|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २ रा
श्रीनारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व नऊ योगीश्वरांचा संवाद ऐकविणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात हे कुरूनंदना ! श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने नारद श्रीकृष्णांनी स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहात असत. हे राजन ! ज्याला इंद्रिये आहेत असा, सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनीसुद्धा उपासना करावी, अशा श्रीकृष्णचरणकमलांची सेवा करणार नाही ? एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले ते आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्यांची विधिपूर्वक पूजा व प्रणाम करून म्हटले - (१-३) वसुदेव म्हणाले ज्याप्रमाणे मातापित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवद्भक्तांचे येणे प्रपंचाला उबगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठी असते, तसेच, हे भगवन ! आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुःखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते परंतु आपल्यासारख्या भगवत्प्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. लोक देवतांना ज्याप्रकारे भजतात, त्याचप्रमाणे देवतासुद्धा त्यांना प्रतिबिंबासारखेच कर्मानुसार फळ देतात परंतु सत्पुरूष दीनवत्सल असतात ते सर्वांनाच आपले समजतात. हे ब्रह्मन ! तरीसुद्धा आम्ही आपणास भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारीत आहोत जे श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणार्या या संसारापासून मनुष्य मुक्त होतो. पूर्वी मी मुक्ती देणार्या भगवंतांची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे, तर ते मला पुत्ररूपाने प्राप्त व्हावेत, म्हणून केली होती कारण भगवंतांच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो. हे सुव्रता ! आपण मला आता असा उपदेश करा की, ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूंनी वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊन जाईन. (४-९) श्रीशुक म्हणतात राजन ! बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंतांच्या गुणांचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले - (१०) नारद म्हणाले हे यदुश्रेष्ठा ! विश्वाचे कल्याण करणारा भागवतधर्म जाणून घेण्यासंबंधीचा तुमचा हा निश्चय अतिशय चांगला आहे. हे वसुदेवा ! हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की, जो ऐकल्याने, त्याचा उच्चार केल्याने, त्याचे स्मरण केल्याने, त्याचा स्वीकार केल्याने किंवा त्याला मान्यता दिल्यामुळेसुद्धा दुर्जनही त्याच क्षणी पवित्र होतात. ज्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे, त्या परमकल्याणस्वरूप व माझे आराध्यदैवत, अशा भगवान नारायणांचे तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे. त्यासंबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद होय. स्वायंभुव मनूचा प्रियव्रत नावाचा एक पुत्र होता, त्याचा पुत्र आग्नीध्र, आग्नीध्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ. वासुदेवांचा अंश असणार्या त्यांनी मोक्षधर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता त्याचे शंभर पुत्र होते आणि ते सगळे वेदांमध्ये पारंगत होते. (११-१६) भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला तो नारायणांचा परम भक्त होता त्यांच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष या नावाने प्रसिद्ध झाला. त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते सोडून तो वनात गेला तेथे त्याने तपश्चर्येने भगवंतांची उपासना करून तीन जन्मांमध्ये भगवंतांना प्राप्त करून घेतले. त्या पुत्रांपैकी नऊ पुत्र या भारतवर्षाच्या नऊ द्वीपांचे अधिपती झाले आणि एक्क्याएेंशी पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले. उरलेल्या भाग्यशाली नऊ जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून ते आत्मज्ञानी झाले होते त्यामुळे ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहात आणि अधिकारी पुरूषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत त्यांची नावे अशी होती कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन. हे व्यक्तअव्यक्त जग भगवद्रूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही, असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते. मनात येईल, तिकडे ते जात असत देवता, सिद्ध, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य किन्नर, नाग, मुनी, चारण, भूतनाथ, विद्याधर, ब्राह्मण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात सर्वजण जीवन्मुक्तच होते. (१७-२३) ते एकदा या अजनाभ वर्षात महात्म्या निमीच्या, ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोहोचले. ते भगवंतांचे परम भक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते त्यांना पाहून यजमान निमी, अग्नी आणि ऋत्विज असे सर्वजणच त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. ते भगवंतांचे परम भक्त आहेत, असे जाणून विदेहराजाने त्यांना यथायोग्य आसनावर बसविले आणि प्रेमाने त्यांची विधिपूर्वक पूजा केली. ते नऊही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकांसारखे तळपत होते राजाने विनम्रतेने मस्तक लववून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला. (२४-२७) विदेहराजा म्हणाला - मी तर असे समजतो की, आपण सर्वजण मधुसूदन भगवंतांचे पार्षदच आहात कारण भगवंतांचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. जीवांना मनुष्यशरीर प्राप्त होणे, हे अतिशय कठीण शिवाय ते क्षणभंगुर अशा या देहात भगवंतांच्या भक्तजनांचे दर्शन आणखीच दुर्लभ आहे. म्हणून हे त्रिलोकपावन महात्म्यांनो ! आम्ही आपणास आमच्या परम कल्याणासंबंधी विचारीत आहोत कारण या जगात अर्धा क्षण झालेला सत्संगसुद्धा मनुष्याचा फार मोठा ठेवा आहे. आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो, तर आपण आम्हांला भागवतधर्माचा उपदेश करावा कारण त्यामुळे प्रसन्न झाले असता भगवान शरणागत भक्तांना स्वतःलासुद्धा देऊन टाकतात. (२८-३१) नारद