श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ८ वा

अवधूतोपाख्यान - अजगर ते पिंगलेपर्यंत नऊ गुरूंची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अवधूत म्हणतात हे राजन ! प्राण्यांना इद्रियांचे दुःख जसे स्वर्गात व नरकातही मिळते, त्याचप्रमाणे सुखही मिळते म्हणून बुद्धिमान माणसाने त्याची इच्छा धरू नये. प्रयत्‍न न करता योगायोगाने जे अन्न मिळते, ते खाऊनच योग्याने अजगराप्रमाणे जीवननिर्वाह करावा मग ते चविष्ट असो की बेचव अधिक असो की कमी. पुष्कळ दिवस भोजन मिळाले नाही, तरीसुद्धा त्यासाठी काही प्रयत्‍न न करता तो प्रारब्धाचा भोग समजून आहार न घेता अजगराप्रमाणे पडून राहावे. मनोबळ, इंद्रियबळ व शारीरिक बळ या तिन्हींनी युक्त असूनही तसेच इंद्रियांमध्ये कार्य करण्याची क्षमता असूनही देहाने काम न करता झोपल्यासारखे पडून राहावे परंतु सजग असावे. (अजगरापासून, सुखासाठी प्रयत्‍न न करणे, मिळेल ते खाणे, दैवावर विसंबून राहाणे, हे गुण घ्यावेत). (१-४)

निश्चल समुद्र बाहेर प्रसन्न आणि आत गंभीर असतो तो अथांग असतो तो ओलांडता येत नाही त्याचा अंत लागणे कठीण आहे त्याला प्रक्षुब्ध करता येत नाही त्याचप्रमाणे मुनी बाहेरून प्रसन्न पण आतून गंभीर असतो तो कसा आहे, हे कोणाला कळत नाही तेजामुळे कोणाला त्याच्यावर मात करता येत नाही त्याचा अंतपार कोणाला लागत नाही आणि विकारांनी तो विचलित होत नाही. समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळले, तरीसुद्धा तो वाढत नाही आणि नाही मिळाले, तरी तो आटत नाही त्याचप्रमाणे भगवत्परायण मुनीसुद्धा समृद्धीने युक्त असला तरी आनंदाने हुरळून जात नाही आणि दारिद्रय असले तरी दुःखी होत नाही. (समुद्रापासून धीरगंभीरता आणि सुखदुःखात एकरूपता हे गुण घ्यावेत). (५-६)

ज्याप्रमाणे पतंग आगीच्या मोहात सापडून आगीवर झेप घेऊन मरतो, त्याचप्रमाणे इंद्रिये ताब्यात नसणारा मुनी देवमायारूपी स्त्रीला पाहून तिच्या विलासांना भुलून घोर नरकात पडतो. स्त्री, सुवर्ण, अलंकार, वस्त्रे इत्यादी मायेने निर्माण केलेल्या पदार्थांमध्ये उपभोगबुद्धीने आसक्त झालेला मूर्ख मनुष्य आपला विवेक घालवून बसतो आणि त्या पतंगाप्रमाणे स्वतः त्यांमध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो. (मायानिर्मित पदार्थांमध्ये आसक्त होऊ नये, ही शिकवण पतंगापासून घ्यावी). (७-८)

भ्रमर जसा अनेक फुलांमधील रस त्यांना पीडा न देता ग्रहण करतो, त्याचप्रमाणे मुनीने थोडेथोडे अन्न काही घरातून माधुकरी मागून आणावे त्यायोगे शरीरनिर्वाहही होईल आणि देणार्‍यालाही कष्ट वाटणार नाहीत. भ्रमर जसा सर्व तऱ्हेच्या फुलांमधून रसरूप सार ग्रहण करतो, त्याप्रमाणे कुशल मुनीने सर्व लहानमोठ्या शास्त्रांतून सार ग्रहण करावे. मुनीने सायंकाळसाठी किंवा दुसर्‍या दिवसासाठी भिक्षान्न शिल्लक ठेवू नये भिक्षा घेण्यासाठी पात्राऐवजी फक्त हात आणि ठेवण्यासाठी फक्त पोटच असावे मधमाशीने मध साठवला तर मधासह तिचाही नाश होतो म्हणून मुनीने कोणत्याही तऱ्हेचा संग्रह करू नये. (मधमाशीपासून पुढील गुण घ्यावेत माधुकरी मागावी, शास्त्रांचे तात्पर्य घ्यावे संग्रह करू नये). मुनीने अगदी लाकडाच्या स्त्रीलासुद्धा कधीही पायानेही स्पर्श करू नये, नाहीतर लाकडी हत्तिणीमध्ये आसक्त झालेला हत्ती ज्याप्रकारे बांधला जातो, त्याचप्रमाणे हाही मोहात पडतो. आपला साक्षात मृत्यू अशा स्त्रीला विवेकी पुरूषाने कधीही जवळ करू नये कारण हत्तिणीमध्ये आसक्त झालेला हत्ती दुसर्‍या बलवान हत्तींकडून मारला जातो, त्याचप्रमाणे हासुद्धा मृत्यूची शिकार होतो. (हत्तीपासून, स्त्रीसंग वर्ज्य करावा, ही शिकवण घ्यावी). (९-१४)

