श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७८ वा

दंतवक्त्र आणि विदूरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सूताचा वध -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- महाराज ! शिशुपाल, शाल्व आणि पौंड्रक मारले गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे ऋण फेडण्यासाठी संतापलेला दुष्ट दंतवक्त्र हातात गदा घेऊन एकटाच, पायी-पायीच, युद्धभूमीवर येऊन थडकला. तो इतका शक्तिमान होता की, त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती. श्रीकृष्णांनी त्याला अशाप्रकारे येताना पाहून ताबडतोब हातात गदा घेऊन रथातून खाली उडी मारली आणि किनार्‍याने समुद्राला अडवावे, तसे त्याला अडविले. उन्मत्त दंतवक्त्राने गदा उगारून श्रीकृष्णांना म्हटले- " तू आज माझ्या दृष्टीसमोर आलास, हे फार चांगले झाले ! " (१-४)

हे कृष्णा ! तू माझा मामेभाऊ असलास , तरी तू माझ्या मित्रांना मारले असून मलासुद्धा मारू इच्छितोस. म्हणून मूर्खा ! आज मी तुला या वज्रासारख्या गदेने ठार करीन. अरे मूर्खा ! तू माझा भाऊ असलास तरी शत्रूही आहेस. मी माझ्या मित्रांवरील प्रेमामुळे. शरीरातील रोग नाहीसा करावा, तसा तुला मारूनच त्यांच्या ऋणातून मुक्त होईन. माहुत जसा अकुंशाने हत्तीला टोचतो, त्याप्रमाणे दंतवक्त्राने आपल्या कडवट शब्दांनी श्रीकृष्णांना टोचत त्यांच्या डोक्यावर गदा मारून सिंहाप्रमाणे गर्जना केली. रणभूमीवर गदेचा प्रहार झाला, तरी यदुश्रेष्ठ जागेवरून जराही हालले नाहीत. त्यांनी आपल्या प्रचंड अशा कौ‍मोदकी गदेने दंतवक्त्राच्या छातीवर प्रहार केला. गदेच्या प्रहाराने दंतवक्त्राची छाती फुटून तो तोंडातून रक्त ओकू लागला. त्याचे केस विखुरले, हात-पाय पसरले गेले आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला. परीक्षिता ! शिशुपालाच्या मृत्यूच्या वेळी जसे झाले होते तसेच, सर्वांच्या देखतच दंतवक्त्राच्या मृत शरीरातून एक अत्यंत सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णांमध्ये सामावून गेली. (५-१०)

त्याचा भाऊ विदूरथ भावाच्या मृत्यूने शोकाकुल झाला. तो क्रोधाने सुस्कारे टाकीत, हातात ढाल-तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्यासाठी आला. राजेंद्रा ! तो चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धार असलेल्या चक्राने किरीट-कुंडले असलेले त्याचे डोके उडाविले. अशा प्रकारे ज्यांना मारणे दुसर्‍या कोणालाही अशक्य होते, त्या शाल्व, त्याचे सौभ नावाचे विमान, दंतवक्त्र आणि विदूरथ यांना मारून श्रीकृष्णांनी सुशोभित द्वारकेत प्रवेश केला. त्यावेळी देव, माणसे, मुनी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, महानग व पितर त्यांची स्तुती करीत होते. तसेच अप्सरा, यक्ष, किन्नर, चारण त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांच्या विजयाचे गायन करीत होते. यावेळी वृष्णिवंशी यादव वीर त्यांच्यबरोबर चालले होते. योगेश्वर जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण अशा लीला करीत असता सदोदित विजयी होत असले तरी अविवेकी लोकांना पराजित झाल्यासारखे वाटतात. (११-१६)

बलरामांनी जेव्हा ऐकले की, कौरव, पांडवांशी युद्ध करण्याची तयारी करीत आहेत, तेव्हा तटस्थ राहाण्याच्या इच्छेने तीर्थयात्रेचा बहाणा करून ते द्वारकेतून बाहेर पडले. तेथून बाहेर पडून त्यांनी प्रभास क्षेत्रामध्ये स्नान केले आणि तेथे तर्पणाने देव, ऋषी, पितर यांना आणि भोजन घालून माणसांना तृप्त केले. नंतर काही ब्राह्मणांसह ते सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेने निघाले. ते अनुक्रमे पृथूदक, बिंदुसर, त्रितकूप, सुदर्शनतीर्थ, विशालतीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ आणि पूर्ववाहिनी सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्रांवर गेले. परीक्षिता ! त्यानंतर यमुना तटावरील आणि गंगातटावरील तीर्थे करीत ते त्या दिवसात जेथे ऋषी ज्ञानयज्ञ करीत होते, त्या नैमिष्यारण्यात गेले. दीर्घकाल यज्ञ करणारे ऋषी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच योग्यतेनुसार नमस्कार करून व आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला. ते आपल्या बरोबरच्या ब्राह्मणांसह आसनावर बसले. नंतर त्यांची पूजा केली. तेव्हा त्यांना दिसले की, व्यासांचा शिष्य रोमहर्षण व्यासपीठावर बसलेलाच आहे. सूतकुळात जन्मलेला असूनही हा रोमहर्षण त्या ब्राह्मणांपेक्षाही उच्च आसनावर बसला आहे. शिवाय आपण ब्राह्मणांसह आलो असता त्याने उठून आपले स्वागत केले नाही की हात जोडून प्रणामही केला नाही. यामुळे बलरामांना क्रोध आला. ते म्हणाले की, " हा रोमहर्षण प्रतिलोम (क्षत्रियापासून ब्राह्मणस्त्रीला झालेला) असूनही या श्रेष्ठ ब्राह्मणांपेक्षा तसेच धर्माचे रक्षक असलेल्या आमच्यापेक्षाही उच्च आसनावर बसला असल्याकारणाने, हा अविवेकी मृत्यूदंडास पात्र आहे. भगवान व्यासमहर्षींचा शिष्य असून याने इतिहास, पुराणे, धर्मशास्त्रे इत्यादी पुष्कळशा शास्त्रांचे अध्ययनसुद्धा केले आहे. परंतु अजून याचा आपल्या मनावर संयम नाही. हा उद्दाम आहे. या गर्विष्ठाने स्वत:ला व्यर्थ पंडित मानले आहे. नटाप्रमाणे याचे अध्ययन हे केवळ सोंग आहे. याच्यापासून याला स्वत:लाही लाभ नाही की दुसर्‍यालाही नाही. (१७-२६)

