|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८४ वा
वसुदेवांचा यज्ञोत्सव - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- सर्वात्मा, भक्तभयहारी, भगवान श्रीकृष्णांबद्दल त्यांच्या पत्न्यांना किती प्रेम आहे, हे कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, इतर राजपत्न्या आणि भगवंतांच्या प्रियतम गोपी, यांनीही ऐकले. त्यांचे हे अलौकिक प्रेम पाहून सगळ्याजणी अत्यंत मुग्ध झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे ज्या वेळी स्त्रिया स्त्रियांशी आणि पुरुष पुरुषांशी बोलत होते, त्याचवेळी पुष्कळसे मुनी, भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे आले. व्यास, नारद, च्यवन, देवल, असित, विश्वामित्र, शतानंद, भरद्वाज, गौतम, शिष्यांसह परशुराम, वसिष्ठ, गालव, भृगू, पुलस्त्य, कश्यप, अत्री, मार्कंडेय, बृहस्पती, द्वित, त्रित, एकत, सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार, अंगिरा, अगस्त्य, याज्ञवल्क्य, वामदेव, इत्यादी इतरही बरेच विश्ववंद्य ऋषी आलेले पाहून अगोदरपासूनच तेथे असलेले राजे, पांडव, श्रीकृष्ण आणि बलराम लगेच उठून उभे राहिले आणि सर्वांनी त्यांना प्राणाम केला. यानंतर स्वागत, आसन, पाद्य, अर्घ्य, पुष्पमाला, धूप, चंदन इत्यादींनी, सर्व राजांनी व राम-कृष्णांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. जेव्हा सर्व ऋषी आरामात बसले, तेव्हा धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झालेले भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले. त्यावेळी ती सभा अतिशय शांतपणे भगवंतांचे भाषण ऐकत होती. (१-८) भगवान श्रीकृष्ण म्हणाले- आम्ही धन्य झालो! जन्म घेतल्याचे फळ आज आम्हांला पुरेपूर मिळाले; कारण ज्या योगेश्वरांचे दर्शन देवतांनासुद्धा दुर्लभ आहे, ते आज आम्हांला झाले. ज्यांची तपश्चर्या अगदी थोडी आहे आणि जे देवाला फक्त विशिष्ट मूर्तीमध्ये पाहातात, अशांना आपले दर्शन, स्पर्श, कुशल-प्रश्न, प्रणाम, पाद्यपूजा इत्यादींची संधी कशी मिळू शकेल बरे ? (९-१०) केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे आणि फक्त दगडमातीच्या प्रतिमा म्हणजेच देवता नव्हेत, तर संत पुरुषच खरे तीर्थ किंवा देवता आहेत. कारण त्यांचे पुष्कळ काळपर्यंत सेवन करावे, तेव्हाच फळ मिळते. परंतु संत पुरुष दर्शनानेच कृतार्थ करतात. अग्नी . सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू किंवा वाणी आणि मनाची अधिष्ठात्री देवता, यांची उपासना केली असता भेदबुद्धिरूप अज्ञानाचा नाश होत नाही. परंतु ज्ञानी महापुरुषांची सेवा क्षणभर केली गेली, तरी ते सर्व अज्ञान नाहीसे करतात. जो मनुष्य वात, पित्त आणि कफ या तीन धातूंनी बनलेल्या शरीरालाच आत्मा, स्त्री-पुरुष इत्यादींनाच आपले आणि माती, लाकूड, इत्यादी पार्थिव वस्तूंनाच देव मानतो, तसेच जो फक्त पाण्यालाच तीर्थ समजतो, ज्ञानी पुरुषांना नव्हे, तो मनुष्य असूनही पशूंपेक्षाही अविचारी समजावा. (११-१३) श्रीशुक म्हणतात- अखंड ज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्णांचे हे गूढ भाषण ऐकून सर्व ऋषी स्तब्ध झाले. हे काय म्हणत आहेत, तेच त्यांना कळेना ! पुष्कळ वेळपर्यंत विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, भगवान सर्वेश्वर असूनही जे कर्माधीन जीवांप्रमाणे असे बोलत आहेत, ते फक्त लोकशिक्षणासाठीच होय. नंतर ते हसत हसत त्या जगद्गुरूंना म्हणाले. (१४-१५) मुनी म्हणाले- भगवन ! ज्यांच्या मायेने प्रजापतींचे अधीश्वर मरीची इत्यादी, तसेच मोठमोठे तत्त्वज्ञानी असे आम्ही मोहित होत आहोत, ते आपण स्वत: इश्वर असूनही माणसासारखे व्यवहार करून, स्वत:ला लपवून ठेवीत आहात. भगवन ! आपली लीला अगाध आहे ! जशी पृथ्वी स्वत:च झाडे, घट इत्यादी रूपांमुळे अनेक नामे धारण करते, त्याचप्रमाणे आपण एक आणि कृतिरहित असूनही अनेक रूपे धारण करून या जगाची रचना, रक्षण आणि संहार करता. परंतु हे सर्व करीत असतानाही या कर्मांनी आपण लिप्त होत नाही. सर्वव्यापी, परिपूर्ण अशा आपले हे चरित्र म्हणजे केवळ लीलाच नव्हे काय ? आपण जरी प्रकृतीच्या पलीकडील स्वत: परब्रह्म आहात, तरीसुद्धा वेळोवेळी भक्तजनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विशुद्ध सत्त्वमय स्वरूप प्रगट करता आणि आपल्या लीलांच्या द्वारे सनातन वैदिक मार्गाचे रक्षण करता. कारण सर्व वर्ण आणि आश्रम हे आपलेच रूप आहे. वेद आपले विशुद्ध हृदय आहे, तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान आणि समाधीच्या योगाने त्यातच आपल्या साकार, निराकार आणि त्यांच्या अधिष्ठानस्वरूप परब्रह्माचा साक्षात्कार होतो. हे परमात्मन ! वेदांचा आधारभूत ब्राह्मणच, वेदप्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणिवेचे स्थान आहेत. म्हणूनच आपण त्यांचा सन्मान करता. त्यामुळेच आपण ब्राह्मणभक्त असणार्यांमध्ये अग्रगण्य आहात. आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात आणि संतांचे एकमेव प्राप्तव्य आहात. आपले दर्शन होऊन आज आमचा जन्म, विद्या, तप आणि ज्ञान सफल झाले. प्रभो! आपले ज्ञान अनंत आहे. आपण स्वत: परमात्मा भगवान आहात. आपण आपल्या योगमायेने आपला महिमा झाकून ठेवला आहे. आम्ही आपणांस नमस्कार करतो. येथे असलेले हे राजे तसेच आपल्याबरोबर आहार-विहार करणारे यादवसुद्धा आपले खरे स्वरूप जाणत नाहीत. कारण जे सर्वांचा आत्मा, जगताचे आदिकारण आणि नियंत्रक आहे, अशा आपल्या स्वरूपाला आपण मायेने झाकून ठेवले आहे. जेव्हा माणूस स्वप्न पाहू लागतो, त्यावेळी स्वप्नातील पदार्थांनाच खरे मानतो आणि मनाने जाणवणार्या नाममात्र शरीरालाच खरे मानतो. त्यावेळी त्याला आपले जागृत शरीर जाणवत नाही. त्याचप्रमाणे, स्वप्नतुल्य विषयांकडे इंद्रियांच्या प्रवृत्तिरूप मायेने चित्त मोहित होऊन जीवांची विवेकशक्ती झाकली जाते. त्यामुळेच ते सत्यस्वरूप अशा आपल्याला ओळखत नाहीत. सर्व पापराशी नष्ट करणार्या गंगाजलाचे सुद्धा आश्रयस्थान असलेल्या, ज्या आपल्या चरणकमलांना योगी अत्यंत परिपक्व अशा योगसाधनेने स्वत:च्या हृदयात धारण करतात, त्यांचेच दर्शन आज आम्हांला झाले, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रभो! आम्ही आपले भक्त आहोत. आपण आमच्यावर कृपा करावी. कारण ज्यांच्या लिंगशरीररूप जीवकोश आपल्या उत्कृष्ट भक्तीमुळे नष्ट होतो, त्यांनाच आपल्या परम पदाची प्राप्ती होते. (१६-२६) श्रीशुक