श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८१ वा

सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- सर्वांच्या मनातील जाणणारे ब्राह्मणांचे भक्त, संतांचे एकमेव आश्रयस्थान असे श्रीहरी अशा रीतीने त्या ब्राह्मणाबरोबर पुष्कळ वेळपर्यंत गप्पगोष्टी करीत राहिले. नंतर ते आपला प्रिय मित्र जो ब्राह्मण त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहात स्मित हास्य करून थट्टेने त्याला म्हणाले. (१-२)

श्रीकृष्ण म्हणाले " हे ब्रह्मन ! तू आपल्या घरून माझ्यासाठी भेट म्हणून काय आणले आहेस ? माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमाने मला लहानशीसुद्धा वस्तू अर्पण करतात, तेव्हा ती मला फार मोठी वाटते. परंतु अभक्तांनी मला पुष्कळ जरी काही दिले तरी त्यामुळे मी संतुष्ट होत नाही. जो मनुष्य भक्तीने पान, फूल, फळ किंवा पाणी मला अर्पण करतो, त्या शुद्धचित्त भक्ताने भक्तीने दिलेले ते मी स्वीकारतो. " राजा ! असे म्हटल्यावरसुद्धा त्या ब्राह्मणाने संकोचाने त्या लक्ष्मीपतीला ते पसाभर पोहे दिले नाहीत. लज्जेने त्याने मान खाली घातली. श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या मनातील जाणतात. त्यांनी ब्राह्मणाच्या येण्याचे कारण जाणूनही विचार केला की, " याने यापूर्वी कधीही धनाच्या इच्छेने माझे भजन केलेले नाही. यावेळी हा आपला मित्र पतिव्रता पत्‍नीला बरे वाटावे म्हणून तिच्याच आग्रहावरून येथे आला आहे. म्हणून देवांनासुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मी याला देईन. " भगवान श्रीकृष्णांनी असा विचार करून त्याच्या वस्त्रातून एका फडक्यात बांधलेले पोहे " हे काय आहे? " असे म्हणून, स्वत:च ओढून घेतले. आणि म्हणाले, " प्रिय मित्रा ! ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू माझ्यासाठी आणलीस. हे पोहे केवळ मलाच नव्हे, तर सगळ्या जगाला तृप्त करतील. " असे म्हणून त्यांनी त्यातून एक मूठभर पोहे खाल्ले आणि दुसरी मूठ भरून घेतले, तोच पतिपरायण रुक्मिणीने श्रीकृष्णांचा हात धरला. रुक्मिणी म्हणाली, " हे विश्वात्मन ! माणसाला या लोकी किंवा परलोकातसुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे एक मूठभर पोहेसुद्धा पुरेसे आहेत. " (३-११)

ब्राह्मण त्या रात्री श्रीकृष्णांच्या महालात राहिला. तेथे खाऊन-पिऊन तो इतका खूष झाल की, आपण स्वर्गात असल्यासारखे त्याला वाटले. हे राजा ! दुसर्‍या दिवशी विश्वनिर्मात्या व भक्तांना आनंद देणार्‍या श्रीकृष्णांनी त्याला वंदन केले व त्याच्या मागोमाग काही अंतर जाऊन त्याला निरोप दिला. नंतर तो आपल्या गावी निघाला. ब्राह्मणाला श्रीकृष्णांकडून धन मिळाले नाही. तरीसुद्धा त्याने स्वत: काही मागितले नाही. उलट या देवदेवेश्वरासाठी आपण य:कश्चित पोहे ते काय आणले, या विचाराने तो लज्जित झाला, परंतु श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे आनंदितही होऊन तो आपल्या घराकडे परतला. जाताना तो मनात विचार करू लागला- " अहो ! ब्राह्मणांना देव मानणार्‍या श्रीकृष्णांची ब्राह्मणभक्ती आज मी पाहिली. धन्य झालो ! ज्यांच्या वक्ष:स्थळावर लक्ष्मी विराजमान असते, त्यांनी सर्वांत दरिद्री अशा मला आपल्या हृदयाशी कवटाळले. कुठे मी अत्यंत पापी, दरिद्री आणि कुठे लक्ष्मीचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण ! परंतु त्यांनी ’मी केवळ ब्राह्मण’ म्हणून मला आपल्या बाहूंनी हृदयाशी घट्ट धरले. एवढेच नव्हे, तर ज्या पलंगावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते, त्या पलंगावर त्यांनी मला भाऊ मानून बसविले. मी थकलेलो होतो, म्हणून स्वत: त्यांच्या पट्टराणीने आपल्या हातांनी चवर्‍या ढाळून मला वारा घातला. ब्राह्मणांना देव मानणार्‍या देवाधिदेवांनी पाय चेपणे इत्यादी रीतीने माझी चांगली सेवा करून देवाप्रमाणे माझी पूजा केली. त्यांच्या चरणांची पूजाच स्वर्ग, मोक्ष, पृथ्वी आणि रसातळातील संपत्ती व सर्व सिद्धींच्या प्राप्तीचे कारण होय. तरीसुद्धा ’हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल आणि माझे याला विस्मरण होईल, ’ असा विचार करूनच दयाळू श्रीकृष्णांनी मला थोडेसुद्धा धन दिले नाही. ’ (१२-२०)

