श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७३ वा

जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंतांचे इंद्रप्रस्थाला परतणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- जरासंधाने अगदी सहजपणे वीस हजार आठशे राजांना जिंकून डोंगराच्या दरीत ठेवले होते. ते जेव्हा तेथून बाहेर आले, तेव्हा त्यांची शरीरे मळकट आणि वस्त्रे गलिच्छ दिसत होती. भुकेमुळे ते दुर्बळ झाले होते आणि त्यांची तोंडे वाळून गेली होती. कैदखान्यात बंद राहिल्यामुळे ते खंगले होते. तेथून बाहेर पडताच त्यांनी पावसाळ्यातील ढगाप्रमाणे सावळ्या, पीतांबरधारी भगवंतांचे दर्शन घेतले. त्यांच्या चार हातांमध्ये गदा, शंख, चक्र आणि कमळ शोभून दिसत होते. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह आणि कमळाच्या गाभ्याप्रमाणे त्यांचे डोळे लालसर होते. त्यांचे सुंदर मुखकमल प्रसन्न असून कानांमध्ये मकराकृती कुंडले चमकत होती. त्यांच्या श्रीविग्रहावर सुंदर मुगुट, मोत्यांचा हार, हातामध्ये कडे, करदोटा आणि बाजूबंद शोभून दिसत होते. गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत होता आणि तेथे वनमाला शोभत होती. त्यांना पाहाताच त्या राजांची अशी स्थिती झाली की ते जणू डोळ्यांनी त्यांना पीत आहेत, जिभेने चाटीत आहेत, नाकाने हुंगत आहेत आणि बाहूंनी आलिंगन देत आहेत. त्यामुळे त्यांची सारी पापे धुतली गेली. त्यांनी त्यांच्या चरणांवर डोकी टेकवून त्यांना प्रणाम केला. श्रीकृष्णांच्या दर्शनाने त्या राजांना इतका आनंद झाला की कैदेत राहिल्याचे त्यांचे दु:ख एकदम नाहीसे झाले. हात जोडून ते श्रीकृष्णांची स्तुती करू लागले.(१-७)

राजे म्हणाले, शरणागतांचे सगळे दु:ख नाहीसे करणा-या हे देवदेवेश्वरा ! हे अविनाशी श्रीकृष्णा ! आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. या घोर संसाराला कंटाळून आपल्याला शरण आलेल्या आमचे रक्षण करा. हे मधुसूदना ! हे आमचे स्वामी ! या मगधराजाला आम्ही दोष देत नाही. भगवन ! कारण राज्यलक्ष्मीपासून राजांना दूर करणे ही आपली कृपाच होय राज्यैश्वर्याच्या घमेंडीने उन्मत्त झालेल्या राजाला कल्याणाची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. आपल्या मायेने मोहित होऊन तो अनित्य अशा संपत्तीलाच स्थिर समजतो. अज्ञानी लोक ज्याप्रमाणे मृगजळाच्या पाण्यालाच जलाशय समजतात, त्याचप्रमाणे इंद्रियलोलुप, अज्ञानी माणसे या बदलणा-या मायेला सत्य वस्तू समजतात. भगवन ! आम्ही अगोदर संपत्तीच्या नशेने आंधळे झालो होतो. या पृथ्वीला जिंकून घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत होतो आणि क्रूरपणे आपल्याच प्रजेला नष्ट करीत होतो. आम्ही इतके मस्तवाल झालो होतो की, आपण मृत्यूस्वरूपाने आमच्यासमोर उभे आहात, याचीही आम्हांला पर्वा नव्हती. हे श्रीकृष्णा ! त्याचा आम्हांला आज अतिशय वेगवान व असामान्य बलशाली अशा आपलेच स्वरूप असलेल्या काळाने राज्यापासून दूर केले. ज्यांच्या कृपेनेच आमचा गर्व नाहीसा झाला, अशा आपल्या चरणकमलांचे आम्ही स्मरण करीत आहोत. हे विभो ! दिवसेंदिवस क्षीण होणा-या व रोगांची जन्मभूमी असलेल्या या शरीराने मृगजळासारखे राज्य भोगण्याची आम्हांला अभिलाषा नाही, तसेच कानाला भुरळ पाडणा-या मृत्यूनंतरच्या स्वर्गादी कर्मफलांचीसुद्धा आम्हांला इच्छा नाही. आता आपण आम्हांला हा उपाय सांगा की, जेणेकरून येथे संसारात राहूनही आपल्या चरणकमलांची सदैव आठवण राहील. नमस्कार करणा-यांच्या दु:खाचा नाश करणा-या हे श्रीकृष्णा ! वासुदेवा ! हरे ! परमात्मन ! गोविंदा ! आमचा आपल्याला वारंवार नमस्कार असो ! (८-१६)

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! कारागृहातून मुक्त झालेल्या राजांनी जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली, तेव्हा शरणागतरक्षक दयाळू प्रभू मधुर वाणीने त्यांना म्हणाले. (१७)

