|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७७ वा
शाल्वाचा उद्धार - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- प्रद्युम्नाने हात-तोंड धुऊन कवच चढवून धनुष्य घेतले आणि तो सारथ्याला म्हणाला, " मला वीर द्युमानाकडे घेऊन चल. " द्युमान त्यावेळी यादवसेनेची धूळधाण करीत होता. प्रद्युम्नाने त्याचा प्रतिकार करून हसत हसत त्याच्यावर आठ बाण सोडले. चार बाणांनी त्याचे चार घोडे आणि एकेका बाणाने सारथी, धनुष्य, ध्वज आणि त्याचे मस्तक उडविले, इकडे गद, सात्यकी, सांब इत्यादी वीरसुद्धा शाल्वाच्या सेनेचा संहार करू लागले. सौभ विमानात बसलेल्या सैनिकांची मस्तके तुटून समुद्रात जाऊन पडत. अशा प्रकारे यादव आणि शाल्वाचे सैनिक एकमेकांवर प्रहार करीत राहिले. असे हे अतिशय घनघोर आणि भयंकर युद्ध सत्तावीस दिवस चालले. (१-५) त्यावेळी युधिष्ठिराच्या आमंत्रणावरून भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले होते. राजसूय यज्ञाची पूर्तता झाली होती आणो शिशुपालाचाही मृत्यू झाला होता. तेथे श्रीकृष्णांनी मोठे भयानक अपशकुन होत असलेले पाहून कुरुवंशातील ज्येष्ठ, ऋषी, कुंती आणि पांडव यांचा निरोप घेऊन द्वारकेकडे प्रयाण केले. ते मनात म्हणू लागले की, " मी वडिल बंधूसह येथे आलो. आता शिशुपालाच्या पक्षातील राजे द्वारकेवर निश्चितच आक्रमण करतील. द्वारकेला पोहोचल्यावर ते युद्ध पाहून श्रीकृष्णांनी नगराचे रक्षण करण्याचे काम बलरामांच्याकडे सोपविले आणि सौभपती शाल्वाला पाहून आपला सारथी दारुक याला म्हटले. " दारुका ! तू लवकर माझा रथ शाल्वाजवळ घेऊन चल. हा शाल्व अतिशय मायावी आहे, तरीसुद्धा तू भिऊ नकोस. भगवंतांची अशी आज्ञा होताच दारुक गरुडध्वज रथावर आरूढ झाला आणि तो रथ शाल्वाकडे घेऊन चालला. दोन्ही सेनेतील सैनिकांनी युद्धभूमीवर प्रवेश करताना तो पाहिला. आतापर्यंत शाल्वाची बहुतेक सेना नष्ट झाली होती. श्रीकृष्णांना पाहाताच त्याने त्यांच्या सारथ्यावर प्रचंड आवाज करणारी शक्ती फेकली. ती शक्ती एखाद्या उल्केसारखी आकाशातून वेगाने चालाली होती. तिच्या प्रकाशाने सर्व दिशा उजळून निघाल्या. ती सारथ्याकडे येत असलेली पाहुन श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी तिचे शेकडो तुकडे केले. त्यानंतर त्यांनी शाल्वाला सोळा बाण मारले आणि आकाशातून फिरणारे विमानसुद्धा, सूर्याने आपल्या किरणांनी आकाश व्यापावे, त्याप्रमाणे असंख्य बाणांनी व्यापून टाकले. शाल्वाने शार्ड्ग.धनुष्याने शोभून दिसणार्या श्रीकृष्णांच्या डाव्या हातावर बाण मारला. त्यामुळे शार्ड्ग.धनुष्य भगवंतांच्या हातातून गळून पडले. ही एक अद्भूत अशीच घटना घडली. जे लोक हे युद्ध पाहात होते, त्यांच्यात मोठा हाहाकार उडाला. तेव्हा शाल्व गर्जना करून श्रीकृष्णांना म्हणाला. (६-१६) " अरे मूर्खा ! तू आमच्या देखतच आमचा भाऊ आणि मित्र असलेल्या शिशुपालाच्या भावी पत्नीला हिरावून घेतलेस आणि तो बेसावध असताना भर सभेत त्याला मारलेस. तू स्वत:ला अजिंक्य समजतोस, हे मला माहित आहे. तू आज जर माझ्यासमोर थांबलास, तर मी तुला माझ्या तीक्ष्ण बाणांनी अशा ठिकाणी पाठवीन की, जेथून कोणी परत येत नाही. (१७-१८) श्रीभगवान म्हणाले- " अरे निर्बुद्धा ! तू विनाकारणच बडबड करीत आहेस. तुझा मृत्यू तुझ्या डोक्यावर घिरट्या घालीत आहे, हे तुला माहीत नाही, खरे शूर आपले शौर्य दाखवितात, व्यर्थ बडबड करीत नाहीत. " असे म्हणून श्रीकृष्णांनी रागाने वेगवान अशा भयानक गदेने शाल्वाच्या खांद्यावर प्रहार केला. त्यामुळे तो रक्त ओकीत थरथर कापू लागला. इकडे गदा जेव्हा भगवंतांकडे परत आली, तेव्हा शाल्व अदृश्य झाला. यानंतर थोड्याच वेळात एक मनुष्य श्रीकृष्णांकडे आला व मस्तक लववून त्यांना नमस्कार करून, रडत रडतच म्हणाला, " मला देवकींनी पाठविले आहे. त्यांनी सांगितले आहे की, पित्याबद्दल अत्यंत प्रेम असणार्या हे महाबाहो श्रीकृष्णा ! एखादा कसाई ज्याप्रमाणे पशूला बांधून