श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ४ था

भगवंतांच्या अवतारांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजा म्हणाला - श्रीहरींनी स्वेच्छेनुसार जे जे अवतार घेऊन आतापर्यंत ज्या ज्या लीला केल्या, करीत आहेत किंवा करतील, त्या आपण आम्हांला सांगाव्यात. (१)

द्रुमिल म्हणाला - भगवान अनंत असून त्यांचे गुणही अनंत आहेत त्यांच्या गुणांची गणती करीन, असे जो म्हणतो, तो मूर्खच म्हटला पाहिजे एखादा कोणी कोणत्याही रीतीने पृथ्वीवरील धुळीचे कण मोजेल, परंतु सर्व शक्तींचे आश्रय असलेल्या भगवंतांच्या गुणांची कितीही काळ लागला तरी गणती करू शकणार नाही. भगवंतांनी स्वतःच निर्मिलेल्या पंचमहाभूतांच्या योगाने विराट शरीराची निर्मिती करून आपल्या अंशाने त्यात प्रवेश केला तेव्हा त्या आदिदेव नारायणाला ‘पुरूष‘ हे नाव मिळाले हा त्यांचा पहिला अवतार होय. त्यांच्या विराट शरीरात तिन्ही लोक राहिले आहेत त्यांच्याच इंद्रियांपासून सर्व देह धारण करणार्‍यांची ज्ञानेंद्रिये आणि कम]द्रिये निर्माण झाली आहेत त्यांच्या स्वरूपापासूनच प्राण्यांमध्ये ज्ञानाचा संचार होतो त्यांच्या श्वासोच्छ्‌वासाने सर्व शरीरात बळ येते तसेच इंद्रियांमध्ये ओज आणि काम करण्याची शक्ती उत्पन्न होते तेच सत्त्व इत्यादी गुणांनी विश्वाची उत्पत्ती, स्थिती प्रलय करतात म्हणून तेच आदिकर्ता होत. सर्वप्रथम जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव निर्माण झाले नंतर ते आदिपुरूषच आपल्या सत्त्वांशाने जगाच्या स्थितीसाठी तसेच ब्राह्मण व धर्म यांच्या रक्षणासाठी यज्ञपती विष्णू झाले तसेच तेच तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रूद्र झाले अशा प्रकारे निरंतर त्यांच्यापासूनच प्रजेची उत्पत्ती, स्थिती आणि संहार होत असतात. (२-५)

दक्ष प्रजापतीची मूर्ती नावाची कन्या धर्माची पत्‍नी होती आदिपुरूषाने तिच्यापासून ऋषिश्रेष्ठ, शांतचित्त अशा नर आणि नारायण यांच्या रूपाने अवतार धारण केला त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणार्‍या कर्माचा उपदेश केला व स्वतःसुद्धा त्याचेच अनुष्ठान करीत आजही ते बद्रिकाश्रमामध्ये आहेत मोठमोठे ऋषी त्यांच्या चरणकमलांची सेवा करीत असतात. इंद्राला शंका आली की, तपश्चर्येने हे आपले स्थान हिरावून घेऊ इच्छितात, तेव्हा त्याने तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी परिवारासह कामदेवाला पाठविले कामदेवाला भगवंतांच्या महिम्याचे ज्ञान नव्हते म्हणून तो अप्सरागण, वसंत ऋतू, शीतल वायू यांच्यासह बद्रिकाश्रमात जाऊन स्त्रियांच्या कटाक्षबाणांनी त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्‍न करू लागला. हे इंद्राचे अविवेकी कृत्य आहे, हे जाणून आदिदेव, गर्व न बाळगता भयकंपित झालेल्या त्या सर्वांना हसतहसत म्हणाले "कामदेवा ! देगांगनांनो ! वायो ! तुम्ही भिऊ नका आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करा आता इथेच थांबा आमचा आश्रम सुना करून जाऊ नका". राजन ! नरनारायण ऋषींनी अभयदान देत जेव्हा त्यांना असे म्हटले, तेव्हा कामदेव इत्यादी लाजेने माना खाली घालून दयाळू नरनारायणांना म्हणाले "प्रभो ! आपल्याबाबतीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही; कारण आपण मायेच्या पलीकडे गेलेले आणि निर्विकार आहात म्हणूनच आत्माराम आणि ज्ञानी पुरूष निरंतर आपल्या चरणकमलांना प्रणाम करीत असतात. तुमचे भक्त आपल्या स्थानाचे उल्लंघन करून तुमच्या परमपदाला जातात, म्हणून देव निरनिराळ्या प्रकारे त्यांच्या साधनेत विघ्ने निर्माण करतात परंतु जे लोक यज्ञ इत्यादींच्या द्वारे देवतांना आहुतींच्या रूपाने त्यांचा भाग देत राहातात, तेव्हा ते विघ्ने आणीत नाहीत परंतु जर आपली कृपा असेल, तर मात्र आपले भक्तजन त्या विघ्नांचा माथ्यावर पाय देतात. (६-१०)

काहीजण खोल समुद्राप्रमाणे असलेल्या तहानभूक, ऊनथंडीपाऊस, अंतर्बाह्य प्राण, यांमुळे होणारे कष्ट तसेच रसनेंद्रिये आणि जननेंद्रियांचा आवेग यांना ओलांडून पलीकडे जातात, परंतु ते पुन्हा गाईच्या खुराने तयार झालेल्या खड्‌ड्यातील पाण्यात बुडावे, तसे निष्फळ क्रोधाच्या आहारी जाऊन आपली कठीण तपश्चर्या धुळीला मिळवितात". ते अशी स्तुती करीत असताना सर्वशक्तीमान नारायणांनी त्यांच्यासमोर पुष्कळशा वस्त्रालंकरांनी नटलेल्या अत्यंत रमणीय स्त्रिया प्रगट करून दाखविल्या त्या तेथे भगवंतांची सेवा करीत होत्या. इंद्राच्या सेवकांनी जेव्हा लक्ष्मीसमान असणार्‍या त्या रूपवती स्त्रियांना पाहिले, तेव्हा त्यांच्या दिव्य सौंदर्यासमोर त्यांचे लावण्य फिके पडले त्या स्त्रियांच्या दिव्य सुगंधाने त्या मोहित झाल्या. माना खाली घातलेल्या त्यांना हसल्यासारखे करून देवदेवेश म्हणाले, "जी तुम्हांला अनुरूप वाटेल, अशी कोणतीही एक स्त्री तुम्ही निवडून घ्या ती तुमच्या स्वर्गलोकाचे भूषण ठरेल". "ठीक आहे," असे म्हणून इंद्राच्या सेवकांनी भगवंतांच्या आज्ञेचा स्वीकार करून त्यांना नमस्कार केला नंतर श्रेष्ठ अप्सरा उर्वशीला पुढे करून ते स्वर्गलोकी गेले. तेथे जाऊन त्यांनी इंद्राला नमस्कार केला आणि सभेत देवतांच्या समक्ष नारायणांच्या सामर्थ्याचे वर्णन केले ते एकून आश्चर्यचकित झालेला इंद्र भयभीत झाला. (११-१६)

भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी कलावतार धारण केले विदेहराज ! हंस, दत्तात्रेय, सनकादिक आमचे वडील ऋषभ यांच्या रूपाने अवतीर्ण होऊन त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या साधनांचा उपदेश केला आहे त्यांनीच हयग्रीव अवतार घेऊन मधुकैटभ नावाच्या असुरांचा संहार करून त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले. प्रलयाच्या वेळी मत्स्यावतार घेऊन त्यांनी मनू, पृथ्वी आणि वनस्पतींचे रक्षण केले तसेच वराहावतार घेऊन पृथ्वीचा रसातलातून उद्धार करतेवेळी हिरण्याक्षाचा संहार केला कूर्मावतार धारण करून अमृतमंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंदराचल ठेवून घेतला त्याचप्रमाणे त्यांनी शरणागत आर्त भक्त गजेंद्राला मगरीपासून सोडविले. (१७-१८)

एकदा वालखिल्य ऋषी तपश्चर्या करता करता अत्यंत कृश झाले होते ते जेव्हा कश्यप ऋषींसाठी समिधा आणीत होते, तेव्हा थकून जणू समुद्रात पडावे, तसे गायीच्या खुरांनी केलेल्या खड्‌ड्यातील पाण्यात पडले त्यांनी स्तुती केल्यानंतर भगवंतांनी अवतार घेऊन त्यांना वर काढले वृत्रासुराल मारले तेव्हा इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागल्यामुळे तो भिऊन लपून बसला तेव्हा भगवंतांनी त्या हत्येपासून इंद्राचे रक्षण केले तसेच जेव्हा असुरांनी अनाथ देवांगनांना कैद केले, तेव्हासुद्धा भगवंतांनी त्यांना असुरांच्या बंदिवासातून सोडविले भगवंतांनी सज्जनांचे रक्षण करण्यासाठी नृसिंहावतार धारण केला आणि हिरण्यकशिपूला ठार मारले. देवतांच्या रक्षणासाठी देव आणि असूर यांच्या संग्रामामध्ये त्यांनी दैत्यपतींचा वध केला तसेच वेगवेगळ्या मन्वन्तरांमध्ये आपल्या शक्तीने अनेक कलावतार धारण करून याचकाचा बहाणा करून, ही पृथ्वी दैत्यराज बलीकडून काढून घेतली व अदितिनंदन देवतांना दिली. परशुरामअवतार घेऊन त्यांनीच पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केले ते म्हणजे हैहयवंशाचा नाश करण्यासाठी भृगुवंशामध्ये पेटलेला अग्नी होते त्याच भगवंतांनी रामावतारामध्ये समुद्रावर सेतू बांधून रावणासह लंका उध्वस्त केली त्यांची कीर्ती सर्व लोकांचे पाप नष्ट करणारी आहे त्या सीतापतींचा विजय असो. राजन ! अजन्मा असूनही पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी तेच भगवान यदुवंशात जन्म घेतील आणि देवताही करू शकणार नाहीत, अशी कर्मे करतील पुढे भगवानच बुद्धाच्या रूपाने प्रगट होतील आणि यज्ञाचा अधिकार नसणारे यज्ञ करीत असल्याचे पाहून, अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांनी, त्यांना मोहित करतील कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार घेऊन तेच शूद्र राजांचा वध करतील. हे विदेहराज ! अनंतकीर्ती जगन्नाथाचे असे अनेक जन्म आणि कर्मे यांचे भक्तांनी वर्णन केले आहे. (१९-२३)

अध्याय चवथा समाप्त

GO TOP