श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ७ वा

अवधूतोपाख्यान - पृथ्वी ते कबुतर या आठ गुरूंची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा ! तू मला जे म्हणालास, तेच मी करू इच्छितो ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी लोकपालांनासुद्धा मी त्यांच्या लोकात यावे, असे वाटते. पृथ्वीवर देवतांचे जे काम होते, ते मी पूर्ण केले आहे ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून याच कामासाठी मी बलरामासह अवतीर्ण झालो होतो. ब्राह्मणांच्या शापाने जणू भस्म झालेला हा यदुवंश आता आपापसात युद्ध करून नष्ट होऊन जाईल आजपासून सातव्या दिवशी या पुरीला समुद्र बुडवून टाकील. प्रिय उद्धवा ! ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करीन, त्याच क्षणी येथील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात पृथ्वीवर कलियुगाचा महिमा सुरू होईल. मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू येथे राहू नकोस कारण बाबा रे ! कलियुगातील बहुतेक लोकांची रूची अधर्माकडेच राहील. तु आपले आप्त, स्वजन आणि भाऊबंदांचा स्नेहसंबंध सोडून दे आणि अनन्य प्रेमाने माझ्याठायी आपले मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर. या जगात मन, वाणी, डोळे, कान इत्यादी इंद्रियांनी जे अनुभवले जाते, ते सर्व नाशवान आहे मनाचा कल्पनाविलास आहे, म्हणून मायाच आहे, असे समज. ज्या पुरूषाचे मन एकाग्र नसते, त्याला वस्तू पुष्कळ आहेत, असा भ्रम होतो अनेकत्वाचा भ्रम झाल्यानेच गुणदोष दिसू लागतात ज्याची बुद्धी गुणदोषयुक्त असते त्याच्यासाठीच कर्म, अकर्म आणि विकर्म असा भेद असतो. म्हणून तू अगोदर आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात ठेव मग हे सगळे जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेले असून, तो आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत, असा अनुभव घे. त्यानंतर शब्दज्ञान आणि अनुभव यांनी चांगल्या रीतीने संपन्न होऊन तू आपल्या आत्म्याच्या अनुभवामध्येच आनंदमग्न होशील तसेच सर्व शरीर धारण करणार्‍यांचा आत्मा होऊन राहाशील असे झाल्यानंतर कोणत्याही विघ्नाने तू दुःखी होणार नाहीस. जो माणूस गुणदोषबुद्धीच्या पलीकडे जातो, तो लहान मुलाप्रमाणे सदोष म्हणून निषिद्ध कर्मे टाकून देत नाही की गुणबुद्धीने विहित कर्मे करीत नाही. ज्याने श्रुतींच्या तात्पर्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून त्याचा अनुभवही घेतला आहे, तो सर्व प्राण्यांचा अकारण मित्र होतो आणि त्याच्या वृत्ती नेहमीच शांत राहातात सर्व दृश्य विश्वाला तो माझेच स्वरूप समजतो म्हणून त्याला जन्ममृत्यू असत नाहीत. (१-१२)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला, तेव्हा भगवद्‌भक्त उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारले. (१३)

उद्धव म्हणाला - आपण योगेश्वर, सर्व योगांचे आधार, त्यांचे कारण आणि योगस्वरूप आहात माझ्या परम कल्याणासाठी आपण त्या संन्यासरूप त्यागाचा मला उपदेश केला आहे. परंतु हे अनंता ! जे लोक विषयांतच गुरफटले गेले आहेत, त्यांना विषयभोगांचा त्याग करणे अतिशय कठीण आहे हे सर्वस्वरूपा ! त्यातसुद्धा जे लोक आपल्याला विन्मुख आहेत, त्यांना तर हे सर्वथैव अशक्य आहे, असे माझे मत आहे. हे प्रभो ! मीही आपल्या मायेने रचलेल्या देह आणि देहाशी संबंधित ‘मीमाझे‘ या मिथ्या कल्पनेने प्रापंचिक वस्तूंमध्ये बुडून गेलो आहे म्हणून हे भगवन ! आपण ज्या संन्यासाचा मला उपदेश केला, त्याचे स्वरूप आपल्या या सेवकाला अशा प्रकारे समजावून सांगा की, मी सहजपणे ते आचरू शकेन. हे प्रभो ! आपण त्रिकालाबाधित सत्यस्वरूप, स्वयंप्रकाश व सर्वांचे आत्मा आहात हे प्रभो ! आत्मतत्त्वाचा उपदेश करणारा आपल्याव्यतिरिक्त देवतांमध्येसुद्धा मला दुसरा कोणी दिसत नाही कारण ब्रह्मदेव इत्यादी शरीराभिमानी देव आपल्या मायेने मोहित झालेले आहेत त्यामुळेच ते बाह्य विषयांना सत्य मानतात. भगवन ! आपण निर्दोष, अनन्त, सर्वज्ञ, नियन्ते, शक्तिमान आणि अविनाशी अशा वैकुंठधामाचे निवासी, तसेच माणसाचे नित्य सखा नारायण आहात म्हणूनच त्रिविध तापांनी पोळल्यामुळे विरक्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे. (१४-१८)

श्रीकृष्ण म्हणाले - हे उद्धवा ! जगामध्ये जे लोक व्यवहारात चतुर आहेत, ते चित्तातील अशुभ वासनांपासून बहुधा स्वतःच स्वतःचा उद्वार करून घेतात. सर्व प्राण्यांचा, विशेषतः मुनष्याच्या बाबतील आपणच आपले गुरू असतो कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या द्वारेच आपले कल्याण करून घेतो. सांख्ययोगपारंगत विद्वान या मनुष्ययोनीमध्ये इंद्रियशक्ती, मनःशक्ती इत्यादींना आश्रयभूत असणार्‍या माझाआत्मतत्त्वाचा पूर्णतः प्रगटरूपाने साक्षात्कार करून घेतात. मी एक, दोन, तीन, चार आणि चारापेक्षाही अधिक पाय असलेली आणि पाय नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत त्या सर्वांमध्ये मला माणसाचेच शरीर अधिक प्रिय आहे. कारण या मनुष्यशरीरात एकाग्रचित्त मनुष्य बुद्धी इत्यादी ग्रहण केल्या जाणार्‍या साधनांनी अनुमानाचा विषय नसूनही माझासर्वप्रवर्तक ईश्वराचासाक्षात अनुभव घेतात. या संबंधात महात्मे हा एक प्राचीन इतिहास सांगतात हा इतिहास म्हणजे परम तेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद आहे. धर्माचे मर्म जाणणार्‍या यदूने एकदा एक त्रिकालदर्शी, तरूण, अवधूत, ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेले पाहून त्यांना विचारले. (१९-२५)

यदूने विचारले ब्रह्मन ! आपण काही कर्म तर करीत नाही, तरीपण आपल्याला ही चतुर बुद्धी कोठून प्राप्त झाली ? जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखे जगामध्ये वावरत आहात. साधारणतः असे दिसते की, माणसे आयुष्य, यश, संपत्ती किंवा मोक्ष इत्यादींच्या इच्छा मनात धरूनच धर्म, अर्थ, काम किंवा तत्त्वजिज्ञासामध्ये प्रवृत्त होतात. परंतु आपण कर्म करण्यासाठी समर्थ, विद्वान, निपुण, सुंदर आणि अमृतमधुर बोलणारे आहात असे असूनही आपण वेडा, उन्मत्त किंवा पिशाच्च यांच्यासारखे राहाता काही करीत नाही की काही इच्छित नाही. जगातील अधिकांश लोक काम आणि लोभरूप वणव्यात होरपळत असतात परंतु आपल्याला मात्र त्या आगीची झळ लागलेली दिसन नाही जशी गंगेमध्ये असलेल्या हत्तीला वणव्याची आच लागत नाही. ब्रह्मन ! संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता तरीही आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो ? आपण हे आम्हांला सांगावे. (२६-३०)

श्रीकृष्ण म्हणाले ब्राह्मणभक्त, शुद्धबुद्धी, यदूने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांना हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लववून तो त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा ब्राह्मण म्हणाले. (३१)

ब्राह्मण म्हणाले राजन ! मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला आहे त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे, फिरत असतो तू त्या गुरूंची नावे आणि त्यांच्यापासून घेतलेली शिकवण ऐक. माझ्या गुरूंची नावे अशी आहेत पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबुतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरीण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी. (कीटक) आणि कुंभारमाशी. राजन ! मी या चोवीस गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवण घेतली. हे वीरवर ययातिनंदन ! मी ज्याच्याकडून, ज्या प्रकारे, जे काही शिकलो आहे, ते सर्व तुला सांगतो ऐक. (३२-३६)

पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला, तरी ती तो सर्व शांतपणे सहन करते तिच्याकडून मी ‘क्षमा‘ हे व्रत शिकलो जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरूषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये. पृथ्वीचेच रूप असणारे पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसर्‍यांच्या हितासाठीच असतात किंबहुना दुसर्‍याचे हित करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो साधु पुरूषाने त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून परोपकार करण्याचे शिकावे. (पृथ्वी पासून क्षमा व परोपकार हे गुण घ्यावेत). (३७-३८)

प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो, त्याचप्रमाणे साधकानेसुद्धा इंद्रियांना आवडणारे विषय न घेता शरीरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावेत थोडक्यात, ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही, मन चंचल होणार नाही आणि वाणी निरर्थक बडबड करणार नाही, हे पाहावे. वायू अनेक गुणधर्माच्या पदार्थावर जातो, पण कोठेही आसक्त होत नाही की कोणाचाही गुणदोष घेत नाही त्याचप्रमाणे योग्याने वेगवेगळ्या गुणधर्माच्या विषयांकडे जावे लागले, तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये की कोणाचे गुणदोष पाहू नयेत. पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांचा संपर्क झाला असता वायू त्यांचा वास वाहून नेत असला, तरी तो वास स्वतःला चिकटून घेत नाही त्याचप्रमाणे आत्मदर्शी योग्याने या पार्थिव शरीराशी संबंध असेपर्यंत त्याच्या आधिव्याधी, तहानभूक इत्यादी सहन करावे परंतु त्यांपासून सर्वथा अलिप्त असावे. (वायूपासून अल्पसंतुष्टता, इतरांचे गुणदोष न पाहाणे व न घेणे आणि अलिप्त असणे, हे गुण घ्यावेत). (३९-४१)

आकाश ज्याप्रमाणे सर्व चराचरांत आतबाहेर व्यापून असते, तरी त्या वस्तूंपासून अलिप्त असते त्याचप्रमाणे साधकाने, आपण ब्रह्मस्वरूपाने सर्वत्र अधिष्ठानरूपात व्यापून असलो, तरी सर्वांपासून अलिप्त व अमर्याद आहोत, ही भावना आकाशापासून शिकावी. तेज, पाणी, पृथ्वी इत्यादी पदार्थ किंवा वार्‍याने ढकललेले ढग, धूळ इत्यादी पदार्थ आकाशातच असतात, पण त्यांचा आकाशाला स्पर्श होत नाही, त्याचप्रमाणे काळाच्या ओघात उत्पन्न होणार्‍या देहादी पदार्थांचा आत्म्याशी संबंध असत नाही. (आकाशापासून अलिप्तपणा, अमर्यादपणा हे गुण घ्यावेत). जसे पाणी स्वभावतःच स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारे असते, तसेच तीर्थांचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चार यांनीसुद्धा लोक पवित्र होतात, त्याचप्रमाणे साधक पाण्यासारखा स्वभावतःच शुद्ध, प्रेमळ, मधुरभाषी आणि लोकपावन असतो व त्याचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चार यांनी लोक पवित्र होतात. (पाण्यापासून शुद्धता, पावित्र्य इत्यादी गुण घ्यावेत). (४२-४४)

दुसर्‍या तेजाने पराभूत न होणारा, सर्व काही पोटात ठेवणारा तेजस्वी अग्नी काहीही खाऊनसुद्धा त्यांच्या दोषांनी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने तळपणारा, तपश्चर्येने देदीप्यमान, मनइंद्रियांकडून पराभूत न होणारा, संग्रह न करणारा साधक सर्व विषयांचा योग्य उपभोग घेऊनही मन आणि इंद्रिये यांना त्यांचा दोष लागू देत नाही. अग्नी लाकडात गुप्त असतो पण कल्याणेच्छू याजकांसाठी यज्ञकुंडात प्रगट असतो सर्वांकडून हविर्द्रव्य घेऊन त्यांचे भूतभविष्यांतील पाप नाहीसे करतो त्याचप्रमाणे सिद्धपुरूष बहुधा एकांतात, अप्रगट असतो, पण मुमुक्षूंसाठी त्यांच्याजवळ राहातो शिवाय सर्वत्र दात्यांनी दिलेले स्वीकारून त्यांचे पूर्वोत्तर पाप धुऊन टाकतो. अग्नीला विशिष्ट आकार नसतो, पण तो लाकडाच्या आकाराप्रमाणे तसा तसा दिसतो त्याप्रमाणे सर्वव्यापक आत्मासुद्धा आपल्या मायेने रचलेल्या कार्यकारणरूप जगात प्रवेश केल्यामुळे त्या त्या वस्तूंचा नामरूपासारखा भासतो. (अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, इंदियसंयम, उपास्यता, उपाधीशी असंबद्धता इत्यादी गुण घ्यावेत). (४५-४७)

ज्या काळाची गती जाणली जाऊ शकत नाही त्या काळाच्या प्रभावाने चंद्राच्या कळा कमीजास्त होतात तरीसुद्धा चंद्र हा चंद्रच असतो त्याचप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या अवस्था शरीराच्या असतात, आत्म्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. (चंद्रापासून हा गुण घ्यावा देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होत नाही). आगीच्या ज्वाळा किंवा दिव्याची ज्योत क्षणाक्षणाला उत्पन्न आणि नष्ट होत राहाते, परंतु कळत नाही तसेच वेगवान काळामुळे प्राण्यांच्या शरीराची क्षणाक्षणाला उत्पत्ती आणि विनाश होत असतो, परंतु तो लक्षात येत नाही. (अग्नीची ज्वाळा किंवा दिव्याच्या ज्योतीपासून प्रकृतीचे विनाशित्त्व जाणावे अग्नीसंबंधीचा हा आणखी एक गुण). (४८-४९)

सूर्य जसा आपल्या किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते पृथ्वीला देतो, त्याचप्रमाणे योगी पुरूष इंद्रियांच्याद्वारे विषय ग्रहण करतो आणि योग्य समयी त्यांचे दानसुद्धा करून टाकतो विषयांत तो आसक्त असत नाही. पाण्याच्या निरनिराळ्या पात्रांमध्ये प्रतिबिंबित झालेला एकच सूर्य त्यातच प्रवेश करून वेगवेगळा झाल्याचे सामान्य बुद्धीच्या माणसाला दिसते, त्याचप्रमाणे उपाधींच्या भेदामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच आत्मा वेगवेगळा आहे, असे वाटते. (सूर्यापासून अनासक्ती व उपाधीमुळे भेदप्रतीती हे गुण घ्यावेत). (५०-५१)

कधीही, कोणाशीही, अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये अन्यथा अशा माणसाची बुद्धी दीनवाणी होऊन त्याला कबुतराप्रमाणे अतिशय क्लेश सहन करावे लागतात. एका जंगलात एक कपोत झाडावर आपले घरटे बांधून त्यात मादीसह काही वर्षेपर्यंत राहात होता. त्यांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमी स्नेह वाढत होता ते दांपत्यधर्मानुसार एकमेकांच्या दृष्टीने दृष्टीला, अंगाने अंगाला आणि बुद्धीने बुद्धीला जखडून टाकत होते. (५२-५४)

त्यांचे एकमेकांवर एवढे प्रेम होते की, ते निःशंकपणे त्या वनराईत बरोबरीने निजत, बसत, हिंडतफिरत, थांबत, गोष्टी करीत, खेळत आणि खातपीत होते. हे राजन ! मन ताब्यात नसलेला तो कबुतर त्या कबुतरीला जे काही हवे असेल, ते कितीही कष्ट पडले तरी आणून देत असे तीसुद्धा त्याच्या कामना पूर्ण करीत असे. वेळ येताच कबुतरीला पहिल्यांदा गर्भ राहिला तिने घरट्यात आपली पतीजवळच अंडी घातली. भगवंतांच्या अचिंत्य शक्तीने योग्य वेळी ती अंडी फुटली आणि त्यांतून अवयव असणारी पिल्ले बाहेर पडली त्यांचे अंग आणि त्यावरील लव अत्यंत कोमल होती. पिलांवर प्रेम असणारी ती दोघे मोठ्या प्रेमाने पिल्लांचे पालन पोषण करीत आणि त्यांचे गोड ‘गुटुरगूं‘ ऐकून आनंदमग्न होऊन जात. ती उत्साही पिल्ले जेव्हा आपल्या सुकुमार पंखांनी आईवडीलांना खेटून बसत, कूजन करीत, सुंदर खोड्या करीत आणि लुटूलुटू करीत आईबाबांकडे चालत येत, तेव्हा मातापित्यांना आनंद होई. भगवंतांच्या मायेने मोहित होऊन एकमेकांच्या स्नेहबंधनांत बांधलेली ती दोघे आपल्या लहान पिल्लांच्या पालनपोषणात गुंतून गेलेली असत. एके दिवशी ती दोघेही पिल्लांना चारा आणण्यासाठी जंगलात गेली होती चारा गोळा करण्यासाठी बराच वेळ ती जंगलात भटकत राहिली. इकडे एक पारधी सहज फिरतफिरत त्या घरट्याजवळ येऊन पोहोचला घरट्याच्या आसपास कबुतरीची पिल्ले दुडुदुडु धावत असल्याचे पाहून, त्याने जाळे टाकून, त्यांना पकडले. पिल्लांचे पोषण करण्यात नेहमीच तत्पर असलेले ते जोडपे चारा घेऊन आपल्या घरट्याजवळ आहे. कबुतरीने पाहिले की, तिची पिल्ले जाळ्यात अडकून चीची करीत आहेत त्यांना अशा स्थितीत पाहून कबुतरीला अपार दुखः झाले ती रडतरडतच त्यांच्या जवळ धावली. (५५-६५)

भगवंतांच्या मायेने अत्यंत दुःखी झालेली ती उचंबळणार्‍या स्नेहरज्जूने घट्ट बांधली गेली होती आपली पिल्ले जाळ्यात अडकलेली पाहून भान हरपून ती स्वःतच जाळ्यात जाऊन अडकली. कबुतराने प्राणाहूनही अधिक प्रिय असलेली आपली पिल्ले आणि प्राण प्रिय मादीसुद्धा जाळ्यात अडकलेली पाहून तो अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागला. "काय मी कमनशिबी ! माझी बुद्धीच चालेनाशी झाली आहे अरेरे ! या संसारात मी अतृप्त असतानाच व सर्व गोष्टी पुर्‍याहोण्याआधीच माझा धर्म, अर्थ आणि काम याचे मुळ असणारा हा माझा गृहस्थाश्रम नष्ट झाला. मला शोभणारी व माझे सर्व ऐकणारी माझी पतिव्रता पत्‍नी उजाड घरात मला एकट्याला सोडून आमच्या साध्याभोळ्या पिल्लांसह स्वर्गात निघाली. पिल्ले गेली पत्‍नीही गेली आता दिनवाणा विधुर झालेला मी या उजाड घरात कोणासाठी जगू ?". पिल्ले व मादी जाळ्यात अडकून तडफडत असून ती आता मरणाच्या दारात आहेत, हे स्पष्ट दिसत असूनही बिचारा कबुतर स्वतःच जाळ्यात जाऊन पडला. तो क्रूर पारधी, गृहस्थाश्रमी कबुतरजोडपे आणि त्याची पिल्ले मिळाल्याने ‘आपले काम झाले‘ असे पाहून त्यांना घेऊन घरी गेला. ज्या कुटुंबवत्सल माणसाला प्रपंचातील सुखदुःखातच आनंद वाटतो आणि जो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यातच आपले स्वत्व गमावून बसतो, त्याला कधीच शांती मिळत नाही त्या कबुतराप्रमाणे तो आपल्या कुटुंबियांबरोबर नाश पावतो. मुक्तीचे उघडलेले दारच असे मनुष्यशरीर मिळूनही जो कबुतराप्रमाणे आपल्या घरादारातच गुंतलेला असतो, तो उंचीवर जाऊन खाली पडू पाहाणारा म्हटला पाहिजे त्याला "आरूढच्युत" म्हणतात. (कबुतरापासून, कुटुंबविषयक अत्यासक्ती सर्वनाशाला कारण होते, हा बोध घ्यावा). (६६-७४)

अध्याय सातवा समाप्त

GO TOP