मनात असा विचार करीतच ब्राह्मण आपल्या घराजवळ येऊन पोहोचला. ते ठिकाण, सूर्य, अग्नी आणि चंद्र यांच्या तेजाप्रमाणे तेजस्वी प्रासादांनी वेढलेले होते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपवने आणि उद्याने तयार केलेली होती. आणि त्यांमध्ये पक्ष्यांचे थवे चिवचिवाट करीत होते. सरोवरांमध्ये कुमुदे, पांढरी, तांबडी, निळी अशी सुगंधी कमळे उमलली होती. उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या सुंदर स्त्रिया तेथे वावरत होत्या. ते पाहून ब्राह्मण विचार करू लागला , " हे मी काय पाहात आहे? हे कोणाचे ठिकाण आहे? जेथे मी राहात होतो, ते हे ठिकाण असे कसे झाले? " तो असा विचार करीत होता, तेवढ्यात देवदूतांसारखे सुंदर स्त्री-पुरुष वाजत-गाजत, मंगल गीते गात, त्या भाग्यवान ब्राह्मणाच्या स्वागतासाठी आले. (कारण भगवंतांनी स्वर्गातून त्यांना येथे आणले होते.) पती आल्याचे ऐकून त्याच्या पत्‍नीला अतिशय आनंद झाला आणि ती गडबडीत ताबडतोब घराच्या बाहेर आली. त्यावेळी ती अशी दिसत होती की, जणू कमलवनातून आलेली लक्ष्मीच. पतीला पाहाताच त्या पतिव्रता पत्‍नीच्या डोळ्यांत अत्युत्कट प्रेमामुळे अश्रू तरळू लागले. (ते जमिनीवर पडू नयेत म्हणून) तिने आपले डोळे बंद केले. यांना वंदनच केले पाहिले, असे ठरवून त्यांना नमस्कार केला आणि मनोमन आलिंगनही दिले. (२१-२६)

सुवर्णालंकार घातलेल्या दासींच्या समुदायात देवांगनेप्रमाणे अत्यंत शोभणार्‍या पत्‍नीला पाहून तो आश्चर्यचकित झाला. तिच्यासह त्याने मोठ्या आनंदाने आपल्या प्रासादात प्रवेश केला. तो प्रासाद इंद्राच्या प्रासादासारख्या शेकडो रत्‍नजडित खांबांचा होता. हत्तींच्या दातांपासून बनविलेल्या आणि सोन्याच्या पत्र्यांनी मढविलेल्या पलंगावर दुधाच्या फेसाप्रमाणे पांढर्‍या शुभ्र आणि कोमल गाद्या अंथरल्या होत्या. सोन्याच्या दांड्यांच्या चवर्‍या आणि पंखे तेथे ठेवलेले होते. सोन्याची सिंहासने होती. त्यांच्यावर मऊमऊ गाद्या अंथरल्या होत्या. तेथे मोत्यांच्या लडी लावलेले तेजस्वी चांदवे लावले होते. स्फटिकांच्या शुभ्र भिंतींवर पाचूची नक्षी होती. आणि रत्‍ननिर्मित स्त्रियांच्या हातात रत्‍नांचे दिवे झगमगत होते. (२७-३१)

