|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८० वा
सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून स्वागत - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षित म्हणाला - गुरुवर्य ! अनंत शक्ती असणार्या भगवान श्रीकृष्णांच्या ज्या दुसर्या लीला आहेत, त्यांचे वर्णन आम्ही ऐकू इच्छितो. हे ब्रह्मन ! विषयबाणांनी दु:खी झालेला व वारंवार पवित्रकीर्ती श्रीकृष्णांच्या मंगलमय लीलांचे श्रवण करणारा कोणता ज्ञानी मनुष्य त्यांपासून विन्मुख होईल? जी भगवंतांचे गुणगान करते, तीच खरी वाणी. जे त्यांची सेवा करतात, तेच खरे हात. जे चराचरांत निवास करणार्या त्यांचे स्मरण करते, तेच खरे मन. आणि जे भगवंतांच्या पुण्यमय कथांचे श्रवण करतात, तेच खरे कान. जे चराचर जगताला त्यांची प्रतिमा समजून नमस्कार करते, तेच मस्तक आणि जे सगळीकडे त्यांच्या स्वरूपाचेच दर्शन करतात, तेच खरे नेत्र होत. शरीराचे जे अवयव भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणोदकांचे नित्य सेवन करतात, तेच खरे अवयव. (१-४) सूत म्हणतात- परीक्षिताने जेव्हा असा प्रश्न केला, तेव्हा श्रीशुकदेवांचे हृदय भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी तल्लीन झाले व ते परीक्षिताला म्हणाले. (५) श्रीशुक म्हणले- एक ब्राह्मण श्रीकृष्णांचा मित्र होता. तो मोठा ब्रह्मज्ञानी, विषयांपासून विरक्त, शांतचित्त आणि जितेंद्रिय होता. गृहस्थाश्रमात असूनही तो प्रारब्धानुसार जे काही मिळे त्यातच संतुष्ट असे. त्याची वस्त्रे सामान्यच होती. परंतु त्याची पत्नीही तशीच होती. तीसुद्धा अर्धपोटी राहून कृश झाली होती. दारिद्र्याने ग्रासलेली ती दु:खी पतिव्रता एके दिवशी भुकेने व्याकूळ होऊन कापत कापत पतीजवळ गेली आणि खिन्न चेहर्याने म्हणाली. " पतिदेवा ! साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे, शरणागतवत्सल आणि ब्राह्मणांचे भक्त आहेत. हे महाभाग ! साधूंचा आश्रय असणार्या त्यांच्याकडे आपण जा. आपण कुटुंबवत्सल असून दरिद्री आहात, हे कळल्यावर ते आपल्याला पुष्कळ धन देतील. भोज, वृष्णी, अंधक इत्यादी यादवांचे अधिपती असे ते सध्या द्वारकेत आहेत. जे त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात, त्यांना ते स्वत:चे सुद्धा दान करतात. तर मग ते जगद्गुरु आपल्या भक्तांना, जे फारसे इच्छा करण्यासारखे नाही, ते धन आणि ईप्सित विषय देतील, यात आश्चर्य ते कोणते? " त्या ब्राह्मणाला पत्नीने जेव्हा अशा प्रकारे पुष्कळ वेळा नम्रतेने विनंती केली, तेव्हा त्याने विचार केला की, " या निमित्ताने श्रीकृष्णांचे दर्शन होईल. हा आपला मोठाच लाभ आहे. " असा विचार करून त्याने जाण्याचा निश्चय केला आणि पत्नीला म्हटले, " हे कल्याणी ! घरात काही त्यांना भेट देण्याजोगी वस्तू असेल तर दे ! " तेव्हा तिने शेजार-पाजारच्या ब्राह्मणांच्या घरातूंन चार मुठी पोहे मागून आणले आणि एका कपड्यात बांधून भगवंतांना भेट देण्यासाठी आपल्या पतीकडे दिले. तो श्रेष्ठ ब्राह्मण ते पोहे घेऊन द्वारकेकडे जाण्यास निघाला. वाटेत तो विचार करीत होता की, " श्रीकृष्णांचे दर्शन आपल्याला कसे होईल, बरे ? " (६-१५) द्वारकेला पोहोचल्यावर तो ब्राह्मण