श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ९० वा

भगवान कृष्णांच्या लीला-विहारचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! द्वारकेची शोभा अलौकिक (अशीच) होती. तेथील सडका मदरसाचा स्राव करणारे मदोन्मत्त हत्ती, उत्त्तम पोषाख घातलेले योद्धे, घोडे आणि सुवर्णांचे रथ यांच्या गर्दीने नेहमी फुललेल्या असत. जिकडे पहावे तिकडे हिरवीगार उपवने आणि उद्याने होती. तेथे फुलांनी लहडलेल्या झाडांच्या राई होत्या. त्यांच्यावर बसून भ्रमर गुणगुणत होते आणि पक्शी किलबिल करीत होते. सर्व प्रकारच्या संपत्तींनी ती नगरी परिपूर्ण होती. जगातील श्रेष्ठ वीर यादव तेथे राहात होते. नवतारुण्याची झळाळी असलेल्या तेथील स्त्रिया सुंदर वेषभूषा करून नटलेल्या असत. विजेसारखी कांती असणार्‍या त्या आपापल्या महालात चेंडू इत्यादी खेळ खेळत. लक्ष्मीपती भगवंत अशा या आपल्या द्वारकेत निवास करीत असत. सोळा हजार पत्‍न्यांचे एकटॆच प्राणवल्लभ भगवान श्रीकृष्ण ऐश्वर्याने संपन्न अशा त्यांच्या प्रासादांत तितकीच सुंदर रूपे धारण करून त्यांच्याबरोबर विहार करीत असत. सर्व पत्‍न्यांच्या वाड्यांत परिसरांत सुंदर-सुंदर अशी सरोवरे होती. त्यांतील निर्मळ पाणी, उमललेल्या निळ्या, पिवळ्या, शुभ्र, लाल अशी निरनिराळ्या कमळांच्या परागांनी सुगंधित होत असे. त्यांमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट चालू असे. त्या जलाशयांमध्ये प्रवेश करून श्रीकृष्ण पत्‍नींसह जलविहार करीत असत. त्यांच्याबरोबर विहार करणार्‍या पत्‍न्यांच्या अंगाच्या केशराची उटी आलिंगनाच्या वेळी भगवंतांच्या अंगाला लागत असे. त्यावेळी गंधर्व गायन करीत आणि सूत, मागध तसेच भाट अतिशय आनंदाने मृदंग, ढोल, नगारे आणि वीणा वाजवीत. (१-८)

भगवंतांच्या पत्‍न्या हसत हसत पिचकार्‍यांनी पाणी उडवून त्यांना भिजवून टाकीत. तेसुद्धा पुन्हा त्यांच्यावर पाणी उडवीत. यक्षराजाने यक्षिणींसह विहार करावा, त्याप्रमाणे भगवान आपल्या पत्‍न्यांबरोबर क्रीड करीत. त्यावेळी त्यांची वक्ष:स्थळे आणि मांड्या ओल्या वस्त्रांमुळे दिसू लागत. पाणी उडवताना त्यांच्या अंबाड्यातील फुले खाली पडू लागत. त्या पिचकारी काढून घेण्याचा बहाणा करून प्रियतमाजवळ जात आणि त्या बहाण्याने त्यांना आलिंगन देत. त्यांच्या स्पर्शाने पत्‍न्यांच्या हृदयामध्ये प्रेमभाव उचंबळून येत असे. त्यामुळे त्यांची मुखकमले प्रफुल्लित होऊन त्यांचे सौ‍ंदर्य आणखीच खुलून दिसे. त्यावेळी श्रीकृष्णांची वनमाला त्या राण्यांच्या वक्ष:स्थळावर लागलेल्या केशराच्या रंगाने रंगून जाई. जलक्रीडेमध्ये मग्न झाल्यामुळे त्यांचे कुरळे केस भुरभुर उडत असत. ते आपल्या राण्यांना वारंवार भिजवीत आणि त्यासुद्धा त्यांना ओलेचिंब करीत. जशी हत्तिणींनी घेरलेल्या गजराजाने क्रीडा करावी, त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर विहार करीत. श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्‍न्या जलक्रीडा केल्यानंतर आपापली वस्त्रे व अलंकार उतरवून गाणे, बजावणे या व्यवसायावरच ज्यांची उपजीविका आहे, अशा नट-नर्तकींना ती देऊन टाकीत. अशा प्रकारे भगवान त्यांच्याबरोबर विहार करीत. त्यावेळचे त्यांचे मोहक चालणे, वार्तालाप करणे, त्यांचे पाहाणे, स्मित हास्य, हसणे-खिदळणे आणि आलिंगन देणे इत्यादींमुळे त्यांना आणखी कशाचेच भान राहात नसे. काही वेळा श्यामसुंदरांच्या चिंतनात त्या इतक्या मग्न होऊन जात की, त्या पुष्कळ वेळपर्यंत स्तब्ध राहात आणि पुन्हा त्यांचेच चिंतन करीत वेड्याप्रमाणे असंबद्ध बडबड करीत. मी त्यांचे बोलणे तुला ऐकवतो. (९-१४)

