श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८९ वा

भृगूकडून तीन देवांची परीक्षा व मेलेल्या ब्राह्मणबालकांना भगवंतांनी परत आणणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी ऋषी एकत्र आले होते. ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण, याविषयी त्यांच्यामध्ये तर्क-वितर्क चालू होते. परीक्षिता ! हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू याला पाठविले. तो सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या सभेत गेला. ब्रह्मदेवांची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी त्याने त्यांना नमस्कार केला नाही की, त्यांची स्तुती केली नाही. तेव्हा आपल्या तेजाने तळपणार्‍या ब्रह्मदेवांना त्याचा राग आला. परंतु समर्थ ब्रह्मदेवांनी तो आपलाच पुत्र आहे, असे पाहून आलेला क्रोध विवेकबुद्धीने आतल्या आत शांत केला. जसा अग्नी स्वत:च्या पुत्ररूपी पाण्याने शांत होतो. (१-४)

तेथून भृगू कैलासावर गेला. भगवान शंकरांनी आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदाने ते उठून उभे राहिले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे झाले. परंतु भृगूने " तू मर्यादा सोडून वागणारा आहेस, " असे म्हणून त्याच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही. ते ऐकून शंकरांचे डोळे क्रोधाने लाल झाले. आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले. परंतु त्याचवेळी देवी सतीने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून गोड बोलून त्यांचे सांत्वन केले. नंतर भॄगू श्रीविष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठलोकात गेले. त्यावेळी भगवान विष्णू लक्ष्मीदेवींच्या मांडीवर आपले डोके ठेवून पहुडले होते. भृगूंनी तेथे जाऊन त्यांच्या वक्ष:स्थळावर एक लाथ मारली. भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला. नंतर म्हणाले- " ब्रह्मन ! आपले स्वागत असो. या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या. महर्षी ! आपण आल्याचे मला माहित नव्हते. म्हणून मी आपले स्वागत करू शकलो नाही. माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी. हे महामुने ! आपले चरण अत्यंत कोमल आहेत. " असे म्हणून भगवान, भृगूंचे चरण आपल्या हाताने चेपू लागले. आणि म्हणाले,- " महर्षे ! तीर्थांनाही पवित्र करणार्‍या आपल्या चरणतीर्थाने वैकुंठलोक, मी आणि माझ्या आत राहाणार्‍या लोकपालांना पवित्र करावे. मुनिवर्य ! आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो. आपल्या चरणांच्या स्पर्शाने पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्ष:स्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करील." (५-१२)

श्रीशुक म्हणतात- अत्यंत भावपूर्ण वाणीने जेव्हा भगवान असे म्हणाले, तेव्हा भृगू अतिशय आनंदित आणि तृप्त झाला. भक्तीच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यांत अश्रू तरारले आणि तो स्तब्ध झाला. परीक्षिता ! तेथून परत फिरून भ्रूगू ब्रह्मवेत्त्या मुनींच्याकडे आला आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो काही अनुभव आला, तो त्याने विस्तृतपणे सांगितला. ते ऐकून सर्व मुनींना अतिशय आश्चर्य वाटले व त्यांची शंकाही दूर झाली. तेव्हापासून ते भगवान विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ मानू लागले. कारण तेच शांती आणि अभयाचे उगमस्थान असून, त्यांच्यापासूनच साक्षात धर्म, ज्ञान, वैराग्य, आठ प्रकारची ऐश्वर्ये आणि चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते, असा निश्चय केला. शांत , समचित्त, नि:स्पृह आणि सर्वांना अभय देणार्‍या साधूंचे व मुनींचे तेच एकमेव परम प्राप्तव्य आहेत, असे सगळी शास्त्रे सांगतात. (१३-१७)

सत्त्वगुण ही त्यांची प्रिय मूर्ती आहे आणि ब्राह्मण इष्टदेव आहेत. निष्काम, शांत आणि विवेकसंपन्न लोकच त्यांचे भजन करतात. भगवंतांच्या गुणमय मायेने राक्षस, असुर आणि देवता असे त्यांचे तीन प्रकार निर्माण केले आहेत. त्यांपैकी सत्त्वमय देवमूर्तीच त्यांच्या प्राप्तीचे साधन आहे. (१८-१९)

श्रीशुक म्हणतात- सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी ही युक्ती योजिली होती. पुरुषोत्तमांच्या चरणकमलांची सेवा करून त्यांनी त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले. (२०)

सूत म्हणतात- पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्तिकथा जन्म-मृत्यूरूप संसाराचे भय नाहीसे करणारी आहे. श्रीशुकदेवांच्या मुखारविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे. जन्म-मरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणांनी हिचे निरंतर पान करतो, त्याचा सारा थकवा हिच्यामुळे नाहीसा होतो. (२१)

