|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८५ वा
श्रीभगवंतांचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश व देवकीच्या सहा पुत्रांना परत आणणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - असेच एके दिवशी राम- कृष्णांनी वडिलांना नमस्कार केल्यावर वसुदेवांनी मोठ्या प्रेमाने दोन्ही भावांचे कौतुक करून म्हटले. ऋषींच्या तोंडून वसुदेवांनी भगवंतांचा महिमा ऐकला होता. तसेच त्यांचे ऐश्वर्यपूर्ण कार्यसुद्धा त्यांनी पाहिले होते. यामुळे पूर्ण विश्वास उत्पन्न होऊन पुत्रांना उद्देशून ते म्हणाले. " हे श्रीकृष्णा ! हे महायोगीश्वर संकर्षणा ! तुम्ही दोघेही सनातन आहात. तुम्ही दोघे सर्व जगाचे साक्षात कारणस्वरूप प्रधान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक असे परमेश्वर आहात, हे मी जाणतो. तुम्ही या जगाचे आधार, निर्माते, निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी तुम्ही याची निर्मिती केली आहे. हे ज्यावेळी , ज्या रूपात, जे काही असते, होते, ते सर्व तुम्हीच आहात. प्रकृती व पुरुष आपणच असून त्यांच्या पलीकडे असणारे त्यांचे नियामक असे साक्षात भगवानसुद्धा तुम्हीच आहात. हे इंद्रियातीता ! हे अजन्मा ! परमात्मन ! हे नाना प्रकारचे विश्व तुम्हीच निर्माण केले असून यामध्ये तुम्हीच आत्मरूपाने प्रवेश केला आहे. तसेच तुम्हीच प्राण(क्रियाशक्ती) आणि जीव(ज्ञानशक्ती) होऊन याचे पालन-पोषण करीत आहात. क्रियाशक्तिप्रधान प्राण इत्यादींमध्ये जगातील वस्तूंची निर्मिती करण्याचे जे सामर्थ्य आहे, ते तुमचेच आहे. कारण ते तुमच्यासारखे चेतन नसल्यामुळे तुमच्याअधीन आहेत. तुमच्यामुळे त्यांच्या क्रिया होतात. हे प्रभो! चंद्राचे चांदणे, अग्नीचे तेज, सूर्याची प्रभा, नक्षत्रे आणि वीज इत्यादींचे चमकणे, पर्वतांचे स्थैर्य, पृथ्वीची आधारशक्ती व गंधरूप गुण, हे सर्व वास्तविक तुम्हीच आहात. हे परमेश्वरा ! ज्याच्यामध्ये तृप्त करण्याची व जीवन देण्याची शक्ती आहे ते पाणी आणि त्याचे द्रवत्व तुम्हीच आहात. हे प्रभो! इंद्रियशक्ती, अंत:करणाची शक्ती, शरीराची शक्ती, त्याची हालचाल, चालणे-फिरणे इत्यादी वायूच्या शक्ती यासर्व तुमच्याच आहेत. दिशा आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे आकाश हेसुद्धा तुम्हीच आहात. आकाश आणि त्याच्या आश्रयाने व्यक्त होणारा शब्द(परा), नाद(पश्यंती), ॐकार तसेच वर्ण(मध्यमा) व पदार्थांचे वेगळेपण दाखविणारी पदरूप(वैखारी) वाणीसुद्धा तुम्हीच आहात. इंद्रिये, त्यांची विषयांना ग्रहण करणारी शक्ती आणि त्यांच्या देवता तुम्हीच आहात. बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती आणि जीवाची शुद्ध स्वरूपात असणारी स्मृतीसुद्धा तुम्हीच आहात. भीतमात्रांमध्ये त्यांचे कारण तामस अहंकार, इंद्रियांमधील त्यांना कारणीभूत असणारा राजस अहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये त्यांना कारण असणारा सात्त्विक अहंकार त्याचप्रमाणे जीवांच्या जन्म-मरणाला कारणीभूत असणारी अविद्या तुम्हीच आहात. हे भगवन ! जसे माती इत्यादी वस्तूंचे कार्य असणार्या घडा, झाडे इत्यादींमध्ये माती असते, त्याचप्रमाणे सर्व नाशवंत पदार्थांमधील अविनाशी तत्त्व तुम्ही आहात. हे प्रभो ! सत्त्व, रज व तम हे तीन गुण आणि त्यांची कार्ये, परब्रह्मस्वरूप तुमच्यामध्ये योगमायेच्या द्वारा कल्पिली गेली आहेत. म्हणून हे जन्म इत्यादी भाव वास्तविक तुमच्यामध्ये नाहीत. जेव्हा तुमच्या ठायी यांची कल्पना केली