श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ९ वा

अवधूतोपाख्यान कुरर ते भुंगा अशा सात गुरूंची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अवधूत म्हणाले माणासाना जी वस्तू आवडते, तिचा साठा करणे त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते हे ओळखून जो साठवण करत नाही, तो अपार आनंदाचा अनुभव घेतो. मांसाचा तुकडा चोचीत धरलेल्या कुररपक्ष्यावर स्वतःजवळ मांस नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले त्याने मांसाचा तुकडा फेकून दिला, तेव्हा तो सुखी झाला. (संग्रह करणे, हे संकटाचे मूळ आहे, ही शिकवण कुरराकडून घ्यावी). (१-२)

ज्याप्रमाणे बालक स्वतःशीच रममाण होते, त्याला कोणतीही काळजी नसते, त्याचप्रमाणे मीसुद्धा आत्मानंदात मग्न असतो मान मिळो की अपमान होवो माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही घरपरिवार यांचीही मला काळजी नाही जगात फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त आहेत एक म्हणजे अजाण व काही काम न करणारे बालक किंवा गुणातीत हे दोघेही परम आनंदात मग्न असतात. (मानापमान इत्यादींची चिंता न करणे, हा गुण बालकाकडून घ्यावा). (३-४)

एके दिवशी कुण्या कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले होते त्या दिवशी तिच्या घरातील लोक कोठेतरी बाहेर गेले होते म्हणून तिने स्वतःच त्यांचे आदरातिथ्य करण्याचे ठरविले. (५)

राजन ! त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एक कोपर्‍यात भात कांडू लागली त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठ्याने वाजू लागल्या या आवाजावरून घरात धान्य नाही, हे पाहुण्यांना कळेल, हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एकएक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या शेवटी दोन्ही हातांमध्ये दोन बांगड्या राहू दिल्या. ती पुन्हा भात कांडू लागली परंतु त्या दोनदोन बांगड्याही जेव्हा आवाज करू लागल्या, तेव्हा तिने आणखी एकएक बांगडी फोडून टाकली दोन्ही मनगटांध्ये जेव्हा एक एक बांगडी शिल्लक राहिली, तेव्हा आवाज बंद झाला. हे शत्रूंचे दमन करणार्‍या ! त्या वेळी लोकव्यवहार जाणण्याच्या इच्छेने मीसुद्धा तेथे जाऊन पोहोचलो मी त्या प्रसंगातून हे शिकलो की, जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहातात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो आणि जेव्हा दोघेजण राहतात तेव्हा सुद्धा गप्पागोष्टी होतात म्हणून साधकाने कुमारिकेच्या बांगडीप्रमाणे एकट्यानेच राहिले पाहिजे. (या प्रसंगातून ‘मुनीने एकट्याने राहावे‘ हे कळते). (६-१०)

आसन आणि श्वास यांच्यावर विजय मिळवून वैराग्य व अभ्यासाने आपले मन ताब्यात आणावे त्यानंतर सावधपणे ते एका लक्ष्यावर लावावे. जेव्हा परमात्म्यामध्ये मन स्थिर होते, तेव्हा ते हळू हळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकते होता होता सत्त्वगुण वाढून रजतम नाहीसे होतात अखेर जसे इंधन नसलेला अग्नी शांत होतो, त्याप्रमाणे मन शांत होते. अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्येच स्थिर होते, तेव्हा त्याला आतबाहेर अशा कोणत्याही पदार्थांचे भान राहात नाही मी असे पाहिले होते की, बाण तयार करणारा एक कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला होता की, त्याच्या जवळूनच सैन्यासह राजाची स्वारी निघून गेली, तरी त्याला तिचा पत्ता लागत नाही. (बाणकर्त्याकडून ‘एकाग्रता‘ हा गुण घ्यावा). (११-१३)

मुनीने एकटेच राहावे राहाण्याच्या ठिकाणाविषयी ममता नसावी सावध असावे एकांतात किंवा गुहेत राहावे बाह्य वेषावरून स्वतःला कोणासमोर प्रगट करू नये आणि कमी बोलावे. या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणे निरर्थक आहे उंदराने तयार केलेल्या बिळामध्ये साप आरामात राहातो. (सापाच्या उदाहरणाने साधकाने घर वगैरे बांधू नये, हा धडा घ्यावा). (१४-१५)