नेतो, त्याप्रमाणे शाल्व तुझ्या पित्याला बांधून घेऊन गेला आहे. " ही दु:खद बातमी ऐकून श्रीकृष्ण सामन्य माणसाप्रमाणे झाले. त्यांच्या चेहर्यावर औदासीन्य दिसू लागले. सामान्य माणसाप्रमाणे ते व्याकूळ होऊन मनात प्रेम दाटून येऊन म्हणू लागले. " अहो ! देवदानवांना अजिंक्य व नेहमी सावध असणार्या बलरामाला य:कश्चित् शाल्वाने जिंकून माझ्या वडिलांना कसे काय बांधून नेले? प्रारब्ध बलवत्तर असते, हेच खरे !" श्रीकृष्ण असे म्हणत आहेत, तेवढ्यात वसुदेवासारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्व तेथे आला आणि श्रीकृष्णांना म्हणू लागला. " अरे मूर्खा ! पहा ! हाच तुला जन्म देणारा तुझा पिता आहे, ज्याच्यासाठी तू जगत आहेस. तुझ्या देखतच मी याला आता ठार मारतो. तुझ्या अंगात ताकद असेल, तर याला वाचव ! " मायावी शाल्वाने अशाप्रकारे श्रीकृष्णांची निर्भत्सना करून वसुदेवाचे मस्तक तलवारीने उडविले आणि ते घेऊन तो आकाशात सौभ विमानात जाऊन बसला. श्रीकृष्ण स्वत: सिद्ध ज्ञास्वरूप आणि महाप्रभावी असूनही पित्यावरील प्रेमामुळे क्षणभर सामान्य माणसाप्रमाणे दु:खसागरात बुडून गेले. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की, ही शाल्वाने पसरलेली माया आहे. ही त्याला मय दानवाने शिकविली होती. श्रीकृष्णांनी सावध होऊन युद्धभूमीवर पाहिले, तर तेथे दूत नव्हता की पित्याचे ते शरीरही नव्हते. ते जसे एखादे स्वप्न होते. दुसरीकडे पाहिले, तर शाल्व विमानात बसून आकाशात फिरत आहे. तेव्हा ते त्याचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले. (१९-२९) हे परीक्षिता ! मागचा पुढचा विचार न करणारे काही ऋषी अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगतात. श्रीकृष्णांच्या बाबतीत असे म्हणणे हे ते ’मायापती’ असल्याचे जे पूर्वी वर्णन केले, त्याच्या विरोधी आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी असणारे शोक, मोह, स्नेह आणि भय हे कोठे ! आणि कोठे ते परिपूर्ण भगवान की ज्यांचे ज्ञान, विज्ञान आणि ऐश्वर्य अखंडित आहे ! ज्यांच्या चरणकमलांची सेवा करून चांगल्या रीतीने प्राप्त झालेल्या आत्मविद्येने शरीर इत्यादींमध्ये आत्मबुद्धीस्वरूप अनादी अज्ञान नाहीसे करतात व आत्म्यासंबंधी अनंत ऐश्वर्य प्राप्त करून घेतात, त्या संतांचे परम गतिस्वरूप असणार्या श्रीकृष्णंच्या ठिकाणी मोह कसा असू शकेल बरे ? (३०-३२) शाल्व श्रीकृष्णांच्यावर अतिशय त्वेषाने शस्त्रांचा वर्षाव करू लागला. अमोघ पराक्रम असलेल्या भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्या बाणांनी शाल्वाला घायाळ केले आणि त्याचे कवच, धनुष्य आणि डोक्यावरील मणी हे सर्व छिन्नभिन्न करून टाकले. त्याचबरोबर गदेच्या प्रहाराने त्याचे विमानही तोडून फोडून टाकले. श्रीकृष्णांनी फेकलेल्या गदेमुळे त्या विमानाचे हजारो तुकडे होऊन ते समुद्रात पडले. त्यापूर्वीच हातात गदा घेऊन शाल्वाने जमिनीवर उडी मारली आणि वेगाने त्याने श्रीकृष्णांवर झेप घेतली. (३३-३४) शाल्व आक्रमण करीत आहे असे पाहाताच त्यांनी भाल्याने त्याचा हात गदेसह उखडून टाकला. नंतर त्याला मारण्यासाठी त्यांनी प्रलयकालीन सुर्याप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत अद्भूत असे सुदर्शन चक्र धारण केले. त्यावेळी ते सूर्य उगवत असलेल्या उदयाचलाप्रमाणे दिसत होते. ज्याप्रमाणे इंद्राने वज्राने वृत्रासुराचे मस्तक उडवले होते त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्या चक्राने परम मायावी शाल्वाचे किरीटकुंडलयुक्त डोके धडापासून वेगळे केले. त्यावेळी शाल्वाच्या सैनिकांत हाहाकार उडाला. परीक्षिता ! पापी शाल्व जेव्हा मरण पावला आणि त्याच्या विमानाचासुद्धा गदेच्या प्रहाराने चक्काचूर झाला, तेव्हा देव आकाशात दुंदुभि वाजवू लागले. याचवेळी मित्रांच्या वधाचा बदला घेण्यासाठी दंतवक्त्र अत्यंत क्रुद्ध होऊन तेथे आला. (३५-३७) अध्याय सत्त्याहत्तरावा समाप्त |