श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८८ वा

शिवांचे संकटमोचन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने म्हटले- सर्व भोगांचा त्याग केलेल्या शंकरांना जे देव, असुर किंवा मनुष्य भजतात ,ते बहुतेक धनसंपन्न होतात, पण लक्ष्मीपती विष्णूंची उपासना करणारे मात्र साधारणत: तसे नसतात. दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत. परंतु त्यांच्या उपासकांना त्यांच्या स्वरूपाच्या विपरीत असे फळ मिळते. याविषयी माझ्या मनात मोठा संदेह आहे. मी आपल्याकडून याचे कारण जाणून घेऊ इच्छितो. (१-२)

श्रीशुक म्हणतात- शिव नेहमी आपल्या शक्तीने युक्त असतात. ते सत्त्वादी गुणांनी युक्त असून अहंकाराचे अधिष्ठाते आहेत. वैकारिक, तैजस आणि तामस असे अहंकाराचे तीन भेद आहेत. या त्रिविध अहंकारापासून दहा इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन असे सोळा पदर्थ उत्पन्न झाले. म्हणून या सर्वांच्या अधिष्ठात्या देवतांपैकी कोणाचीही उपासना केल्यावर त्या देवतेनुरूप ऐश्वर्याची प्राप्ती होते. परंतु श्रीहरी प्रकृतीपलीकडील स्वत: पुरुषोत्तम असून प्राकृत गुणरहित आहेत. ते सर्वज्ञ व सर्वांच्या अंत:करणाचे साक्षी आहेत. जो त्यांचे भजन करतो, तो स्वत:सुद्धा गुणातीत होतो. तुझे अजोबा धर्मराज युधिष्ठिर यांनी, अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर, भगवंतांकडून विविध प्रकारच्या धर्मांचे वर्णन ऐकतेवेळी हाच प्रश्न विचारला होता. जे मनुष्यमात्रांच्या कल्याणासाठी यदुवंधांमध्ये अवतरले होते, त्या भगवंतांनी युधिष्ठिरांची ऐकण्याची इच्छा पाहून संतुष्ट होऊन असे उत्तर दिले होते. (३-७)

भगवान श्रीकृष्ण म्हणाले- ज्याच्यावर मी कृपा करतो, त्याचे सर्व धन मी हळू हळू काढून घेतो. तो जेव्हा निर्धन होतो, तेव्हा त्याचे बांधव दु:खाकुल झालेल्या त्याला सोडून जातात. मग तो धन मिळवण्यासाठी उद्योग करू लागतो, तेव्हा मी त्याचे ते प्रयत्‍नसुद्धा निष्फळ करतो. त्यामुळे तो कंटाळून माझ्या भक्तांशी मैत्री करतो, तेव्हा मी त्याच्यावर कृपा करतो. माझ्या कॄपेने त्याला परम सूक्ष्म, अनंत, सच्चिदानंदस्वरूप अशा परब्रह्माची प्राप्ती होते. अशा प्रकारे माझी आराधना करणे अत्यंत कठीण आहे, हे जाणून लोक मला सोडून इतर देवतांची आराधना करतात. नंतर ते लवकर प्रसन्न होणार्‍या देवतांकडून राज्य, वैभव इत्यादी मिळवून उन्मत्त होतात आणि आपल्याला वर देणार्‍या देवतेलाही विसरतात. उलट त्यांची अवहेलना करतात. (४-११)