आपल्या मायेने एका नारायण देवांनीच निर्माण केलेले हे विश्व कल्पाच्या शेवटी आपल्या कालशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून, सर्वांना आपल्यात घेऊन स्वतःच्याच आधारावर ते एकमेवाद्वितीय होऊन राहिले प्रकृती आणि पुरूष या दोहोंचे नियामक असलेले तेच आदिपुरूष जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्याने या सत्त्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात, तेव्हा सर्व कार्यकारणांचे परम कारण असे ते एकटेच असतात ते केवळ अनुभवस्वरूप व आनंदाचा पुंज आहेत तेथे प्रकृतीची कोणतीही उपाधी नाही. केवळ आपल्या सामर्थ्यानेच ते आपल्या त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात हे शत्रुसूदना ! त्या मायेद्वारे ते सर्वप्रथम सूत्राची क्रियाशक्तिप्रधान महत्‌तत्त्वाची निर्मिती करतात. हे सूत्रच तीन गुणांचे कार्य आहे तेच सार्‍या विश्वाची अहंकारद्वारा निर्मिती करते त्यामध्ये हे सगळे विश्व आतबाहेर व्यापलेले आहे त्याच्यामुळेच मनुष्य जन्ममृत्यूचक्रात फिरत राहातो. ज्याप्रमाणे कोळीकीटक आपल्या हृदयातून तोंडाच्याद्वारे तंतू बाहेर काढून जाळे पसरतो, त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गिळून टाकतो, त्याप्रमाणे परमेश्वरसुद्धा आपल्यापासूनच या जगाची उत्पत्ती करतात, जीवरूपाने त्यामध्ये विहार करतात आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतात. (विश्व आणि ब्रह्म एकरूप आहे, हे कोळ्याच्या जाळ्याच्या दृष्टान्ताने स्पष्ट केले आहे). (१६-२१)

जर एखादा स्नेहाने, द्वेषाने किंवा भीतीनेसुद्धा बुद्धिपूर्वक आपले मन एखाद्या ठिकाणी केंद्रित करील, तर त्याला त्या वस्तूचे स्वरूप प्राप्त होते. कुंभारमाशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवरील मातीच्या घरात बंदिस्त करून टाकते बाहेरून वारंवार येऊन त्याला भूंभूं करून घाबरविते तिच्या भीतीने तिचेच चिंतन करीत करीत तो आपल्या पहिल्या शरीराचा त्याग न करताही तिच्यासारखाच होतो. (याप्रमाणे कोणत्याही प्रकारे का होईना, परमात्म्याचे सतत चिंतन केल्याने मनुष्यसुद्धा परमात्म्याला प्राप्त करतो, हे ज्ञान किड्याकडून घ्यावे). (२२-२३)

राजन ! अशा प्रकारे मी इतक्या गुरूंकडून हे ज्ञान घेतले आता, मी आपल्या शरीराकडून जे शिकलो, ते तुला सांगतो नीट ऐक. माझा हा देहसुद्धा माझा गुरूच आहे हा मला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो याला जन्म व मरण असल्यामुळे याच्या पाठीशी दुःख सततचे लागलेलेच आहे या देहामुळेच मी तत्त्वचिंतन करत असलो तरी हा देह हिंस्त्र प्राणी, अग्नी इत्यादी दुसर्‍यांचाच आहे, असा निश्चय करून या देहाची आसक्ती सोडून मी वागत असतो. जो मनुष्य पत्‍नी, पुत्र, धनदौलत, पशू, सेवक, घर, आप्तेष्ट यांची वाढ करीत त्यांच्याकडून ज्या देहाला सुख मिळेल, अशी इच्छा बाळगून त्यांचे पालनपोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो, तोच देह शेवटी, बी निर्माण करून झाडाने नष्ट व्हावे, त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करून मृत्यूला कवटाळतो. जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा सवती पत्‍न्या आपापल्याकडे ओढून त्याला सतावतात, त्याचप्रमाणे देहाभिमानी जीवाला एकीकडे त्याची रसना खाद्यपदार्थांकडे ओढते तर कधी तहान सतावते, कधी एकीकडे जननेंद्रिय व्याकूळ करते, तर दुसरीकडे त्वचा, पोट, कान हे आपापल्या विषयांकडे खेचून घेतात नाक कधी सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी आकर्षित करतात कधी कम]द्रिये आपापल्या विषयांकडे ओढतात. भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या मायेद्वारे झाडे, सरपटणारे प्राणी, पशू, पक्षी, डास, मासे अशा अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या, परंतु त्यांपासून त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मनुष्यशरीराची निर्मिती केली ब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊ शकणार्‍या बुद्धीने युक्त अशा याची रचना केल्यावर त्यांना आनंद झाला. अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्यशरीर पुष्कळ जन्मांनंतर मिळालेले आहे याच्यामुळे परम पुरूषार्थाची प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे, हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही, तोवरच शहाण्याने तत्काळ आपल्या परम कल्याणासाठी प्रयत्‍न करावेत कारण विषयभोग तर सर्वत्र मिळतात. अशा प्रकारे मला वैराग्य प्राप्त झाले अंतःकरणामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला त्यामुळे मी अहंकार व आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरतो. म्हणून एकाच गुरूकडून पुष्कळ ज्ञान मिळाले, तरी ते उत्तम ठसत नाही कारण एकाच अद्वितीय अशा ब्रह्माबद्दल ऋषींनी अनेक प्रकारे वर्णन केले आहे. (२४-३१)

श्रीकृष्ण म्हणाले - धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रेयांनी राजा यदूला असा उपदेश केला यदूनेही त्यांना वंदन करून प्रार्थना केली नंतर दत्तात्रेय प्रसन्नचित्ताने आपल्या इच्छेनुसार तेथून निघून गेले आमच्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या यदूंनी अवधूतांचे हे म्हणणे ऐकून सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले. (३२-३३)

अध्याय नववा समाप्त

GO TOP