श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ३ रा

माया, माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने विचारले सर्वशक्तीमान परमकारण भगवंतांच्या मायावींनासुद्धा मोहित करणार्‍या मायेचे स्वरूप आम्ही जाणू इच्छितो तरी आपण ते आम्हांला सांगावे. संसारातील निरनिराळ्या तापांनी पोळलेला मी एक मनुष्य, त्या तापांवरील औषध असणारे, आपण जे भगवत्कथारूप अमृताचे पान आपल्या वाणीने करवीत आहात, तिचे सेवन करीत असताना माझी तृप्तीच होत नाही. (१-२)

अंतरिक्ष म्हणाला राजन ! आदिपुरूष ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन, त्यांना विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्याद्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठकनिष्ठ सृष्टी निर्माण करतात, तिलाच "माया" म्हणतात. अशा प्रकारे पंचमहाभूतांच्या द्वारे तयार झालेल्या प्राणिशरीरांमध्ये प्रवेश करून स्वतःलाच एक मन आणि पाच ज्ञानेंद्रिये व पाच कम]द्रिये अशा दहा रूपांत विभागून त्यांच्याद्वारा तोच विषयांचा उपभोग घेतो. तो देहाभिमानी जीव ईश्वराकडून प्रकाशित झालेल्या इंद्रियांच्या द्वारा विषयांचा उपभोग घेतो आणि या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या शरीरालाच आपले स्वरूप मानून त्यातच आसक्त होतो. नंतर तोच देहधारी जीव इंद्रियांनी सकाम कर्मे करतो आणि त्यानुसार शुभ कर्माचे फळ सुख आणि अशुभ कर्माचे फळ दुःख भोगत या जगात भटकत राहातो. अशा प्रकारे हा कर्मपरतंत्र जीव अनेक अमंगल कर्मफळांना भोगत पंचमहाभूतांच्या प्रलयापर्यंत जन्ममृत्यूंच्या फेर्‍यात फिरत राहातो. जेव्हा पंचमहाभूतांच्या प्रलयाची वेळ येऊन ठेपते, तेव्हा अनादि आणि अनंत असा काळ, द्रव्यगुणात्मक व्यक्त सृष्टीला नामरूपरहित करून मूळ कारणात विलीन करतो. त्यावेळी पृथ्वीवर सलग शंभर वर्षेपर्यंत भयंकर कोरडा दुष्काळ पडतो प्रलयकाळाच्या शक्तीने सूर्याची उष्णता आणखी वाढून तिन्ही लोक तापू लागतात. त्यावेळी शेषनागाच्या सहस्त्र मुखांतून बाहेर पडणारा अग्नी वार्‍याच्या साह्याने पाताळापासून वर वर येऊन सारे जाळण्यास सुरूवात करतो आणि तो चारी बाजूंना पसरतो. एवढे झाल्यावर प्रलयकालीन मेघ हत्तीच्या सोंडेएवढ्या पर्जन्यधारांचा शंभर वर्षेपर्यंत वर्षाव करतात त्यामुळे हे विराट ब्रह्मांड पाण्यामध्ये बुडून जाते. राजन ! जसे इंधन नसेल, तर आग विझून जाते, त्याचप्रमाणे त्यावेळी विराट पुरूष आपले ब्रह्मांडशरीर सोडून सूक्ष्म अशा अव्यक्तात विलीन होतो. प्रलयकालीन वारा पृथ्वीचा गुण गंध आकर्षून घेतो त्यामुळे तिचे पाण्यात रूपांतर होते जेव्हा तोच वारा पाण्यातील रस शोषून घेतो, तेव्हा तेच पाणी तेज बनते. जेव्हा प्रलयकालीन अंधार अग्नीचा गुण रूप काढून घेतो, तेव्हा तो अग्नी वायूमध्ये लीन होतो आणि जेव्हा आकाश वायूचा स्पर्शगुण काढून घेते, तेव्हा तो वायू आकाशात लीन होतो. राजन ! त्यानंतर काळरूप ईश्वर जेव्हा आकाशाचा गुण शब्द, काढून घेतो, तेव्हा ते आकाश तामस अहंकारात लीन होते इंद्रिये आणि बुद्धी राजस अहंकारात लीन होतात सात्त्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या देवतांसह मन सात्त्विक अहंकारात प्रवेश करते अहंकार महत्तत्त्वामध्ये विलीन होतो महत्तत्त्व प्रकृतीमध्ये आणि प्रकृती ब्रह्मामध्ये लीन होते. उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारी ही भगवंतांची त्रिगुणमय माया आहे आम्ही तुला हिचे वर्णन करून सांगितले आता तू आणखी काय ऐकू इच्छितोस ? (३-१६)