लोभी मनुष्य कष्टाने साठवलेले धन कोणाला देत नाही की, स्वतः त्याचा उपभोग घेत नाही त्याच्याकडील धनाची माहिती असणारा दुसराच कोणीतरी ते घेतो जसे पोळ्यांतील मध काढणारा मनुष्य मधमाशांनी साठवलेला मध आपण घेतो. (१५)

ज्याप्रमाणे मधमाशांनी मोठ्या कष्टाने जमा केलेला मध त्यांच्या आधीच मध काढणारा मनुष्य खातो, त्याप्रमाणे गृहस्थांनी मोठ्या कष्टाने मिळविलेल्या पैशांतून तयार केलेले अन्नपदार्थ त्यांच्या आधीच संन्यासी उपभोगतो. (मध गोळा करणार्‍याकडून मिळालेली शिकवणधनासाठी कष्ट न करताही उदरनिर्वाह होऊ शकतो). (१६)

हरिणापासून मी हे शिकलो की, वनवासी संन्याशाने विषयांसंबंधीचे गाणे कधीही ऐकू नये व्याधाच्या गीताने मोहित होऊन बांधल्या जाणार्‍या हरिणाकडून हे शिकावे. हरिणीपासून जन्मलेले ऋष्यश्रृंग मुनी स्त्रियांचे वैषयिक गाणेबजावणे, नाचणे इत्यादी पाहून, ऐकून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या हातातील बाहुले बनले. (वैषयिक गीते ऐकू नयेत, ही शिकवण हरिणापासून घ्यावी). (१७-१८)

मासा जसा गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्याच्या लोभाने आपले प्राण गमावतो, त्याचप्रमाणे चवदार पदार्थांचा लोभी निर्बुद्ध माणूससुद्धा मनाला व्याकूळ करणार्‍या आपल्या जिभेला वश होऊन मारला जातो. विवेकी लोक जेवण घेण्याचे बंद करून इतर इंद्रियांवर लवकर विजय मिळवितात; परंतु यामुळे जीभ ताब्यात येत नाही उलट भोजन घेणे बंद केल्यामुळे ती अधिकच खवळते. माणसाने सर्व इंद्रियांवर विजय मिळविला तरी जोपर्यंत तो जिभेला ताब्यात ठेवत नाही, तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही कारण जीभ जिंकली तर सर्व इंद्रिये जिंकली, असे खुशाल समजावे. (जीभ जिंकणे महत्त्वाचे, हे माशापासून शिकावे). (१९-२१)

हे राजन ! पूर्वी एकदा विदेहनगरात पिंगला नावाची वेश्या राहात होती मी तिच्याकडून जे शिकलो, ते तुला सांगतो. ती अतिशय सुंदर वेश्या एकदा रात्रीच्या वेळी एखाद्या पुरूषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नटूनथटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली. हे पुरूषश्रेष्ठा ! पैशाची लालसा असलेल्या तिला वाटेतून येणार्‍या जाणार्‍या पुरूषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत, असे वाटे. (२२-२४)

अनेक पुरूष येऊन निघून गेले, तरी त्या वेश्येला वाटे की, आणखी एखादा धनवान माणूस आपल्याकडे येईल व तो आपल्याला पुष्कळ धन देईल. अशी खोटी आशा बाळगून झोपमोड झालेली ती दरवाजाजवळ ताटकळत उभी होती ती कधी बाहेर येई तर कधी आत जाई होता होता मध्यरात्र झाली. पैशाच्या आशेने चेहरा सुकून गेला चित्त व्याकूळ झाले आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले तिच्या चिन्तेचे कारणच तिच्या सुखाला कारणीभूत ठरले. पिंगलेच्या चित्तामध्ये जेव्हा वैराग्य जागृत झाले, तेव्हा तिने गाइलेले गीत माझ्याकडून ऐक "मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य". राजन ! जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही, त्याचप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही, तो शरीर आणि त्याची बंधने तोडून टाकू इच्छित नाही. (२५-२९)