अशा प्रकारे सर्व प्रकारच्या संपत्तीची अकारण समृद्धी पाहून ब्राह्मण त्याविषयी शांतपणे विचार करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, " मी तर जन्मत:च भाग्यहीन आणि दरिद्री. त्या‍अर्थी या संपत्तीचे कारण परमऐपश्वर्यशाली यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या कृपाकटाक्षाशिवाय दुसरे असूच शकत नाही. ज्यांच्याकडे अनंत भोगसामग्री आहे, असे माझे मित्र दशार्हाधिपती भगवान, याचक भक्ताच्या मनातील भाव ओळखून समोर काही न बोलता त्याला पुष्कळ काही देतात. ज्याच्याजवळ समुद्र भरून टाकण्याचे सामर्थ्य आहे, तो मेघ शेतकर्‍याच्या शेतात त्याला नकळत पुष्कळ वर्षाव करूनही थोडाच केला, असे समजतो, तसे माझ्या मित्राचे आहे. ते पुष्कळ देतात, परंतु थोडेच दिले असे समजतात. त्यांच्या भक्ताने थोडेसे काहीही करू दे, ते त्यांना फार वाटते. पहा ना ! मी त्यांना फक्त एक मूठभर पोहे भेटीदाखल दिले, पण त्या महात्म्याने किती प्रेमाने त्यांचा स्वीकार केला बरे ! मला जन्मोजन्मी त्यांचेच प्रेम, त्यांचेच सख्य, त्यांचीच मैत्री आणि त्यांचीच सेवा करावयास मिळो. मला संपत्ती नको, तर गुणांचे एकमेव निवासस्थान असलेल्या त्या महानुभावांच्या चरणी माझे मन जडून राहो आणि त्यांच्याच भक्तांचा सत्संग मला प्राप्त होवो. संपत्तीचे दोष जाणणारे अजन्मा भगवान श्रीकृष्ण धनाढ्य लोकांचा ऐश्वर्याच्या मदाने अध:पात होतो, हे पाहून आपल्या पूर्ण ज्ञान न झालेल्या भक्ताला , निरनिराळ्या प्रकारची संपत्ती, राज्य किंवा इतर वैभव देत नाहीत. आपल्या बुद्धीने असा निश्चय करून तो ब्राह्मण त्यागपूर्वक, अनासक्त भावाने आपल्या पत्‍नीसह प्रापंचिक विषय उपभोगू लागला. करण भगवंतांचा तो परम भक्त होता. (३२-३८)

देवाधिदेव यज्ञपती भगवान श्रीहरी ब्राह्मणांना आपले प्रभू, आपले दैवत मानतात. म्हणून त्यांच्या दृष्टीने ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अशा प्रकारे भगवंतांचा प्रिय मित्र असलेल्या त्या ब्राह्मणाने जाणले की, भगवान जरी अजिंक्य असले, तरी त्यांचे भक्त त्यांना जिंकतात. हे जाणून तो त्यांच्या ध्यानात तन्मय झाला. ध्यानाच्या उत्कटतेमुळे त्याची अविद्येची गाठ तुटली आणि त्याने लवकरच भक्तांचा आश्रय असलेल्या भगवंतांचे स्थान प्राप्त करून घेतले. ब्राह्मणांना आपले देव मानणार्‍या भगवान श्रीकृष्णांची ही ब्राह्मणभक्ती जो श्रवण करतो, त्याला भगवंतांच्या चरणांविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि तो कर्मबंधनातून मुक्त होतो. (३९-४१)

अध्याय एक्याऐंशीवा समाप्त

GO TOP