राण्या म्हणत- अग टिटवे ! रात्रीच्या यावेळी आपले अखंड ज्ञान झाकून ठेवून स्वत: भगवानही झोपी गेले आहेत आणि तू मात्र झोपत नाहीस का? झोप उडालेली तू अशीच रात्रभर जागून आक्रोश का करीत आहेस? गडे ! कमलनयन भगवंतांचे मधुर हास्य आणि लीलायुक्त उदार नजरेने तुझ्या हृदयालासुद्धा आमच्याप्रमाणे घरे पडली नाहीत ना? (१५)

अग चक्रवाकी ! तू रात्रीच्या वेळी प्रियकर दिसत नसल्यामुळे आपले डोळे बंद करून अशा प्रकारे करुण स्वराने त्याला बोलावीत आहेस का? आमच्याप्रमाणेच भगवंतांची दासी होऊन त्यांच्या चरणांवर वाहिलेली पुष्पमाळ तू आपल्या वेणीत घालु इच्छितेस काय? (१६)

अरे समुद्रा ! तू तर नेहमी गर्जनाच करीत असतोस. तुला झोप येत नाही का? तुला सदैव जागे राहाण्याचाच रोग जडला आहे. आमच्या प्रिय श्यामसुंदराने तुझे धैर्य, गांभीर्य इत्यादी स्वाभाविक गुण हिरवून घेतले आहेत. म्हणूनच तुझी अशी कठीण अवस्था झाली आहे काय? (१७)

हे चंद्रा ! असाध्य असा क्षयरोग तुला झाला आहे. म्हणूनच तू इतका क्षीण झाला आहेस. त्यामुळे तू आपल्या किरणांनी अंधार नाहीसा करू शकत नाहीस. आमच्या प्रिय श्यामसुंदराच्या गोड गोष्टी विसरल्यामुळे आमचे जसे बोलणे कमी झाले, तसेच तुझे किरण कमी झाले असावेत, असेच आम्हांला वाटते. (१८)

हे मलयपर्वतावरील वायो ! आम्ही तुझे काय वाकडे केले आहे की, ज्यामुळे तू भगवंतांच्या नेत्रकटाक्षांनी अगोदरच घायाळ झालेल्या आमच्या मनात पुन्हा कामदेवाला पाठवतोस? (१९)

श्रीमान मेघा ! तू निश्चितच यादवराजांचा लाडका आहेस. म्हणूनच तू आमच्याचप्रमाणे त्यांच्या प्रेमपाशात बांधला जाऊन त्यांचे ध्यान करीत आहेस. त्यांच्या भेटीसाठी तुझे मन कासावीस झाले आहे. त्यामुळेच तू त्यांची वारंवार आठवण काढून आमच्याप्रमाणे अश्रूधारा गाळीत आहेस ! अरे बाबा ! त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे खरोखर विकतचे दुखणे घेणेच होय ! (२०)

सुरेल गळा असणार्‍या कोकिळा ! आमच्या प्राणप्रियासारखेच, मधुर स्वरात तू बोलतेस. प्रियकराच्या विरहामुळे मेलेल्यांना जीवन देणार्‍या या गोड शब्दांत मला सांग की, मी तुझ्या आवडीचे काय करू? (२१)

हे उदार मनाच्या पर्वता ! तू हलत-डुलत नाहीस की काही सांगत-ऐकत नाहीस. तू कोणत्या तरी गहन चिंतेमध्ये बुडाला आहेस, असे वाटते. आमच्याप्रमाणेच तुलाही असे वाटते का की, आमच्या स्तनांप्रमाणे असणार्‍या तुझ्या शिखरांवर वासुदेवांचे चरणकमल धारण करावेत ! (२२)

हे समुद्रपत्‍नी नद्यांनो ! तुमचे डोह सुकून जाऊन तुम्ही अत्यंत कॄश झाला आहात. तुमच्यामध्ये उमललेल्या कमळांचे सौ‍ंदर्यही आता दिसत नाही. जशा आम्ही आमच्या प्रियतम श्यामसुंदरांची प्रेमळ नजर आमच्यावर न पडल्यामुळे बेचैन होऊन अत्यंत कृश झालो आहोत, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा मेघांच्या द्वारा आपल्या प्रियतम समुद्राचे पाणी न मिळल्यामुळे अशा दीन झाला आहात, असे वाटते. (२३)