राजाने म्हटले, महर्षे ! आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही, त्यांना तरण्यास कठीण अशी ही भगवंतांची माया स्थूलबुद्धी लोक सहज कसे पार करू शकतील, ते मला सांगा. (१७)

प्रबुद्ध म्हणाला स्त्रीपुरूषसंबंध इत्यादी संबंधानी बांधली गेलेली माणसे सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती यासाठी कर्मे करीत असतात परंतु त्यांचे फळ मात्र उलट मिळते, याचा विचार करावा. मिळविण्यास कठीण, नेहमी पीडा देणारे व स्वतःचा मृत्यूस्वरूप असलेले, द्रव्य, घर, पुत्र, आप्तेष्ट, पशू इत्यादी नाशवान पदार्थ मिळाले तरी त्यांपासून कोणते सुख मिळणार आहे ? याचप्रमाणे कर्माने मिळणारे परलोकसुद्धा असे नाशवान आहेत, असे समजावे तेथेही पृथ्वीवरील लहानलहान राजांप्रमाणे बरोबरीच्यांशी स्पर्धा व वरचढांशी द्वेष असतो शिवाय त्यांचाही नाश असतो. म्हणून आपले परम कल्याण व्हावे, अशी ज्याला इच्छा असेल, त्याने गुरूंना शरण गेले पाहिजे ते गुरू शब्दज्ञानी, ब्रह्मानुभवी व त्यामुळे शान्तचित्त असावेत. ब्रह्मजिज्ञासूने गुरूंनाच आपला आत्मा आणि देव मानून, निष्कपटभावाने त्यांची सेवा करून आणि त्यांच्या सान्निध्यात राहून भागवतधर्माचे शिक्षण प्राप्त करून घ्यावे यामुळेच सर्वात्मा व भक्तांना स्वतःचे दान करणारे भगवान प्रसन्न होतात. (ते भागवत धर्म असे) सर्वप्रथम प्रापंचिक गोष्टीबद्दल अनासक्तभाव, नंतर सत्संगती व सर्वाबद्दल यथायोग्य दया, मैत्री आणि विनय असावा. पावित्र्य, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा तसेच सुखदुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये समबुद्धी असणे. सर्व ठिकाणी चैतन्यरूपात आत्म्याला आणि नियंता म्हणून ईश्वराला पाहाणे, एकांतात राहणे, घराची आसक्ती न ठेवणे, पवित्र वल्कले धारण करणे, जे काही मिळेल, त्यातच संतोष मानणे. भगवत्प्राप्तीचा मार्ग दाखविणार्‍या शास्त्रांविषयी श्रद्धा आणि दुसर्‍या कोणत्याही शास्त्रांची निंदा न करणे, प्राणायामाने मनाचा, मौनाने वाणीचा आणि वासना सोडून कर्मांचा संयम करणे, सत्य भाषण करणे, इंद्रियांचा व मनाचा निग्रह करणे. अद्‌भूत लीला करणार्‍या भगवंतांच्या जन्म, कर्म आणि गुणांचे श्रवण, कीर्तन आणि ध्यान करणे तसेच सर्व कर्मे भगवंतांसाठीच करणे. यज्ञ, दान, तप, जप, सदाचारपालन आणि स्त्री, पुत्र, घर, प्राण इत्यादी जे काही आपल्याला प्रिय असेल, ते सर्व भगवंतांच्या चरणी अर्पण करणे. ज्या मनुष्यांनी श्रीकृष्णांचा आपला आत्मा आणि स्वामी म्हणून साक्षात्कार करून घेतला असेल, त्यांच्यावर प्रेम, तसेच स्थावरजंगम अशा प्राण्यांची, विशेषतः संतमहंतांची सेवा करणे. भगवंतांच्या परमपावन यशासंबंधी एकमेकांशी चर्चा करणे आणि अशा प्रकारच्या साधकांवर आपापसात प्रेम करणे, आपापसात संतुष्ट राहाणे आणि प्रपंचातून निवृत्त होऊन एकमेकांमध्ये आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणे. राजन ! पापांच्या समूहांचे श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करतात सर्वांनी त्यांचेच स्मरण करावे आणि एकमेकांकडून स्मरण करवून घ्यावे अशा प्रकारे साधनभक्तीचे अनुष्ठान करता करता प्रेमभक्तीचा उदय होतो आणि प्रेमाच्या उद्रेकाने त्यांच्या शरीरांवर रोमांच उभे राहातात. अशी प्रेमभक्ती उत्पन्न झाली की, ते भक्त भगवच्चिंतन करता करता कधी रडतात, कधी हसतात, कधी आनंदित होतात, कधी भान विसरून भगवंतांशी बोलू लागतात, नाचतात, गातात, त्यांना शोधतात आणि शेवटी त्यांच्याशी एकरूप होऊन आनंदमग्न होतात. जो अशा प्रकारचे भागवतधर्माचे सिद्धांत गुरूंकडून आत्मसात करतो, त्याला त्यांच्या योगाने भक्तीची प्राप्ती होते आणि तो नारायणपरायण होऊन, जिच्या कचाट्यातून सुटणे अतिशय अवघड आहे, ती माया सहजपणे पार करतो. (१८-३३)

