|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७५ वा
राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधानाचा अपमान - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षिताने विचारले- मुनिवर्य ! अजातशत्रू धर्मराजाचा राजसूय यज्ञमहोत्सव पाहून जे राजे, ऋषी, मुनी, देव इत्यादी आले होते, ते सर्वजण आनंदित झाले; पण दुर्योधन मात्र नाही. ही गोष्ट मी आपल्या तोंडून ऐकली. भगवन ! आपण याचे कारण सांगावे. (१-२) श्रीशुक म्हणाले- परीक्षिता ! तुझे थोर आजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवाकार्ये स्वीकारली होती. भीमसेन भोजनप्रमुख होता. दुर्योधन खजिनदार होता. सत्काराचे काम सहदेवाकडे होते आणि वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचे काम नकुल पाहात होता. अर्जुन गुरुजनांची सेवा करीत होता आणि श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचे काम करीत होते. भोजन वाढण्याचे काम द्रौपदी करीत होती आणि उदार कर्ण दाने देत होता. परीक्षिता ! याचप्रमाणे सात्यकी, विकर्ण, हार्दिक्य, विदुर इत्यादी तसेच भूरिश्रवा इत्यादी बाल्हीकाचे पुत्र आणि संतर्दन इत्यादींना राजसूय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामांवर नियुक्त केले होते. ते सर्वजण राजाला आवडेल अशा प्रकारे कामे करीत होते. (३-७) ऋत्विज, सदस्य, ज्ञानी पुरुष, इष्ट-मित्र व बांधव यांचा, गोड वाणी, पूजा आणि दक्षिणा इत्यादींनी उत्तम प्रकारे सत्कार झाला, तसेच शिशुपाल भक्तवत्सल भगवंतांच्या चरणी विलीन झाला. त्यानंतर सर्वांनी गंगेत अवभृथस्नान केले. या स्नानाच्या सोहळ्याच्या वेळी मृदंग, शंख, ढोल, नौबती, नगारे, शिंगे इत्यादी निरनिराळी वाद्ये वाजू लागली. नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. गवयी गटागटांनी गाऊ लागले. वीणा, बासर्या, टाळ-झांजा वाजू लागल्या. यांचा तुंबळ आवाज सगळ्या आकाशात दुमदुमू लागला. सोन्याचे हार गळ्यात घातलेले यदू, सृंजय, कांबोज, कुरु, केकय आणि कोसल देशाचे राजे युधिष्ठिर महाराजांना पुढे करून रंगी-बेरंगी ध्वजपताकांनी युक्त आणि खूप सजविलेल्या अशा हत्ती, रथ, घोडे व सैनिक अशा वतुरंग सेनेसह पृथ्वीचा थरकाप करीत चालले होते. यज्ञाचे सदस्य, ऋत्विज आणि पुष्कळसे विद्वान ब्राह्मण वेदमंत्रांचे उच्च स्वराने पठन करीत चालले होते. त्यावेळी देव, ऋषी, पितर, गंधर्व आकाशातून फुलांचा वर्षाव करीत त्यांची स्तुती करीत होते. यावेळी स्त्री-पुरुष सुगंधी द्रव्ये, फुलांचे हार, रंगी-बेरंगी वस्त्रे आणि बहुमुल्य अलंकारांनी नटून-थटून एकमेकांवर पाणी, तेल, दूध, लोणी इत्यादी टाकून त्यांना भिजवीत, ते एकमेकांच्या अंगाला लावीत खेळ करीत होते. वारांगना पुरुषांना तेल, दूध, सुगंधित पाणी, हळद आणि दाट केशर लावीत आणि पुरुषासुद्धा त्यांना त्याच वस्तूंनी चिंब भिजवीत. (८-१५) तो उत्सव पाहाण्यासाठी त्यावेळी ज्याप्रमाणे उत्तमोत्तम विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळशा देवी आल्या होत्या, त्याचप्रमाणे रक्षणासाठी बरोबर असलेल्या सैनिकांसह राण्या निरनिराळ्या वाहनांत बसून आल्या होत्या. पांडवांचे मामेभाऊ श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकीत होते. यामुळे त्या राण्यांचे लाजेने चूर झालेले चेहरे स्मित हास्याने खुलून दिसत होते. त्या राण्यांची वस्त्रे भिजल्यामुळे त्यांच्या शरीराचे वक्ष:स्थळ, मांड्या, कंबर इत्यादी अवयव दिसू लागले होते. त्यासुद्धा पिचकार्यांनी आपले दीर आणि त्यांच्या मित्रांवर रंग उडवीत होत्या. या धावपळीमुळे त्यांच्या वेण्या सुटून त्यांमध्ये माळलेली फुले ओघळून पडत होती. त्यांचा हा मनोहर विहार पाहून कामी पुरुषांचे चित्त चंचल होत होते. (१६-१७) चक्रवर्ती राजा युधिष्ठिर द्रौपदी इत्यादी राण्यांसह सुंदर घोडे जुंपलेल्या व सोन्याच्या हारांनी सजविलेल्या रथात बसला होता. त्यावेळी तो प्रयाजादी क्रियांनी युक्त असा मूर्तिमंत राजसूय यज्ञ वाटत होता. ऋत्विजांनी पत्नीसंयाज नावाचा याग व यज्ञान्त-स्नानासंबंधी कर्म करवून द्रौपदीसह युधिष्ठिराकडून आचमन व संकल्प करवून गंगास्नान करविले. त्यावेळी माणसे आणि देवतासुद्धा दुंदुभी वाजवू लागल्या. तसेच देव, ऋषी, पितर आणि लोक फुलांचा वर्षाव करू लागले. युधिष्ठिराने स्नान केल्यानंतर सर्व वर्णांच्या आणि आश्रमांच्या लोकांनी गंगेमध्ये स्नान केले. कारण या स्नानामुळे महापापी-सुद्धा पापराशीतून ताबडतोब मुक्त होतात. त्यानंतर धर्मराजाने नवी रेशमी वस्त्रे परिधान केली व बहुमोल अलंकार घातले. नंतर ऋत्विज, सदस्य, ब्राह्मण इत्यादींना वस्त्रे, अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचे पूजन केले. भगवत्सपरायण राजाने बांधव, कुटुंबीय, राजे, इष्ट-मित्र, हितचिंतक आणि इतरही लोक यांचा वारंवार सत्कार केला. त्यावेळी सर्व लोकांनी रत्नजडित कुंडले, फुलांचे हार, पगड्या, लांब अंगरखे, रेशमी वस्त्रे व रत्नांचे बहुमोल हार घातल्याने ते देवतांसारखे शोभून दिसत होते. कानांमधील कुंडले आणि कुरळे केस यांमुळे ज्यांची मुखकमले शोभून दिसत होती, अशा स्त्रिया कमरपट्ट्यांमुळे विशेष सुंदर दिसत होत्या. (१८-२४) परीक्षिता ! राजसूय यज्ञामध्ये चारित्र्यसंपन्न ऋत्विज, वेदवेत्ते सदस्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, राजे, देव, ऋषी, पितर, अनुयायांसह लोकपाल इत्यादी जे आले होते, त्या सर्वांचा युधिष्ठिराने सत्कार केला. त्यानंतर ते सर्वजण धर्मराजांचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानाकडे गेले. अमृतपान करीत असताना माणूस जसा कधीच तृप्त होत नाही, त्याप्रमाणे सर्व लोक भगवद्भक्त राजर्षी युधिष्ठिराच्या राजसूय महायज्ञाची कितीही प्रशंसा करून तृप्त होत नव्हते. यानंतर धर्मराजाने मोठ्या प्रेमाने आपले आप्तेष्ट, संबंधी, बांधव आणि भगवान श्रीकृष्ण यांना थांबवून ठेवले. कारण त्यांच्या विरहाच्या कल्पनेनेच त्याला दु:ख होत होते. परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांनी सांब इत्यादी यादववीरांना द्वारकापुरीला पाठविले आणि स्वत: युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी ते तेथेच राहिले. अशाप्रकारे पार करण्यास अत्यंत कठीण असा राजसूय यज्ञाच्या मनोरथाचा महासागर धर्मनंदन राजाने श्रीकृष्णांच्या कृपेने सहजपणे पार केला आणि त्याची सर्व काळजी मिटली. (२५-३०) एके दिवशी भगवंतांचा भक्त असलेल्या युधिष्ठिराच्या अंत:पुरातील संपत्ती व राजसूय यज्ञ केल्यामुळे त्याला प्राप्त झालेले महत्त्व पाहून दुर्योधनाला मत्सर वाटू लागला. परीक्षिता ! मय नावाच्या दानवाने पांडवांसाठी जे प्रासाद बनविले होते, त्यांमध्ये राजे, दैत्यराजे आणि सुरेन्द्र या सर्वांजवळ असणारे नाना प्रकारचे ऐश्वर्य एकवटले होते. त्या सर्वांच्याद्वारा द्रौपदी तेथे आपल्या पतींची सेवा करीत होती. त्यावेळी त्या राजभवनांत श्रीकृष्णांच्या हजारो राण्या राहात होत्या. त्या जेव्हा राजभवनात नितंबांच्या भारामुळे हळूहळू चालत, तेव्हा त्यांच्या नूपुरांचा आवाज सगळीकडे पसरत असे. त्यांचे कटिप्रदेश अत्यंत सुंदर होते. तसेच त्यांच्या वक्ष:स्थळावर लावलेया केशराच्या लालिम्याने मोत्यांचे शुभ्र हार लालसर वाटत होते. कुंडले घातलेली व कुरळे केस भुरभुरत असलेली त्यांची मुखकमले विशेषच शोभून दिसत होती. हे सर्व पाहून द्रौपदीच्या ठिकाणी आसक्त असलेल्या दुर्योधनाच्या अंत:करणात जळफळाट होऊ लागला. (३१-३३) राजाधिराज युधिष्ठिर एके दिवशी आपले बंधू. संबंधी आणि आपला नेत्रच असे श्रीकृष्ण यांच्यासह मय दानवाने बनविलेल्या सभेत सुवर्णसिंहासनावर इंद्राप्रमाणे विराजमान झाला होता. त्याचे ऐश्वर्य ब्रह्मदेवाच्या ऐश्वर्यासारखे होते. भाट त्याची स्तुती करीत होते. त्याच वेळी अभिमानी दुर्योधन आपल्या भावांसह तेथे आला. त्याच्या डोयावर मुकुट, गळ्यामध्ये हार आणि हातत तलवार होती. परीक्षिता ! तो हार रागाने तेथील सेवकांना दरडावीत होता. मय दानवाने त्या सभेत अशी किमया केली होती की, दुर्योधन मोहित होऊन जमिनीला पाणी समजून त्याने आपली वस्त्रे वर केली आणि पाण्याला जमीन समजून तो तेथे आपटला. तो पडल्याचे पाहून भीमसेन, राण्या आणि अन्य राजे हसू लागले. त्यावेळी युधिष्ठिर जरी त्यांना मनाई करीत होता, तरी श्रीकृष्णांची त्यांना संमती होती. या घटनेमुळे दुर्योधन लज्जित झाला. तो क्रोधाने जळू लागला. आता तो मान खाली घालून गुपचुपपणे सभाभवनातून बाहेर पडून हस्तिनापुरला गेला. ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हाहाकार माजला आणि धर्मराज काहीसा खिन्न झाला. भगवान श्रीकृष्ण मात्र गप्प बसले होते. कारण कोणत्याही प्रकारे का होईना, पृथ्वीचा भार त्यांना कमी करायचा होता. खरे तर त्यांनी पाहिल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता. परीक्षिता ! त्या महान राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा जळफळाट का झाला, हे तू मला विचारले होतेस. ते सर्व मी तुला सांगितले. (३४-४०) अध्याय पंचाहत्तरावा समाप्त |