श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८३ वा

भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- गोपींचे गुरु आणि प्राप्तव्य अशा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपा केली. नंतर त्यांनी युधिष्ठिराला व अन्य संबंधितांना खुशाली विचारली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे दर्शन घेण्यानेच ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले, त्यांचा जेव्हा त्रैलोक्यनाथाने सत्कार केला व त्यांची खुशाली विचारली, तेव्हा आनंदित होऊन ते म्हणाले. " भगवन ! महापुरुषांच्या मनातील आपल्या चरणारविंदांचा मकरंद जेव्हा त्यांच्या मुखातून कथामृताच्या रूपाने बाहेर पडतो, तो जे लोक आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून पितात, त्यांचे अमंगल कोठून होणार? कारण प्राण्यांना देह प्राप्त करून देणारे आपले विस्मरण ते कथामृत नाहीसे करते. भगवन ! आपण एकरस ज्ञानस्वरूप आणि अखंड आनंदचे सागर आहात. बुद्धिवृत्तीमुळे होणार्‍या जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था आपल्या स्वयंप्रकाश स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाहीत. परमहंसांचे आपण प्राप्तव्य आहात. काळाच्या ओघात वेदांचा -हास होत असलेला पाहून त्यांच्या रक्षणासाठी आपण आपल्या योगमायेने मनुष्यरूप धारण केले आहे. आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. (१-४)

श्रीशुक म्हणतात- ज्यावेळी इतर लोक याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत होते, त्याचवेळी यादव आणि कौरव यांच्या स्त्रिया एकत्र येऊन आपापसात भगवंतांच्या त्रिभुवनविख्यात लीलांचे वर्णन करीत होत्या. तेच मी तुला सांगतो, ऐक . (५)

द्रौपदी म्हणाली- हे रुक्मिणी ! भद्रे ! जांबवती ! सत्ये ! सत्यभामे ! कालिंदी ! शैब्ये ! लक्ष्मणे ! रोहिणी ! आणि अन्य श्रीकृष्णपत्‍न्यांनो ! स्वत: भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत तुमचे कोणत्या प्रकारे पाणिग्रहण केले, ते आम्हांला सांगा. (६-७)

रुक्मिणी म्हणाली- माझा विवाह शिशुपालाबरोबर व्हावा, म्हणून जरासंधाने राजे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन आले असता, सिंहाने शेळ्या-मेंढ्यांच्या कळपातून आपली शिकार न्यावी, त्याप्रमाणे अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन आले. त्या लक्ष्मीनिवासांच्या चरणांचीच सेवा करायला मला मिळावी.(एवढीच माझी इच्छा आहे.) (८)

सत्यभामा म्हणाली- आपला भाऊ प्रसेनाच्या मृत्यूने अतिशय दु:खी झालेल्या माझ्या वडिलांनी त्या वधाचा आरोप भगवंतांच्यावर ठेवला. तो कलंक दूर करण्यासाठी त्यांनी ऋक्षराज जांबवानाला जिंकून त्याच्याकडून ते रत्‍न आणून माझ्या पित्याला दिले. खोटा आरोप ठेवल्याकारणाने माझे वडिल घाबरून गेले. जरी त्यांनी माझा विवाह दुसर्‍याशी ठरविला होता, तरीसुद्धा त्यांनी स्यमंतकमण्यासह मला भगवंतांच्या हाती सोपविले. (९)

जांबवती म्हणाली- हेच आपले स्वामी भगवान सीतापती आहेत, हे माझ्या वडिलांना-जांबवानाला न कळल्यामुळे ते सत्तावीस दिवसपर्यंत यांच्याशी लढत राहिले. परंतु जेव्हा लक्षात आले, तेव्हा वडिलांनी यांचे पाय घरून स्यमंतकमण्यासह भेट म्हणून मला यांना अर्पण केले. अशी आहे या दासीची कथा. (१०)

कालिंदी म्हणाली- त्यांच्या चरणांची प्राप्ती व्हावी, म्हणून मी तपश्चर्या करीत आहे, असे जेव्हा भगवंतांना समजले, तेव्हा ते मित्र अर्जुनासह यमुनातीरावर आले आणि त्यांनी माझे पाणिग्रहण केले. तीच मी त्यांच्या घरची झाडलोट करणारी दासी आहे. (११)

मित्रविंदा म्हणाली- स्वयंवरामध्ये ज्यांनी येऊन विरोध करणार्‍या माझ्या भावांना व सर्व राजांना जिंकून कुत्र्यांच्या झुंडीमधून सिंहाने आपली शिकार घेऊन जावी, त्याप्रमाणे मला आपल्या वैभवसंपन्न द्वारकापुरीला नेले, त्यांचे जन्मोजन्मी पाय धुण्याचे भग्य मला प्राप्त व्हावे, एवढीच माझी इच्छा आहे. (१२)

