|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १३ वा
हंसरूपाने सनक इत्यादींना दिलेल्या उपदेशाचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] भगवान श्रीकृष्ण म्हणाले सत्त्व, रज आणि तम हे तीन बुद्धीचे गुण आहेत, आत्म्याचे नव्हेत, सत्त्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्धसत्त्वाने वृत्तिरूप सत्त्वगुणाचाही त्याग करावा. माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्ति रूप धर्माची वाढ होते सात्त्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्त्व गुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते. सत्त्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होय कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोप नष्ट होतो. शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार ही दहा गुणांच्या वाढीची कारणे आहेत. श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात, ते सात्त्विक समजावेत, ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात, ते तामस समजावेत. (१-५) माणसाने सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्त्विक पदार्थांचेच सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. बांबूंच्या एकमेकावर घासण्याने उत्पन्न झालेला अग्नी जसा बांबूंचे वन जाळून स्वतः शांत होतो, त्याचप्रमाणे गुणांच्या मिश्रणाने उत्पन्न झालेले देह, सत्त्वगुणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने भस्म होतात. (६-७) उद्धवाने विचारले भगवान ! साधारणतः सर्वच माणसांना हे माहीत आहे की, विषय हे संकटांचे घर आहे तरीसुद्धा ती माणसे कुत्री, गाढवे किंवा बोकडांप्रमाणे ते विषय का भोगतात ? (८) श्रीकृष्ण म्हणाले अज्ञानी माणासाच्या मनामध्ये देहाविषयी ‘मी‘ अशी खोटी कल्पना उत्पन्न होते, तेव्हा त्याच्या सत्त्वगुणप्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो. रजोगुणाने घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्पविकल्प करू लागते नंतर त्याच त्याच विषयांचे चिंतन केल्यामुळे त्याच्याविषयी असह्य अशी कामना उत्पन्न होते त्या कामनांच्या अधीन झालेला व मन ताब्यात नसलेला मनुष्य कळून सवरून परिणामी दुःखदायक अशी कामे करतो कारण तो रजोगुणाच्या आवेगाने अतिशय मोहित झालेला असतो. रजोगुणतमोगुणांनी ज्ञानी माणसाचीसुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत, हे जाणून त्यांमध्ये आसक्त होत नाही. म्हणून साधकाने त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन व प्राण यांवर विजय मिळवून क्रमाक्रमाने मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावे. (९-१३) सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्येच स्थिर करावे माझे शिष्य असणार्या सनकादिकांनी योगाचे हेच स्वरूप सांगितले आहे. (१४) उद्ववाने विचारले - हे केशवा ! हा योग आपण सनकादिकांना ज्यावेळी ज्या रूपाने उपदेशिला होता, ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो. (१५) श्री भगवान म्हणाले - ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती. (१६) सनकादींनी विचारले - तात ! हे चित्त स्वभावतःच विषयांचे ठिकाणी आसक्त राहाते आणि ते विषय वासनारूपाने चित्तात राहातात तर मग या संसारसागरातून तरून जाऊ इच्छिणार्या मुमुक्षूने त्यांना एकमेकांपासून दूर कसे ठेवावे ? (१७) भगवान श्रीकृष्ण म्हणाले - भूतांना उत्पन्न करणार्या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न केला होता परंतु त्याची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्याकारणाने पुष्कळ विचार करूनही त्याला प्रश्नाचा आशय कळला नाही. प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने माझे स्मरण केले तेव्हा मी हंसरूपाने त्याच्यासमोर प्रगट झालो. तेव्हा मला पाहून सनकादिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्याजवळ आले त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारले की, "आपण कोण आहात ?" हे उद्ववा ! तत्त्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनींनी मला असे विचारले, तेव्हा मी त्यांना जे सांगितले, ते ऐक. हे विप्रवर ! जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर, आत्मारूप वस्तू एकच आहे मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे ? बरे ! उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो, तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन बोलू ? (१८-२२) वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्त्वे सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहेत म्हणून "आपण कोण ?" हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत तत्त्वतः त्याला काहीही अर्थ नाही. मनाने, वाणीने, दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतले जाते ते सर्व "मीच आहे, माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही" हे तुम्ही निश्चित समजा. हे पुत्रांनो ! चित्त विषयाकार होते आणि विषय चित्तात वासनारूपाने राहातात परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असणार्या जीवाचे देह आहेत. नेहमी विषयांचेच सेवन करीत राहिल्याने चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करते आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात म्हणून साधकाने मद्रूप होऊन या दोन्हींचाही त्याग करावा. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्त्विक, राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत जीव या सर्वांचा साक्षी आहे, असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. ज्याअर्थी हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थांत बांधून टाकते म्हणून साधकाने तुरीय अवस्थास्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचे बंधन तोडावे त्यामुळे विषय व चित्त या दोन्हींचाही परस्परसंबंध तुटतो. "मी, माझे" या अहंकारानेच बंधन निर्माण होते त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो म्हणून हे जाणणार्याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच असावे. मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तीयुक्तीने नाहीसा करीत नाही, तोपर्यंत जो जागृत असूनही अज्ञाननिद्रेत झोपलेलाच समजावा त्याचे हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखेच मिथ्या होय. वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही म्हणून स्वप्न पाहाणार्याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात, त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचेसुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रमधर्म त्यामुळे मिळणार्या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे हे सर्व खोटेच आहे. (२३-३१) जो बाल्य, तारूण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलणार्या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो, तोच स्वप्नावस्थेत त्यांसारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी, चेतन आत्मा एकच आहे "ज्याने स्वप्न पाहिले, जो गाढ झोपला होता, तोच मी जागा आहे," या प्रत्यभिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते. मनाच्या या तीन अवस्था गुणांमुळेच झाल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पिल्या गेलेल्या आहेत, असा निश्चय करा नंतर सगळ्या संशयांचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमानप्रमाण व संतांचे उपदेश यांपासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खड्गाने छिन्नविच्छिन्न करा व आपल्याच हृदयात स्थित असलेल्या माझेपरमात्म्याचे भजन करा. (३२-३३) हे जग, हा मनाचाच खेळ आहे, भास आहे अलातचक्रासारखे हे अतिशय चंचल आहे हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहावे विज्ञान म्हणजे एक परमात्माच जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो गुणांचे कार्य म्हणून जो हा तीन प्रकारचा भेद दिसतो, ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणे खोटी आहे. म्हणून साधकाने हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावे आणि आत्मानंदात मग्न असावे व्यवहारासाठी कधी काही दिसले तरी हे खरे नाही, असा निश्चय करून ते सोडून दिलेले असल्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही शरीर असेपर्यंत फक्त स्मरणरूप संस्कार राहील. मदिरेने धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची शुद्ध असत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे, दैवयोगाने तो कोठे गेला की आला आहे, हेही माहीत नसते. (३४-३६) प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्याकारणाने जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्म शिल्लक आहे, तोपर्यंत तो पडण्याची वाट पाहात असतो समाधीमध्ये स्थिर असलेला आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करीत नाही तसाच. हे ऋषींनो ! सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितले आहे, तेच मी तुम्हांला सांगितले मी यज्ञस्वरूप भगवान स्वतःच तुम्हांला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंसरूपाने आलो आहे, असे समजा. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो ! योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रियनिग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे. समता, अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत, ते सर्व, निर्गुण, निरपेक्ष, सर्वांचा सुहृद, सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात. (३७-४०) या माझ्या उपदेशाने सनकादी मुनींचा संदेह दूर झाला, तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावाने ते माझी स्तुती करू लागले. त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा करून स्तुती केली नंतर ब्रह्मदेवांच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो. (४१-४२) अध्याय तेरावा समाप्त |