श्रीकृष्ण म्हणाले- हे राजांनो ! तुम्ही सर्वांनी जी इच्छा प्रगट केली, त्यानुसार आजपासून सर्वांचा आत्मा आणि सर्वांचा स्वामी अशा माझ्या ठायी तुमची खात्रीने सुदृढ भक्ती राहील. हे राजांनो ! तुम्ही जे मागितले, तेच उत्तम आहे. तुम्ही केलेली स्तुती खरी आहे; कारण मीसुद्धा पाहातो की, संपत्ती आणि ऐश्वर्याच्या घमेंडीने पुष्कळसे लोक उच्छृंखल होतात. हैहय, नहुष, वेन, रावण, नरकासुर इत्यादी अनेकजण तसेच देव, दैत्य आनि राजे ऐश्वर्याच्या गर्वामुळे पदभ्रष्ट झाले. तुम्ही हेही समजून घ्या की, शरीरादी उत्पन्न होणा-या सर्व गोष्टी नाश पावतात. म्हणून मन आपल्या ताब्यात ठेवून यज्ञांनी माझे पूजन करा आणि धर्माप्रमाणे प्रजेचे रक्षण करा. तुम्ही आपल्या वंशपरंपरेचे रक्षण करण्यासाठी संतान उत्पन्न करा आणि प्रारब्धानुसार जन्म-मृत्यू, सुख-दु:ख इत्यादी जे काही प्राप्त होईल, ते समभावाने स्वीकारून आपले चित्त माझ्या ठिकाणी लावून आपले जीवन चालवा. देहादिकांविषयी उदासीन राहा आणि स्वस्वरूप रममाण व्हा. त्याचप्रमाणे आपल्या आश्रमाला योग्य अशा व्रतांचे पालन करीत जा. आपले मन योग्य प्रकारे माझ्या ठिकाणी लावल्याने शेवटी तुम्ही ब्रह्मस्वरूप अशा मलाच प्राप्त व्हाल. (१८-२३)

श्रीशुक म्हणतात- भुवनेश्वर भगवान श्रीकृष्णांनी राजांना हा आदेश देऊन त्यांना स्नान इत्यादी घालण्यासाठी अनेक स्त्री-पुरूषांची नियुक्ती केली. (२४)

परीक्षिता ! सहदेवांकडून त्यांना राजाला योग्य अशी वस्त्रे, आभूषणे, पुष्पमाला, चंदन इत्यादी देववून त्यांचा सन्मान करविला. जेव्हा ते राजे अभ्यंग स्नान करून वस्त्रे, आभूषणे परिधान करून तयार झाले, तेव्हा भगवंतांनी त्यांना उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन देवविले आणि तांबूल इत्यादी विविध प्रकारचे राजोचित भोग देवविले. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्या राजांचा बंधमुक्त करुन सन्मान केला, तेव्हा पावसाळा संपल्यानंतर तारे शोभावेत, त्याप्रमाणे तेजस्वी कुंडले घातलेले ते शोभू लागले. नंतर श्रीकृष्णांनी त्यांना सुवर्णाने आणि रत्नांनी मढविलेल्या, उत्तम घोडे जुंपलेल्या रथांमध्ये बसवून, गोड शब्दांनी तृप्त करून आपपल्या देशाकडे पाठविले. महात्म्या श्रीकृष्णांनी अशा प्रकारे त्या राजांना मोठ्या संकटातून मुक्त केले. आता ते श्रीकृष्णांचेच रूप, गुण आणि लीलांचे चिंतन करीत आपापल्या राजधानीकडे गेले. त्या राजांनी तेथे जाऊन आपापल्या प्रजाजनांना त्या परमपुरुषाची अद्भुत लीला ऐकविली. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक भगवंतांच्या आज्ञेनुसार ते राज्य करू लागले. (२५-३०)

अशा प्रकारे श्रीकृष्णांनी भीमसेनाच्या हस्ते जरासंधाचा वध करवून, भीमसेन आणि अर्जुनासह जरासंधपुत्र सहदेवाकडून सन्मानित होऊन इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले. इंद्रप्रस्थाजवळ पोहोचल्यावर त्या विजयी वीरांनी आपापले शंख वाजविले. त्यामुळे त्यांच्या इष्ट-मित्रांना सुख आणि शत्रूंना अतिशय दु:ख झाले. तो शंखध्वनी ऐकून इंद्रप्रस्थवासियांची मने आनंदित झाली. जरासंध मारला गेला, हे त्यांना कळाले. युधिष्ठिराचे संकल्पही पूर्ण झाले. भीमसेन, अर्जुन आणि श्रीकृष्णांनी राजाला वंदन केले. तसेच जरासंधाचा वध करण्यासाठी त्यांना जे जे करावे लागले, ते सर्व त्यांनी सांगितले. (३१-३४)

श्रीकृष्णांची ही आपल्यावरील कृपा ऐकून युधिष्ठिर सद्‍गदित झाला त्याच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. भगवंतांचे ते प्रेम पाहून त्याच्या तोंडून शब्द फुटेना ! (३५)

अध्याय त्र्याहत्तरावा समाप्त

GO TOP