशा घमेंडखोर अहंकारी लोकांना माझ्याविषयी काहीच आवडत नाही. (३१-३४)

उद्धवा ! कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी तीन कांडे असणारे वेद ब्रह्म आणि आत्मा यांची एकताच सांगतात परंतु ऋषी हा विषय अप्रत्यक्षपणे सांगतात आणि तसे सांगणेच मलाही आवडते. वेदांना शब्दब्रह्म म्हणतात त्यांचे रहस्य समजणे अतिशय कठीण आहे ते परा, पश्यंती आणि मध्यमा वाणीच्या रूपात प्राण, मन आणि इंद्रियमय आहे ते समुद्राप्रमाणे सीमा नसलेले, गूढ असून, त्याचा थांग लागणे अतिशय अवघड आहे. अनंत शक्तिसंपन्न, सर्वव्यापी ब्रह्मस्वरूप अशा मीच वेदवाणीचा विस्तार केला आहे कमळाच्या देठामध्ये जसा बिसतंतू असतो, त्याप्रमाणे ही वेदवाणी प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये अनाहतनादाच्या रूपाने दिसून येते. कोळीकीटक हृदयात उत्पन्न होणारे तंतू आपल्या तोंडातून बाहेर काढतो, त्याप्रमाणे अमृतमय, वेदमय प्रभू प्राणाच्या उपाधीने नादवान होऊन, मनाला निमित्त करून हृदयाकाशातून ॐकारापासून हजारो प्रकारची वैखरी वाणी प्रगट करतो ती वाणी ‘स्पर्श‘. (‘क‘ पासून ‘म‘ पर्यंत व्यंजने), स्वर. (‘अ‘ पासून ‘औ‘ पर्यंत) ऊष्म. (श, ष, स, ह) आणि अंतःस्थ. (य, र, ल, व) या वर्णांनी विभूषित झालेली आहे तीमध्ये उत्तरोत्तर चार चार वर्णांनी वाढत जाणारे छंद आहेत आणि तिचा वेगवेगळ्या भाषांच्या रूपाने विस्तार झाला आहे तिचा पार लागणे कठीण आहे तोच प्रभू ती वाणी प्रलयकाली स्वतःमध्ये विलीन करून घेतो. काही छंद पुढीलप्रमाणे आहेत गायत्री, उष्णिक, अनुष्टुभ्‌, बृहती, पंक्ती, त्रिष्टुभ, जगती, अतिच्छंद, अत्यष्टी अतिजगती आणि विराट. ती वेदवाणी कर्मकांडामध्ये कशाचे विधान सांगते, उपासनाकांडामध्ये कोणकोणत्या देवतांचे वर्णन करते आणि ज्ञानकांडामध्ये कशाकशाचा अनुवाद करून कोणाकोणाचा निषेध करते, याचे रहस्य माझ्याखेरीज अन्य कोणीही जाणत नाही. वेद कर्मकांडामध्ये यज्ञरूपाने माझेच विधान करतात, उपासनाकांडात मलाच देवता म्हणतात ज्ञानकांडात माझ्याखेरीज अन्य वस्तूंचे वर्णन करून "नेति नेति" या वाक्यांच्याद्वारे अन्य सर्व वस्तूंचा निषेधही करतात सर्व वेदांचा अर्थ एवढाच आहे अशा प्रकारे वदे माझ्यामध्येच भेद निर्माण करून ही सगळी माया आहे, असे म्हणून शेवटी भेदाचा निषेध करून वेद प्रसन्न होतात. (३५-४३)

अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP