|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८६ वा
सुभद्राहरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंतांचे एकाच वेळी जाणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] राजाने म्हटले- मुनिश्रेष्ठ ! राम-कृष्णांची बहिण व माझी आजी सुभद्रा, हिच्याशी अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला, हे जाणण्याची आम्हांला इच्छा आहे. (१) श्रीशुक म्हणतात- पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वीपर्यटन करीत असता प्रभासक्षेत्री जाऊन पोहोचला. तेथे त्याने ऐकले की, आपली मामेबहीण सुभद्रा, हिचा विवाह बलराम दुर्योधनाबरोबर करू इच्छितात. पण इतर त्यांच्याशी सहमत नाहीत. अशावेळी अर्जुन, सुभद्रा आपल्याला मिळावी, म्हणून त्रिदंडी संन्याशाचा वेष घेऊन द्वारकेला पोहोचला. आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी अर्जुन तेथे पावसाळ्याचे चार महिने राहिला. तेथे नगरवासीयांनी आणि तो अर्जुन आहे, हे न कळलेल्या बलरामांनी त्याचा चांगला आदरसत्कार केला. त्याचे अतिथ्य करावे, म्हणून एकदा बलरामांनी त्याला घरी आमंत्रित केले. तेथे बलरामांनी अत्यंत श्रद्धेने वाढलेली भिक्षा त्याने ग्रहण केली. (२-५) अर्जुनाने तेथे वीरांचे मन मोहित करणार्या उपवर सुभद्रेला पाहिले. अर्जुनाचे डोळे प्रेमाने प्रफुल्लित झाले. प्रेम जागृत झालेले मन तिच्या ठायी जडले. स्त्रियांना आवडणार्या त्याला पाहिल्यावर सुभद्रेचेसुद्धा मन त्याच्यावर जडले. आणि ती थोडीशी हसून लाजर्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. आता अर्जुन फक्त तिचेच चिंतन करू लागला. आणि तिला पळवून मिळवण्याची संधी शोधू लागला. सुभद्रेला प्राप्त करण्याच्या उत्कट इच्छेने त्याचे चित्त सैरभैर झाले. त्याला थोडीसुद्धा शांती मिळेनाशी झाली. (६-८) सुभद्रा एकदा देवाच्या मोठ्या जत्रेसाठी रथार बसून द्वारकेच्या बाहेर पडली. त्याचवेळी महारथी अर्जुनाने देवकी- वसुदेव आणि श्रीकृष्णांच्या संमतीने, सुभद्रेचे अपहरण केले. वीर अर्जुनाने रथावर स्वार होऊन धनुष्य हातात घेतले आणि जे सैनिक त्याला अडविण्यासाठी आले, त्यांना पिटाळून लावले. इकडे सुभद्रेचे आप्तेष्ट ओरडत असताना ज्याप्रमाणे सिंह आपली शिकार घेऊन जातो, त्याप्रमाणे अर्जुनाने सुभद्रेला नेले. हे ऐकून, पौर्णिमेच्या दिवशी समुद्र जसा खवळतो, त्याप्रमाणे बलराम खवळून उठले. परंतु श्रीकृष्णांनी आणि बांधवांनी त्यांचे पाय धरून त्यांची समजूत घातली, तेव्हा ते शांत झाले बलरामांनी नंतर वरदक्षिणा म्हणून वधू-वरांसाठी पुष्कळसे धन, अन्य सामग्री, हत्ती, रथ, घोडे आणि दास- दासी पाठविल्या. (९-१२) श्रीशुक म्हणतात- विदेहाची राजधानी मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव नावाचा एक गृहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण श्रीकृष्णांचा परम भक्त होता. तो फक्त भगवद्भक्ती करूनच पूर्णमनोरथ, शांत, ज्ञानी आणि विरक्त होता. तो कोणत्याही प्रकारचा उद्योग न करता जे काही अनायसे मिळेल, त्यावरच आपला निर्वाह चालवी. दररोज त्याला प्रारब्धानुसार उदरनिर्वाहासाठी पुरेशी सामग्री मिळत असे. त्यापेक्शा अधिक मिळस नसे. पण तो त्यातच संतुष्ट राही आणि आपल्या वर्णाश्रमानुसार योग्य ती धर्मकर्मे करीत असे. परीक्षिता ! तसाच, त्या देशाचा बहुलाश्व नावाचा राजासुद्धा निरहंकारी होता. हे दोघेही श्रीकृष्णांचे प्रिय भक्त होते. (१३-१६) श्रीकृष्णांनी त्या दोघांवरही प्रसन्न होऊन एके दिवशी दारुकाला सांगून आपला रथ मागविला आणि त्यात बसून ते विदेह देशाकडे जाण्यास निघाले. भगवंतांच्याबरोबर नारद, वामदेव, अत्री, वेदव्यास, परशुराम, असित, आरुणी, मी, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, च्यवन इत्यादी ऋषीसुद्धा होते. परीक्षिता ! ते जेथे जेथे जाऊन पोहोचत, तेथे तेथे तेथील नागरिक आणि ग्रामवासी, ग्रहांच्याबरोबर असलेल्या उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे, तसे हातात पूजेचे साहित्य घेऊन उपस्थित असत. परीक्षिता ! त्या प्रवासात आनर्त, धन्व, कुरु-जांगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधू, केकय, कोसल, अर्ण इत्यादी अनेक देशांतील स्त्री-पुरुष भगवान श्रीकृष्णांच्या मुक्त हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने युक्त असे मुखकमल डोळे भरून पाहात असत. त्रिलोकगुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या दर्शनाने त्या लोकांची अज्ञानदृष्टी नाहीशी करून, त्यांना ज्ञान देऊन त्यांचे परम कल्याण करीत चालले होते. जी सर्व दिशांना उजळून टाकणारी आणि सर्व अशुभांचा नाश करणारी आहे, अशा कीर्तीचे गायन, जागोजागी माणसे आणि देव करीत होते. ते ऐकत श्रीकृष्ण हळू हळू विदेह देशात जाऊन पोहोचले. (१७-२१) परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांच्या शुभागमनाची बातमी ऐकून नागरिक आणि ग्रामवासी आनंदाने हातात पूजेचे साहित्य घेऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी सामोरे येत. भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन त्यांचे हॄदय आणि चेहरे आनंदाने प्रफुल्लित होत. ते भगवंतांना आणि ज्यांचे फक्त नाव ऐकले होते, त्या मुनींना हात जोडून, मस्तक लववून नमस्कार करीत. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी आलेले आहेत, असे पाहून बहुलाश्व आणि श्रुतदेव यांनी त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांनीही एकाच वेळी हात जोडून मुनींसह श्रीकृष्णांना आपल्याकडून अतिथ्य स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. (२२-२५) दोघांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळी रूपे धारण करून त्यांच्या नकळत दोघांच्याही घरी गेले. विदेहराज बहुलाश्व अतिशय बुद्धिमान होता. दुर्जनांना ज्यांचे नावसुद्धा ऐकू येणे कठीण तेच भगवान श्रीकृष्ण आणि ऋषी आपल्या घरी आले आहेत, हे पाहून बहुलाश्वाने सुंदर सुंदर आसने आणवून त्यांना आरामात त्यावर बसविले. प्रेमभक्तीच्या उद्रेकाने त्याचे हृदय भरून आले. नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्य. त्याने त्या अतिथींच्या चरणांना नमस्कार करून त्यांचे पाय धुतले आणि आपल्या कुटुंबियांसह लोकांना पावन करणारे त्यांच्या चरणांचे तीर्थ मस्तकी धारण केले. नंतर भगवान तसेच भगवत्स्वरूप ऋषींना, गंध, पुष्पमाळा, वस्त्रे, अलंकार, धूप, दीप, अर्घ्य, गाई, बैल इत्यादी समर्पण करून त्यांची पूजा केली. जेव्हा सर्वजण भोजन करून तृप्त झाले, तेव्हा राजाने श्रीकृष्णांचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने हळू हळू पाय चेपीत, अत्यंत मधुर वाणीने तो भगवंतांची स्तुती करू लागला. (२६-३०) राजा