|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८७ वा
वेदस्तुती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षिताने विचारले- भगवन ! ब्रह्म हे कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडचे आहे. सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण त्यात नाहीतच. वाणीने किंवा मनानेसुद्धा ते सांगता येत नाही. दुसर्या बाजूला, सर्व श्रुतींचा विषय तर तीन गुण हाच आहे. अशा स्थितीत श्रुती निर्गुण ब्रह्माचे प्रतिपादन कसे काय करतात? (१) श्रीशुक म्हणतात- भगवंतांनी जीवांना अर्थ, धर्म, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी, इंद्रिये, मन आणि प्राणांची निर्मिती केली. ब्रह्माचे प्रतिपादन करणार्या उपनिषदांचे हेच ज्ञान पूर्वजांचेसुद्धा पूर्वज असलेल्या सनकादी ऋषींनी स्वीकारले. जो कोणी श्रद्धापूर्वक यांचे श्रवण-मनन करतो, तो सर्व उपाधींपासून मुक्त होऊन परमकल्याणस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. याविषयी मी तुला नारायणांशी संबंधित एक कथा ऐकवितो. ती कथा म्हणजे नारद आणि नारायण ऋषींचा संवाद होय. (२-४) भगवंतांचे भक्त नारद एकदा निरनिराळ्या लोकांमध्ये फिरत फिरत सनातन ऋषी भगवान नारायणांचे दर्शन घेण्यासाठी बद्रिकाश्रमात गेले. मनुष्यमात्राचे लौकिक कल्याण आणि त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी, म्हणून भगवान नारायण या भारतवर्षामध्ये या कल्पाच्या सुरुवातीपासूनच धर्म, ज्ञान आणि संयम धारण करून तपश्चर्या करीत आहेत. परीक्षिता ! एके दिवशी ते कलापग्रामवासी सिद्ध ऋषींच्याबरोबर बसले होते. त्यावेळी नारदांनी त्यांना प्रणाम करून हाच प्रश्न विचारला होता. भगवान नारायणांनी सर्व ऋषी ऐकत असता जनलोकांमध्ये राहाणार्या पूर्वीच्या लोकांचा जो ब्रह्मविचार झाला होता, तो नारदांना सांगितला. (५-८) भगवान नारायण म्हणाले- नारदमुने ! पूर्वी एकदा जनलोकांमध्ये राहाणारे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र नैष्ठिक ब्रह्मचारी सनक, सनंदन, सनातन इत्यादी ऋषींचे ब्रह्मसत्र (ब्रह्मविषयक चर्चासत्र) झाले होते. त्यावेळी तू माझ्या श्वेताद्वीपाधिपती अनिरुद्धांचे दर्शन घेण्यासाठी श्वेताद्वीपाकडे गेला होतास. त्यावेळी तेथे ज्या ब्रह्माच्या विषयात श्रुती मौन धारण करतात, त्यासंबंधी अतिसुंदर चर्चा झाली होती. जो तू मला आता विचारलास, तोच प्रश्न त्यावेळी तेथे उपस्थित केला गेला होता. सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार हे चारही भाऊ शास्त्रीय ज्ञान, तपश्चर्या आणि स्वभाव याबाबतीत समान आहेत. त्यांना शत्रू, मित्र आणि उदासीन एकसारखेच वाटतात. त्यांनी आपल्यापैकी सनंदन यांना वक्ता म्हणून नियुक्त केले आणि अन्य भाऊ श्रोते झाले. (९-११) सनंदन म्हणाले- पहाटॆ झोप घेत असलेल्या सम्राटाला जागे करण्यासाठी जसे त्याचे नोकर भाट त्याच्याजवळ येतात आणि त्याचे पराक्रम व सुयशाचे गायन करून त्याला जागे करतात, त्याचप्रमाणे जेव्हा परमात्मा आपणच निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तींसहित झोपी जातो, तेव्हा प्रलयाच्या शेवटी श्रुती, त्यांचे प्रतिपादन करणार्या वचनांनी त्यांना जागे करतात. (१२-१३) श्रुती म्हणतात- ज्यांना कोणी जिंकू शकत नाही, अशा हे प्रभो! आपला जयजयकार असो! जयजयकार असो ! आपण स्वभावत:च सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहात. म्हणून चराचर जीवांच्या आनंदामय अशा मूळ स्वरूपाला आच्छादित करून त्यांना बंधनात अडकविणार्या त्रिगुणांना धारण करणार्या मायेचा नाश करा. प्राण्यांमधील ज्ञानादी सर्व शक्तींना जागृत करणारे आपणच आहात. कधी आपण मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती करून सगुण रूप धारण करता तर कधी मूळ सच्चिदानंदस्वरूपात राहाता. आम्ही वेद आपले असेच वर्णन करतो. (१४) ज्याप्रमाणे घटादी कार्ये मातीरूप कारणातून उत्पन्न होऊन त्यातच लय पावतात, त्याप्रमाणे ज्या आपल्यामध्येच कोणताही बदल न घडता, हे सारे इंद्रियांना कळणारे विश्व ज्या आपल्यापासून उत्पन्न होऊन आपल्यातच विलीन होते आणि विश्व नसते, तेव्हाही केवळ आपणच शिल्लक असता, म्हणून वेदमंत्र आणि मंत्रद्रष्टे ऋषी हे सर्व विश्व ब्रह्मच मानतात. तसेच मनाचे चिंतन असो की वाणीचे उच्चरण तेही आपल्यासंबंधीच आहे, असे त्यांना वाटते. (कारण आपल्याशिवाय अन्य वस्तूच नाही ना ! ) जसे, माणसांनी कोठेही पाय ठेवला तरी तो पृथ्वीवर ठेवला, असेच होते. (मग तो लाकडावर ठेवो, की दगडावर. कारण हे सर्व पदार्थ पृथ्वीस्वरूपच आहेत.) (१५) म्हणूनच हे त्रिगुणात्मकमायाधिपते ! विवेकी लोक, सर्व लोकांचे सर्व पाप नाहीसे करणार्या तुमच्या कथामृतसागरात डुंबत राहून सर्व प्रकारचे पाप-ताप नाहीसे करतात. तर मग हे पुरुषोत्तमा ! ज्यांनी आत्मज्ञानाने अंत:करणातील विकार आणि काळामुळे उत्पन्न होणारे वार्धक्यादी दोष दूर केले आहेत आणि त्यामुळे जे अखंड आनंदस्वरूप अशा आपल्या परमपदाला प्राप्त झाले आहेत, त्यांचे पाप-ताप नाहीसे होतील, यात काय शंका ! हे भगवन ! मनुष्यप्राणी जर तुमची सेवा करतील, तरच त्यांचे जीवन सफल होय. नाहीतर त्यांचे श्वासोच्छवास म्हणजे लोहाराच्या भात्यासारखेच होत. आपल्या अनुग्रहामुळेच महतत्त्व, अहंकार इत्यादी जड तत्त्वांनी ब्रह्मांड रचले. अन्नमयादी पाच कोशात त्या त्या आकाराने (परंतु त्यांच्याशी लिप्त न होता ) राहून आपण त्यांना चैतन्यमय केले. य पाच कोशांचा आधार असलेले ब्रह्मही आपणच आहा. किंबहुना कार्यकारणात्मक विश्वाच्या ही पलीकडे असणारे व त्याच्या नाशानंतरही शिल्लक राहाणारे साक्षिभुत सत्य तत्त्व आपणच आहात. (१६-१७) ऋषींनी आपल्या प्राप्तीचे जे मार्ग सांगितले आहेत, त्यांपैकी मणिपूर चक्रात असणार्या ब्रह्माची उपासना स्थूलदृष्टीचे साधक करतात. जेथून सर्व नाड्या शरीरभर पसरल्या आहेत, त्या हृदयात दहर ब्रह्माची उपासना ’आरूणी’ साधक करतात. हे अनन्ता ! त्या हृदयातून ’सुषुम्ना’ नावाची जी एक नाडी, तुमच्या साक्षात्काराचे श्रेष्ठ स्थान असलेल्या ब्रह्मरंधात