हंसा ! अरे ये !! तुझे स्वागत असो. बैस. हे दूध पी ! बाबा रे ! श्यमासुंदरांविषयी काही सांग. तू त्यांचा दूत आहेस, असे आम्हांला वाटते. श्रीकृष्ण सुखरूप आहेत ना? त्यांची मैत्री फारच अस्थिर आहे. त्यांनी आम्हांला सांगितलेले त्यांना आठवते का? ते आमची पर्वा करीत नाहीत, तर आम्ही तरी त्यांच्यामागे कशाला धावावे ? हे क्षुद्राच्या दूता ! आमची इच्छा पूर्ण करणार्‍या त्यांना बोलावून आण. परंतु लक्ष्मीला मात्र बरोबर आणू नकोस. भगवंतांवर अनन्य प्रेम असणारी सर्व स्त्रियांमध्ये एकटी लक्ष्मीच आहे काय? (२४)

श्रीकृष्णपत्‍न्यांचा योगेश्वरेश्वर श्रीकृष्णांविषयी असाच अनन्य प्रेमभाव होता. म्हणूनच त्यांनी परमपद प्राप्त करून घेतले. ज्यांच्या लीला अनेक प्रकारे अनेक गीतांच्या द्वारा गाईल्या गेल्या आहेत, त्या केवळ ऐकूनच स्त्रियांचे मन बळेच त्यांचेकडे ओढ घेत असे. मग ज्या त्यांना आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहात होत्या, त्यांच्या बाबतीत काय बोलावे? (२५-२६)

ज्या स्त्रियांनी जगद्‌गुरु श्रीकृष्णांना आपले पती मानून प्रेमाने त्यांचे चरण चुरणे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची सेवा केली, त्यांच्या तपश्चर्येचे काय वर्णन करावे? (२७)

सत्पुरुषांचे एकमेव आश्रय असणार्‍या श्रीकृष्णांनी वेदोक्त धर्माचे स्वत: आचरण करून लोकांना दाखवून दिले की, धर्म, अर्थ आणि काम साध्य करण्याचे गृहस्थाश्रम हेच स्थान आहे. म्हणूनच ते गृहस्थाला उचित अशा धर्माचा आश्रय घेऊन व्यवहार करीत होते. त्यांच्या सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या. राजा ! त्या श्रेष्ठ पत्‍न्यांपैकी रुक्मिणी इत्यादी आठ पट्टराण्या आणि त्यांच्या पुत्रांचे मी यापूर्वीच क्रमाने वर्णन केले आहे. त्यांव्यतिरिक्त सत्यसंकल्प भगवान श्रीकृष्णांच्या आणखी जेवढ्या पत्‍न्या होत्या, त्या प्रत्येकीचे दहा पुत्र होते. त्या अत्यंत पराक्रमी पुत्रांमध्ये अठरा महारथी होते. त्यांचे यश सर्वत्र पसरले होते. त्यांची नावे माझ्याकडून ऐक. प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानू, सांब, मधू, बृहद्भानू, चित्रभानू, वृक, अरुण, पुष्कर, वेदबाहू, श्रुतदेव, सुनंदन, चित्रबाहू, विरुप, कवी आणि न्यग्रोध. हे राजेंद्रा ! श्रीकृष्णांच्या या पुत्रांपैकीसुद्धा रुक्मिणीनंदन प्रद्युम्न हा पित्याप्रमाणेच सर्वांत श्रेष्ठ होता. महारथी प्रद्युम्नाने रुक्मीच्या कन्येशी विवाह केला होता. तिच्यापासून अनिरुद्ध झाला. त्याला दहा हजार हत्तींचे बळ होते. रुक्मीच्या मुलीचा मुलगा अनिरुद्ध याने रुक्मीच्या मुलाच्या मुलीशी विवाह केला. तिच्यापासून वज्रनाभ याचा जन्म झाला. ऋषींच्या शापाने यदुवंशाचा नाश झाल्यावर हाच एकटा वाचला होता. वज्रनाभाचा पुत्र प्रतिबाहू. प्रतिबाहूचा सुबाहू, सुबाहूचा शांतसेन आणि शांतसेनाचा शतसेन. या वंशात कोणीही पुरुष निर्धन, निपुत्रिक अल्पायुषी, अशक्त किंवा ब्राह्मणभक्त नसलेला जन्मला नाही. परीक्षिता ! यदुवंशांमध्ये असे यशस्वी आणि पराक्रमी पुरुष होऊन गेले की , ज्यांची गणती हजारो वर्षांमध्ये पूर्ण होऊ शकणार नाही. यदुवंशातील मुलांना शिक्षण देण्यासाठी तीन कोटी अठ्ठावीस लाख आचार्य होते, असे ऐकिवात आहे. अशा स्थितीत महात्म्या यादवांची संख्या कशी सांगता येईल? स्वत: महाराज उग्रसेन यांच्या आधिपत्याखाली जवळ जवळ एक महापद्म सैनिक होते. (२८-४२)

