|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७६ वा
शाल्वाबरोबर यादवांचे युद्ध - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! मनुष्यासारखी लीला करणार्या भगवान श्रीकृष्णांचे आता आणखी एक अद्भूत चरित्र ऐक. त्यांनी शाल्वाला कसे मारले, ते सांगतो. शाल्व हा शिशुपालाचा मित्र होता आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळी तो आलेला होता. त्यावेळी यादवांनी युद्धामध्ये जरासंध इत्यादींच्याबरोबर शाल्वालाही जिंकले होते. सर्व राजांच्या समक्ष त्या दिवशी शाल्वाने प्रतिज्ञा केली होती की, " मी पृथ्वीवरून यादवांचे नाव पुसून टाकीन. पाहाच माझे सामर्थ्य ! " परीक्षिता ! अशी प्रतिज्ञा करून मूर्ख शाल्वाने देवाधिदेव पशुपतींची आराधना सुरू केली. त्याकाळी तो दिवसभरात फक्त एक वेळ मूठभर धूळ खात असे. भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारे असल्याने त्यांनी एक वर्षानंतर प्रसन्न होऊन शरण आलेल्या शाल्वाला वर मागण्यास सांगितले. त्यावेळी शाल्वाने असा वर मागितला की, " मला आपण एक असे विमान द्या की ,जे देव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग आणि राक्षस यांना नष्ट करता येणार नाही. इच्छा असेल तिकडे जाईल आणि यदुवंशीयांसाठी अत्यंत भयानक असेल. " भगवान शंकर म्हणाले, ’तथास्तु’. त्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार पराक्रमी मय दानवाने लोखंडाचे सौभ नावाचे विमान तयार केले आणि ते शाल्वाला दिले. ते विमान म्हणजे एक नगरच होते. ते इतके अंधकारमय होते की, त्याला पाहाणे किंवा पकडणे अतिशय अवघड होते. शाल्वाची इच्छा असेल, तेथे ते जात असे. यादवांनी केलेला पराभव आठवून शाल्वाने ते विमान घेऊन द्वारकेवर चढाई केली. (१-८) शाल्वाने आपल्या अवाढव्य सेनेद्वारा द्वारकेला चारी बाजूंनी घेरले आणि नंतर तेथील फळा फुलांनी लहडलेली उपवने, उद्याने, तो उध्वस्त करू लागला. तसेच नगरातील गोपुरे, दारे, राजवाडे, गच्च्या, भिंती व नागरिकांची मनोरंजनस्थळे नष्ट करू लागला. त्या श्रेष्ठ विमानातून शस्त्रांचा वर्षाव होऊ लागला. शिलाखंड, झाडे, विजा, साप आणि गारा पडू लागल्या. अत्यंत तुफान वादळ सुरू झाले. धुळीने दिशा दिसेनाशा झाल्या. पूर्वी ज्याप्रमाणे त्रिपुरासुराने पृथ्वीला त्रस्त करून सोडले होते, त्याचप्रमाणे शाल्वाच्या विमानाने द्वारकापुरीला अतिशय त्रस्त केले. तेथील लोकांची सुखशांती नष्ट झाली. आपल्या प्रजेला अतिशय कष्ट होत आहेत, असे जेव्हा परमयशस्वी वीर प्रद्युम्नाने पाहिले, तेव्हा तो रथावर आरूढ होऊन सर्वांना धीर देत म्हणाला, " भिऊ नका. " त्यांच्या पाठोपाठ सात्यकी, चारुदेष्ण, सांब, भावांसह अक्रूर, कृतवर्मा, भानुविंद, गद, शुक, सारण इत्यादी अनेक वीर मोठमोठी धनुष्ये हातात घेऊन निघाले. ते सर्वजण महारथी होते. सर्वांनी कवचे घातली होती आणि सर्वांचे रक्षण करण्यासाठी रथ, हत्ती, घोडे तसेच पायदळ सेना बरोबरीने चालत होती. यानंतर, पूर्वी जसे देवांबरोबर असुरांचे घनघोर युद्ध झाले होते, त्याचप्रमाणे शाल्वाचे सैनिक आणि यादव यांचे युद्ध होऊ लागले. ते बघून लोकांच्या अंगावर शहारे येत. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रखर किरणांनी रात्रीचा अंधार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे प्रदुम्नाने आपल्या दिव्य अस्त्रांनी क्षणातच सौभपती शाल्वाच्या सर्व माया नष्ट केल्या. प्रद्युम्नाच्या बाणांना सोन्याचे पंख व लोखंडी फाळ लावलेले होते. त्यांच्या गाठी दिसत नव्हत्या. अशा पंचवीस बाणांनी त्याने शाल्वाच्या सेनापतीला घायाळ केले. तसेच शाल्वालासुद्धा शंभर बाण मारले. नंतर प्रत्येक सैनिकाला एक एक, सारथ्यांना प्रत्येकी दहा आणि वाहनांना तीन तीन बाण मारले. महावीर प्रद्युम्नाचे हे अद्भूत आणि महान कृत्य पाहून त्याचे आणि शत्रूपक्षाचेही सैनिक त्याची प्रशंसा करू लागले. मय दानवाने तयार केलेले शाल्वाचे ते विमान मायावी होते. ते इतके विचित्र होते की, कधी ते अनेक रूपांत दिसे, तर कधी एकाच रूपात. कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे. शत्रूंना त्याचा पताही लागत नसे. ते कधी जमिनीवर दिसे, तर कधी आकाशत उडत असे. कधी पर्वताच्या शिखरावर चढत असे, तर कधी पाण्यावर तरंगू लागे. ते कोलिताप्रमाणे फिरत राही. ते कोठेच स्थिर राहात नसे. आपले विमान आणि सैनिक यांच्यासह जेथे जेथे शाल्व त्यांच्या दृष्टीस पडत असे, तेथे तेथे यादव सेनापती बाणांचा वर्षाव करीत होते. सूर्य आणि अग्नीप्रमाणे जळत जाणारे त्यांचे बाण विषारी सापांप्रमाणे असह्य होत होते. शाल्वाचे नगराकार विमान आणि सेना त्यामुळे अत्यंत व्याकुळ झाली. शाल्वही मूर्च्छा येऊन पडला. (९-२४) शाल्वाच्या सेनापतींनीसुद्धा यादवांवर पुष्कळ शस्त्रांचा वर्षाव केला होता. त्यामुळे त्यांना अतिशय क्लेश होत होते. परंतु त्यांनी रणांगण सोडले नाही. कारण ते विचार करीत होते की, मरण आले तर स्वर्ग मिळेल आणि जिवंत राहिलो तर विजय मिळेल. ज्याला आधी प्रद्युम्नाने पंचवीस बाण मारले होते, त्या शाल्वाच्या द्युमान नावाच्या बलवान मंत्र्याने झेप घेऊन प्रद्युम्नावर पोलादी गदेचा जोराने प्रहार केला आणि " मारले ! मारले ! " म्हणून तो मोठ्याने ओरडला. शत्रूंचे दमन करणार्या प्रद्युम्नाने वक्ष:स्थळ गदेच्या आघाताने जखमी झाले. दारुकाचा पुत्र त्याचा सारथी होता. सारथिधर्मानुसर त्याने त्याला रणभूमीवरून बाजूला नेले. दोन घटकांनंतर प्रद्युम्न शुद्धीवर आला. तेव्हा तो सारथ्याला म्हणाला, " हे सूता ! तू मला रणभूमीवरून बाजूला आणलेस, हे अगदी वाईट केलेस. आमच्या वंशातील कोणताही वीर रणभूमी सोडून निघून गेला, असे आम्ही कधी ऐकले नाही. हा कलंक फक्त माझ्या माथ्यावरच लागला आहे. हे सूता ! खरोखर तू षंढ आहेस. आता मी माझे चुलते बलराम आणि वडिल श्रीकृष्ण यांच्यासमोर जाऊन काय सांगू ? मी युद्धातून पळून आलो, असेच आता सर्वजण म्हणतील. त्यांनी विचारल्यावर मी त्यांना योग्य असे काय उत्तर देऊ? " माझ्या भावजया माझी खिल्ली उडवीत मला स्पष्टपणे विचारतील की, " सांग ना ! हे वीरपुरुषा ! तू षंढ कसा निपजलास? युद्धात तुझे शत्रूंशी युद्ध कसे झाले?" (२५-३१) सारथी म्हणाला- कुमार ! मी जे काही केले ते सारथ्याचा धर्म जाणूनच केले. हे स्वामी ! संकट आल्यावर सारथ्याने रथात बसलेल्याचे रक्षण करावे आणि रथीने सारथ्याचे, हाच धर्म होय. हे जाणूनच मी आपल्याला रणभूमीवरून दूर नेले. शत्रूने आपल्यावर गदेचा प्रहार केल्यामुळे आपण बेशुद्ध झाला होतात. (३२-३३) अध्याय शाहत्तरावा समाप्त |