|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १२ वा
सत्संगाचा महिमा आणि कर्मानुष्ठान व कर्मत्यागाची रीत - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीभगवान म्हणतात सर्व आसक्ती नष्ट करणार्या सत्संगामुळे भक्त मला जसा प्राप्त करू शकतो, तसा योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त दक्षिणा, व्रते, यज्ञ, तीर्थ, नियम, यम इत्यादी साधनांनी मला मिळवू शकत नाही. हे पुण्यशील उद्ववा ! प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या योगानेच दैत्यराक्षस, पशुपक्षी, गंधर्वअप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक आणि विद्याधरांना माझी प्राप्ती झालेली आहे मनुष्यांमध्ये वैश्य, शूद्र, स्त्री, अंत्यज इत्यादी रजोगुणीतमोगुणी स्वभावाच्या पुष्कळशा जीवांनी माझे परमपद प्राप्त करून घेतले आहे वृत्रासुर, प्रह्लाद, वृषपर्वा, बली, बाणासूर, मयदानव, बिभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबवान, गजेंद्र, जटायू, तुलाधार वैश्य, धर्मव्याध, कुब्जा, व्रजातील गोपी, यज्ञपत्न्या आणि इतर अनेकजणसुद्धा सत्संगाच्या प्रभावानेच मला प्राप्त करू शकले. त्यांनी वेदाध्ययन केले नव्हते की महापुरूषांची उपासना केली नव्हती त्याचप्रमाणे त्यांनी कोणतीही व्रते किंवा तपश्चर्यासुद्धा केली नव्हती केवळ सत्संगानेच ते मला येऊन मिळले. गोपी, गाई, यमलार्जुन इत्यादी वृक्ष व्रजातील हरीण इत्यादी पशू,या सर्वांनी भक्तीनेच मला प्राप्त करून घेतले याखेरीज कालियानागासारखे अज्ञानी केवळ प्रेमभावनेने सहजपणे मला मिळून कृतकृत्य झाले. उद्ववा ! प्रयत्नशील साधक, योग, सांख्य, दान, व्रत, तपश्चर्या, यज्ञ, वेदाध्ययन, स्वाध्याय, संन्यास इत्यादी साधनांच्याद्वारे ज्या मला प्राप्त करून घेऊ शकत नाहीत, ते सत्संगाने माझी प्राप्ती करून घेतात. उद्ववा ! ज्यावेळी अक्रूर बलरामदादासह मला वज्रातून मथुरेला घेऊन निघाला, त्यावेळी माझ्याविषयीच्या गाढ प्रेमामुळे माझ्या ठिकाणीच चित्त जडलेल्या गोपी माझ्या वियोगाच्या तीव्र दुःखाने इतक्या व्याकूळ झाल्या होत्या की, माझ्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू त्यांना आनंददायक वाटत नव्हती. अत्यंत प्रियतम असा मी वृंदावनामध्ये होतो, तेव्हा त्यांनी रासक्रीडेच्या रात्री, माझ्यासमवेत अर्ध्या क्षणाप्रमाणे घालविल्या होत्या परंतु प्रिय उद्ववा ! त्याच रात्री मी नसल्यामुळे त्यांना त्याच रात्री एकेका कल्पाप्रमाणे वाटू लागल्या. माझ्याठायी मनबुद्धी एकवटलेल्या त्यांना माझ्याशिवाय आपले आप्तेष्ट, स्वतःचे शरीर, इहलोक, परलोक अशा कशाचीही शुद्ध राहिली नव्हती जसे मुनी समाधीमध्ये भगवंताशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला मिळून जाऊन आपले नामरूप विसरून जातात, तसे त्यांचे झाले होते. त्या माझे खरे रूप जाणत नव्हत्या त्या मला फक्त प्रियतमच समजत होत्या आणि जारभावाने भेटण्याची इच्छा करीत होत्या असे असूनही त्या शेकडो, हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्या प्रभावानेच परब्रह्म अशा मला प्राप्त करून घेतले. म्हणून हे उद्ववा ! तू विधिनिषेध, प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसेच इहपरलोकासंबंधी सर्व कर्मांचा त्याग