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! एकदा द्वारकेत एका ब्राह्मणस्त्रीने एका पुत्राला जन्म दिला, परंतु जमिनीवर ठेवताच तो मरण पावला. आपल्या मृत बालकाचे प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला आणि त्याला तेथे ठेवून दु:खी अंत:करणाने शोक करीत असे म्हणू लागला. " ब्राह्मणद्रोही, धूर्त, लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानेच माझ्या बालाकाचा मृत्यू झाला आहे. जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा , गुष्ट आणि इंद्रिये न जिंकलेला असा असतो, त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पडून दु:खच दु:ख भोगते. " परीक्षिता ! अशा प्रकारे आपले दुसरे आणि तिसरे अपत्यसुद्धा जन्मत:च मरण पावल्यानंतर तो ब्राह्मण त्या पुत्रांची प्रेते राजवाड्याच्या दरवाजासमोर टाकून तेच म्हणून गेला. नववे मूल मरण पावल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाने ते प्रेत तेथे टाकून पूर्वीप्रमाणेच म्हटले, त्यावेळी श्रीकृष्णांच्या शेजारी बसलेल्या अर्जुनाने ते ऐकून ब्राह्मणाला म्हटले. " हे ब्राह्मणा ! आपण राहात असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रियही नाही काय? हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मण असावेत ! ज्याअ राज्यामध्ये धन, स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दु:खी होतात, ते राजे क्षत्रियांचा वेष धारण केलेले, पोटभरू नटच होत. हे ब्राह्मणा ! पुत्रांच्या मृत्यूमुळे दु:खी असलेल्या तुमच्या संतानाचे मी रक्षण करीन. जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही, तर अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईन." (२२-३०)

ब्राह्मण म्हणाला- येथे बलराम, श्रीकृष्ण, श्रेष्ठ धनुर्धर प्रद्युम्न , अद्वितीय योद्धा अनिरुद्धसुद्धा जेथे माझ्या बालकांचे रक्षण करू शकले नाहीत, या जगदीश्वरांनासुद्धा जे काम करणे अवघड झाले, ते तुम्ही कसे काय करू इच्छिता? हा तुमचा मला पोरकटपणा वाटतो. आमचा या म्हणण्यावर विश्वास नाही. (३१-३२)

अर्जुन म्हणाला- ब्रह्मन ! मी बलराम, श्रीकृष्ण किंवा प्रद्युम्न नाही. ज्याचे गांडीव नावाचे धनुष्य आहे, तो मी अर्जुन आहे. हे ब्राह्मणा ! माझ्या पराक्रमाला नावे ठेवू नकोस. मी माझ्या पराक्रमाने भगवान शंकरांना संतुष्ट केले आहे. युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझे मूल आणून देईन. (३३-३४)

परीक्षिता ! त्या ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा असे आश्वासन दिले, तेव्हा तो लोकांना त्याच्या पराक्रमाचे वर्णन ऐकवीट प्रसन्न मनाने घरी गेला. पत्‍नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण व्याकूळ होऊन अर्जुनाकडे येऊन म्हणू लागला, " वाचवा. माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा. " हे ऐकून अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केले, शंकरांना नमस्कार केला, दिव्य अस्त्रांचे स्मरण केले आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतले. (३५-३७)

बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनाने प्रसूतिगृहाच्या सर्व बाजूंनी त्या बाणांचा एक पिंजरा तयार केला. यानंतर ब्राह्मणस्त्रीने एका पुत्राला जन्म दिला, जो सारखा रडत होता. परंतु पाहाता पाहाताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेनासा झाला. तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णांच्या देखतच अर्जुनाची निंदा करू लागला. तो म्हणाला- " माझा मूर्खपणा तर पहा ! मी या नपुंसकाच्या फुशारकीच्या शब्दांवर विश्वास ठेवला. ज्याला प्रद्युम्न, अनिरुद्ध एवढेच काय , पण बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा वाचवू शकले नाहीत, त्याचे रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल बरे? खोटारड्या अर्जुनाचा धि:कार असो ! आपल्याच तोंडाने बढाई मारणार्‍या अर्जुनाच्या धनुष्याचा धि:कार असो ! जो मंदबुद्धी, प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणाने परत आणू पाहातो." (३८-४२)

जेव्हा तो ब्राह्मण असे शिव्याशाप देऊ लागला, तेव्हा अर्जुन ताबडतोब योगबळाने यमराजांचे निवासस्थान असलेल्या संयमनीपुरीला गेला. तेथे त्याल ब्राह्मणबालक मिळाला नाही, मग तो धनुष्य घेऊन इंद्र, अग्नी, निऋती, सोम, वायू आणि वरुण यांच्या नगरांत, रसातळ व स्वर्गाच्या वर असणार्‍या लोकांत तसेच इतरही पुष्कळ ठिकाणी गेला. परंतु त्याला ब्राह्मणबालक मिळाला नाही. त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही. तेव्हा त्याने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला. परंतु श्रीकृष्णांनी त्याला अडवून म्हटले. अर्जुना ! तू असा स्वत:च स्वत:चा तिरस्कार करू नकोस. ब्राह्मणाची सर्व मुले मी तुला आता दाखवतो. जे लोक आज आपली निंदा करीत आहेत, तेच नंतर आपली निर्मळ कीर्ती प्रस्थापित करतील. (४३-४६)

सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजूत घालून ते अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून पश्चिम दिशेकडे निघाले. त्यांनी सात सात पर्वत असणारी सात द्वीपे, सात समुद्र आणि लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश केला. (४७-४८)

परीक्षिता ! त्या अंधकारामध्ये शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक नावाचे चारही घोडे रस्ता न दिसल्यामुळे इकडे तिकडे भटकू लागले. योगेश्वरांचेसुद्धा परमेश्वर भगवान श्रीऋष्णांनी घोड्यांची ही अवस्था पाहून आपल्या हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा सुदर्शन चक्राला पुढे पाठविले. आपल्या तेजाने सुदर्शन चक्र भगवंतांनीच निर्माण केलेल्या घनदाट भयंकर अंधकाराला कापीत, मनासारख्या तीव्र वेगाने, पुढे पुढे चालू लागले. श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणाने राक्षसांच्या सेनेत प्रवेश करावा तसे. अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखविलेल्या मार्गावरून तो रथ अंधकाराच्या पलीकडे असलेल्या सर्वश्रेष्ठ पारावार नसलेल्या, व्यापक अशा प्रकाशसागरात पोहोचला. ते तज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्याने आपले डोळे मिटून घेतले. यानंतर रथाने दिव्य अशा महासागरात प्रवेश केला. झंझावाताने उसळणार्‍या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता. तेथे एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होते. चमकणार्‍या रत्‍नांच्या हजारो खांबांनी ते शोभत होते. त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते. त्यांचे शरीर अत्यंत भयानक तसेच अद्भू त होते. त्यांना एक हजार फणा होत्या. आणि त्या तेजस्वी रत्‍नांनी चमकत होत्या. प्रत्येक फणेला भयानक दोन दोन डोळे होते. त्यांचे शरीर कैलासपर्वताप्रमाणे शुभ्र होते आणि गळे व जिभा निळ्या रंगाच्या होत्या. त्या शेषाच्या सुखमय शय्येवर सर्वव्यापक महान प्रभावशाली परम पुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचे अर्जुनाने पाहिले. त्यांचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचे होते. अत्यंत सुंदर असा पीतांबर त्यांनी धारण केला होता. सुंदर असा आकर्ण नेत्र असलेले त्यांचे मुख प्रसन्न होते. बहुमोल रत्‍नजडित मुकुट आणि रत्‍नजडित कुंडले यांच्या तेजाने हजारो कुरळे केस चमकत होते. त्यांना लांब असे सुंदर आठ होते, गळ्यात कौस्तुभमणी होता. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह आणि गळ्यात वनमाला होती. तेथे नंद-सुनंद इत्यादी पार्षद, सुदर्शन चक्र इत्यादी मूर्तिमंत आयुधे, पुष्टी, श्री, कीर्ती आणि माया या चार शक्ती, तसेच सर्व ऋद्धी, ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे अधीश्वर अशा भगवंतांची सेवा करीत असल्याचे अर्जुनाने पाहिले. आपलेच स्वरूप असलेल्या भगवान अनंतांना श्रीकॄष्णांनी नमस्कार केला. त्यांच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनानेही त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमाने स्मित हास्य करीत गंभीर वाणीने त्यांना म्हटले. " तुम्हा दोघांना पाहाण्यासाठी मी ब्राह्मणाची मुले माझ्याकडे आणली. धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह पृथ्वीवर अवतार घेतला आहे. पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या. तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात. तुम्ही पूर्णकाम आणि सर्वश्रेष्ठ आहात. तरीसुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणार्‍या धर्माचे आचरण करा." (४९-६०)

भगवान अनंतांनी जेव्हा त्या दोघांना अशी आज्ञा केली, तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला, त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित हौन, ब्राह्मणबालकांना घेऊन ते जसे आले होते, तसे द्वारकेला परतले. त्या मुलांची जी वये व जशी रूपे होती, तसेच त्यांना त्या ब्राह्मणाकडे सोपविले. भगवान विष्णूंचे ते परमधाम पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. जीवांमध्ये जे काही बळ आहे, ते श्रीकृष्णांच्याच कृपेचे फळ आहे, हा त्याला अनुभव आला. भगवंतांनी अशा अनेक पराक्रमी लीला केल्या. सामान्य लोकांप्रमाणे संसारातील विषयांचा भोग घेतल्यासारखे दाखविले आणि श्रेष्ठतम असे यज्ञही केले. जसा इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पाडतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आदर्श महापुरुषासारखे आचरण करीत ब्राह्मणादी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले. त्यांनी काही अधर्मी राजांना स्वत: मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादींकडून मारविले. अशा प्रकारे धर्मराज इत्यादींकडून त्यांनी अनायसे धर्माची स्थापना केली. (६१-६६)

अध्याय एकोणनव्वदावा समाप्त

GO TOP