गेली आहे, तेथे काही साधक तुमची उपासना करतात. या साधकांना तेथे तुमचा साक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा या संसारात यावे लागत नाही. (१८) स्वत:च निर्माण केलेल्या निरनिराळ्या योनींमध्ये उपादान कारणरूपाने आपणच असून जीवरूपाने जणू प्रवेश केला आहे. अग्नी जसा लहान-मोठ्या लाकडामुळे लहान-मोठा वाटतो, त्याप्रमाणे त्या त्या योनीत राहाण्यामुळे आपण लहान-मोठे भासता. म्हणूनच निर्मल अंत:करण असलेले निष्काम भक्त, मिथ्या असणार्या या सर्व योनींत सत्य, सर्वत्र समान, एकरस असे तुमचे स्वरूपच असल्याचा अनुभव घेतात. (१९) स्वत:च्या कर्माने निर्माण केलेल्या या शरीरांत राहाणारा कार्य-कारणरहित असा जो जीवात्मा तो सर्वशक्तीसंपन्न अशा आपलेच स्वरूप आहे. ज्ञानी लोक जीवाच्या या वास्तविक स्वरूपाचा विचार करून या भूलोकात सर्व वेदोक्त कर्मांच्या समर्पणाचे स्थान व मोक्षस्वरूप अशा आपल्या चरणांची पूर्ण श्रद्धेने उपासना करतात. (कारण या उपासनेनेच जीवाला ’मीच ब्रह्म आहे’, हा साक्षात्कार होतो.) हे परमेश्वरा ! कळण्यास अत्यंत कठीण अशा आत्मतत्त्वाचे ज्ञान करून देण्यासाठी अवतार घेणार्या आपल्या चरित्ररूप अमृताच्या महासागरात पोहून जे आपले त्रिविध ताप नाहीसे करतात, त्यांना मोक्षाचीही इच्छा नसते. इतकेच काय, पण काहीजण तर, आपल्या चरणकमलांचे हंस बनून सेवा करणार्या भक्तांच्या सहवासात राहाण्यासाठी आपल्या घरादाराचाही त्याग करतात. (२०-२१) जर हे शरीर तुमच्या सेवेसाठी उपयोगात आणले तर तेच आपला आत्मा, हितचिंतक आणि मित्र बनते. शिवाय आपणही जीवाचे हितचिंतक, मित्र व आत्मा असल्यामुळे त्याला भेटायला नेहमी उत्सुक असता. अशी सर्व सोय असूनही जीवांचे केवढे हे दुर्दैव की, ते आपल्या उपासनेत रमत नाहीत. उलट शरीर, घरदार इत्यादी विनाशी वस्तूंत रमून स्वत:ची अधोगती करून घेतात. परिणामी त्यांच्या ठिकाणीच वासना जडल्याने पशुपक्ष्यादी क्षुद्र शरीरे त्यांना प्राप्त होताच आणि या भयंकर जन्ममृत्यूरूप प्रपंचात ते भटकत राहातात. योगीजन प्राण, मन,इंद्रिये यांचा निग्रह करून दृढ योगाभ्यासाने अंत:करणात ज्या तत्त्वरूप आपलि उपासना करतात, त्याच तत्त्वाला तुमचे शत्रूसुद्धा निरंतर तुमच्या स्मरणाने प्राप्त होतात. शेषनागाच्या शरीराप्रमाणे असणार्या तुमच्या बाहूंवर आसक्त होणार्या स्त्रिया आणि तुमची चरणकमले नित्य धारण करणार्या आम्ही श्रुती समदर्शी अशा तुमच्या दृष्टीने सारख्याचा. (योगाने असो, द्वेषाने असो, प्रेमाने असो की अद्वितीय भावनेने असो तुमचे स्मरणच तुमची प्राप्ती करून देणारे आहे.) (२२-२३) हे भगवन ! अनादी न अनन्त अशा ज्या आपल्यापासून प्रथम ब्रह्मदेव व त्यानंतर आध्यात्मिक व आधिदैविक देवगण उत्पन्न झाले, त्या आपल्याला या जगात ज्यांचे जन्म-मृत्यू त्याहीनंतरचे आहेत, त्यांपैकी कोण बरे जाणू शकेल? शिवाय ज्यावेळी आपण सारे विश्व आपल्यात समाविष्ट करून झोपी जाता ,त्यावेळी तर स्थूल-सूक्ष्म जग, काळाचा वेग किंवा शास्त्र काहीच नसते. (तर मग तुमचे ज्ञान