सत्या म्हणाली- मला वरू इच्छिणार्‍या राजांचे बळ पाहाण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी, टोकदार शिंगे असलेले सात बैल सोडले होते. मोठमोठ्या वीरांची घमेंड जिरविणार्‍या त्या बैलांना भगवंतांनी अगदी सहजपणे झेप घेऊन पकडले आणि त्यांना वेसण घातली. लहान मुलींनी शेळीची करडे पकडावीत, त्याप्रमाणे. ज्यांनी अशा प्रकारे सामर्थ्याचा पण लावलेल्या मला प्राप्त करून घेऊन चतुरंग सेना आणि दासींसह द्वारकेला आणले. मार्गांमध्ये ज्या क्षत्रियांनी विघ्न आणले, त्यांनाही जिंकले. माझी हीच इच्छा आहे की, यांच्या सेवेची संधी मला सदैव मिळो! (१३-१४)

भद्रा म्हणाली- हे द्रौपदी ! माझ्या पित्याने स्वत: माझे मामेभाऊ असलेल्या भगवंतांना बोलावून आणून अक्षौहिणी सेना आणि पुष्कळशा दासी यांसह ठायी चित्त जडलेल्या मला त्यांना अर्पण केले. माझ्या कर्मानुसार मला जेथे जेथे जन्म घ्यावा लागेल, त्या सगळीकडे त्यांच्याच चरणकमलांचा स्पर्श मला प्राप्त व्हावा, यातच मी माझे परम कल्याण समजते. (१५-१६)

लक्ष्मणा म्हणाली- हे राणी ! देवर्षी नारदांच्या मुखातून वारंवार भगवंतांचे अवतार आणि लीलांचे गायन ऐकून आणि लक्ष्मीने सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांनाच वरले, याचाही विचार करून माझे चित्त भगवंतांच्या चरणी आसक्त झाले. हे साध्वी ! माझे पिता बृहत्सेन यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. माझे मनोगत जेव्हा त्यांना समजले, तेव्हा त्यांनी मझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला. महाराणी ! अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे तुमच्या पित्याने स्वयंवरामध्ये मत्स्यवेधाची योजना आखली होती, त्याचप्रमाणे माझ्या पित्यानेसुद्ध केले. फरक एवढाच की, हा मासा बाहेरून झाकलेला होता. राजे लोकांना हे कळले, तेव्हा सर्व ठिकाणांहून शस्त्रास्त्रवेत्ते हजारो राजे आपपल्या गुरुंसह माझ्या पित्याच्या राजधानीत आले. माझ्या पित्याने त्या राजांचा पराक्रम आणि वय पाहून चांगल्या त-हेने पाहुणचार केला. मला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने त्या लोकांनी स्वयंवर मंडपात ठेवलेले धनुष्य आणि बाण मत्स्यवेधासाठी उचलले. त्यांपैकी काही राजे धनुष्याला दोरीही लावू शकले नाहीत. त्यांनी धनुष्य जसेच्य तसे ठेवून दिले. काहींनी धनुष्याची दोरी एका टोकाला बांधून दुसर्‍या टोकापर्यंत ती ओढली, परंतु दुसर्‍या टोकाला ते बांधू शकले नाहीत. त्याच्या झटक्याने ते खाली पडले. जरासंध, अंबष्ठ, शिशुपाल, भीमसेन, दुर्योधन, कर्ण अशा वीरांनी धनुष्याला दोरी बांधली. परंतु मासा कुठे आहे, हे त्यांना समजलेच नाही. अर्जुनाने पाण्यामध्ये त्या माशाचे प्रतिबिंब पाहिले आणि तो कोठे आहे हेही जाणले. अत्यंत सावधपणे त्याने बाण सोडला, परंतु त्याला लक्ष्यवेध करता आला नाही. बाणाने माशाला फक्त स्पर्श केला. (१७-२४)

अशाप्रकारे अभिमानी राजांचा मानभंग झाला व ते मागे फिरले. तेव्हा भगवंतांनी धनुष्य उचलून सहजपणे त्याला दोरी लावली, बाण जोडला आणि पाण्यात फक्त एकदाच माशाचे प्रतिबिंब पाहून बाण मारून त्याला खाली पाडले. त्यावेळी सूर्य ’अभिजित’ नक्षत्रात होता. त्यावेळी पृथ्वीवर जयजयकार होऊ लागला आणि आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. देवांनी आनंदविभोर होऊन पुष्पवर्षाव केला. त्याचवेळी भगवंतांच्या ठिकाणी मन जडलेल्या मी स्वयंवरमंडपात प्रवेश केला. माझ्या पायातील नूपुरे मधुर आवाज करीत होती. मी नवी उत्तम रेशमी वस्त्रे परिधान केली होती. वेणीत गजरा माळलेला होता आणि चेहर्‍यावर लज्जामिश्रित हास्य विलसत होते. मी हातात सुवर्णजडित तेजस्वी रत्‍नहार घेतला होता. त्यावेळी दाट कुरळ्या केसांमुळे आणि गालांवर कुंडलांची किरणे पडल्यामुळे शोभणारा माझा चेहरा वर करून सौ‍म्य हास्ययुक्त नजर चारी बाजूंनी बसलेल्या राजांकडे टाकून, नंतर हळुवारपणे माझ्या हातातील वरमाला मी भगवंतांच्या गळ्यात घातली. त्याबरोबर मृदंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. नट आणि नर्तकी नाचू लागल्या. गवई गाऊ लागले. (२५-३०)

