श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८२ वा

श्रीकृष्ण-बलरामांशी गोप-गोपींची भेट -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात- असेच एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत निवस करीत असताना प्रलयाचा वेळी लागावे, तसे खग्रास सूर्यग्रहण लागले. परीक्षिता ! लोकांना त्या ग्रहणाबद्दल अगोदरच समजले होते, म्हणून सर्वजण आपले कल्याण व्हावे, या उद्देशाने स्नान-दान इत्यादी करण्यासाठी समंतपंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आले. जेथे शस्त्र धारण करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ अशा परशुरामांनी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन करून राजांच्या रक्ताने मोठमोठे डोह बनविले होते, तेच हे क्षेत्र. जसा एखादा सामान्य मनुष्य आपले पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतो, त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान भगवान परशुरामांनी, स्वत:शी पापकर्माचा काहीही संबंध नसूनही लोकांना सदाचाराचे शिक्षण देण्यासाठी तेथे यज्ञ केला होता. (१-४)

परीक्षिता ! या महान तीर्थक्षेत्रासाठी भारतवर्षाच्या सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्री आली होती. त्यांमध्ये अक्रूर, वसुदेव, उग्रसेन इत्यादी वृष्णी, तसेच गद, प्रद्युम्न, सांब इत्यादी अन्य यादवसुद्धा आपापल्या पापांचा नाश करण्यासाठी तेथे आले होते. अनिरुद्ध आणि सेनापती कृतवर्मा हे दोघेजण सुचंद्र, शुक, सारण इत्यादींसह नगराचे रक्षण करण्यासाठी म्हणून द्वारकेत राहिले होते. अत्यंत तेजस्वी यादवांनी गळ्यांत सोन्याचे हार, दिव्य पुष्पमाळा, बहुमोल वस्त्रे आणि कवचे धारण केली होती. ते आपल्या पत्‍न्यांसह जाताना देवांसारखे शोभत होते. देवतांच्या विमानांसारखे रथ, समुद्रावरील लाटांप्रमाणे चालणारे घोडे, ढगांसारखे विशालकाय गर्जना करणारे हत्ती आणि विद्याधरांसारखी कांती असणारे पायदळ त्यांच्याबरोबर होते. त्या थोर यादवांनी तेथे पोहोचल्यावर एकाग्रचित्ताने स्नान करून उपवास केला. नंतर त्यांनी ब्राह्मणांना, ज्यांना सुंदर वस्त्रांच्या झुली, फुलांच्या माळा आणि सोन्याच्या साखळ्या गळ्यात घातल्या होत्या, अशा गाई दान दिल्या. यानंतर ग्रहण सुटल्यावर त्यांनी परशुरामतीर्थात विधिपूर्वक स्नान केले आणि सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर पक्वान्नांचे भोजन दिले. हे सर्व त्यांनी श्रीकृष्णांच्या ठिकाणी भक्ती जडावी, म्हणून केले होते. श्रीकृष्णांनाच आपला देव मानणार्‍या त्यांनी ब्राह्मणांच्या अनुमतीने स्वत: भोजन केले आणि मग दाट सावली असलेल्या वृक्षांच्याखाली आपापल्या इच्छेनुसार ते बसले. नंतर त्यांनी आपल्या सुहृद आणि संबंधित राजांच्या भेटी-गाठी घेणे सुरू केले. तेथे मत्स्य, उशीनर, कोसल, विदर्भ, कुरू, सृंजय, कोंबाज, कैकय, मद्र, कुंती, आनर्त, केरळ इत्यादी ठिकाणचे स्वपक्षांचे आणि अन्य पक्षांचे शेकडो राजे आले होते. परीक्षिता ! याव्यतिरिक्त नंद इत्यादी गोपमित्र तसेच भगवंतांच्या दर्शनासाठी पुष्कळ दिवसांपासून उत्कंठित झालेल्या गोपीसुद्धा तेथे आल्या होत्या. यादव या सर्वांना भेटले. एकमेकांना भेटून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे सर्वांची हृदयकमळे आणि मुखकमळे प्रफुल्लित झाली. सर्वजण एकमेकांना मिठीत घेऊन आलिंगन देत, त्यावेळी परस्परांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात. अंगावर रोमांच येत. प्रेमाने तोंडातून शब्द फुटत नसे आणि सर्वजण आनंदसमुद्रात डुंबू लागत. (५-१५)

स्त्रियासुद्धा एकमेकींना पाहून अत्यंत स्नेहाने मंदहास्ययुक्त नजरेने एकमेकींकडे पाहात एकमेकींना बाहूंनी घट्ट आलिंगन देऊ लागल्या. त्यावेळी केशर लावलेली त्यांची वक्ष:स्थळे एकमेकींच्या वक्ष:स्थळाला भिडू लागली आणि डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. तेथे वयाने लहान असणार्‍यांनी मोठ्यांना नमस्कार केला आणि त्या नमस्कार करणार्‍यांना त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांनी नमस्कार केला. नंतर एकमेकांचे स्वागत करून ख्याली-खुशाली विचारून ते श्रीकृष्णांच्या मधुर लीलांविषयी आपापसात बोलू लागले. (१६-१७)