अन्य ब्राह्मणांबरोबर सैनिकांच्या तीन चौक्या आणि तीन चौक पार करून, जेथे जाणे अत्यंत अवघड , अशा भगवद्धर्माचे पालन करणार्या यादवांच्या निवासस्थानात जाऊन पोहोचला. तेथेच श्रीकृष्णांच्या सोळा हजार राण्यांचे प्रासाद होते. त्यांपैकी वैभवसंपन्न अशा एकामध्ये ब्राह्मणाने प्रवेश केला. त्यात प्रवेश करताच त्याला वाटले की, आपण जणू ब्रह्मानंदाच्या समुद्रातच डुंबत आहोत. (१६-१७) श्रीकृष्ण त्यावेळी रुक्मिणीच्या पलंगावर बसले होते. ब्राह्मण येत असल्याचे लांबून पाहाताच ते ताबडतोब उठून उभे राहिले आणि त्याच्याजवळ येऊन त्यांनी मोठ्या आनंदाने त्याला मिठी मारली. प्रिय मित्र असलेल्या श्रेष्ठ ब्राह्मणाच्या अंगस्पर्शाने कमलनयन भगवान अत्यंत आनंदित झाले. तेव्हा त्यांच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. परीक्षिता ! नंतर त्याला श्रीकृष्णांनी पलंगावर बसवून स्वत: पूजेचे साहित्य आणून मित्राची पूजा केली. तसेच सर्वांना पवित्र करणार्या त्यांनी आपल्या हातांनी ब्राह्मणाचे पाय धुऊन ते चरणोदक आपल्या मस्तकी धारण केले आणि त्याच्या शरीराला चंदन, केशर इत्यादी दिव्य गंधांची उटी लावली. नंतर त्यांनी मोठ्या आनंदाने सुगंधित धूप आणि दीपाने आपल्या मित्राला आरती ओवाळली. अशा प्रकारे पूजा करून तांबूल आणि गाय देऊन " तुझे स्वागत असो" असे म्हणून त्याचे स्वागत केले. जीर्ण वस्त्रे नेसलेल्या मळकट शरीर असलेल्या त्या कृश ब्राह्मणाच्या शरीरावरील शिरा स्पष्ट दिसत होत्या. अशा त्याची स्वत: रुक्मिणी चवर्या ढाळून सेवा करू लागली. पवित्रकीर्ती श्रीकृष्ण अतिशय प्रेमाने त्या मलिन अंगांच्या ब्राह्मणाची पूजा करीत आहेत, हे पाहून अंत:पुरातील स्त्रिया अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणू लागल्या, " या निर्धन, निंदनीय, अंगावर धड वस्त्रे नसलेल्या य:कश्चित भिकार्याने असे कोणते पुण्य केले असावे की, ज्यामुळे त्रैलोक्याचे गुरु असणार्या श्रीकृष्णांनी स्वत: त्याचा आदर-सत्कार केला ! इतकेच नव्हे तर, आपल्या पलंगावर असलेल्या रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला थोरल्या भावासारखी मिठी मारली ! " परीक्षिता ! नंतर श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण एकमेकांचे हात हातात घेऊन पूर्वी गुरुकुलात राहात असतानाच्या आनंददायक गोष्टी बोलू लागले. (१८-२७) श्रीकृष्ण म्हणाले- धर्म जाणणार्या हे ब्राह्मणा ! गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत आल्यावर समावर्तन करून तू अनुरूप अशा स्त्रीबरोबर विवाह केलास की नाही ? मला माहित आहे की, तुझे चित्त गृहस्थाश्रमात असूनही विषयभोगात आसक्त नाही. हे विद्वाना ! मला हे पण माहित आहे की, धनाविषयीसुद्धा तुला मुळीच प्रेम नाही. जगात फारच थोडे लोक भगवंतांच्या मायेने निर्माण केलेल्या विषयवासनांचा त्याग करतात आणि चित्तामध्ये विषयांची वासना नसतानाही माझ्यासारखी फक्त लोकशिक्षणासाठी कर्मे करीत असतात. हे ब्रह्मन ! आपण दोघे गुरुकुलत राहात होतो, त्याची तुला आठवण आहे का? गुरुकुलातच खरोखर द्विजांना आत्मज्ञान होते व त्यामुळे ते अज्ञानांधकार पार करून जातात. हे मित्रा ! या जगामध्ये जन्मदाता पिता