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! ब्रह्मदेव, विष्णू , महादेव इत्यादी देव शाप आणि वर देण्यास समर्थ आहेत; परंतु यांपैकी महादेव आणि ब्रह्मदेव लवकर वर किंवा शाप देतात. परंतु श्रीविष्णू तसे नाहीत. याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. एकदा वृकासुराला वर देऊन भगवान शंकर संकटात सापडले होते. वृकासुर हा शकुनीचा पुत्र होता. तो दुष्ट होता. एके दिवशी वाटेत त्याने नारदांना पाहून विचारले, " तिन्ही देवांपैकी लवकर प्रसन्न होणारे कोण? " नारद म्हणाले- " तू भगवान शंकरांची आराधना कर. त्यामुळे तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल. ते थोड्याशा गुणांनी चटकन प्रसन्न होतात आणि थोड्याशा अपराधाने चटकन रागावतात. रावणाने आणि बाणासुराने भाटांप्रमाणे त्यांची थोडीशी स्तुती केली, तेव्हा ते त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना अतुलनीय ऐश्वर्य दिले. नंतर रावणाने कैलास उचलल्यामुळे आणि बाणासुराच्या नगररक्षाणाचा भार घ्यावा लागल्याने ते संकटात सापडले होते." (१२-१६)

हे ऐकून वृकासुर केदारक्षेत्री गेला आणि अग्नीला भगवान शंकरांचे मुख समजून आपल्या शरीराचे मांस तोडून अग्नीमध्ये हवन करून त्यांची आराधना करू लागला. अशा प्रकारे सहा दिवस उपासना करूनसुद्धा शंकरांचे दर्शन झाले नाही, तेव्हा त्याला अतिशय दु:ख झाले. सातव्या दिवशी केदारतीर्थात स्नान करून त्याने आपले केस ओले झालेले मस्तक कु-हाडीने तोडून त्याचे हवन करावे, असे ठरविले. जगामध्ये जसा एखादा दु:खाने आत्महत्या करू लागला, तर आपण त्याला वाचवितो, त्याप्रमाणे परम दयाळू भगवान शंकरांनी अग्निदेवाप्रमाणे अग्निकुंडात प्रगट होऊन आपल्या दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अडविले. त्यांचा स्पर्श होताच वृकासुराचे शरीर जसेच्या तसे परिपूर्ण झाले. भगवान शंकर वृकासुराला म्हणाले- " वत्सा ! थांब. थांब. मी तुला पाहिजे तो वर देतो. माग. मला फक्त पाणी अर्पण केल्यानेही मी माझ्या शरणगत भक्तांवर संतुष्ट होतो. अरे ! तू विनाकारण शरीराला का कष्ट देतोस? " अत्यंत पापी अशा त्याने सर्व प्राण्यांना भयभीत करणारा असा वर मागितला की , " मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, तो मरून जावा. " परीक्षिता ! त्याची ही विनंती ऐकून भ्गवान रुद्र सुरुवातीला थोडेसे नाराज झाले, पण नंतर हसून म्हणाले, " ठिक आहे." असे म्हणून या वराने त्यांनी जणू सापाला अमृत पाजले. (१७-२२)

भगवान शंकर असे म्हणाल्यावर वृकासुराच्या मनात पार्वतीदेवींचे हरण करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि त्या वराची परीक्षा घेण्यासाठी तो असुर त्यांच्याच मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्‍न करू लागला. तेव्हा आपण दिलेल्या वराने शंकर भयभीत झाले. तो त्यांच्या पाठलाग करू लागला आणि ते त्याला भिऊन कापत कापत पळू लागले. ते पृथ्वी, स्वर्ग आणि दिशांच्या शेवटापर्यंत पळत गेले. तरीसुद्धा तो पाठलाग करीत असल्याचे पाहून ते उत्तरेकडे गेले. मोठमोठे देव हे संकट टाळण्याचा काही उपाय न सुचल्याने स्तब्ध राहिले. शेवटी ते अंधाराच्या पलीकडे असलेल्या प्रकाशमय अशा वैकुंठलोकी गेले. जगताला अभय देऊन स्वत: शांत असणार्‍या संन्यांशांचे एकमेव आश्रयस्थान असलेले नारायण जेथे निवास करताता व जेथे गेल्यावर जीवाला परत पृथ्वीतलावर यावे लागत नाही, त्या वैकुंठात श्रीशंकर गेले. भक्तांचे भय नाहीसे करणार्‍या भगवंतांनी पाहिले की, शंकर मोठ्या संकटात सापडले आहेत. तेव्हा ते आपल्या योगमायेने ब्रह्मचार्‍याचे रूप घेऊन दुरूनच वृकासुराकडे येऊ लागले. त्यांच्या कमरेला मुंज गवताची दोरी, हरिणाजिन, एका हातात दंड आणि दुसर्‍या हातात रुद्राक्षांची माळ होती. त्यांचे तेज धगधगत्या आगीसारखे होते. त्यांनी हातात कुश घेतले होते. वृकासुराला त्यांनी नम्रतेचा बहाणा करून नमस्कार केला. (२३-२८)