कुंती, आपले भाऊ, बहिणी, त्यांची मुले, माता-पिता, भावजया आणि श्रीकृष्णांना भेटून व त्यांच्याशी बोलून आपले दु:ख विसरली. (१८)

कुंती वसुदेवांना म्हणाली- दादा ! मी स्वत:ला फार दुर्दैवी समजते. कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असूनही त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण आली नाही. दादा ! दैव ज्याला प्रतिकूल असते, त्याला हितचिंतक, संबंधी, पुत्र, भाऊ, किंबहुना माता-पितासुद्धा विसरतात, हेच खरे ! (१९-२०)

वसुदेव म्हणाले- ताई ! आम्हांला दोष देऊ नकोस. सगळेजण दैवाच्या हातातील खेळणे आहेत. कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनेच कर्मे करतात. किंवा तसे त्यांना करावे लागते. ताई ! कंसाच्या छळामुळे आम्ही देशोधडीला लागलो होतो. थोड्याच दिवसांपूर्वी, सुदैवाने पुन्हा आमच्या जागी आलो. (२१-२२)

श्रीशुक म्हणतात- तेथे आलेल्या राजांचा वसुदेव, उग्रसेन इत्यादी यादवांनी सत्कार केला. श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे त्यांना परमानंद झाला. (२३)

परीक्षिता ! भीष्म, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, पुत्रांसह गंधारी, पत्‍न्यांसह पांडव, कुंती, सृंजय, विदुर, कृपाचार्य, कुंतिभोज, विराट, भीष्मक, नग्नजित, पुरुजित, द्रुपद, शल्य, धृष्टकेतू, काशिराज, दमघोष, विशालाक्ष, मिथिलानरेश, मद्रनरेश, केकयनरेश, युधानम्यू, सुशर्मा, पुत्रांसह बाल्हीक आणि युधिष्ठिराचे अनुयायी राण्यांसह अन्य राजे, भगवान श्रीकृष्णांचा लक्ष्मीचे निवासस्थान असलेला श्रीविग्रह पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले. नंतर राम-कृष्णांकडून चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त झालेले ते मोठ्या आनंदाने श्रीकृष्णांचे स्वजन असणार्‍या यादवांची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, " हे भोजराज ! या जगामध्ये, मनुष्यमात्रात तुमचेच जीवन धन्य आहे. कारण योग्यांनाही दुर्लभ असे श्रीकृष्णांचे दर्शन तुम्हांला नेहमीच होत असते. ज्यांची वेदांनी गाईलेली कीर्ती, चरणतीर्थ असे गंगाजल, आणि ज्यांची वाणी म्हणजेच वेद या जगाला अत्यंत पवित्र करीत आहे. काळामुळे सगळे वैभव नष्ट झालेली पृथ्वी ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुन्हा सर्वशक्तिसंपन्न होऊन आमच्या सर्व अभिलाषा पूर्ण करू लागली, त्या श्रीकृष्णांशी तुमचा कौटुंबिक आणि गोत्रसंबंध आहे. एवढेच काय, तुम्हांला नेहमी त्यांचे दर्शन होऊन त्यांना स्पर्श करता येतो. तुम्ही त्यांच्याबरोबर चालता, बोलता, निजता, बसता आणि खाता-पिता. खरे तर संसारचक्राचे कारण असलेल्या गृहस्थाश्रमामध्ये राहाणार्‍या तुमच्या घरी स्वर्ग-मोक्ष मिटविणारे सर्वव्यापक विष्णू स्व्त: अवतरले आहेत. (२४-३१)

