|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १० वा
इहलौकिक व पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरूपण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीकृष्ण म्हणातात साधकाने सर्व प्रकारे मला शरण येऊन मी सांगितलेल्या आपल्या धर्मांचे सावधपणे पालन करावे निष्काम भावाने आपला वर्ण, आश्रम आणि कूळ यांचेही आचार पाळावेत. स्वधर्माचरणाने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे, त्याने विषयांमध्ये आसक्त झालेले लोक विषयांना सत्य मानून सुखासाठी जी कर्मे करतात, त्या कर्मांचा परिणाम दुःखदायक होतो, ही गोष्ट नीट ध्यानात घ्यावी. जसे झोपलेला माणूस स्वप्नामध्ये अनेक विषय पाहातो किंवा जागेपणी मनाने ज्या विषयांचे चिंतन करतो, ते सर्व इंद्रियांनी दिसणारे व अनेक असल्यामुळे खोटेच आहेत, हे समजते, तसेच इंद्रियांच्याद्वारे बाहेरील विषयांत जाणवणारी भेदबुद्धीसुद्धा खोटीच आहे. ईश्वरपरायण मनुष्याने नित्यनैमित्तिक कर्मांचेच आचरण करावे सकाम कर्मे कधीही करू नयेत जेव्हा तो आत्मज्ञानासाठी प्रयत्नशील होईल, तेव्हा तर नित्य कर्माचीही फिकीर करू नये. माझ्या भक्ताने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या यमांचे पूर्णपणे पालन करावे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान या नियमांचे आत्मज्ञानाला अडथळा येत नसेल तर यथाशक्ति पालन करावे मला जाणणार्या शांतस्वरूप गुरूंजवळ जाऊन त्यांना माझेच स्वरूप समजून त्यांची सेवा करावी कसलाही अभिमान धरू नये कोणाचाही मत्सर करू नये नेहमी सावध असावे ‘माझे‘ पणाचा भाव सोडावा गुरू आणि माझ्याबद्दल निःसीम प्रेम ठेवावे तत्त्व समजून घेण्याची जिज्ञासा असणार्याने कोणत्याही प्रकारची घाई करू नये कोणाबद्दलही दोषदृष्टी ठेवू नये निरर्थक आणि असत्य भाषण यांपासून दूर राहावे. पत्नी, पुत्र, घर, जमीन, आप्तेष्ट, धन इत्यादी सर्वांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सर्वांची सुखदुःखे स्वतःसारखीच आहेत, असा सगळीकडे समभाव ठेवून तटस्थ राहावे. आत्मा सयंप्रकाशी, सर्वाचा साक्षी आणि स्थूल व सूक्ष्म या दोन्ही देहांपासून तो पूर्णपणे वेगळा आहे ज्याप्रमाणे जळणार्या लाकडापासून जाळणारा व प्रकाश देणारा अग्नी वेगळाच असतो. जसा लाकडाशी संबंधित असून त्याहून वेगळा असलेला अग्नी लाकडाच्या आकारानुसार लहानमोठा, पेटणाराविझणारा असा लाकडाचे गुण स्वतः घेताना दिसतो, त्याचप्रमाणे आत्मासुद्धा देहात असल्यामुळे वेगळा असूनही देहाचे गुण धारण करतो. (१-९) हे मनुष्याचे शरीर त्रिगुणांचेच बनलेले आहे या गुणांमध्ये ‘मीमाझे‘ पणा असल्यामुळे माणसाच्या मागे संसार लागला आहे त्याचा नाश आत्मज्ञानानेच होतो. म्हणूण विवेकाने देहामध्ये असणार्या केवलस्वरूप परमात्म्याला नीट जाणून, स्थूलसूक्ष्म देहांविषयीची सत्यबुद्धी सोडून द्यावी. (यज्ञासाठी अग्नी उंबराच्या