|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७९ वा
बल्वलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! पर्वकाळ सुरू झाल्यावर मोठा झंझावर सुरू झाला. धुळीचा वर्षाव होऊ लागला आणि सगळीकडे पुवाची दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर यज्ञशाळेमध्ये बल्वल दानवाने मल-मूत्र इत्यादी अपवित्र वस्तू टाकल्या. एवढे झाल्यावर हातात शूळ घेतलेला तो स्वत: दिसला. काजळाच्या ढिगासारखे त्याचे प्रचंड काळेकुट्ट शरीर होते. त्याची शेंडी आणि दाढी-मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लालबुंद होत्या. उग्र दाढी आणि भुवयांच्यामुळे त्याचा चेहरा अतिशय भयानक दिसत होता. त्याला पाहून बलरामांनी शत्रूसेनेचा संंहार करणारे मुसळ आणि दैत्यांचा नाश करणार्या नांगराचे स्मरण केले. तत्काळ ती दोन्ही शस्त्रे तेथे आली. (१-४) आकाशात संचार करणार्या बल्वलाला बलरामांनी आपल्या नांगराच्या टोकाने ओढून घेऊन, त्या ब्रह्मद्रोहीच्या डोक्यावर अत्यंत क्रोधाने मुसळाचा घाव घातला. त्यामुळे वज्राच्या प्रहाराने कावेने लाल झालेला एखादा पहाड पडावा, त्याप्रमाणे कपाळ फुटून रक्ताच्या धारा वाहात असलेला तो आर्त किंकाळी फोडीत जमिनीवर कोसळला. नंतर त्या भाग्यवान मुनींनी बलरामांची स्तुती केली, कधीही व्यर्थ न होणारे आशीर्वाद दिले आणि देवांनी वृत्रासुराला मारणार्या इंद्राला अभिषेक करावा, त्याप्रमाणे त्यांना अभिषेक केला. त्यावेळी ऋषींनी बलरामांणा दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार अर्पण केले. तसेच कधीही न कोमेजणार्या कमळांची वैजयंती माळा अर्पण केली. (५-८) त्यानंतर ऋषींचा निरोप घेऊन बलराम ब्राह्मणांसह कौशिकी नदीवर आले व तेथे स्नान करून, जेथून शरयू नदी उगम पावते, त्या सरोवरावर गेले. तेथून शरयू नदीच्या काठाने जात जात प्रयागावर आले. तेथे स्नान व देवादिकांचे तर्पण करून तेथून पुलहाश्रमाला गेले. तेथून गंडकी, गोमती व विपाशा या नद्यांमध्ये स्नान करून नंतर शोणनदात स्नान केले. यानंतर गयेला जाऊन पितृतर्पण केले. तेथून गंगासागर संगमावर जाऊन तेथेही स्नान केले. नंतर महेंद्र पर्वतावर जाऊन तेथे परशुरामांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सप्त गोदावरी, वेणा, पंपा आणि भीमारथी इत्यादी नद्यांमध्ये स्नान करीत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी ते गेले. तसेच तेथून महादेवांचे निवासस्थान असलेल्या श्रीशैल पर्वतावर जाऊन पोहोचले. यानंतर द्रविड देशातील परम पुण्यमय अशा वेंकटाचलावर जाऊन श्रीव्यंकटेशाचे दर्शन घेतले आणि तेथून ते कामाक्षी, शिवकांची, विष्णुकांची करीत कावेरी नावाच्या श्रेष्ठ नदीत स्नान करून श्रीहरींचा निवास असलेल्या पुण्यमय अशा श्रीरंगक्षेत्री जाऊन पोहोचले. तेथून पुढे त्यांनी श्री विष्णूंचे क्षेत्र असलेला ऋषभ पर्वत, दक्षिण मथुरा आणि महापापे नष्ट करणार्या सेतुबंधची यात्रा केली. (९-१५) बलरामांनी तेथे ब्राह्मणांना दहा हजार गाई दान दिल्या. नंतर तेथून कृतमाला आणि ताम्रपर्णी नद्यांमध्ये स्नान करून सात कुलपर्वतांपैकी एक अशा मलयपर्वतावर ते गेले. तेथे असलेल्या अगस्त्य मुनींना त्यांनी नमस्कार आणि अभिवादन केले. त्यांचा आशीर्वाद व निरोप घेऊन बलराम दक्षिण समुद्रावर गेले. तेथे त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. यानंतर श्रीविष्णूंचे