श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७४ वा

भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- जरासंधाच वध आणि सर्वशक्तिमान श्रीकृष्णांचा तो महिमा ऐकून राजा युधिष्ठिर प्रसन्न होऊन म्हणाला. (१)

युधिष्ठिर म्हणाला- ब्रह्मदेवादी त्रैलोक्याचे स्वामी आणि इंद्रादी लोकपाल आपली दुर्मिळ आज्ञा मिळताच ती शिरोधार्य मानून तिचे पालन करतात. हे अनंता ! तेच कमलनयन आपण स्वत:ला राजे समजणार्‍या क्षुद्र अशा आमची आज्ञा पाळता ! खरे तर, ही आपल्याला न शोभणारीच लीला होय ! ज्याप्रमाणे उदय किंवा अस्तामुळे सूर्याचे तेज अधिक किंवा कमी होत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही कर्मांमुळे आपला प्रभाव कमी-जास्त होत नाही; कारण आपण एकमेवाद्वितीय परब्रह्म परमात्मा आहात. हे अजिंक्य माधवा ! " मी-माझे किंवा तू-तुझे" या प्रकारची पशूंप्रमाणे विकृत भेदबुद्धी आपल्या भक्तांच्या चित्तामध्ये कधीही असत नाही. (२-५)

श्रीशुक म्हणतात- असे म्हणून युधिष्ठिराने श्रीकृष्णांच्या अनुमतीने, यज्ञासाठी योग्य मुहूर्तावर वेदज्ञ ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून वरले. व्यास, भरद्वाज, सुमंतू, गौतम, असित, वसिष्ठ, च्यवन, कण्व, मैत्रेय, कवष, त्रित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जैमिनी, क्रतू, पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन,अथर्वा, कश्यप, धौ‍म्य, परशुराम, शुक्राचार्य, आसुरी, वीतिहोत्र, मधुच्छंदा, वीरसेन आणि अकृतवर्ण अशी त्यांची नावे होती. (६-९)

तसेच द्रोणाचार्य, भीष्म, कृपाचार्य, धृतराष्ट्र व त्याचे पुत्र आणि बुद्धीमान विदुर यांनाही आमंत्रित केले. राजन ! राजसूय यज्ञ पाहाण्यासाठी सर्व देशांतील राजे, त्यांचे मंत्री व सेवक, तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे सर्व वर्णांचे लोकही तेथे आले. (१०-११)

यानंतर ऋत्विजांनी सोन्याच्या यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली. प्राचीन काळी वरुणदेवाच्या यज्ञामध्ये ज्याप्रमाणे यज्ञपात्रे सोन्याची होती, त्याचप्रमाणे युधिष्ठिराच्या यज्ञामध्येसुद्धा होती. पांडुनंदन युधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार ब्रह्मदेव, शंकर, इंद्रादी लोकपाल, आपल्या गणांसह सिद्ध आणि गंधर्व, विद्याधर, नाग, मुनी, यक्ष, राक्षस, पक्षी, किन्नर, चारण, राजे, राण्या वगैरे निरनिराळ्या ठिकाणांहून तेथे आले. (१२-१५)

कृष्णभक्ताने राजसूय यज्ञ करणे हे योग्यच आहे, असेच सर्वांना वाटले. त्यात त्यांना आश्चर्य वाटले नाही. जसा पूर्वी देवांनी वरुणाकडून यज्ञ करविला होता, त्याप्रमाणे यावेळी देवांसारख्या तेजस्वी ऋत्विजांनी युधिष्ठिराकडून विधिपूर्वक राजसूय यज्ञ करविला. सोमरस काढण्याच्या दिवशी युधिष्ठिराचे पूज्य याजक आणि सदसस्पतींचे मनापासून विधिपूर्वक पूजन केले.(१६-१७)