करून, सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्य भावाने शरण ये मग तुला कोणत्याही प्रकारचे भय राहाणार नाही. (१-१५) उद्वव म्हणाला हे योगेश्वरांचे ईश्वर ! आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे तो असा "स्वधर्मानुसार मी कर्म करावे की, सर्व सोडून आपल्याला शरण यावे" यामुळे माझे मन गोंधळून गेले आहे. (१६) श्रीभगवान म्हणाले तो हा परमेश्वरच प्रथम अनाहत नादस्वरूप परावाणी नावाच्या प्राणासह मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो नंतर तोच मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्यंती नावाची वाणी होतो नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध नावाच्या चक्रात येऊन मध्यमा नावाने वाणीचे किंचित स्थूल रूप धारण करतो त्यानंतर तोच मुखामध्ये येऊन ऱ्हस्वदिर्घ इत्यादी मात्रा, उदात्तादी स्वर आणि ककारादी वर्ण इत्यादी रूपांनी वैखरी नावाची स्थूल वाणी होतो. जसा आकाशात वार्याचा मित्र अग्नी हा उष्णतेच्या रूपात असतो तोच जोराने लाकडावर लाकूड घासले असता ठिणगीच्या रूपात प्रगट होतो नंतर तोच हविर्द्रव्य मिळाल्यानंतर प्रज्वलित होतो त्याचप्रमाणे या वाणीच्या रूपाने मीच प्रगट होतो. याचप्रमाणे बोलणे, कर्म करणे, चालणे, मलमूत्र विसर्जन करणे, वास घेणे, चव घेणे, पाहाणे, स्पर्श करणे, ऐकणे, मनाने संकल्पविकल्प करणे, बुद्धीने निश्चय करणे, अभिमान धरणे इत्यादी सर्व क्रिया, महत्तत्त्व, तसेच सत्त्व, रज, तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्ये, हे सर्व मीच आहे, असे समज. त्रिगुणमय ब्रह्मांडरूपी कमळाचे कारण हा परमात्माच आहे प्रथम तो एकच अव्यक्त होता नंतर काल व माया यांच्या साह्याने तोच अनेक रूपांमध्ये प्रगट झाल्यामुळे अनेक असल्यासारखा वाटू लागला जमिनीत बी पेरल्यानंतर ते जसे अनेक रूपांमध्ये विस्तार पावून प्रगट होते, तसे हे आहे कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत असतात, त्याचप्रमाणे या परमात्म्यामध्येच सारे विश्व ओतप्रोत भरले आहे हा पुरातन संसाररूपी वृक्ष कर्ममय आहे ते कर्मच भोगरूप फुले आणि मोक्षरूप फळ उत्पन्न करते. (१७-२१) पाप आणि पुण्य ही या संसाररूपी वृक्षाची दोन बीजे आहेत शेकडो वासना या याच्या मुळ्या तीन गुण ही त्याची तीन खोडे पंचमहाभूते या याच्या पाच फांद्या आहेत यांमधून पाच प्रकारचे रस. (शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध) बाहेर पडतात दहा इंद्रिये आणि एक मन ह्याही याच्या फांद्याच होत एक जीव आणि एक ईश्वर या झाडावर घरटे बांधून राहातात वात, पित्त, कफ या याच्या तीन साली आहेत सुखदुःख ही दोन फळे होत असा हा संसारवृक्ष सूर्यमंडलापर्यंत पसरलेला आहे विषयलोलुप गृहस्थ या झाडाची दुःखरूप फळे खातात परंतु वनवासी संन्यासी याची सुखरूप फळे खातात एक असणारा मीच मायेमुळे अनेकरूप झालो आहे, हे श्रीगुरूंकडून जे लोक जाणून घेतात, तेच वेदांचे रहस्य जाणणारे होत. हे उद्ववा ! अशा प्रकारे, गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीने तू ज्ञानाची कुऱ्हाड धारदार कर आणि तिने सावधपणे आपला जीवभाव तोडून टाक अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन नंतर ती कुर्हाड टाकून दे. (२२-२४) अध्याय बारावा समाप्त |