जाते, तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता. एरव्ही निर्विकल्प परमार्थस्वरूप फक्त तुम्हीच शिल्लक राहाता. सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या प्रवाहरूप या देहात तुमचे सर्वात्मक असे सूक्ष्मस्वरूप जे अज्ञानी जाणत नाहीत, ते आपल्या देहाभिमानरूप अज्ञानामुळेच कर्मांच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत राहातात. हे परमेश्वरा ! योगायोगाने मला सर्व सामर्थ्याने युक्त अत्यंत दुर्लभ असे मनुष्य शरीर प्राप्त झाले आहे. परंतु तुमच्या मायेमुळे मी माझ्या खर्या कल्याणरूप स्वार्थाच्या बाबतीत बेसावध राहिलो आणि माझे आयुष्य फुकट गेले. हे प्रभो! हे शरीर म्हणजेच मी आणि या शरीराशी संबंधित असणारे माझे, या प्रकारच्या स्नेहाच्या दोर्यांनी तुम्ही हे सर्व जग बांधून टाकले आहे. तुम्ही दोघे आमचे पुत्र नाहीत, तर प्रकृती आणि सर्व जीवांचे स्वामी आहात. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठीच तुम्ही अवतार धारण केला आहे, ही गोष्ट तुम्ही मला सांगितली होतीच! म्हणून हे दीनबंधो ! मी आज तुमच्या चरणकमलांना शरण आलो आहे. कारण शरणागतांचे संसारभय नाहीसे करणारे तेच आहेत. पुरे झाली ही इंद्रियांची विषयलोलुपता ! यांमुळेच मी शरीराला आत्मा आणि परमात्मा असणार्या तुम्हांला पुत्र समजलो. प्रभो ! प्रसूतिगृहात तुम्ही आम्हांला सांगितले होते की, " मी जरी अजन्मा असलो, तरीसुद्धा मीच तयार केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येक युगामध्ये, तुम्हा दोघांच्या द्वारा अवतार धारण करतो. " हे भगवन ! तुम्ही आकाशप्रमाणे अलिप्त राहूनही अनेक शरीरे धारण करता आणि सोडता सर्वव्यापी अशा तुमच्या विभूतिरूप योगमायेला कोण जाणू शकेल बरे?" (१-२०) श्रीशुक म्हणतात- वसुदेवांचे हे बोलणे ऐकून भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण विनम्रतेने मान खाली घालून मधुर वाणीने हसत हसत म्हणाले. (२१) श्रीकृष्ण म्हणाले- बाबा ! आम्हा मुलांना उद्देशून आपण जो हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, तो पूर्ण तर्कसंगत आहे, असे आम्ही मानतो. हे यदुश्रेष्ठ! आपण सर्वजण, मी , बलरामदादा हे द्वारकानिवासी किंबहुना संपूर्ण चराचर जग असे सगळे आपण ब्रह्मस्वरूपच आहोत, असे समजले पाहिजे. आत्मा हा स्वयंप्रकाश, नित्य, निर्गुण, असूनही त्याने स्वत:च गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक रूपांनी प्रतीत होतो. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते कारणस्वरूपात एक असूनही ज्याप्रमाणे आपले कार्य असणार्या वस्तूंमध्ये प्रगट-अप्रगट, लहान-मोठी, एक-अनेक अशा रूपांत प्रगट होतात, त्याप्रमाणे आत्मा एक असूनसुद्धा उपाधींच्या भेदामुळे अनेक भासतो. (२२-२५) श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! श्रीकृष्णांची ही वचने ऐकून वसुदेवांनी अनेकत्वबुद्धीचा त्याग केला आणि आनंदात मग्न होऊन ते स्वस्थ राहिले. हे कुरुश्रेष्ठा ! सर्वदेवस्वरूप देवकी आपल्या मुलांनी पूर्वी मृत गुरुपुत्राला परत आणलेले ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झाली होती. आता कंसाने मारलेल्या आपल्या पुत्रांची आठवण होऊन दु:खाने देवकीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. ती दीनपणे श्रीकृष्ण-बलरामांना उद्देशून म्हणाली. (२६-२८) देवकी म्हणाली- हे लोकाभिरामा ! मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुझी शक्ती आहे. हे श्रीकृष्णा ! तू योगेश्वरांचासुद्धा ईश्वर आहेस. तुम्ही दोघेही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर, आदिपुरुष नारायण आहात, हे मला कळले. कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन जे शास्त्राच्या आज्ञांचे उल्लंघन करून स्वच्छंदीपणे वागत होते, अशा भूमीला भार झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही दोघे माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झालात, हेही मला माहित आहे. (२९-३०) हे विश्वात्मन ! ज्यांच्या पुरुषरूप अंशापासून उत्पन्न झालेल्या मायेचे अंश असणार्या गुणांच्या केवळ अंशाने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो, त्या तुम्हांला आज मी शरण आले आहे. तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते. त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेने त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला होता. तुम्ही दोघे योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात. म्हणून आज माझीसुद्धा इच्छा पूर्ण करा. ज्यांना कंसाने मारले होते, त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावे. मी त्यांना डोळे भरून पाहीन. (३१-३३) श्रीशुक म्हणतात- हे परीक्षिता ! मातेचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनीही योगमायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला. जगाचे व आपले आत्मा आणि इष्टदेव असे राम-कृष्ण आलेले पाहून त्यांच्या दर्शनाने बलीचे हृदय आनंदात मग्न झाले. त्याने आपल्या कुटुंबियांसह ताबडतोब आपल्या आसनावरून उठून भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला. अत्यंत आनंदित होऊन त्याने त्या महापुरुषांना श्रेष्ठ आसन दिले आणि जेव्हा ते दोघे त्यावर विराजमान झाले. तेव्हा त्याने त्यांचे पाय धुऊन जे चरणतीर्थ ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना पवित्र करते, ते परिवारासह, आपल्या मस्तकी धारण केले. नंतर बहुमोल वस्त्रे, अलंकार, चंदन, तांबूल, दीपक, अमृतासारखे भोजन तसेच अन्य विविध सामग्रींनी त्यांची उत्तम पूजा केली आणि आपला परिवार, धन तसेच स्वत:लाही त्यांच्या चरणांवर समर्पित केले. हे राजा ! बलीने प्रेमपूर्ण बुद्धीने वारंवार भगवंतांचे चरणकमल घट्ट धरले. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अंग रोमांचित झाले. तो सद्गददित होऊन भगवंतांची स्तुती करू लागला. (३४-३८) बली म्हणाला- महान अशा अनंताला माझा नमस्कार असो. सर्व जगाचे निर्माते, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे प्रवर्तक, परब्रह्मस्वरूप अशा आपल्यालाही नमस्कार असो. भगवन ! आपल्या दोघांचे दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ असूनसुद्धा आपल्या कृपेने ते सुलभ असावे; कारण आज आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी स्वभाव असलेल्या आम्हां दैत्यांनाही दर्शन दिलेत. हे प्रभो! आम्ही आणि आमच्यासारखे दुसरे दैत्य. दानव, गंधर्व, सिद्ध, विद्याधर,चारण, यक्ष, राक्षस, पिशाच्च, भूत आणि प्रमथनायक इत्यादी आपल्याशी नेहमी वैरभावाने वागतात; परंतु असे असूनही साक्षात वेदमय आणि विशुद्ध सत्त्वस्वरूप अशा आपली काहींनी वैरभावाने, काहींनी भक्तीने आणि काहींनी काही कामना धरून प्राप्ती करून घेतली. जी आपल्याजवळ राहूनही सत्त्वप्रधान देवादिकांना झाली नाही. हे योगेश्वरांचे अधीश्वर ! आपली योगमाया ही आहे आणि अशी आहे, हे जर योगेश्वरसुद्धा प्राय: जाणत नाहीत, तर आमच्याविषयी काया सांगावे ? म्हणून, हे स्वामिन ! माझ्यावर अशी कृपा करा की, कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंस ज्यांचा शोध घेत असतात, अशा आपल्या चरणकमलांच्या ठायी माझी चित्तवृत्ती जडावी आणि त्यायोगे मी, त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा या गृहस्थाश्रमाच्या अंधार्या विहिरीतून वर यावे. हे प्रभो! अशा प्रकारे, जे सगळ्या विश्वाचे एकमेव आश्रय आहेत, त्या आपल्या चरणकमलांना मी शरण जाऊन शांतचित्त व्हावे. सर्वांचे हितचिंतक अशा संतांचीच मी संगत धरावी. चराचराचे नियंते असणार्या हे प्रभो! आपण आम्हांला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा. कारण जो पुरुष श्रद्धेने आपल्या आज्ञेचे पालन करतो, तो विधिनिषेधाच्या बंधनातून मुक्त होतो. (३९-४६) श्रीकृष्ण म्हणाले- " स्वायंभुव मन्वन्तरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून सहा पुत्र झाले होते. ते सर्व देव होते. ब्रह्मदेव आपल्या कन्येशीच समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून ते हसू लागले. त्या अपराधामुळे ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला आणि ते असुरयोनीमध्ये हिरण्यकशिपुचे पुत्र झाले. आता योगमायेने त्यांना तेथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकले. हे दैत्यराजा ! देवकी त्या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झाली आहे. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत. म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना येथून घेऊन जाऊ. यानंतर हे शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकात जातील. स्मर, उद्गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी अशी या सहाजणांची नावे आहेत. माझ्या कृपेने यांना पुन्हा सद्गती प्राप्त होईल. असे सांगितल्यावर बलीने त्या दोघांची पूजा करून ती मुले त्यांच्या स्वाधीन केली. यानंतर बालकांना घेऊन ते दोघे द्वारकेला परत आले व त्यांनी माता देवकीकडे तिचे पुत्र सोपविले. त्या मुलांना पाहून देवकीच्या स्तनांतून पुत्रस्नेहाने दुधाच्या धारा वाहू लागल्या. वारंवार त्यांना मांडीवर घेऊन व छातीशी धरून ती त्यांची मस्तके हुंगू लागली. पुत्रांच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या देवकीने त्यांना स्तनपान करविले. कारण ज्याच्यामुळे हे सृष्टीचक्र चालते, त्या भगवंतांच्या मायेने ती मोहित झाली होती. देवकीच्या स्तनांतील श्रीकृष्णांनी पिऊन उरलेले अमृतमय दूध प्यालामुळे आणि भगवान श्रीकृष्णांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. यानंतर त्या सर्वांनी श्रीकृष्ण देवकी, वसुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देवलोकाकडे गेले. परीक्षिता ! मेलेली मुले परत आली आणि पुन्हा निघूनही गेली. हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटले. ही श्रीकृष्णांचीच माया आहे, हे तिला कळले. परीक्षिता ! अनंतशक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुउत चरित्रे अनंत आहेत. (४७-५८) सूत म्हणतात- अमरकीर्ती श्रीकृष्णांचे हे श्रीशुकांनी वर्णन केलेले चरित्र सर्व जगाचे पाप पूर्णपणे मिटवणारे व भक्तांच्या कानांचे भूषण आहे. जो याचे श्रवण करतो किंवा ते दुसर्याला ऐकवितो, त्याच्या चित्तवृत्ती भगवंतांचे ठिकाणी लागतात आणि तो त्यांचा परम कल्याणस्वरूप लोक प्राप्त करून घेतो. (५९) अध्याय पंचाऐंशीवा समाप्त |