त्या यज्ञात कोणत्या सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावी यावर सभासद विचार-विनिमय करू लागले. जितक्या मती, तितकी मते ! म्हणून काहीच निर्णय होऊ शकला नाही. तेव्हा सहदेव म्हणाला. " यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. कारण तेच देव, देश, काल, धन इत्यादी सर्व काही आहेत. हे सर्व विश्व ज्यांचे रूप आहे, सर्व यज्ञसुद्धा ज्यांची रूपे आहेत, तसेच अग्नी, आहुती, मंत्र हीही ज्यांची रूपे आहेत, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे दोन्हीही ज्यांच्या प्राप्तीसाठीच आहेत , असे हे एकटेच आहेत, सभासदांनो ! हेच एक अद्वितीय ब्रह्म आहेत. हे संपूर्ण जगत यांचेच स्वरूप आहे. ते अजन्मा असून स्वत:मध्येच स्वत:च विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करतात. सगळे जग ज्यांच्या कृपेने अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करून चारही पुरुषार्थांचे फळ प्राप्त करून घेते. म्हणून त्याच या सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णांचीच अग्रपूजा करा. त्यांची पूजा करण्याने चराचराच्या आत्म्याचीच पूजा होणार आहे. आपण दिलेले अनन्त व्हावे, असे वाटत असेल, तर चराचराचा अंतरात्मा, भेदरहित, विकाररहित तसेच परिपूर्ण अशा भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा करावी." भगवंतांचा महिमा जाणणारा सहदेव एवढे बोलून गप्प बसला. ते ऐकून सर्व महात्म्यांनी " अगदी योग्य ! अगदी योग्य ! " असे म्हणून सहदेवाच्या म्हणण्याचे समर्थन केले. सर्वांचा हा पाठिंबा ऐकून व सभासदांचे मनोगत जाणून युधिष्ठिराने मोठ्या आनंदाने व प्रेमभराने श्रीकृष्णांची यथासांग पूजा केली. प्रथम त्याने भगवंतांचे चरण प्रक्षालन केले आणि ते त्रिभुवनाला पावन करणारे चरणतीर्थ पत्‍नी, भाऊ, मंत्री आणि कुटुंबियांसह अतिशय आनंदाने आपल्या मस्तकावर धारण केले. त्याने भगवंतांना पीतांबर आणि मौल्यवान अलंकार अर्पण केले. त्यावेळी त्याचे डोळे आनंदाश्रूंनी इतके भरून आले होते की, तो भगवंतांना नीट पाहूही शकत नव्हता. (१८-२८)

भगवान श्रीकृष्णांची अशा प्रकारे केलेली पूजा पाहून सर्व लोक हात जोडून " नमो नम: ! जय जय ! " असा त्यांचा जयजयकार करून त्यांना नमस्कार करू लागले. त्याचवेळी आकाशातून आपोआप पुष्पवृष्टी होऊ लागली. (२९)

शिशुपालाने हे सर्व पाहिले. श्रीकृष्णांचे गुण ऐकून त्याला अतिशय राग आला आणि तो आसनावरून उठून उभा राहिला आणि भर सभेत हात उंचावून, मोठ्या क्रोधाने कोणाची भीड न ठेवता, भगवंतांना अर्वाच्य शब्द बोलू लागला. " सभासदांनो ! अटळ काळच ईश्वर आहे, हे वेदांचे म्हणणे अक्षरश: खरे आहे, त्यामुळेच येथे बालबुद्धी व्यक्तीच्या बोलण्याने ज्ञानवृद्धांची बुद्धीसुद्धा चक्रावून गेली आहे. अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे, याचा निर्णय करण्यास आपण समर्थ आहात. म्हणून हे सदसस्पतींनो ! ’ कृष्ण अग्रपूजेसाठी योग्य आहे’ हे अजाण सहदेवाचे बोलणे तुम्ही मान्य करू नका. येथे तपस्वी, विद्वान, व्रते धारण करणारे, ज्ञानाने पाप नाहीसे केलेले, लोकपालांनीही पूजिलेले ब्रह्मनिष्ठ श्रेष्ठ ऋषी आहेत. सभेतील श्रेष्ठांना सोडून हा कुलाला कलंक असलेला गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा होऊ शकेल बरे ? कावळा कधी यज्ञाच्या पुरोडाशाचा अधिकारी होऊ शकतो काय? याला कोणताही वर्ण नाही की आश्रम नाही. हा उच्च कुळातही जन्मलेला नाही. हा सर्व धर्मांच्या बाहेर आहे. हा स्वैर वर्तन करणारा आहे. याच्या अंगी कोणतेही गुण नाहीत. अशा स्थितीत हा अग्रपूजेला कसा पात्र होऊ शकतो? ययातीने याच्या वंशाला शाप दिलेला आहे, म्हणूनच सत्पुरुषांनी याच्या वंशालाच बहिष्कृत केले आहे. हा नेहमी धर्मबाह्य मधुपानात आसक्त असतो. तर मग हा अग्रपूजेला कसा पात्र असू शकेल ? या सर्वांनी ब्रह्मर्षी राहात असलेल्या देशांचा त्याग केला आणि वेदचर्चा नसलेल्या समुद्रात किल्ला बांधून हे राहू लागले. तेथे राहून हे चोर सर्व प्रजेला त्रास देतात." शिशुपालाचे सर्व पुण्य संपले होते; म्हणूनच तो यासारखे अर्वाच्य बोल श्रीकृष्णांना उद्देशून बोलत होता. परंतु सिंह जसा कोल्ह्याच्या कोल्हेकुईकडे लक्ष देत नाही, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्यावर काहीच बोलले नाहीत. परंतु भगवंतांची निंदा ऐकणे सभासदांना असह्य झाले. त्यांपैकी काहीजण कानांवर हात ठेवून क्रोधाने शिशुपालाला शिव्या-शाप देत बाहेर निघून गेले. कारण भगवंतांची किंवा भक्तांची निंदा ऐकून जो तेथून निघून जात नाही, त्याचे पुण्य नाहीसे होऊन तो अधोगतीला जातो. (३०-४०)