प्राचीन काळी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी पुष्कळसे उग्र स्वभावाचे असुर मारले गेले. ते मनुष्यजातीत जन्माला येऊन घमेंडीने जनतेला त्रास देऊ लागले. त्यांना शासन करण्यासाठी भगवंतांच्या आज्ञेने देवांनी यदुवंशामध्ये अवतार घेतला होता. परीक्षिता ! त्यांच्या कुळांची संख्या एकशे एक होती. ते सर्वजण श्रीकृष्णांनाच आपला स्वामी मानीत होते. जे त्यांचे अनुयायी होते, त्यांची सर्व प्रकारे भरभराट झाली. यदुवंशियांचे चित्त श्रीकृष्णांमध्ये इतके जडले होते की, त्यांचे निजणे-उठणे, हिंडणे-फिरणे, बोलणे-चालणे, खेळ, स्नान इत्यादी कामांच्या बाबतीत त्यांना आपल्याला शरीर आहे, याचीही शुद्धता राहात नसे. परीक्षिता ! जेव्हा परमतीर्थ अशा भगवंतांनी स्वत: यदुवंशामध्ये अवतार घेतला, तेव्हा त्या तीर्थापुढे गंगाजलाचा महिमा आपोआपच कमी झाला. प्रेमाने वा द्वेषाने श्रीकृष्णपरायण झालेले त्यांच्या स्वरूपालाच प्राप्त झाले. जिला प्राप्त करण्यासाठी देवदानवही प्रयत्‍न करीत असतात, तीच लक्ष्मीदेवी श्रीकृष्णांच्या सेवेत स्वत: व्यग्र असते. श्रीकृष्णांचे नाव एक वेळ ऐकल्याने किंवा उच्चारल्याने सर्व अमंगल नाहीसे करते. सर्व कुळांचे धर्म श्रीकृष्णांनीच स्थापन केले आहेत, त्यांनी आपल्या हातामध्ये कालस्वरूप चक्र घेतलेले आहे. अशा स्थितीत, त्यांनी पृथ्वीवरील भार उतरविला, यात आश्चर्य ते काय? भगवान श्रीकृष्णच सर्व जीवांचे आश्रयस्थान आहेत. त्यांनी देवकीच्या उदरी जन्म घेतला ही केवळ त्यांची लीला आहे. यदुवंशातील वीर पार्षद होऊन त्यांची सेवा करीत असतात. त्यांनी आपल्या बाहुबळाने अधर्माचा अंत केला आहे. ते चराचराचे दु:ख नाहीसे करणारे आहेत. मंद हास्याने युक्त असे त्यांचे श्रीमुख व्रजस्त्रिया आणि नगरातील स्त्रियांच्या हृदयात प्रेमभाव वाढविते. अशा त्यांचा जयजयकार असो ! प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या परमात्म्याने स्वत:च स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी दिव्य लीलाशरीर धारण केले आणि त्याला अनुरूप अशा अनेक अद्भूमत घटनांचा अभिनय केला. त्यांचे एक एक कर्म, स्मरण करणार्‍यांच्या कर्मबंधनाला तोडून टाकणारे आहे. यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घेऊ इच्छितो, त्याने त्यांच्या लीलांचेच श्रवण करावे. जेव्हा मनुष्य क्षणाक्षणाला श्रीकृष्णांच्या मनोहर लीलाकथांचे श्रवण, कीर्तन आणि चिंतन करू लागतो, तेव्हा त्याची क्षणोक्षणी वाढणारी हीच भक्ती त्याला भगवंतांच्या परमधामाला नेऊन पोहोचविते. काळाच्या गतीच्या पलीकडे जणे जरी अत्यंत कठीण असले, तरीसुद्धा तेथे काळाची डाळ शिजत नाही. त्या धामाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपले राज्य सोडून अरण्याची वाट धरली आहे. (४३-५०)

अध्याय नव्वदावा समाप्त
स्कन्ध दहावा समाप्त
॥ हरि: ॐ तत्सत् ॥

GO TOP