म्हणतात- हे राजर्षे ! अश प्रकारे भगवंतांची स्तुती करून, त्यांचा, धृतराष्ट्राचा तसेच धर्मराजाचा निरोप घेऊन त्यांनी आपापल्या आश्रमात जाण्याचा विचार केला. त्यांचा जाण्याचा विचार पाहून, कीर्तीमान वसुदेव त्यांच्या जवळ आले, त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरून अतिशय नम्रपणे त्यांना म्हणाले. (२७-२८) वसुदेव म्हणाले- ऋषींनो ! सर्वदेवस्वरूप आपणांस मी नमस्कार करीत आहे. आपण माझी एक प्रार्थना ऐकावी. ती अशी की, कर्मांच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो, ते आपण मला सांगाचे. (२९) नारद म्हणाले- ऋषींनो ! वसुदेव, श्रीकृष्णाला मूल समजून विशेष जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेनेच आपल्या कल्याणाचे साधन आम्हांला विचारीत आहेत, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. नेहमी जवळ राहाणे माणसाबद्दलच्या अनादराला कारण ठरते ! गंगेजवळ राहाणारा माणूस पवित्र होण्यासाठी दुसर्या तीर्थांवर जातो. श्रीकृष्णांचे ज्ञान कालगतीनुसार होणारी जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांमुळे नाहीसे होत नाही. तसेच ते आपोआप कोणत्याही दुसर्या कारणाने, गुणांनी किंवा अन्य कशानेही नष्ट होत नाही. त्यांचे ज्ञान अविद्या, राग-द्वेष, पुण्य-पापरूप कर्मे, सुख-दु:खादी कर्मफले, किंवा सत्त्वादी गुणांच्या प्रवाहांनी खंडित झालेले नाही. ते स्वत: अद्वितीय परमात्मा आहेत. जेव्हा ते स्वत:ला आपल्याच प्राण इत्यादी शक्तींनी झाकून घेतात, तेव्हा सामान्य लोकांना ते मनुष्य वाटतात. ढग, धुके किंवा ग्रहण यांमुळे सूर्यच झाकला गेला आहे, असे वाटते, त्याप्रमाणे. (३०-३३) परीक्षिता ! यानंतर श्रीकृष्ण, बलराम आणि अन्य राजांच्या समक्षच वसुदेवांना संबोधून ऋषी म्हणाले. " कर्मवासना आणि कर्मफलांचा, कर्मांच्या द्वारेच सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की, यज्ञांनी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे. (३४-३५) त्रिकालाचे ज्ञान असणार्या ऋषींनी शास्त्रदृष्टीने हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्षसाधन आणि अंत:करणात आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितला आहे. आपण न्यायाने मिळविलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंतांची आराधना करणे, हाच गृहस्थाश्रमी द्विजातींसाठी परम कल्याणाचा मार्ग आहे. हे वसुदेवा ! विवेकी पुरुषाने यज्ञ, दान इत्यादी करून धनाची इच्छा, गृहस्थोचित भोगांनी स्त्री-पुत्रांची इच्छा, आणि कालानुसार स्वर्ग इत्यादी लोकसुद्धा नष्ट होतात, हे जाणून त्याही इच्छेचा त्याग कारावा. अशा रीतीने घरात राहूनही या तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये जावे. हे वसुदेवा ! ब्राहण, क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही द्विज, देवता, ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात. यज्ञ, अध्ययन आणि संतान यांद्वारेच या ऋणांतून मुक्तता होते. यांतून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो, त्याचे पतन होते. हे बुद्धिमान वसुदेवा ! ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात. आता यज्ञ करून देवऋणातून मुक्त व्हा आणि गृहत्याग करा. हे वसुदेवा ! आपण परम भक्तीने निश्चितच जगदीश्वर भगवंतांची आराधना केलेली असल्यानेच ते आपले पुत्र झाले आहेत." (३६-४१) श्रीशुक म्हणतात- ऋषींचे हे म्हणणे ऐकून उदार वसुदेवांनी, त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार केला, त्यांना प्रसन्न केले आणि यज्ञासाठी ऋत्विज म्हणून त्यांचीच योजना केली. राजन ! वसुदेवांनी जेव्हा अशा प्रकारे धर्मविधिपूर्वक ऋषींना ऋत्विज म्हणून नेमले, तेव्हा त्या ऋषींनी त्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मशील वसुदेवांकडून उत्तमोत्तम सामग्रीने युक्त असे यज्ञ करविले. परीक्षिता ! वसुदेवांनी जेव्हा यज्ञाची दीक्षा घेतली, तेव्हा यदुवंशियांनी स्नान करून सुंदर वस्त्रे परिधान केली आणि कमलपुष्पांच्या माळ गळ्यात घातल्या. अन्य राजानांही सुंदर वस्त्रालंकार धारण केले. वसुदेवांच्या पत्नींनी सुंदर वस्त्रे, सुगंधित उटणी आणि सोन्याचे हार घातले आणि त्या मोठ्या आनंदाने आपल्या हातात कलश इत्यादी मंगल सामग्री घेऊन यज्ञशाळेत आल्या. (४२-४५) मृदंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. नट आणि नर्तकी नाचू लागल्या. सूत आणि मागध स्तुती करू लागले. गंधर्वांच्या बरोबर त्यांच्या गोड आवाज असणार्या गायिका पत्न्या गाणी गाऊ लागल्या. वसुदेवांनी शास्त्राप्रमाणे डोळ्यांत अंजन घातले व शरीराला लोणी लावले. त्यानंतर त्यांच्या देवकी इत्यादी अठरा पत्न्यांसह ऋत्विजांनी त्यांना, प्राचीनकाळी नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक झाला होता, त्याप्रमाणे अभिषेक केला. यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळे मृगचर्म धारण केलेले वसुदेव सुंदर पैठण्या, कंकणे, हार, नूपुरे आणि कुंडले इत्यादी वस्त्रालंकारांनी नटलेल्या पत्न्यांसह अतिशय शोभून दिसत होते. महाराज! इंद्राच्या यज्ञाप्रमाणे वसुदेवांच्या यज्ञातील ऋत्विज आणि सभासद, रत्नजडित अलंकार व रेशमी वस्त्रे परिधान करून सुशोभित झाले. सर्व जीवांचे ईश्वर असलेले श्रीकृष्ण आणि बलराम आपल्याच विभूतिस्वरूप बांधव आणि स्त्री-पुत्रांसह शोभू लागले. (४६-५०) वसुदेवांनी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्टोम, दर्श, पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ, सौरसत्र इत्यादी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र इत्यादी अन्य यज्ञांच्या द्वारा द्रव्य, ज्ञान व क्रिया यांचे अधिपती असणार्या ईश्वराची आराधना केली. एवढे झाल्यावर त्यांनी योग्यवेळी वस्त्रालंकार घातलेल्या ऋत्विजांना शास्त्रानुसार दक्षिणा व पुष्कळ धनासह अलंकृत गाई, भूमी आणि कन्या अर्पण केल्या. नंतर महर्षींनी पत्नीसंजाय व अवभृथस्नान ही कर्मे करवून, वसुदेवांसह परशुराम तीर्थात स्नान केले. स्नान केल्यानंतर वसुदेव व त्यांच्या पत्न्यांनी आपली सगळी वस्त्रे व अलंकार बंदी लोकांना दिले आणि स्वत: नवी वस्त्रे व अलंकार परिधान करून ब्राह्मणांपासून कुत्र्यापर्यंत सर्वांना भोजन दिले. त्यानंतर आपले बांधव, त्यांच्या पत्न्या, पुत्र तसेच विदर्भ, कोसल, कुरु, काशी, केकय, सृंजय इत्यादी देशांचे