हे द्रौपदी ! अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरले, तेव्हा कामातुर राजांना मत्सरामुळे ते सहन झाले नाही. आपल्या चार घोड्यांच्या रथावर चतुर्भुज भगवंतांनी मला घेतले आणि हातात शार्ड्ग.धनुष्य घेऊन व कवच धारण करून ते युद्धासाठी सज्ज झाले. परंतु हे राणी ! जसे एखाद्या सिंहाने पशूंची पर्वा न करता त्यांच्यातून निघून जावे, त्याप्रमाणे दारुकाने सोन्याच्या सामानाने भरलेला रथ सर्व राजांच्या देखतच द्वारकेकडे हाकला. त्यांपैकी काही राजांनी धनुष्य घेऊन, युद्धासाठी सज्ज होऊन, भगवंतांना अडविण्याच्या उद्देशाने, कुत्र्यांणी सिंहाचा पाठलाग करावा तसा त्यांचा पाठलाग सुरू केला. युद्धामध्ये शार्ड्ग.धनुष्यातून सुटलेल्या बाणांनी काहीजणांचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले आणि कोणाच्या माना तुटून ते धारातीर्थी पडले. तर काहीजण युद्धभूमी सोडून पळून गेले. (३१-३५)

त्यानंतर यदुराज भगवंतांनी सूर्याप्रमाणे, स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रशंसा केल्या गेलेल्या आपल्या निवासस्थानी, द्वारका नगरीत प्रवेश केला. त्या दिवशी ती विशेषरूपाने सजविली गेली होती. ध्वज, पताका आणि तोरणे इतकी लावली होती की, त्यांच्यामुळे सूर्याची किरणे खाली येऊ शकत नव्हती. माझ्या वडिलांनी सुहृद, संबंधी आणि बांधवांना बहुमोल वस्त्रे, अलंकार, बिछाने, आसने आणि विविध प्रकारची सामग्री देऊन सन्मानित केले. भगवान सर्व प्रकारच्या संपत्तींनी परिपूर्ण होते, तरीसुद्धा माझ्या पित्याने प्रेमाने त्यांना पुष्कळ दासी, सर्व प्रकारची संपत्ती, सैनिक, हत्ती, रथ, घोडे तसेच पुष्कळशी बहुमूल्य शस्त्रास्त्रे समर्पण केली. आम्ही पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून फार मोठी तपश्चर्या केली असावी, म्हणूनच आम्ही या जन्मी आत्माराम भगवंतांच्या घरातील दासी झालो आहोत. (३६-३९)

सोळा हजार पत्‍न्यांच्या वतीने रोहिणी म्हणाली- दिग्विजयाच्या वेळी भौ‍मासुराने पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या आम्हा कन्यांना आपल्या महालांत बंदी करून ठेवले होते. भगवंतांनी हे जाणले व युद्धामध्ये भौ‍मासुराचा त्याच्या सेनेसह संहार करून , स्वत: पूर्णकाम असूनही, आम्हांला तेथून सोडवून आणून आमचे पाणिग्रहण केले. जन्म-मृत्यूरूप संसारचक्रातून मुक्त करणार्‍या त्यांच्या चरणकमलांचेच आम्ही सदा-सर्वदा चिंतन करीत असतो. हे साध्वी ! आम्हांला सार्वभौ‍म पद, इंद्रपद या दोहोंचे भोग, अणिमा इत्यादी सिद्धींमुळे प्राप्त होणारे ऐश्वर्य, ब्रह्मदेवाचे पद, मोक्ष किंवा सालोक्य, सारूप्य इत्यादी मुक्ती, हे काहीही नको. आम्हांला फक्त एवढेच पाहिजे की, लक्ष्मीच्या वक्ष:स्थळाला लावलेल्या केशराने सुगंधित झालेली, गदाधारी प्रभूंच्या चरणांची धूळ, नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी. महात्मा गोपालकृष्ण गाई चारत असताना गोप, गोपी, भिल्लिणी, गवत आणि वेलीसुद्धा ज्या चरणकमलांना स्पर्श करू इच्छित असत, तोच आम्हांला हवा आहे. (४०-४३)

अध्याय त्र्याऐंशीवा समाप्त

GO TOP