कोणाला कसे होणार ? ) वैशेषिक पूर्वी नसलेले जग नवीन उत्पन्न झाले असे मानतात. नैयायिक एकवीस प्रकारच्या दु:खांचा नाश हाच मोक्ष मानतात. सांख्य आत्मे अनेक मानतात. मीमांसिक कर्मफलेच सत्य मानतात. श्रुतिविरोधामुळे हे सर्व भ्रामात्मक ज्ञान आहे. परमात्मा त्रिगुणात्मक आहे, ही भेदबुद्धी तुमच्या बाबतीत अज्ञनामूलक आहे. अज्ञानाच्या पलीकडे केवळ ज्ञानस्वरूप असणार्या आपल्या ठिकाणी हा भेद कोठून असणार? (२४-२५) तुमच्या अधिष्ठानावर पुरुषापासून सर्व त्रिगुणात्मक जग, मनामुळे नसूनही असल्यासारखे भासते. आत्मज्ञानी मात्र हे सर्व विश्व आत्म्यापासून उत्पन्न झाल्यामुळे आत्म्याप्रमाणेच सत्य मानतात. सोन्याचा दागिनाही सोने म्हणूनच स्वीकारला जातो ना? तसेच आपल्यापासून उत्पन्न झालेले व आपण ज्यात प्रवेश केला आहे, असे हे जग आत्मज्ञानी निश्चयाने आत्मरूपच मानतात. सर्व चराचर हे आपले निवासस्थान आहे, असे समजून जे तुमची सेवा करतात, ते जन्म-मृत्यूची पर्वा न करता मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवतात. (अर्थात मुक्त होताता) परंतु तुमच्यापासून जे दूर जातात, ते जरी विद्वान असले, तरी त्यांना तुम्ही जनावरांना बांधावे तसे वेदवाणीरूपी दाव्याने बांधून टाकता. याउलट जे तुमची भक्ती करतात, ते स्वत:ला आणि इतरांनाही पवित्र करतात.(भक्तिहीन विद्वानांना केवळ शब्दज्ञान होते आणि भक्तांना साक्षात्कार होतो.) (२६-२७) हे प्रभो! आपण इंद्रियरहित आहात, पण स्वयंप्रकाश आहात. (आपल्या ज्ञानाला इंद्रियांची जरूर नाही.) सार्या प्राण्यांची इंद्रिये आपल्यामुळेच कार्ये करतात. म्हणूनच मायावेष्टित ब्रह्मदेवासह सर्व देव आपली पूजा करताता आणि मनुष्यांनी दिलेले हव्यकव्यादी भक्षण करतात. ज्याप्रमाणे मांडलिक राजे प्रजेकडून कर घेऊन सम्राटाला देतात, त्याचप्रमाणे सर्व देव त्यांना ज्या ज्या कार्यासाठी नेमलेले असेल, ते ते तुमच्या भीतीने ते पार पाडतात. (हे कार्य करणे, हीच तुमची पूजा आहे आणि मनुष्यांनी केलेली देवांची पूजा हे त्यासाठी देवांना मिळालेले वेतन आहे.) हे मायारहित प्रभो! जेव्हा आपण मायेसह क्रीडा करू इच्छिता, तेव्हा मायेचा संग नसलेल्या तुमच्या केवळ संकल्पाने, मायेमुळे उत्पन्न होणार्या सूक्ष्म शरीरांनी युक्त होऊन निरनिराळ्या चराचराचा जन्म होतो. (आपल्या संकल्पाने निर्माण झालेल्या सृष्टीत जरी विषमता असली, तरी त्याला कारण आपण नाही. ) कारण आपण आकाशाप्रमाणे सर्वांशी सम असून परमदयाळू आहात. आपल्याला कोणी स्वकीय नाही की परकीय नाही. या सृष्टीत प्रारंभी वाणीला किंवा मनाला न कळणारे आपण शून्यवत होता. (२८-२९) हे नित्य एकरस प्रभो! जर जीव वास्तविक अनंत, नित्य आणि सर्वव्यापी असतील, तर ते आपल्यासारखेच असल्यामुळेच आपण त्यांचे नियंत्रक होऊ शकणार नाही. मात्र असे नसेल, तरच आपण त्यांचे नियंत्रण करू शकाल. उपाधीने का असेना, पण जीवरूप कार्य ज्या परमात्मरूप कारणापासून निर्माण झाले, ते कारण सर्व जीवांमध्ये असल्यामुळे परमात्माच सर्व जीवांचा नियंता ठरतो. जे लोक आपल्याला जाणले, असे म्हणतात, त्यांना आपण कधीच कळलेले नसता ! कारण जाणली जाणारी वस्तू प्रत्येकाच्या मतानुसार वेगळी ठरते. आणि आपण तर नित्य एकरूप आहात. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही जन्मरहित असल्यामुळे यांपैकी कोणीही एक जीवरूपाने जन्मले असे म्हणता येत नाही. (जर प्रकृती जीवरूपाने जन्मली म्हटले तर जीव अचेतन ठरेल आणि पुरुष जन्मला म्हटले, तर निर्विकार पुरुषात विकार उत्पन्न झाला, असे होईल.) म्हणून वारा हे निमित्तकारण आणि पाणी हे उपादानकारण यांपासून बुडबुडे तयार होतात, तसेच पुरुष व प्रकृती या दोहोंच्या संयोगाने जीव तयार होतात, असे म्हटले पाहिजे. त्यामुळेच हे सारे जीव अनेक प्रकारच्या नामरूपांसह परमकारण अशा तुमच्यामध्येच विलीन होतात. जशा नद्या समुद्रात किंवा जसे सर्व फुलांचे रस मधात विलीन होतात. (३०-३१) हे प्रभो ! तुमच्या मायेमुळे हे जीव जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत आहेत, हे पूर्णपणे जाणून ज्ञानी लोक संसार-निवर्तक अशा आपल्याला शरण येतात. जे आपल्याला अनुसरतात, त्यांना संसारभय कोठून असणार? मात्र ज्यांची भृकुती हाच तीन ऋतू असणारा काळ आहे, तो आपल्याला शरण न येणार्यांना भयभीत करतो. (आपल्याला शरण आल्यास संसारावे वा काळाचे भय उरत नाही. ) हे अजन्मा प्रभो! ज्यांनी इंद्रिये व प्राण यांचा निग्रह केलेला आहे, पण जे गुरुचरणांना शरण गेले नाहीट, ते जर उच्छृंखल व अत्यंत चंचल अशा मनरूप घोड्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करतील, तर त्याचे त्यांना फक्त कष्टच होतील व त्यांच्यावर शेकडो संकटे येतील. जशी नावाड्याशिवाय नाव घेऊन समुद्रप्रवास करणार्या व्यापार्याची गत होते, तशी त्या साधकांची गत होते. (३२-३३) सर्व रसस्वरूप असे तुम्ही जीवांचा आत्मा असताना तुमचा आश्रय करणार्या माणसाला आप्तेष्ट, पुत्र, शरीर, धन, घर, जमीनजुमला, प्राण किंवा रथ इत्यादी गोष्टींची काय जरूर आहे? याउलट ’आत्मसुख हेच सत्यसुख आहे’, हे न जाणणार्या आणि सुखासाठी मैथुनादी गोष्टींचा अवलंब करणार्या अज्ञानी लोकांना मुळातच नश्वर व नि:सार अशा या संसारातील कोणती वस्तू आनंद देऊ शकणार आहे? या पॄथ्वीतलावर हॄदयात आपल्या चरणकमलांना धारण करणारे व त्यामुळेच ज्यांचे चरणतीर्थ पाप नाहीसे करते, असे ऋषीसुद्धा अहंकाररहित होऊन अतिशय पुण्यमय अशा तीर्थांचा व आश्रमांचा आश्रय करतात. माणसांनी नित्य आनंदमय आत्मस्वरूप अशा आपल्या ठिकाणी एकवेळ जरी मन लावले तरी ते पुन्हा माणसाचे विवेक- वैराग्यादी गुण नाहीसे करणार्या घराकडे फिरकत नाहीत. (३४-३५) कारण व कार्य एकरूप असतात, या नियमाप्रमाणे हे विश्व सत्तत्त्वापासून उत्पन्न झाल्यामुळे सत् आहे, असे म्हणावे, तर ते तर्कशुद्ध ठरत नाही. (कारण जग हे असत्य आहे.) कारण व कार्य एकरूप असतात, हा नियमही निरपवास नाही. जसा पिता व पुत्र यांच्यात कार्यकारणभाव असला, तरी एकरूपता नसते. काही ठिकाणी तर कार्य काल्पनिक असते. जसे दोरी हे