राजे, सभासद, ऋत्विज, देवता , माणसे, भुतमात्र, पितर आणि चारणांना पुष्कळ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. नंतर श्रीकृष्णांचा निरोप घेऊन, यज्ञाची प्रशंसा करीत ते आपापल्या ठिकाणी गेले. त्या वेळी धृतराष्ट्र, विदुर, पांडव, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, नारद, भगवान व्यास, तसेच अन्य सोयरे, संबंधित आणि बांधव, आपल्या आप्त अशा यादवांना सोडून जावे लागत असल्याकारणाने अत्यंत दु:खित झाले. अतिशय स्नेहाने त्यांनी त्यांना आलिंगन दिले आणि दु:खी अंत:करणाने कसेतरी ते आपापल्या देशाकडे गेले. इतर लोकही त्यांच्याबरोबर तेथूनच रवाना झाले. श्रीकृष्ण, बलराम तसेच उग्रसेन इत्यादींनी नंदबाबांसह सर्व गोपांचा उत्तम वस्तू देऊन सन्मान केला. तेव्हा आपापसातील प्रेमामुळे ते काही काळ तेथेच राहिले. वसुदेवांनी आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर आप्तांसमवेत पार केला होता. एकदा नंदांचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने ते म्हणाले. (५१-६०) वसुदेव म्हणाले- हे बंधो! माणसाला भगवंतांनी अशा प्रेमपाशात जखडून टाकले आहे की, मोठमोठे शूर आणि योगीसुद्धा ते तोडण्यास असमर्थ आहेत. आम्ही कृतघ्न असूनही आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याशी जी मैत्री केली, तिला तोड नाही. याच्या मोबदल्यात आपणास काहीही मिळणार नसले, तरीसुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही. हे बंधो ! पूर्वी आम्ही कैदेत असल्याकारणाने आपली काही मदत करू शकलो नाही. आणि आता संपत्तीच्या गर्वाने आंधळे झाल्यामुळे आपण आमच्यासमोर असूनही आम्ही आपल्याकडे लक्ष देत नाही. दुसर्यांना मान देणार्या हे बंधो ! ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे, त्याला राज्यलक्ष्मी कधीच मिळता कामा नये. कारण तिने आंधळा झालेला मनुष्य आप्तेष्टांशीही संपर्क ठेवीत नाही. (६१-६४) श्रीशुक म्हणतात- असे म्हणता म्हणता वसुदेव प्रेमाने सद्ग्दित झाले. आणि नंदांची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले व ते रडू लागले. आपल्या मित्राला प्रसन्न करण्यासाठी तसेच राम-कृष्णांवरील प्रेमामुळे आज उद्या करता करता नंद तीन महिने तेथेच राहिले. यादवांनीही त्यांना मानाने वागवले. यानंतर बहुमोल अलंकार, रेशमी वस्त्रे, अनेक प्रकारची उत्तमोत्तम सामग्री आणि उपभोगाच्या वस्तू, नंद, त्यांचे व्रजातील सहकारी आणि बंधव यांना देऊन त्यांना तृप्त केले. वसुदेव, उग्रसेन, श्रीकृष्ण, बलराम, उद्धव इत्यादी यादवांनी त्यांना दिलेल्या भेटी घेऊन त्यांनी निरोप दिल्यानंतर नंद आपल्या व्रजाकडे गेले. नंद, गोप आणि गोपी यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी इतके आसक्त झाले होते की, प्रयत्न करूनही तेथून काढून घेण्यास असमर्थ असलेले ते तसेच मथुरेला गेले. (६५-६९) सर्व आप्तेष्ट निघून गेल्यावर श्रीकृष्णांनाच दैवत मानणारे यादव पावसाळा जवळ आलेला पाहून द्वारकेला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी वसुदेवांचा यज्ञमहोत्सव, आप्तेष्टांची भेट इत्यादी तीर्थयात्रेतील प्रसंग तेथील लोकांना सांगितले. (७०-७१) अध्याय चौर्याऐंशीवा समाप्त |