श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ११ वा

बद्ध, मुक्त आणि भक्तजन यांची लक्षणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण म्हणाले - आत्म्याला बद्ध किंवा मुक्त म्हणणेसुद्धा माझ्या अधीन असणार्‍या गुणांच्या उपाधीमुळे आहे हे खरे नव्हे गुण मायेमुळे आहेत आणि आत्मस्वरूपाला मोक्ष नाही की बंधन नाही. शोक, मोह, सुख, दुःख आणि देहाची प्राप्ती या सर्वांना मायाच कारणीभूत आहे स्वप्न हा जसा बुद्धीचा भास आहे; तसाच आत्म्यासाठी संसार भास आहे, खरा नव्हे. हे उद्ववा ! विद्या आणि अविद्या या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत त्या मनुष्यांना अनुक्रमे मोक्ष आणि बंधन प्राप्त करून देणार्‍या आहेत या दोन्ही अनादी असून माझ्या मायेने रचलेल्या आहेत. हे महाबुद्धीमान उद्धवा ! माझाच वंश असलेल्या एकट्या जीवालाच अविद्येमुळे अनादी बंधन आहे आणि विद्येमुळे मोक्ष आहे. प्रिय उद्धवा ! आता बद्ध आणि मुक्त या दोहोंमध्ये जो भेद आहे, तो तुला सांगतो, मुक्त ईश्वर आनंदस्वरूप असून नियन्ता आहे, तर बद्ध जीव शोकग्रस्त असून नियम्य आहे असे हे दोघे विरूद्ध धर्मांचे एकचा शरीरात राहातात. या शरीररूपी झाडावर घरटे बनवून अनिर्वचनीय मायेमुळे एकमेकांबरोबर राहाणारे हे दोन पक्षी आहेत दोघे एकमेकांचे मित्र असून समानधर्मी आहेत या दोघांपैकी एक जीव हा या शरीरद्वारा केल्या जाणार्‍या कर्मांच्या फळांचा उपभोग घेतो, पण दुसरा पक्षी जो परमात्मा त्यांचा उपभोग घेत नसूनसुद्धा ज्ञानादी शक्तींनी अधिक शक्तिशाली आहे. जो फळाचा उपभोग घेत नाही, तो स्वतःला व दुसर्‍या जीवालाही जाणतो; परंतु जो भोग भोगतो, तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसर्‍यालाही जाणत नाही अशा प्रकारे जो अविद्येने युक्त आहे, तो नेहमीच बद्ध असतो आणि जो विद्येने युक्त आहे, तो नित्यमुक्त आहे. स्वप्नातून जागा झालेला स्वप्नातील घटनांशी संबंध ठेवत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी देहात राहून सुद्धा देहाच्या गुणधर्मांशी संबंध ठेवत नाही परंतु अज्ञानी मनुष्याला आपला म्हणजेच आत्म्याचा शरीराशी काही संबंध नाही, हे. (जाणकारांकडून) कळले, तरीसुद्धा तो स्वप्नातील जग खोटे आहे, हे कळल्यानंतरही त्यातील घटनांनी जसा सुखीदुःखी होतो, तसाच ‘देह म्हणजेच आपण‘ असे मानून सुखीदुःखी होत असतो. इंद्रिये हे तिन्ही गुणांचे विकार आहेत आणि विषयसुद्धा तिन्ही गुणांचेच विकार आहेत अर्थात इंद्रियांनी विषय घेणे, हा गुणांचाच आपापसातील व्यवहार चालू आहे, हे जाणून आत्मज्ञानी माणसाने निर्विकार राहून आपण काहीच करीत नाही, असे मानावे. प्रारब्धाच्या अधीन असणार्‍या शरीरात इंदियांकडून घडणारी कर्मे ‘मी करतो‘ असे समजणारा अज्ञानी माणूस संसारबंधनात अडकतो. (१-१०)