पिंगला म्हणू लागली अहो ! इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप तर पहा ! जी मी क्षुद्र माणसाकडून विषयसुखाची इच्छा करीत आहे. माझा खरा पती नेहमी माझ्याजवळच आहे तोच मला परमानंद आणि परमार्थधन देणारा आहे त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही, उलट जे मला दुःख, भय, आधिव्याधी, शोक आणि मोह देणारे आहेत, अशा क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत राहिले किती मी मूर्ख ! अरेरे ! मी अत्यंत निंद्य अशा वेश्यावृत्तीचा आश्रय करून व्यर्थच माझ्या शरीराला आणि मनाला क्लेश दिले स्त्रीलंपट, लोभी आणि निंद्य अशा लोकांना हे शरीर विकून मी धनाची आणि रतिसुखाची इच्छा करीत होते !. (३०-३२)

जसे बांबूचे आढे, वासे, पट्‌ट्या इत्यादींनी घर बांधावे, त्याप्रमाणे पाठीचा कणा, हाडे इत्यादींनी हे शरीररूपी घर तयार झाले आहे ते त्वचा, लव तसेच नखांनी आच्छादिले आहे याच्या नऊ दरवाज्यांमधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहात असते माझ्याखेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की, जी अशा या निंद्य शरीरालाच प्रिय समजून त्याचे सेवन करील ? (३३) या विदेही लोकांच्या जीवन्मुक्तांच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चारित्र्यहीन आहे कारण जी स्वतःचे सुद्धा दान करणार्‍या अविनाशी परमात्म्याला सोडून दुसर्‍या पुरूषाची अभिलाषा धरीत आहे. हे सर्व प्राण्यांचे आत्मा, त्यांचे हित करणारे, माझे प्रियतम स्वामी आहेत आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्याबरोबर विहार करीन. जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्ममृत्यू असणारे पुरूष आहेत, यांनी तुझे काय प्रिय केले आहे ? किंवा काळाने कवटाळलेल्या देवांनी तरी आपल्या बायकांचे काय भले केले आहे ? माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चितच माझ्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणून तर भलतील आशा करणार्‍या मला अशा प्रकारे वैराग्य आले माझे हे वैराग्यच मला नक्की सुख देणारे ठरेल. जर मी अभागिनी असते, तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचे कारण ठरले नसते ! कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळेच मनुष्य आपले संसारबंधन तोडून परमशांती मिळवितो. आता मी भगवंतांचे हे उपकार मस्तकावर झेलून आणि विषयभोगांची इच्छा टाकून देऊन त्याच जगदीश्वरांना शरण जाते. आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करीन तसेच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबरच विहार करीन. हा जीव संसाराच्या विहिरीत पडला आहे विषयांनी याला अगदी आंधळे केले आहे काळरूपी अजगराने याला आपल्या दाढेत पकडले आहे आता याचे रक्षण करणारा भगवंतांखेरीज दुसरा कोण आहे ? ज्यावेळी जीव सर्व विषयांपासून विरक्त होतो, त्यावेळी तो स्वतःच आपले रक्षण करतो म्हणून हे सर्व जग काळरूपी अजगराने ग्रासले आहे, हे अत्यंत सावधानपूर्वक जाणले पाहिजे. (३३-४२)

अवधूत म्हणतात असा निश्चय करून पिंगला वेश्येने आपल्या प्रिय धनवंतांची व्यर्थ आशा सोडून देऊन ती आपल्या अंथरूणावर शांतपणे जाऊन झोपली. खरोखर आशा हेच सर्वांत मोठे दुःख आहे आणि निराशा हेच सर्वांचे मोठे सुख आहे पिंगला वेश्येने जेव्हा पुरूषांची आशा सोडली, तेव्हा ती सुखाने झोपू शकली. (विषयांची आशा करू नये, हे पिंगलेकडून शिकावे). (४३-४४)

अध्याय आठवा समाप्त

GO TOP