त्यावेळी शिशुपालाला मारण्यासाठी पांडव, मत्स्य, कैकय आणि सृंजयवंशी राजे संतापून हातात शस्त्रे घेऊन एकदम उभे राहिले. हे राजा ! परंतु शिशुपाल बिलकुल घाबरला नाही. त्याने मागचा-पुढचा विचार न करता आपली ढाल- तलवार उचलली आणि भर सभेत श्रीकृष्णांची बाजू घेणार्‍या राजांची तो निंदा करू लागला. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. त्यांनी आपली बाजू घेणार्‍या राजांना थांबवले आणि स्वत: क्रोधाने आपल्यावर चालून येणार्‍या शिशुपालाचे मस्तक आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तोडले. शिशुपाल मारला गेल्यानंतर तेथे अतिशय गोंधळ माजला. त्याचे अनुयायी असलेले राजे आपपले प्राण वाचविण्यासाठी तेथून पळून जाऊ लागले. आकाशातून निखळून पडलेली उल्का ज्याप्रमाणे जमिनीत शिरते, त्याप्रमाणे सगळ्य़ांच्या देखतच शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडून ती श्रीकृष्णांमध्ये प्रविष्ट झाली. शिशुपालाच्या अंत:करणामध्ये सलग तीन जन्मांपासून वैरभाव वाढत गेला होता आणि अशा वैरभावयुक्त बुद्धीने भगवंतांचेच चिंतन करीत करीत तो भगचद्रूप झाला. कारण नव्या जन्माला भावच कारणीभूत असतो. नंतर चक्रवर्ती राजाने सदस्य आणि ऋत्विजांना पुष्कळ दक्षिणा दिली. तसेच सर्वांचा सत्कार करून विधिपूर्वक यज्ञाच्या शेवटी करावयाचे अवभृथस्नान केले. (४१-४७)

योगेश्वरेश्वर भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे राजाचा यज्ञ पूर्ण केला आणि बांधवांच्या विनंतीवरून काही महिने ते तेथेच राहिले. त्यानंतर युधिष्ठिराची इच्छा नसतानाही भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या राण्या व मंत्रांसह द्वारकेकडे प्रयाण केले. (४८-४९)

वैकुंठवासी जय आणि विजय यांना सनदकादी ऋषींच्या शापामुळे वारंवार जन्म घ्यावा लागला, हे आख्यान मी तुला अतिशय विस्तारपूर्वक सांगितले. अवभृथ स्नान करून महाराज युधिष्ठिर ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या सभेमध्ये देवराज इंद्राप्रमाणे शोभून दिसू लागले. राजाने देव, मनुष्य आणि गंधर्वादिकांचा यथायोग्य सत्कार केला. नंतर ते सर्वजण भगवान श्रीकृष्ण व राजसूय यज्ञाची प्रशंसा करीत आनंदाने आपापल्या लोकी निघून गेले. ज्याला पांडवांच्या या उज्ज्वल राज्यलक्ष्मीचा उत्कर्ष सहन झाला नाही, तो पापी, कलहप्रेमी आणि कुरुकुलाचा रोग असलेला दुर्योधन मात्र दु:खी झाला. (५०-५३)

जो कोणी शिशुपालवध, जरासंधवध, कैदी राजांची मुक्तता आणि यज्ञ या श्रीकृष्णांच्या लीलांचे कीर्तन करील, त्याची सर्व पापांपासून सुटका होईल. (५४)

अध्याय चौर्‍याहत्तरावा समाप्त

GO TOP