परंतु जो ज्ञानी विरक्त असतो, तो, झोपणे, बसणे, हिंडणेफिरणे, स्नान करणे, पाहाणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणेपिणे, ऐकणे, इत्यादी सर्व क्रिया इंद्रिये परस्पर करीत आहेत, असे समजून प्रकृतीत राहूनसुद्धा तिच्यापासून एकदम अलिप्त असतो त्यामुळे त्या कर्मांनी बद्ध होत नाही जसे आकाश, सूर्य आणि वायू कोणाचेही गुणदोष ग्रहण करीत नाहीत की कोठे लिप्त होत नाहीत अशा प्रकारे वैराग्यरूपी तेजाने तीक्ष्ण झालेल्या दृष्टीने ज्याचे सगळे संशय नाहीसे होतात, तो ज्ञानी मनुष्य स्वप्नातून जागा झालेल्या माणसाप्रमाणे अनेकत्वाच्या भ्रमापासून दूर होतो. (सर्वत्र एकच परब्रह्म पाहातो). ज्याचे प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या वृत्तींचे संकल्प पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, तो देहामध्ये राहात असूनसुद्धा त्याच्या गुणांपासून पूर्णपणे मुक्त असतो. (११-१४)

अशा मुक्त पुरूषाच्या शरीराला कोणी हिंसकांनी पीडा दिली किंवा दैवयोगाने त्याची कोणी पूजा केली, तरी त्याच्या मनात कोणताही बदल होत नाही. कशातही गुणदोष न पाहाणार्‍या समदर्शी मुनीने बरे किंवा वाईट करणार्‍या वा बोलणार्‍या माणसाची स्तुती किंवा निंदा करू नये. मुनीने आत्मचिंतनात मग्न असावे त्याने कोणाचेही बरेवाईट करू नये किंवा चिंतू नये तसेच कोणाबद्दलही चांगले किंवा वाईट बोलू नये अशा रीतीने वेड्यासारखे वागावे. (१५-१७)

शब्दज्ञानात पारंगत असलेल्या विद्वानाला जर परब्रह्माचा अनुभव आला नसेल, तर त्याचे परिश्रम हे दूध न देणारी गाय पाळण्यासारखेच निरर्थक होत. हे उद्धवा ! दूध न देणारी गाय, कुलटा स्त्री, पराधीन देह, दुर्गुणी मुले, अपात्र माणसाला दिलेले धन आणि माझे वर्णन न करणारी वाणी सांभाळणारा मनुष्य दुःखामागून दुःखेच भोगतो. हे उद्धवा ! जी वाणी या जगाच्या उत्पतिस्थितीसंहारात्मक माझ्या पवित्र कर्मांचे किंवा अन्य लोकप्रिय लीलावतारांचे वर्णन करीत नाही, ती वाणी वांझ होय ज्ञानी पुरूषाची वाणी अशी असू नये. (१८-२०)

अशा प्रकारे तत्त्वजिज्ञासेने आत्म्यामध्ये अनेकत्त्वाचा होणारा भास दूर करावा आणि अशा प्रकारे शुद्ध झालेले मन सर्वव्यापी असलेल्या माझ्या ठिकाणी लावावे आणि इतर सर्व गोष्टी सोडून शांत बसावे. जर माझ्या ठिकाणी मन स्थिर करण्यास असमर्थ असशील, तर सर्व कर्मे निरपेक्षपणे माझ्यासाठीच कर. माणसाने श्रद्धापूर्वक लोकांना पवित्र करणार्‍या माझ्या कल्याणकारी कथा श्रवण कराव्यात, त्यांचे गायन करावे, वारंवार स्मरण करावे, तसेच माझ्या अवतारांचा व लीलांचा अभिनय करावा. हे उद्धवा ! अशा प्रकारे मला शरण येऊन माझ्यासाठीच धर्म, अर्थ, कामांचे आचरण करीत राहिले असता, भक्ताला सनातन अशा माझी निश्चल भक्ती प्राप्त होते. (२१-२४)

सत्संगाने प्राप्त झालेल्या भक्तीने तो माझी उपासना करतो आणि संतांनी दाखविलेले माझे पद तो सहजपणे प्राप्त करून घेतो. (२५)