स्थान असलेल्या अनंतशयनम्-क्षेत्री गेले आणि तेथील श्रेष्ठ अशा पंचाप्सरस तीर्थामध्ये स्नान केले. तेथे त्यांनी दहा हजार गाई दान केल्या. (१६-१८) भगवान बलराम तेथून निघून केरळ आणि त्रिगर्त देशांना जाऊअ तेथून शंकरांचे क्षेत्र असलेल्या गोकर्णाला आले. तेथे भगवान शंकर नेहमी विराजमान असतात. तेथून त्यांनी द्वीपामध्ये निवास करणार्या आर्यादेवीचे दर्शन घेतले आणि तेथून शूर्पारक क्षेत्रात ते गेले. यानंतर तापी, पयोष्णी आणि निर्विन्ध्या नदीमध्ये स्नान करून ते दंडकारण्यात गेले. तेथे माहिष्मती नगराजवळ असणार्या नर्मदेवर गेले. तेथे मनुतीर्थात स्नान करून ते पुन्हा प्रभासक्षेत्री परतले. तेथेच ब्राह्मणांकडून, कौरव-पांडवांच्या युद्धामध्ये पुष्कळशा क्षत्रियांचा संहार झाला आहे, हे ऐकून पृथ्वीवरील बराचसा भार कमी झाला, असे त्यांना वाटले. रणभूमीवर ज्या दिवशी भीमसेन आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध चालू होते, त्याच दिवशी त्यांना थांबविण्यासाठी बलराम कुरुक्षेत्रात जाऊन पोहोचले. (१९-२३) परंतु युधिष्ठिर, नकुल, सहदेव, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी ते आल्याचे पाहून त्यांना वंदन केले व ते गप्प राहिले. हे काय सांगण्यासाठी येथे आले आहेत, हे त्यांच्या लक्षात येईना ! भीमसेन आणि दुर्योधन असे दोघेही त्यावेळी हातात गदा घेऊन एकमेकांवर विजय मिळविण्यासाठी म्हणून क्रोधाने निरनिराळे पवित्रे घेत होते. त्यांना पाहून बलराम म्हणाले. " हे राजा दुर्योधना ! हे भीमसेना ! तुम्ही दोघे तुल्यबळ वीर आहात. त्यांपैकी भीमसेनामध्ये ताकद अधिक आहे, आणि दुर्योधनामध्ये गदायुद्धाचे कौशल्य अधिक आहे, असे मी समजतो. म्हणून सारखेच बळ असणार्या तुमच्यांपैकी एकाचा जय व दुसर्याचा पराजय होईल, असे मला वाटत नाही. म्हणून हे व्यर्थ युद्ध तुम्ही थांबवा." (२४-२७) परीक्षिता ! बलरामांचे म्हणणे बरोबर होते; परंतु त्या दोघांमधील वैर इतके वाढले होते की, त्यांनी ते ऐकले नाही. कारण एकमेकांना पूर्वी केलेली दुरुत्तरे आणि एकमेकांशी केलेले दुर्व्यवहार यांचीच त्यांना एकसारखी आठवण येत होती. त्यांचे प्रारब्धच तसे आहे, असे म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता ते द्वारकेला परतले. तेथे उग्रसेन वगैरे प्रियजनांना ते भेटले. तेथून बलराम पुन्हा नैमिष्यारण्यात गेले. तेथील ऋषींनी, वैर, युद्ध इत्यादींचा त्याग केलेल्या बलरामांकडून आनंदाने सर्व प्रकारचे यज्ञ करविले. वास्तविक यज्ञ हे बलरामांचे अंगच होते. सर्वसमर्थ भगवान बलरामांनी त्या ऋषींना विशुद्ध तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. त्यामुळे ते सर्वजण, या संपूर्ण विश्वाला स्वत:मध्ये आणि स्वत:ला सगळ्या विश्वामध्ये असल्याचा अनुभव घेऊ लागले. नंतर नातलग व इष्टमित्रांसमवेत बलरामांनी पत्नीसह यज्ञन्त स्नान करून सुंदर वस्त्रालंकार धारण केले. त्यावेळी चंद्र चांदण्यामुळे शोभून दिसावा, त्याप्रमाणे ते शोभू लागले. भगवान बलराम अनंत असून त्यांचे स्वरूप, मनालाही न कळणारे आहे. त्यांनी मायेने मनुष्यासारखे शरीर धारण केले आहे. त्या बलशाली बलरामांच्या अशा चरित्रकथांची गणतीच करणॆ कठीण. जो मनुष्य अनंत व अद्भुत कर्मे करणार्या भगवान बलरामांच्या चरित्रकथांचे सायंकाळी आणि प्रात:काळी स्मरण करतो, तो भगवंतांणा प्रिय होतो. (२८-३४) अध्याय एकोणऐंशीवा समाप्त |