जे लोक धार्मिकतेचे ढोंग करून धर्माचे पालन करीत नाहीत, ते अधिक पापी होत. त्यांना शासन करण्यासाठीच मी या जगात अवतात घेतला आहे. " तीर्थयात्रा करीत असल्याकारणाने जरी भगवान बलराम दुष्टांचा वध करण्यापासून परावृत्त झाले होते, तरीसुद्धा त्यांनी आपल्या हातातील दर्भाच्या टोकाने त्याच्यावर प्रहार केला व तो मरण पावला. कारण हे असेच व्हायचे होते. सूत मरण पावताच सर्व ऋषी हळहळले. देव बलरामांना ते म्हणाले, " प्रभो! हा आपण मोठा अधर्म केलात. हे यदुनंदना ! आम्हीच त्यांना ब्रह्मासन दिले होते आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही, तोपर्यंत शारीरिक कष्टरहित आयुष्यही दिले होते. आपण अजाणतेपणाने का असेना, केलेली ही ब्रह्महत्याच आहे. आपण योगेश्वर आहात, त्यामुळे वेदसुद्धा आपल्याला आज्ञा करू शकत नाहीत. तरीसुद्धा आपला अवतार लोकांना पवित्र करण्यासाठी झाला असल्यामुळे आपण कोणाच्याशी प्रेरणेशिवाय स्वत:च आपल्या इच्छेने या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त घ्यावे. त्यामुळे लोकांना धडा मिळेल." (२७-३२)

श्रीबलराम म्हणाले- लोकांपुढे आदर्श ठेवण्याची कृपा करण्यासाठी या ब्रह्महत्येसाठी मी प्रायश्चित्त घेईन. म्हणून यासाठी प्रथम श्रेणीचे प्रायश्चित्त आपण मला सांगावे. या सूताला आपण दीर्घायुष्य, बळ, इंद्रियांची शक्ती इत्यादी जे काही देऊ इच्छिता, ते मला सांगा. मी आपल्या योगमायेने सर्व काही साध्य करून देईन. (३३-३४)

ऋषी म्हणाले- हे बलरामा ! आपण असे करा की, ज्यायोगे आपले शस्त्र, पराक्रम आणि याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ होणार नाही. शिवाय आमचेही वरदान खरे ठरेल. (३५)

श्रीबलराम म्हणाले- ऋषींनो ! वेदवचन असे आहे की, आत्माच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो. म्हणून रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र आपल्याला कथा सांगेल. तसेच त्याला दीर्घायुष्य, इंद्रियांची शक्ती आणि बल प्राप्त होईल. (३६)

ऋषींनो ! याखेरीज आपण जे काही इच्छित असाल, ते मला सांगा. मी आपली इच्छा पूर्ण करीन, अजाणतेपणाने माझ्या हातून जो अपराध घडला आहे, त्याचे प्रायश्चित्त आपण विचार करून मला सांगावे. कारण आपण ज्ञानी आहात. (३७)

ऋषी म्हणाले- बल्वल नावाचा इल्वलाचा पुत्र एक भयंकर दानव आहे. तो प्रत्येक पर्वकाळी येथे येऊन आमचे सत्र दूषित करतो. हे यदुनंदना ! तो येथे येऊन पू, रक्त, विष्ठा, मूत्र, दारू आणि मांस टाकू लागतो. त्या पाप्याला आपण मारा. ही आमची तुमच्याकडून फार मोठी सेवा होईल. त्यानंतर आपण एकाग्र चित्ताने तीर्थांमध्ये स्नान करीत एक वर्षपर्यंत भारतवर्षाची प्रदक्षिणा करा. त्यामुळे आपण शुद्ध व्हाल. (३८-४०)

अध्याय अठ्ठ्याहत्तरावा समाप्त

GO TOP