लाकडांपासून घुसळून काढतात त्यात खाली लाकूड असते त्याला ‘अधरअरणी‘ म्हणतात वरच्याला ‘उत्तरअरणी‘ म्हणतात आणि मधल्या उभ्या रवीसारख्या लाकडाला ‘मंथनकाष्ठ’ म्हणतात हे घुसळले असता अग्नी उत्पन्न होतो येथे हे रूपक केले आहे) ज्ञानरूप अग्नी उत्पन्न होणार्या क्रियेत आचार्य खालचे लाकूड आहेत, आणि शिष्य वरचे आचार्यांचे प्रवचन हे मंथनकाष्ठ होय त्यापसून आत्मज्ञानरूपी अग्नी निर्माण होतो तो परमानंद देणारा आहे. बुद्धीमान शिष्यांची ती अत्यंत शुद्ध झालेली बुद्धी गुणांपासून उत्पन्न झालेल्या विषयरूप मायेचे भस्म करून टाकते जेव्हा जग उत्पन्न करणारे गुण भस्म होतात, तेव्हा इंधनाला जाळून स्वतः शांत होणार्या अग्नीप्रमाणे ती बुद्धीसुद्धा नाहीशी होते. (१०-१३) जर तुला असे वाटते की, कर्म करणारे व त्या कर्मांची सुखदुःखादी फळे भोगणारे जीव अनेक आहेत, तसेच कर्मांचे फलस्वरूप लोक, कर्मांच्या उपभोगाची वेळ, ती कर्मे सांगणारी शास्त्रे, कर्मांपासून मिळणारे शरीर, हे सर्व नित्य आहे, त्याचप्रमाणे सर्व पदार्थ प्रवाहरूपाने नित्य असून सत्य आहे, व त्या त्या आकारानुसार ज्ञान उत्पन्न होऊन नष्ट होते, तर हे उद्धवा ! सर्वच मनुष्यांना देह व काळाचे विभाग यांच्यामुळे प्राप्त होणार्या जन्मादिक अवस्था नित्य मानाव्या लागतील व त्यांना मोक्ष कधीच मिळणार नाही. शिवाय या जगात कर्म करणारा व त्यांची सुखदुःखे भोगणारा मनुष्यप्राणी संपूर्णपणे परतंत्र आहे अशा पराधीन प्राण्याला कोणता विषय सुख देऊ शकेल ? या जगात असे दिसते की, उत्तम कर्म करू जाणणार्यांनाही सुख मिळत नाही आणि कर्म न जाणणार्या मूर्खांनाही दुःख भोगावे लागत नाही अशा स्थितीत कर्मामुळे सुख मिळवण्याचा अहंकार व्यर्थ आहे जरी सुखदुःखांची प्राप्ती आणि नाश कसा होतो, हे एखाद्याने जाणले, तरीसुद्धा मृत्यू केव्हा येईल व तो कसा टाळावा, हे तर खात्रीने कोणालाही माहीत नाही. वधस्थानाकडे नेल्या जाणार्या माणसाला ज्याप्रमाणे कोणतीही भोगसामग्री संतुष्ट करू शकत नाही, त्याचप्रमाणे मृत्यू जवळ असणार्या माणसाला कोणता पदार्थ किंवा कामना सुखी करू शकेल ? (१४-२०) या लोकाप्रमाणेच परलोकसुद्धा सदोषच आहे तेथे सुद्धा स्पर्धा, असूया, पुण्य क्षीण होणे आणि नाश पावणे, हे सर्व आहेच जशी पुष्कळ कष्टांनी केलेली शेती अतिवृष्टी, अनावृष्टी, यांसारख्या संकटांनी नष्ट होते, त्याचप्रमाणे परलोकासाठी केलेल्या प्रयत्नांना विघ्ने येतात व ते प्रयत्नही विफल होतात. जर कोणतेही विघ्न निर्माण न होता चांगल्या तऱ्हेने यज्ञ इत्यादींचे अनुष्ठान पूर्ण झाले, तर त्यामुळे परलोकाची प्राप्ती कशी होते ते ऐक. यज्ञ करणारा पुरूष यज्ञांचे द्वारा देवतांची आराधना करून स्वर्गात जातो आणि तेथे आपल्या पुण्यकर्माच्या द्वारा प्राप्त केलेले दिव्य भोग देवतांप्रमाणे भोगतो. त्याच्या पुण्यानुसार त्याला एक तेजस्वी विमान मिळते आणि तो त्यातून अप्सरांच्याबरोबर मनोहर