हा प्रथम गुरु होय. त्यानंतर उपनयन (मुंज) संस्कार करून सत्कर्मांचे शिक्षण देणारा हा दुसरा गुरु होय. तो माझ्यासारखाच पूज्य आहे. त्यानंतर ज्ञनोपदेश करून परम्यात्म्याची प्राप्ती करून देणारा गुरु हा तर माझेच स्वरूप होय. वर्णाश्रमियांचे हे तीन गुरु असतात. हे ब्राह्मणा ! या मनुष्यजन्मात वर्णाश्रमींमध्ये जे लोक मत्स्वरूप गुरुंच्या उपदेशानुसार वागून अनायसे हा भवसागर पार करून जातात, तेच स्वार्थ आणि परमार्थाचे खरे जाणकार होत. प्रिय मित्रा ! सर्वांचा आत्मा असणारा मी जितका गुरुदेवांच्या सेवेने संतुष्ट होतो, तितका मी गृहस्थाचे धर्म पंचमहायज्ञ इत्यादींनी, ब्रह्मचार्याचे धर्म उपनयन, वेदाध्ययन इत्यादींनी, वानप्रस्थाचे धर्म तपश्चर्या इत्यादींनी किंवा संन्याशाच्या सर्वस्वत्यागरूप धर्मानेही संतुष्ट होत नाही. (२८-३४) हे ब्रह्मन ! ज्यावेळी आम्ही गुरुकुलात निवास करीत होतो, त्यावेळची ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे काय की जेव्हा आम्हा दोघांना एके दिवशी आपल्या गुरुपत्नींकडे लाकडे आणण्यासाठी जंगलात पाठविले होते ते ? त्यावेळी आपण एका घोर जंगलात गेलो होतो आणि पावसाळ्याचे दिवस नसतानाही भयंकर वादळी पाऊस आला होता. विजांचा कडकडाटही होत होता. मग सूर्यास्त झाला. सगळीकडे अंधार पसरला. जमिनीवर इतके पाणी झाले की, उंचसखल भागाचा पत्ताच लागत नव्हता. (३५-३७) त्या पुरात वादळाने आणि पावसाने आम्ही अतिशय झोडपले जात होतो. दिशा कळत नव्हत्या. आम्ही भांबावून एकमेकांचे हात धरून जंगलात इकडे तिकडे भटकत राहिलो. गुरुदेव सांदीपनी मुनींना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा सूर्योदय झाल्यावर, आपले शिष्य असलेल्या आम्हांला शोधीत ते जंगलात पोहोचले. तेव्हा आम्हांला अतिशय त्रास झाल्याचे त्यांनी पाहिले. ते म्हणाले- " बाळांनो ! तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. सर्व प्राण्यांना आपले शरीर सर्वाधिक प्रिय असते. परंतु तुम्ही त्याचीही पर्वा न करता आमच्या सेवेत मग्न राहिलात. गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगल्या शिष्यांचे एवढेच कर्तव्य असते की, त्यांनी विशुद्ध भावनेने आपले सर्वस्व, एवढेच काय पण शरीरसुद्धा गुरुदेवांच्या सेवेसाठी समर्पित करावे. हे श्रेष्ठ द्विजांनो ! मी तुम्हांवर संतुष्ट आहे. तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होवोत आणि तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्ययन केले, ते या आणि परलोकीसुद्धा निष्फळ न होवो ! " प्रिय मित्रा ! आम्ही गुरुकुलात निवास करीत असताना अशा अनेक घटना घडल्या होत्या. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनुष्य शांती आणि पूर्णतेला प्राप्त करून घेतो. (३८-४३) ब्राह्मण म्हणाला- हे देवा, जगद्गुरो ! आता आम्हांला मिळवायचे काय शिल्लक आहे ? कारण, सत्यसंकल्प परमात्मा असलेल्या आपल्याबरोबर आम्हांला गुरुकुलात राहाण्याचे भाग्य प्राप्त झाले ! हे प्रभो ! छंदोबद्ध वेद आणि सर्व कल्याणे यांचे उत्पत्तिस्थान आहे तुमचे शरीर ! तेच आपण गुरुकुलात राहिलात , हा केवळ मनुष्यासारखा अभिनय नव्हे तर काय ? (४४-४५) अध्याय ऐंशीवा समाप्त |