म्हणाला- हे प्रभो! आपण सर्व प्राण्यांचे आत्मा, साक्षी तसेच स्वयंप्रकाश आहात. आपल्या चरणकमलांचे स्मरण करणार्या आम्हांला आज आपण दर्शन देऊन कृतार्थ केले. माझ्या अनन्य भक्तापेक्षा मला बलराम, लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव हेही प्रिय नाहीत हे आपले वचन सत्य करण्यासाठीच आपण आम्हांला दर्शन दिले आहे. ज्यांनी जगातील सर्व वस्तूंचा त्याग केला आहे, अशा शांत मुनींना जे स्वत:लासुद्धा देऊन टाकतात, अशा आपल्या चरणकमलांचा कोण बरे त्याग करील? ज्या आपण यदुवंशात अवतार घेऊन, जन्म-मृत्यूच्या फेर्यात सापडलेल्यांना मुक्त करण्यासाठी जगामध्ये आपल्या विशुद्ध यशाचा विस्तार केला आहे की, जो त्रैलोक्याचे पाप-ताप शांत करणारा आहे. ज्यांचे ज्ञान अनंत आहे, जे परम शांती स्थापन करण्यासाठी नारायण-ऋषींच्या रूपात तपश्चर्या करीत आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांना मी नमस्कार करीत आहे. हे अनंता ! मुनिवर्यांसह आपण काही दिवस आमच्या येथे राहावे आणि आपल्या चरणधुळीने हा निमिवंश पवित्र करावा. " सर्वांना जीवन देणारे भगवान श्रीकृष्ण, राजाच्या या प्रार्थनेचा स्वीकार करून, मिथिलावासी स्त्री-पुरुष कल्याण करीत काही दिवस तेथेच राहिले. (३१-३७) राजा बहुलाश्वाप्रमाणे श्रुतदेव ब्राह्मणसुद्धा भगवान श्रीकृष्ण मुनिवर्यांसह आपल्या घरी आल्याचे पाहून आनंदविभोर झाला आणि त्यांना नमस्कार करून आपल्या अंगावरील उपरणे हवेत उडवून नाचू लागला. श्रुतदेवाने चटया, पाट आणि कुशासने अंथरून त्यांवर श्रीकृष्ण आणि मुनिवर्यांना बसविले. नंतर त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. तसेच आपल्या पत्नीसह मोठ्या आनंदाने त्यांचे चरण धुतले. त्यानंतर महान भाग्यवान अशा श्रुतदेवाने ते चरणोदक स्वत:सह आपले घर आणि कुटुंबियांवर शिंपडले. यावेळी आपले सर्व मनोरथ पूर्ण झाल्याचा त्याला विलक्षण आनंद झाला होता. त्यानंतर त्याने फळे, वाळा घातलेले अमृतमधुर पाणी, कस्तुरी, तुळस, कुश, कमळे इत्यादी जी मिळाली, ती पूजासामग्री घेऊन त्यांची पूजा केली आणि सत्त्वगुण वाढविणारे अन्न सर्वांना वाढले. त्यावेळी श्रुतदेव मनातल्या मनात विचार करू लागला की, मी प्रपंचरूप अंधार्या विहिरीत पडलेलो असताना ज्यांच्या चरणांची धूळच सर्वतीर्थस्वरूप आहे, ता श्रीकृष्ण आणि त्यांचे निवासस्थान असलेले ऋषी यांचा सहवास मला कसा प्राप्त झाला? आतिथ्याचा स्वीकार करून जेव्हा सर्वजण आरामात बसले, तेव्हा आपले स्त्री-पुत्र, आप्तेष्ट यांच्यासह श्रुतदेव तेथे आला आणि भगवान श्रीकृष्णांचे पाय चेपीत म्हणू लागला. (३८-४३) श्रुतदेव म्हणाला- जेव्हा आपण आपल्या शक्तींच्या द्वारा हे जग निर्माण करून त्यात स्वत: प्रवेश केला, ते पुरुषोत्तम आपण आहात. म्हणून आपण मला आजच दर्शन दिले, असे काही नाही. जसा झोपी गेलेला पुरुष स्वप्नावस्थेमध्ये अविद्येमुळे दुसरी स्वप्नसृष्टी निर्माण करतो आणि तीत स्वत:च प्रवेश करून अनेक रूपात अनेक कर्मे करणारा असा दिसतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातच आपल्या मायेने जगाची निर्मिती केली आणि नंतर त्यात प्रवेश करून अनेक रूपांनी प्रकाशित होत आहात. जे लोक नेहमी आपल्या कथांचे श्रवण-कीर्तन करतात, तसेच आपल्या प्रतिमांची पूजा करून त्यांना वंदन करतात, आणि आपापसात आपल्याविषयीच चर्चा करतात, त्यांचे