राजाने म्हटले परमात्म्याचे स्वरूप जाणणार्‍यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात म्हणून मला आता ज्या परब्रह्म परमात्म्याचे ‘नारायण‘ नावाने वर्णन केले जाते, त्यांचे स्वरूप सांगा. (३४)

पिप्पलायन म्हणाला राजन ! जी या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण असून स्वतः मात्र कारणहित आहे; स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या अवस्थांमध्ये तसेच समाधी अवस्थेतसुद्धा साक्षीरूपाने विद्यमान असते, जिच्या सत्तेनेच शरीर, इंद्रिये, प्राण आणि अंतःकरण ही सर्व चेतन होऊन आपापली कामे करतात, त्याच परम सत्य वस्तूला ‘नारायण‘ समजावे. जशा अग्नीच्या ठिणग्या अग्नीला प्रकाशित करू शकत नाहीत की, जाळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे त्या परमतत्त्वामध्ये मनाची गती नाही की वाणीची गती नाही, डोळे त्याला पाहू शकत नाहीत आणि बुद्धी त्यांच्यासंबंधी विचार करू शकत नाही, प्राण आणि इंद्रियेही त्याला जाणत नाहीत "नेतिनेति" हे श्रुतींचे शब्दसुद्धा बोध करून देणार्‍या साधनांचा निषेध करून तात्पर्यरूपाने जेथे निषेध संपतो, ते आपले मूळ दाखवितात कारण हे मूळ नसेल, तर निषेधच सिद्ध होणार नाही. जेव्हा सृष्टी नव्हती, तेव्हा केवळ हे एकच तत्त्व होते सृष्टीचे निरूपण करण्यासाठी त्यालाच सत्त्वरजतमात्मक प्रकृती म्हटले गेले परत त्यालाच ज्ञानप्रधान असल्यामुळे महत्तत्त्व, क्रियाप्रधान असल्याने सूत्रात्मा आणि जीवाची उपाधी असल्याने अहंकार म्हटले गेले वास्तविक इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, इंद्रिये, त्यांचे विषय किंवा त्यांपासून मिळणारे सुख या विविध शक्ती ब्रह्मच आहेत तात्पर्य, जे काही कार्यकारण आहे, ते सर्व, तसेच त्याच्या पलीकडे जे काही आहे, तेसुद्धा ब्रह्मच आहे. आत्मा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे कधी जन्म घेत नाही की कधी मरत नाही कधी त्याची वाढ होत नाही की कधी त्याच्यात घट होत नाही परिवर्तनशील सर्व अवस्था व पदार्थ यांच्या तिन्ही काळांचा तोच साक्षी आहे सर्वांमध्ये नेहमी अविनाशी असा तो आहे जसा प्राण एकच असूनही निरनिराळ्या ठिकाणी असल्याने त्याची अनेक नावे आहेत, त्याचप्रमाणे आत्मा ज्ञानस्वरूप व एक असूनसुद्धा इंद्रियांमुळे अनेक भासतो. अंडज, जरायुज, उद्‌भिज्ज व स्वेदज या सर्व जीवशरीरांमध्ये एकच प्राणशक्ती जीवांच्याबरोबर तेथे तेथे जाते सुषुप्तिअवस्थेमध्ये जेव्हा इंद्रिये निश्चेष्ट झालेली असतात, अहंकारसुद्धा निद्रितावस्थेत असतो, तेव्हा लिंगशरीररहित हा कूटस्थ आत्माच असतो त्यामुळेच ‘मी सुखाने झोपलो होतो‘ याचे स्मरण आपल्याला नंतर होते. भगवान कमलनाभांच्या चरणकमलांची प्राप्ती करण्याच्या इच्छेने जेव्हा तीव्र भक्ती केली जाते, तेव्हा तीच भक्ती गुण आणि कर्मांनी उत्पन्न झालेले चित्तातील सर्व दोष, जाळून टाकते जेव्हा चित्त शुद्ध होते, तेव्हा आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो जसे डोळे निर्दोष असल्यास सूर्याच्या प्रकाशाची प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागते. (३५-४०)