साप भासण्याचे कारण असले, तरी त्या ठिकाणचे कार्य साप हा काल्पनिक असतो. या ठिकाणी सर्पाभासाचे कारण केवळ दोरी नसून दोरीचे अज्ञान हेही एक कारण आहे. याचप्रमाणे सत्तत्त्वाच्या ठिकाणी अज्ञानाने भासणारे हे जग असल्यामुळे ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक आहे. व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले, तरी त्यामुळे काही बिघडत नाही. (त्यामुळे ब्रह्माद्वैताच्या पारिमार्थिकतेला बाध येत नाही. कारण जगाची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे. ) आणि ही अन्धपरंपरा अनादी काळापासून चालू आहे. अशा स्थितीत कर्मफल नित्य मानणारी तुमची वेदवाणी कर्मावर अत्यंत श्रद्धा ठेवणार्या मंदमतींना भ्रमित करते. (वास्तविक वेद कर्मफलाला नित्य मानीत नाहीत, तर ते आत्मज्ञानाला पात्र नसलेल्यांना कर्माकडे प्रवृत्त करण्यासाठी कर्माची लक्षणावृत्तीने प्रशंसा करतात, एवढेच.) (३६) हे विश्व उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते आणि प्रलयानंतरही असणार नाही. त्यावरून हे सिद्ध होते की, मध्येसुद्धा नित्य अशा तुमच्या अधिष्ठानावरच ते मिथ्या भासते. म्हणूनच माती इत्यादी कारणांपासून उत्पन्न झालेल्या घडा इत्यादी कार्यद्रव्यांची जगाला उपमा दिली जाते. (घडा म्हणजे वास्तविक विशिष्ट आकार व नाव असलेली मातीच. तसेच विविध नावारूपांनी नटलेले विश्व म्हणजे एकमेवाद्वितीय परब्रह्मच ) पण अज्ञानी लोक मात्र मनाच्या या खोट्या कल्पनारूप जगाला सत्य मानतात. (३७) तोच अज्ञानी जीव जेव्हा मायेमुळे अविद्येला कवटाळतो आणि त्यामुळे देहेन्द्रियांना आपलेच खरे रूप समजतो, तेव्हा त्याचे मूळचे नित्य-शुद्ध-बुद्धादी स्वरूप लोप पावते व तो जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत राहातो. परंतु हे प्रभो! आपण मात्र सापाने कात टाकावी, तसा मायेचा त्याग करता, म्हणून आपले ऐश्वर्य नित्य आपल्याबरोबरच राहाते. त्यामुळे अष्टसिद्धीयुक्त अनंत ऐश्वर्यात आपण विराजमान राहाता. (३८) हे भगवन ! अज्ञानी लोकांनी योगी होऊनसुद्धा जर आपल्या हृदयांतील विषयवासनांना उखडून फेकून दिले नाही, तर आपण त्यांच्या हृदयांत असूनसुद्धा, एखाद्याने आपल्याच गळ्यातील मणी आठवण नसल्याने इकडे तिकडे धुंडाळावा, त्याप्रमाणे ते आपल्याला शोधत राहातात, पण आपण त्यांना आपडत नाही. जे लोक इंद्रियांना तृप्त करण्यातच मग्न असतात, त्यांना इहलोकी उपभोगासाठी द्रव्यार्जन इत्यादींसाठी कष्ट करावे लागतात. शिवाय जन्म मृत्यूपासून त्यांची सुटका झालेली नसते. आणि आपले स्वरूप समजून न घेतल्यामुळे स्वत:च्या वर्णाश्रमधर्माचे उल्लंघन त्यांच्याकडून होते. म्हणून परलोकात गेल्यावर नरकाची भीतीही राहाते. (३९) हे भगवन ! आपले वास्तविक स्वरूप जाणणार्या मनुष्याला आपण दिलेल्या पुण्यपापाच्या सुख-दु:खाच्या फळाची जाणीव होत नाही. त्यावेळी विधि-निषेध प्रतिपादन करणारे शास्त्रसुद्धा त्याला लागू होत नाही. शिवाय ज्या माणसांनी दररोज आपल्या प्रत्येक युगामध्ये