हॄदय शुद्ध होते व त्यामुळे आपण त्यात प्रकाशित होता. ज्या लोकांचे चित्त कर्मांच्या वासनांनी बहिर्मुख झालेले असते, त्यांच्या हृदयात असूनसुद्धा आपण त्यांच्यापासून खूप लांब असता. परंतु ज्यांनी आपले गुणगान करून आपले अंत:करण सद्गुतणसंपन्न बनविलेले असते, त्यांच्या बाबतीत मात्र आपण मनाला समजण्यासारखे नसूनही अत्यंत जवळ असता. हे प्रभो! जे लोक आत्मतत्त्वाला जाणणारे आहेत, त्यांचे परमात्मा आपण असता आणि जे शरीरादींनाच आत्मा मानतात, त्यांच्यासाठी आपण जन्ममृत्यूरूप संसार आहात. आपण महतत्त्व इत्यादी कार्यद्रव्ये आणि प्रकृतिरूप कारणाचे नियंत्रण करणारे आहात. तुमची माया तुमचा स्वत:च्या दृष्टीवर पडदा टाकू शकत नाही, परंतु तिने इतरांची दृष्टी मात्र झाकून टाकली आहे. मी ! आपणास नमस्कार करीत आहे. हे स्वयंप्रकाश प्रभो! आम्ही आपले सेवक आहोत. आम्ही काय करावे, याची आपण आम्हांला आज्ञा करावी. आपल्या दर्शनानेच आम्हा जीवांचे सर्व क्लेश नाहीसे झाले आहेत. (४४-४९) श्रीशुक म्हणतात- शरणागतांचे भय नाहीसे करणार्या भगवान श्रीकृष्णांनी श्रुतदेवांची प्रार्थना ऐकून त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत हसत ते त्याला म्हणाले. (५०) श्रीकृष्ण म्हणाले- हे ब्रह्मन ! हे ऋषी तुमच्यावर कृपा करण्यासाठीच येथे आले आहेत. हे आपल्या चरणधुळीने लोकांना पवित्र करीत माझ्यबरोबर संचार करीत असतात. देवता, पुण्यक्षेत्रे आणि तीर्थे इत्यादी दर्शन, स्पर्श, पूजन इत्यादींद्वारा हळू हळू पुष्कळ दिवसांनंतर पवित्र करतात; परंतु संत पुरुष आपल्या केवळ दृष्टीनेच सर्वांना पवित्र करतात. एवढेच नव्हे तर देवता इत्यादींमध्ये पवित्र करण्याची जी शक्ती आहे, तीसुद्धा त्यांना संतांच्या दृष्टीतूनच प्राप्त होते. जगामध्ये ब्राह्मण जन्मानेच सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहेत, ते जर तपश्चर्या, विद्या, संतोष आणि माझी उपासना यांनी युक्त असतील, तर मग त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय सांगावे? (५१-५३) मला माझे हे चतुर्भुज रूपसुद्धा ब्राह्मणांपेक्षा अधिक प्रिय नाही. कारण ब्राह्मण सर्व देवमय आहेत आणि मी सर्वदेवमय आहे. अजाण माणसेही गोष्ट समजून न घेता फक्त मूर्ती इत्यादीमध्येच पूज्यबुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळे माझे स्वरूप असलेले व लोकगुरु जे ब्राह्मण त्यांचा तिरस्कार करतात. ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तात असा निश्चय करतात की, हे चराचर जग आणि याला कारण असणारे महत्तत्त्वादी पदार्थ ही भगवंतांची रूपे आहेत. म्हणून हे श्रुतदेवा ! तू या ब्रह्मर्षींना माझेच स्वरूप समजून पूर्ण श्रद्धेने यांची पूजा कर. तू जर असे करशील, तर ते माझेच पूजन केले, असे होईल. नाहीतर पुष्कळ ऐश्वर्यानेही माझी पूजा होऊ शकत नाही. (५४-५७) श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांची ही आज्ञा शिरोधार्य मानून श्रुतदेवाने श्रीकृष्णांसह त्या ब्रह्मर्षींची एकात्मभावाने आराधना केली व त्यांच्या कृपेने तो भगवत्स्वरूपाला प्राप्त झाला. बहुलाश्वालासुद्धा तीच गती प्राप्त झाली. परीक्षिता ! अशा रीतीने भक्तांची भक्ती करणार्या भगवंतांनी दोन्ही भक्तांसाठी तेथे काही दिवस राहून त्यांना वेदमार्गाचा उपदेश करून ते द्वारकेला परतले. (५८-५९) अध्याय शाऐंशीवा समाप्त |