वेष घेऊन विहार करतो तेव्हा गंधर्व त्याच्या गुणांचे गायन करतात. त्याच्या इच्छेनुसार जाणार्या व घंटांच्या माळा लावलेल्या विमानातून तो देवतांच्या विहारस्थळांमध्ये अप्सरांसह आनंदाने क्रीडा करीत असता आपण लवकरच येथून खाली भूतलावर पडू, याचे त्याला भानही राहात नाही. जोपर्यंत त्याचे पुण्य शिल्लक असते, तोपर्यंत तो स्वर्गामध्ये मौजमजा करतो पुण्य संपताच, त्याची इच्छा नसतांनाही कालगतीनुसार तो खाली पडतो. (२१-२६) जर एखादा मनुष्य दुष्टांच्या संगतीत सापडून अधर्माने वागू लागला, किंवा आपल्या इंद्रियांच्या अधीन होऊन स्वच्छंदपणे वागू लागला, कंजूषपणे वागू लागला, लोभी झाला, स्त्रीलंपट झाला किंवा प्राण्यांना त्रास देऊ लागला आणि शास्त्रविधानाच्या विरूद्ध पशूंचा बळी देऊन भूतप्रेतांची उपासना करू लागला, तर त्याला त्याच्या इच्छेविरूद्ध घोर अंधकारमय नरकात जावे लागते. सकाम कर्माचे फळ दुःखच आहे जो जीव शरीरामध्ये अहंताममता धरून तशी कर्मे करतो, त्यांची फळे भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मर्त्य जीवाला अशा स्थितीत काय सुख मिळणार ? (२७-२९) एक कल्पपर्यंत आयुष्य असणार्या लोक व लोकपाल यांना माझे भय आहे दोन परार्ध आयुष्य असणार्या ब्रह्मदेवालासुद्धा माझ्यापासून भय आहे. सत्व, रज आणि तम हे तीन गुण इंद्रियांना त्यांचे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि इंद्रिय कर्मे करतात जीव अज्ञानाने इंद्रियांनी केलेल्या कर्मांशी संबंध जोडून कर्मांची फळे भोगू लागतो जोपर्यंत शरीर इत्यादींमध्ये ‘मीमाझे‘ पणाचा अभिमान आहे, तोपर्यंत आत्म्याच्या अनेकत्त्वाचा भ्रम नाहीसा होत नाही जोपर्यंत हा अज्ञानमूलक भ्रम नाहीसा होत नाही, तोपर्यंत तो जीव परतंत्रच राहाणार. जोपर्यंत जीवाला पारतंत्र्य जाणवते, तोपर्यंत ईश्वराचे वाटणारे भय कायमच असते जो अशा प्रकारे गुणांच्या विळख्यात सापडून राहातो, त्याला शोक आणि मोह होतच राहातात. प्रिय उद्ववा ! जेव्हा मायेच्या गुणांमध्ये क्षोभ होतो तेव्हा काल, आत्मा, वेद, लोक, स्वभाव आणि धर्म अशा अनेक रूपांनी व नावांनी मीच एकटा ओळखला जातो. (३०-३४) उद्धव म्हणाला भगवन ! हा अलिप्त आत्मा देह, इंद्रिय इत्यादी गुणांमध्ये, तसेच देहाने केलेली कर्मे व त्यांची फळे यांमध्ये राहात असूनही त्यांपासून मुक्त कसा राहातो ? किंवा वरील गुणांनी बद्ध कसा होतो ? बद्ध किंवा मुक्त पुरूष कसा असतो ? कसा वागतो ? तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो ? काय खातो ? मलत्याग इत्यादी कसे करतो ? झोपतो कसा, बसतो कसा आणि चालतो कसा ? हे अच्युता ! प्रश्नाचे मर्म जाणणार्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात एकच आत्मा अनादी गुणांच्या संबंधामुळे नित्यमुक्तही आहे या गोष्टीमुळे मला संशय उत्पन्न झाला आहे तरी आपण माझ्या या प्श्नाचे उत्तर द्यावे. (३५-३७) अध्याय दहावा समाप्त |