उद्धव म्हणाला हे पवित्रकीर्ती भगवन ! आपल्या दृष्टीने संतांची लक्षणे कोणती ? सत्पुरूषांनी आदराने वर्णन केलेली आपली भक्ती कशी करावी ? भगवन ! आपणच ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव, सत्य इत्यादी लोक आणि चराचर जगाचे स्वामी आहात मी आपला विनम्र प्रेमी आणि शरणागत भक्त आहे आपण मला हे सांगा. भगवन ! आपण प्रकृतीच्या पलीकडील पुरूष असून चिदाकाशस्वरूप ब्रह्म आहात तरीसुद्धा आपण स्वेच्छेनेच हा स्वतंत्र अवतार धारण केला आहे. (२६-२८)

श्रीकृष्ण म्हणाले माझा भक्त म्हणजे कृपेची जणू मूर्तीच ! तो कोणत्याही प्राण्यांविषयी वैरभाव बाळगत नाही तो सर्व काही प्रसन्न चित्ताने सहन करतो सत्य हे त्याच्या जीवनाचे सारच होय आणि त्याच्या मनात पापवासना निर्माण होत नाही तो समदर्शी आणि सर्वांवर उपकार करणारा असतो. कामनांमुळे त्याची बुद्धी कलुषित होत नाही तो संयमी, गोड स्वभावाचा आणि पवित्र असतो तो संग्रहापासून दूर राहातो काही मिळविण्यासाठी प्रयत्‍न करीत नाही जरूरीपुरतेच खातोपितो आणि शांत असतो स्वधर्माचरणात त्याची बुद्धी स्थिर असते तो मलाच शरण असतो आणि आत्मतत्त्वाच्या चिंतनामध्ये मग्न असतो. तो सावध, निर्विकार आणि धैर्यवान असतो तहानभूक, शोकमोह आणि जरामृत्यू हे सहा विकार त्याने जिंकलेले असतात तो स्वतः मानाची इच्छा ठेवीत नाही, परंतु इतरांचा सन्मान करतो माझ्या भक्तीची महती पटवून देण्यात निष्णात असतो तो सर्वांचा मित्र असतो त्याच्या हृदयात करूणा असते माझ्या तत्त्वाचे त्याला यथार्थ ज्ञान झालेले असते. (२९-३१)

मी शास्त्रांत सांगितलेल्या धर्मांच्या आचरणातील गुण व उल्लंघनातील दोष जाणूनही भक्तीमध्ये जर ते बाधक असतील, तर त्या सर्व धर्माधर्मांचा त्याग करून जो नेहमी माझ्या भक्तीतच मग्न असतो, तो भक्त श्रेष्ठ होय. मी कोण आहे, किती मोठा आहे, कसा आहे, हे जाणून किंवा न जाणता जे अनन्यभावाने माझे भजन करतात, ते माझे भक्त आहेत. (३२-३३)

माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शन, स्पर्श, पूजा, सेवा, स्तुती, वंदन इत्यादी करावे तसेच माझे गुण आणि कर्मे यांचे सतत कीर्तन करावे. उद्धवा ! माझ्या कथा श्रद्धेने ऐकाव्यात आणि नेहमी माझ्ये ध्यान करावे जे काही मिळेल ते मला अर्पण करावे आणि स्वतःला माझा दास समजून सर्वभावे मला अर्पण व्हावे. माझा दिव्यजन्म आणि कर्मे इतरांना सांगावीत जन्माष्टमी, रामनवमी इत्यादी माझ्या उत्सवांच्या वेळी लोकसमुदायात संगीत, नृत्य, वाद्य इत्यादी कार्यक्रम करून माझ्या मंदिरात आनंदोत्सव करावेत आणि करवावेत. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी माझ्या क्षेत्रांच्या वार्‍या कराव्यात, मिरवणुका काढाव्यात तसेच विविध सामग्रीने माझी पूजा करावी वैदिक किंवा तांत्रिक पद्धतीने दीक्षा ग्रहण करावी माझ्या एकादशी इत्यादी व्रतांचे पालन करावे. मंदिरामध्ये माझ्या मूतर्चीीं श्रद्धेने स्थापना करावी हे काम एकट्याने होत नसेल, तर इतरांना बरोबर घेऊन ते काम पूर्ण करावे माझ्यासाठी फुलांची उद्याने, बगीचे, क्रीडास्थाने, नगरे, मंदिरे बनवावीत. सेवकाप्रमाणे निष्कपट भावनेने माझ्या मंदिरामध्ये सेवा करावी झाडूनपुसून घ्यावे, लिंपावेसारवावे आणि सडा घालून रंगीबेरंगी रागोळ्या काढाव्यात. अभिमान धरू नये ढोंग करून नये त्याचबरोबर आपण केलेल्या कामांचा डांगोरा पिटू नये आपण अर्पण केलेल्या दिव्याच्या प्रकाशाचाही स्वतःसाठी उपयोग करू नये तसेच दुसर्‍या देवतेला अर्पण केलेली वस्तूही मला अर्पण करू नये. जगामध्ये जी जी वस्तू आपल्याला सर्वाधिक प्रिय, सर्वात चांगली वाटत असेल, ती मला अर्पण करावी असे केल्याने ती वस्तू अनंत पटींनी फळ देणारी ठरते. (३४-४१)

हे उद्ववा ! सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गायी, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी, आत्मा आणि सर्व प्राणी, ही सर्व माझ्या पूजेची ठिकाणे होत. प्रिय उद्ववा ! वेदमंत्रांनी सूर्याच्या ठिकाणी माझी पूजा करावी हवनाने अग्नीमध्ये, आतिथ्याने श्रेष्ठ ब्राम्हणांमध्ये आणि चारा वगैरे घालून गाईच्या ठिकाणी माझी पूजा करावी. (४२-४३)

विष्णुभक्ताला आपला भाऊ समजून त्याचा आदर करावा ध्यान लावून हृदयाकाशात माझी पूजा करावी मुख्य प्राण समजून वायूमध्ये आणि फुले इत्यादी वाहून पाण्यामध्ये माझी आराधना करावी. रहस्यमय मंत्रांनी वेदीवर पूजा करावी आपण घेत असलेले भोग आपल्यामधील सर्वात्मा प्रभूच घेतात, अशी भावना करून विषयसेवन करावे सर्व प्राण्यांमध्ये मीच एक क्षेत्रज्ञ आत्मा समानभावाने व्यापून आहे अशी भावना करणे ही माझीच पूजा होय. या सर्व ठिकाणी शंख, चक्र गदा, पद्म धारण केलेले माझेच शांत चतुर्भुज रूप दृष्टीसमोर आणून एकाग्र होऊन माझी पूजा करावी. अशा प्रकारे जो मनुष्य एकाग्र चित्ताने यज्ञयाग इत्यादी इष्ट आणि समाजाच्या उपयोगी धर्मशाळा, विहिरी इत्यादी आपूर्त कर्मे, ही माझीच पूजा मानून करतो, त्याला माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते त्याचप्रमाणे संतांची सेवा केल्याने माझ्या स्वरूपाचे ज्ञानसुद्धा होते. प्रिय उद्धवा ! सत्संग आणि भक्तियोग या दोन साधनांव्यतिरिक्त, संसारसागरातून पार होण्यासाठी बहुधा दुसरा कोणताच उपाय नाही कारण संतांचे श्रेष्ठ आश्रयस्थान मीच आहे. हे उद्धवा ! तू माझा प्रिय सेवक, हितेच्छू आणि सखा आहेस त्याचबरोबर ऐकण्यासाठी इच्छुकपण आहेस म्हणून आता मी तुला एक अत्यंत गोपनीय परम रहस्य सांगणार आहे. (४४-४९)

अध्याय अकरावा समाप्त

GO TOP