श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्ण इत्यादी यदू तेथे आले आहेत, असे जेव्हा नंदबाबांना समजले, तेव्हा ते गोपांसह आपली सगळी सामग्री घालून त्यांना भेटण्यासाठी तेथे आले. त्यांना पाहून यादवांना अतिशय आनंद झाला. मृत शरीरामध्ये प्राणाचा संचार झाल्याप्रमाणे ते उठून उभे राहिले. पुष्कळ दिवसांपासून ते एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते. म्हणूनच ते एकमेकांना बराच वेळपर्यंत गाढ आलिंगन देत राहिले. अत्यंत प्रेम आणि आनंदाने मन भरून येऊन वसुदेवांनी नंदांना हृदयाशी कवटाळले. कंसाने दिलेला त्रास आणि पुत्राला गोकुळात नेऊन ठेवणे, या गोष्टी त्यांना यावेळी आठवल्या. नंद-यशोदा यांनी राम-कृष्णांना मिठीत घेतले. नंतर त्यांनी माता-पित्यांच्या चरणांना वंदन केले. परीक्षिता ! प्रेमाने त्यांचे गळे दाटून आल्याने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. भाग्यवती यशोदा आणि नंद यांनी त्या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि दोन्ही हातांनी त्यांना गाढ आलिंगन दिले. त्यामुळे त्यांचे दु:ख नाहीसे झाले. रोहिणी आणि देवकी या दोघींनी व्रजराणी यशोदेला आलिंगन दिले. त्यांच्याशी यशोदेने जे मैत्रीपूर्ण वर्तन केले होते, त्याची आठवण होऊन दोघींचे गळे दाटून आले. त्या म्हणाल्या. " अग यशोदे! आमच्याशी तुमची जी अतूट मैत्री आहे, तिची त्याबदल्यात इंद्राचे ऐश्वर्य देऊनही आम्ही कधी परतफेड करू शकणार नाही. हे देवी ! बलराम आणि श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या आई-वडिलांना पाहिलेही नव्हते, अशा वयात यांच्या वडिलांनी या दोघांना आपल्या स्वाधीन केले होते. त्यावेळी पापण्या डोळ्यांतील बुबुळांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे आपण या दोघांचे रक्षण केलेत. तसेच आपण यांना प्रेम दिले. यांचे पालन-पोषण करून यांच्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी केल्या. आपल्यामुळे हे निर्भय राहिले. हेही बरोबरच आहे. कारण आपल्यासारख्या सत्पुरुषांच्या दृष्टीत आपला-परका असा भेदभाव नसतो. (३२-३९)

श्रीशुक म्हणतात- परम प्रियतम श्रीकृष्ण फर दिवसांनी दिसल्यामुळे त्यांना पाहाताना जेव्हा गोपींच्या पापण्यांची उघडझाप होई, तेव्हा त्या, पापण्या निर्माण करणार्‍यालाच शिव्याशाप देऊ लागल्या. डोळ्यांमधून त्यांनी प्रियतमाला हृदयात नेऊन गाढ आलिंगन दिले आणि त्या तन्मय होऊन गेल्या. नेहमी ध्यान करणार्‍या योग्यांनाही जो भाव प्राप्त होणे दुर्लभ, तो भाव आज त्यांना प्राप्त झाला. श्रीकृष्णांनी त्यांची ही स्थिती पाहून ते एकांतात त्यांच्याजवळ गेले. नंतर त्यांना आलिंगन देऊन त्यांची खुशाली विचारून हसत हसत त्यांना म्हणाले. सख्यांनो ! आम्ही आमच्या बांधवांचे काम करण्यासाठी म्हणून व्रजाबाहेर गेलो आणि तेथे शत्रूंचा नाश करण्यात गुंतल्यामुळे मध्ये पुष्कळ दिवस निघून गेले. तुम्हांला आमची कधी आठवण येत होती काय? मी कृतघ्न आहे, अशी शंका येऊन आमच्याविषयी तुमच्या मनात वेडेवाकडे विचार आले नाहीत ना? खरे तर प्राण्यांवी भेट आणि वियोग घडविणारे भगवंतच आहेत (त्याला मी तरी काय करणार? ). वायू ज्याप्रमाणे ढग, गवत, कापूस आणि धूळ यांना एकमेकांजवळ आणतो आणि पुन्हा वेगवेगळे करतो, त्याचप्रमाणे विश्वनिर्माते भगवानसुद्धा सगळ्यांचा संयोग-वियोग करीत असतात. सुदैवाने तुम्हांला माझे असे प्रेम मिळाले आहे की, जे माझी प्राप्ती करून देणारे आहे, कारण माझ्या ठिकाणी असलेली भक्ती प्राण्यांना मोक्ष देण्याला समर्थ आहे. गोपींनो ! ज्याप्रमाणे भौतिक पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी आणि आत-बाहेर त्यांना कारणीभूत असणारी पृथ्वी, पाणी, अग्नी , वायू व आकाश ही पंचमाहभूते असतात, त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी व आत-बाहेर फक्त मीच असतो. सर्व पदार्थांमध्ये हीच पंचमहाभूते कारणरूपाने राहिली आहेत आणि आत्मा जीवरूपाने राहिला आहे. परंतु या दोघांच्याही पलीकडील अविनाशी सत्य असणार्‍या माझ्यामध्येच भूते व जीव प्रतीत होतात, असे जाणा. (४०-४७)

श्रीशुक म्हणतात- अश प्रकारे श्रीकृष्णांनी गोपींना अध्यात्मज्ञान दिले. या उपदेशाचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले आणि त्या भगवंतांशी एकरूप झाल्या. (४८)

त्या म्हणाल्या- " हे कमलनाभ ! अगाध बोधसंपन्न योगेश्वर आपल्या हृदयात ज्या आपल्या चरणकमलांचे चिंतन करीत असतात, संसाररूपी विहिरीत पडलेले लोक त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्यांचा आश्रय घेतात, ते आपले चरणकमल, प्रपंचातील कामे करीत असतानाही, नेहमी आमच्या हृदयात विराजमान राहोत. एवढीच कृपा करा. (४९)

अध्याय ब्याऐंशीवा समाप्त

GO TOP