श्रीभगवान म्हणाले- शकुनिनंदना ! तू अत्यंत थकलेला आहेस, हे स्पष्टच दिसत आहे. तू फार लांबून आलास काय? थोडीशी विश्रांती तर घे ! पहा. हे शरीरच सर्व सुखे उपभोगण्याचे साधन आहे.

हे समर्थ गृहस्था ! यावेळी तू काय करू इच्छितोस? मला सांगण्यासारखे असेल तर सांग. कारण या जगामध्ये असे दिसते की, लोक सहायकांच्या द्वारा आपली कामे करून घेतात. (२९-३०)

श्रीशुक म्हणतात- भगवंतांनी अमृतमधुर वाणीने असे विचारल्यावर थकवा दूर झालेल्या त्याने आपली तपश्चर्या, वरप्राप्ती व शंकरांचा पाठलाग, हे सर्व पहिल्यापासून सांगितले. (३१)

श्रीभगवान म्हणाले- " असे असले तरी आम्ही त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवीत नाही. कारण दक्ष प्रजापतीच्या शापाने तो पिशाच झाला आहे आणि स्वत: तो प्रेतपिशाच्चांचा राजा आहे. हे दानवराज ! जर तू त्या जगद्‌गुरुवर विश्वास ठेवीत असशील, तर लगेच स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून परीक्षा कर. हे दानवश्रेष्ठा ! शंकराचे म्हणणे जर कोणत्याही प्रकारे खोटे ठरले, तर त्या खोटे बोलणार्‍याला मारून टाक. ज्यामुळे तो पुन्हा कधीही खोटे बोलणार नाही. " भगवंतांच्या अशा अतिशय गोड वाणीमुळे त्याची विवेकबुद्धी नाहीशी झाली. आणि त्या मूर्खाने वर विसरून स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवला. त्याच क्षणी त्याचे डोके फुटले आणि तो डोक्यावर वज्र पडल्यासारखा जमिनीवर कोसळला. त्यावेळी आकाशात देव जयजयकार , नमस्कार आणि वाहवा ! वाहवा ! असा घोष करू लागले. पापी वृकासुर मेल्याबरोबर देवता, ऋषी, पितर आणि गंधर्व भगवंतांवर पुष्पवर्षाव करू लागले. अशा रीतीने शंकर त्या संकटातून मुक्त झाले. भगवान पुरुषोत्तम भयमुक्त झालेल्या भगवान शंकरांना म्हणाले की, " देवाधिदेवा ! या दुष्टाला त्याच्या पापांनीच नष्ट केले. हे परमेश्वरा ! महापुरुषांचा अपराध करणारा कोणता दळभद्री प्राणी सुखात राहिल? आपण तर स्वत: जगद्‌गुरु विश्वेश्वर आहात ! मग आपल्य बाबतीत काय सांगावे ! (३२-३९)

अनंत शक्तींचे समुद्रच अशा साक्षात परमात्मा श्रीहरींची शंकरांना संकटातून सोडाविण्याची ही लीला जो कोणी दुसर्‍यांना सांगतो किंवा स्वत: ऐकतो, तो संसारबंधनातून व शत्रूभयापासून मुक्त होतो. (४०)

अध्याय अठ्ठ्याऐंशीवा समाप्त

GO TOP