केलेल्या उपदेशांचे संतांकडून श्रवण करून त्याद्वारा तुम्हांला स्वत:च्या हृदयात प्रतिष्ठित केले, त्यांनाही आपणच मोक्ष प्राप्त करून देता. (४०) हे भगवन ! स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपतीच आपला थांग लावू शकले नाहीत असे नाही, तर आपल्यालासुद्धा तो लागला नाही. कारण जर आपल्याला शेवटच नाही, तर तो कोण कसा जाणू शकेल? प्रभो! जसे आकाशात हवेमुळे धुळीचे अनंत कण उडातात, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर दसपट सात आवरणांसहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात. तुम्ही श्रुतीसुद्धा तुमच्या स्वरूपाचे तुमच्या व्यतिरिक्त वस्तूंचा (हे नव्हे, ते नव्हे, असा) निषेध करीत करीत शेवटी तुमच्यापर्यंत येऊन थांबतो. (४१) भगवान नारायण म्हणाले- अशा प्रकारे सनकादी ऋषींनी आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूपाला जाणले आणि स्वत: ते नित्य सिद्ध असूनही या उपदेशाने कृतकृत्य होऊन त्यांनी सनंदनांची पूजा केली. अशा प्रकारे सर्वांचे पूर्वज असणार्या त्या आकाशमार्गी महात्म्यांनी सर्व वेद, पुराणे आणि उपनिषदांचे सार काढले आहे. हे ब्रह्मवेदांच्या मानसपुत्रा ! तूसुद्धा श्रद्धायुक्त अंत:करणाने ही ब्रह्मविद्या धारण करून स्वच्छंदपणे पृथ्वीतलावर विहार कर. ही विद्या माणसांच्या सर्व वासना भस्म करणारी आहे. (४२-४४) श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! संयमी, ज्ञानी, पूर्णकाम आणि नैष्ठिक ब्रह्मचारी अशा नारदांनी भगवान नारायणांनी केलेला उपदेश श्रद्धेने ग्रहण करून म्हटले. (४५) नारद म्हणाले- भगवन ! परम पवित्र कीर्ती असणार्या श्रीकृष्णांना नमस्कार असो. आपण सर्व प्राण्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी रमणीय कलावतार धारण करता. (४६) नारदांनी अशा प्रकारे आदिऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना नमस्कार करून माझे साक्शात पिता असलेल्या कृष्णद्वैपायनांच्या आश्रमाकडे ते गेले. व्यासांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. आसनावर बसल्यावर नारायणांच्या तोंडून जे काही ऐकले होते, ते सर्व नारदांनी त्यांना सांगितले. राजन ! मन-वाणीच्या पलिकडे असणार्या गुणरहित अशा परमात्म्यामध्ये मनाचा प्रवेश कसा होतो, हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला सांगितले. भगवानच या विश्वाचा संकल्प करतात. तसेच त्याच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी तेच असतात. प्रकृती आणि जीव या दोघांचे ते स्वामी आहेत. तेच सृष्टी निर्माण करून जीवाबरोबर हिच्यामध्ये प्रवेश करतात आणि शरीरांची निर्मिती करून तेच त्यांचे नियंत्रण करतात. गाढ झोपेत मनुष्य ज्याप्रमाणे शरीराचे अनुसंधान सोडतो, त्याचप्रमाणे ज्यांची प्राप्ती झाल्यावर मायेतून मुक्त होतो, अशा चिन्मात्र स्वरूपाने मायेचा निरास केलेल्या, संसारभय दूर करणार्या श्रीहरींचे निरंतन चिंतन करीत राहावे. (४७-५०) अध्याय सत्त्याऐंशीवा समाप्त |