राजा म्हणाला आता आपण आम्हांला कर्मयोगाचा उपदेश करा ज्यायोगे मनुष्य शुद्ध होऊन त्याला लवकरच कर्मफलत्यागाने मिळणारी श्रेष्ठ नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते. हाच प्रश्न एकदा मी माझ्या वडिलांजवळ असताना सनकादी ऋषींना विचारला होता परंतु सर्वज्ञ असूनही त्यांनी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही याचेही कारण आपण मला सांगावे. (४२)

आविर्होत्र म्हणाला राजन ! कर्म. (शास्त्रविहित), अकर्म. (निषिद्ध) आणि विकर्म. (विहित कर्माचे उल्लंघन) ही तिन्ही कर्मे फक्त वेदांद्वारेच जाणली जातात लौकिक व्यवहारातून यांचे स्वरूप ठरवणे योग्य नाही वेद अपौरूषेयईश्वररूप आहेत, म्हणून त्यांचे तात्पर्य विद्वानांनाही कळत नाही, असे समजून सनकादी ऋषींनी तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. या वेदांचा मुख्यार्थ वेगळा आणि तात्पर्य वेगळे असते कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी हे कर्मच करावयास सांगतात जसे, लहान मुलाला मिठाईची लालूच देऊन औषध दिले जाते, त्याप्रमाणे हे अज्ञानी लोकांना फळांचे प्रलोभन दाखवून कर्मांमध्ये प्रवृत्त करतात. जो अज्ञानी असून इंद्रिये ज्याला वश नाहीत, त्याने जर आपल्या मनानुसार वेदोक्त कर्मांचा त्याग केला, तर त्याने विहित कर्मांचे आचरण व केल्यामुळे त्याच्या हातून अधर्म घडतो व तो जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटत नाही. म्हणून जो वेदोक्त कर्मांचेच अनुष्ठान करून त्यांच्या फळाची इच्छा न धरता ती भगवंतांना समर्पण करतो, त्याला कर्माच्या निवृत्तीपासून प्राप्त होणारी ज्ञानरूपी सिद्धी प्राप्त होते वेदांमध्ये स्वर्गादिरूप फळांचे जे वर्णन आहे, त्याचे तात्पर्य कर्मांची आवड निर्माण करण्यामध्ये आहे. (४३-४६)

ज्याला आपल्या ब्रह्मस्वरूप आत्म्याची हृदयग्रंथी, "मी आणि माझे" ही कल्पना नाहीशी व्हावी असे वाटत असेल, त्याने वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतींनी भगवंतांची आराधना करावी. गुरूंच्याकडून दीक्षा मिळाल्यावर त्यांच्याकडून अनुष्ठानविधी शिकावा नंतर आपल्याला भगवंतांची जी मूर्ती प्रिय वाटेल, तिच्या ठिकाणीच भगवंतांची पूजा करावी. अगोदर स्नान इत्यादी करून शुद्ध होऊन भगवंतांच्या मूर्तीसमोर बसावे प्राणायाम इत्यादींनी शरीर शुद्ध करावे त्यानंतर आसनविधी, न्यास वगैरे करून घेऊन भगवंतांची पूजा करावी. अगोदर पूजासाहित्य, जमीन, स्वतः व देवमूर्ती हे सर्व पूजेसाठी योग्य बनवावे नंतर आसनावर मंत्रोच्चारपूर्वक पाणी शिंपडून, पाद्य, अर्घ्य इत्यादी पात्रे जवळ तयार ठेवावीत तदनंतर एकाग्रचित्त होऊन, हृदयादी न्यास करावे नंतर हृदयात भगवंतांचे ध्यान करून समोरील मूर्तीमध्ये तिची स्थापन करावी आणि देशकालानुसार मिळालेल्या पूजासामग्रीने मूलमंत्र म्हणून तिची पूजा करावी. त्या त्या उपास्यदेवतेच्या मूर्तीची हृदयादी अंगे आयुधादी उपांगे आणि पार्षदांसहित त्यांच्या त्यांच्या मंत्रांनी पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्रे, अलंकार, गंध, फुले, अक्षता, माळा, धूप, दीप, नैवेद्य इत्यादींनी यथासांग पूजा करावी नंतर स्तोत्रांनी स्तुती करून भगवंतांना नमस्कार करावा. तेच आपल्यामध्ये आहेत, असे ध्यान करीत भगवंतांच्या मूर्तीचे पूजन करावे निर्माल्य आपल्या मस्तकावर धारण करावे नंतर मोठ्या आदराने भगवंतांना हृदयामध्ये व योग्य ठिकाणी ठेवून पूजेची समाप्ती करावी. जो मनुष्य अशा प्रकारे अग्नी, सूर्य, जल, अतिथी आणि आपल्या हृदयामध्ये आत्मरूप श्रीहरींची पूजा करतो, तो लवकरच मुक्त होतो. (४७-५५)

अध्याय तिसरा समाप्त

GO TOP