म्हणाले हे वसुदेवा ! निमीने जेव्हा त्या महात्म्यांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा सन्मान केला आणि सदस्य व ऋत्विजांच्या बरोबर बसलेल्या राजा निमीला ते म्हणाले - (३२) कवी म्हणाला राजन ! भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे माझे निश्चित मत आहे नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते, त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. अज्ञानी लोकांनासुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत, तेच "भागवत धर्म" समज. राजन ! या भागवत धर्माचा अवलंब करणार्या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी, त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. (३३-३५) मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंदियांनी, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील, ती ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरूष नारायणांनाच समर्पण करावीत. जो ईश्वराला विन्मुख झाला, त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते म्हणून गुरूंनाच आपले आराध्यदैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करा.वे. राजन ! हा द्वैतप्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणार्याला तो भासतो ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहाणार्याच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमुळे एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे म्हणून विवेकी पुरूषाने संसारातील कर्मांसंबंधी संकल्पविकल्प करणार्या मनाला आवरावे त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल. भगवंतांच्या जन्माच्या आणि लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत, त्या ऐकाव्यात तसेच त्यांच्याविषयीची नामे व स्तोत्रे संकोच सोडून गात राहावीत शिवाय प्रपंचामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत. जो हे व्रत घेतो, त्याच्या हृदयात, आपल्या प्रियतम प्रभूंच्या नामसंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो त्याचे चित्त द्रवते तो वेड्याप्रमाणे कधी खदखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणांचे गायन करू लागतो कधी कधी नाचतोसुद्धा अशा वेळी त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते. (३६-४०) आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रहनक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्षवनस्पती, नद्या, समुद्र हे सगळे, इतकेच काय, सारे चराचर भगवंतांचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा. जसे जेवणार्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती आणि भूक नाहीशी होणे असे तीन फायदे एकाच वेळी होतात, त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो, त्याला भगवंतांबद्दल प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य, अशा तीनही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. हे राजन ! अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो, त्याला भगवंतांविषयी भक्ती, संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परम शांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो. (४१-४३) राजाने विचारले आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे, ते सांगा त्याचे धर्म कोणते ? त्याचा स्वभाव कसा असतो ? तो माणसांशी कसा वागतो ? काय बोलतो ? आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो ? (४४) हरी म्हणाला आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहते, असे जो पाहातो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतांमध्येच आहेत, असे पाहातो, तो उत्तम भागवत समजावा. जो भगवंतांवर प्रेम, त्यांच्या भक्तांशी मैत्री, दुःखी व अज्ञान्यांवर कृपा आणि भगवंतांचा द्वेष करणार्यांची उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत होय. आणि जो भगवंतांच्या मूर्तीचीच पूजाअर्चा श्रद्धेने करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही, तो कनिष्ठ भक्त होय. (४५-४७) जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो, परंतु त्याबद्दल आवडनावड बाळगत नाही, ही सर्व भगवंतांचीच माया आहे, असे मानतो, तो उत्तम भागवत समजावा. जन्ममृत्यू, तहानभूक, श्रम, भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर, प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना होत असतातच जो भगवंतांचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की, या प्रापंचिक गोष्टींनी त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत होय. ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची इच्छा, कर्मप्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्या आश्रयानेच राहातो, तो उत्तम भागवत होय. ज्याला या शरीराचा, चांगल्या कुळात जन्मल्याचा, तसेच वर्ण, आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो, तोच भगवंतांना प्रिय असतो. जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत "हे माझे आणि हे दुसर्याचे" असा भेदभाव मानीत नाही, सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहात असतो, व त्यामुळे शांत राहातो, तो भगवंतांचा उत्तम भक्त होय. आपले अंतःकरण भगवन्मय करणार्या देवतासुद्धा भगवंतांचे जे चरणकमल धुंडाळीत असतात, त्यांच्यापासून अर्धे निमिषसुद्धा जो दूर होत नाही, मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरीसुद्धा तो त्यांचे स्मरण सोडीत नाही, तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय. भगवंतांच्या त्रिभुवनव्यापी चरणांच्या बोटांच्या नखरत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ दूर केला, त्यांच्या हृदयामध्ये, जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही, तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवील ? अगतिक होऊन नामोच्चार केल्यावरसुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी, प्रेमरज्जूने चरणकमल बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदय एका क्षणापुरतेसुद्धा सोडीत नाहीत, तो भगवद्भक्तांमध्ये मुख्य होय. (४८-५५) अध्याय दुसरा समाप्त |