|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १ ला
यदुवंशाला ऋषींचा शाप - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवान श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला तसाच कौरवपांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरविला. कौरवांनी कपटाने द्यूत खेळून, निरनिराळ्या प्रकारे अपमान करून, तसेच द्रोपदीचे केस ओढणे इत्यादी अत्याचार करून, पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून, भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला. आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशियांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणांनी न कळणार्या श्रीकृष्णांनी विचार केला की, एकापरीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे, तोवर तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही, असेच मला वाटते. हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे याचा दुसर्या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते एकमेकांवर घासल्यामुळे उत्पन्न होणार्या अग्नीप्रमाणे या यदुवंशामध्येसुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा त्यानंतरच माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईन. राजन ! सर्वशक्तिमान आणि सत्यसंकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राम्हणांच्या शापाचे निमित्त करून, आपल्याच वंशाचा संहार केला. त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणार्या आपल्या सौंदर्यसंपन्न श्रीविग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणार्यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरणकमलांनी ती पाहाणार्यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या. अशा रीतीने सहजपणे त्यांनी उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला येथील लोक, कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन, श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील याप्रमाणे योजना करून श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले. (१-७) परीक्षिताने विचारले भगवन ! यदुवंशी तर ब्राम्ह्मणभक्त होते, उदार होते, तसेच वृद्धांची नेहमी सेवा करणारे होते शिवाय त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांचे ठायी जडलेले होते असे असता ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला ? हे विप्रवर ! त्या शापाचे कारण काय होते ? तसेच त्याचे स्वरूप काय होते ? सर्व एकजूट असलेल्या त्यांच्यात फूट कशी पडली ? हे सर्व आपण मला सांगावे. श्रीशुक म्हणाले ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होता, असे शरीर धारण करून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली ते उदारकीर्ती पूर्णकाम प्रभू द्वारकाधामात रममाण होऊन राहिले आता त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचे ठरविले कारण पृथ्वीवरील भार उतरविण्याचे एवढेच कार्य आता शिल्लक राहिले होते. श्रीकृष्णांनी अशी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्यांचे गायन करणार्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत आता वसुदेवांच्या घरी, काळरूपाने निवास करणार्या त्यांनी पाठविल्यावरून विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगू, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले. (८-१२) एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळतखेळत त्यांच्याजवळ गेले त्यांनी खोटीच नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले. जांबवतीनंदन सांबाला स्त्रीचा वेष देऊन तिला त्यांच्याकडे नेऊन त्यांनी विचारले, "ब्राह्मणांनो ! ही डोळ्यांत काजळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते परंतु ते स्वतः विचारण्यास लाजत आहे आपले ज्ञान, अबाधित आहे पुत्र व्हावा अशी हिची इच्छा आहे आणि आता हिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे तर हिला काय होईल, हे आपण सांगावे". परीक्षिता ! त्या कुमारांनी जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली, तेव्हा रागावून ते म्हणाले, "मुर्खांनो ! याला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल". मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय भ्याले त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरील कपडे काढून पाहिले, तर खरोखर तेथे त्यांना एक लोखंडी मुसळ दिसले. ते म्हणू लागले, "आम्ही अभागी हे काय करून बसलो ? आता लोक आम्हांला काय म्हणतील ?" याप्रमाणे व्याकूळ होऊन ते मुसळ घेऊन आपल्या घरी गेले. यावेळी त्यांचे चेहरे फिके पडले होते ते यादवांच्या सभेत गेले आणि ते मुसळ तेथे ठेवून राजा उग्रसेनांना त्यांनी सगळी घटना सांगितली. राजन ! जेव्हा द्वारकेतील लोकांनी ब्राम्ह्मणांच्या शापाचे वृत्त ऐकले आणि आपल्या डोळ्यांनी ते मुसळ पाहिले, तेव्हा ते आश्चर्यचकित व भयभीत झाले कारण ब्राह्मणांचा शाप कधी व्यर्थ जात नाही, हे त्यांना माहीत होते. यदुराज उग्रसेनांनी त्या मुसळाचा भुगा केला आणि तो व लोखंडाचा राहिलेला तुकडा समुद्रात फेकून देवविला. (१३-२१) तो लोखंडाचा तुकडा एका मासळीने गिळला आणि तो चुरा लाटांबरोबर वाहात वाहात समुद्राच्या किनार्यापर्यंत आला. थोड्याच दिवसात तो लव्हाळ्यांच्या रूपाने उगवला. मासे पकडण्यार्या कोळ्यांनी समुद्रात इतर माशांबरोबर या माशालाही पकडले त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता, तो जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकाशी जोडला. भगवंतांना सर्व काही माहीत होते हा शाप ते उलटवू शकत होते परंतु असे करणे त्यांना योग्य वाटले नाही कालरूपधारी प्रभूंनी ब्राह्मणांच्या शापाला संमतीच दिली. (२२-२४) अध्याय पहिला समाप्त |