श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७२ वा

पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- युधिष्ठिर एके दिवशी मुनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, बंधू, आचार्य, कुळातील ज्येष्ठ, नातलग, संबंधित आणि कुटुंबियांच्या बरोबर राजसभेत बसला होता. सर्वांच्या देखतच श्रीकृष्णांना उद्देशून तो म्हणाला. (१-२)

युधिष्ठिर म्हणाला- हे गोविंदा ! यज्ञांचा राजा अशा राजसूय यज्ञाने मी आपल्या पावन विभूतीस्वरूप देवतांचे पूजन करू इच्छितो. हे प्रभो ! आपण माझा हा संकल्प पुरा करावा. हे कमलनाभा ! सर्व अमंगल नष्ट करणा-या आपल्या चरणकमलांची जे लोक निरंतर सेवा करतात, ध्यान आणि स्तुती करतात तेच खरे पवित्र होत. ते संसारापासून आपली सुटका करून घेतात. आणि जर त्यांनी संसारातील विषयांची इच्छा केली, तर त्यांचीसुद्धा त्यांना प्राप्ती होते; परंतु अभक्तांना मात्र काहीच मिळत नाही. हे देवदेवा ! या लोकांना आपल्या चरणकमलांच्या सेवेचा प्रभाव पाहू दे ! कुरुवंशी आणि सृंजयवंशी राजांपैकी जे लोक आपले भजन करतात आणि जे करीत नाहीत, त्यांच्यामधील अंतर हे प्रभो ! आपण लोकांना दाखवा. प्रभो ! आपण सर्वांचे आत्मा, समदर्शी आणि आत्मानंदाचे साक्षात्कारी आहात. स्वत: ब्रह्म आहात. आपल्या ठायी आपपरभाव नाही. तरीसुद्धा, जे आपली सेवा करतात, त्यांना कल्पवृक्षाप्रमाणे फळ मिळतेच. त्या फळामध्ये जो कमी अधिकपणा असतो, तो सेवेनुसार असतो. याउ‍लट कधी होत नाही. (३-६)

श्रीभगवान म्हणाले- हे शत्रूवर विजय मिळविणा-या धर्मराजा ! आपला निश्चय अतिशय चांगला आहे. हा यज्ञ केल्याने सर्व लोकांमध्ये आपल्या मंगलमय कीर्तीचा विस्तार होईल. (७)

हे राजन ! आपला हा महायज्ञ ऋषी, पितर, देवता, संबंधित आम्ही व सर्व प्राणी या सर्वांना प्रिय आहे. पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून सर्व पृथ्वी आपल्या ताब्यात घे आणि सर्व सामग्री एकत्रित करून हा महायज्ञ कर. महाराज ! तुझे हे चारही भाऊ लोकपालांच्या अंशापासून जन्मले आहेत. संयमी अशा तू इंद्रियांवर ताबा नसणा-यांना प्राप्त न होणा-या मला जिंकून घेतले आहेस. जगात देवसुद्धा तेज, यश, लक्ष्मी किंवा ऐश्वर्य यांच्या बळावर माझ्या भक्ताचा पराभव करू शकणार नाही. मग एखाद्या राजाची काय कथा ! (८-११)

श्रीशुक म्हणतात- भगवंतांचे म्हणणे ऐकून संतुष्ट झालेल्या युधिष्ठिराचे मुखकमल प्रफुल्लित झाले. त्याने श्रीकृष्णतेजाने अधिक प्रभावशाली बनलेल्या आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा दिली. त्याने सृंजयवंशी वीरंसह सहदेवाला दक्षिण दिशेकडे, नकुलाला मत्स्यदेशीय वीरांसह पश्मिमेकडे, अर्जुनाला केकयदेशीय वीरांसह उत्तरेकडे आणि भीमसेनाला मद्रदेशीय वीरांसह पूर्व दिशेकडे पाठविले. परीक्षिता ! त्या वीरांनी आपल्या सामर्थ्याने सर्व दिशांकडील राजांना जिंकले आणि यज्ञ करू इच्छिणा-या युधिष्ठिअराला विपुल धन आणून दिले. अजून जरासंध अजिंक्य आहे, हे ऐकून राजाला काळजी वाटू लागली. त्यावेळी श्रीकृष्णांनी उद्धवांनी सांगितलेला उपाय त्याला सांगितला. परीक्षिता ! यानंतर भीमसेन, अर्जुन आणि श्रीकृष्ण हे तिघेही ब्राह्मणांचा वेष घेऊन गिरिव्रजाला गेले. तेथेच जरासंध राहात होता. राजा जरासंध ब्राह्मणांचा भक्त आणि गृहस्थोचित धर्मांचे पालन करणारा होता. वरील तिघे क्षत्रिय ब्राह्मणाचा वेष घेऊन अतिथीसत्काराच्या वेळी जरासंधाकडे गेले आणि त्यांनी त्याच्याकडे याचना केली. (१२-१७)

"राजन ! आपले कल्याण असो ! आम्ही तिघेजण आपले अतिथी म्हणून आलो आहोत आणि फार लांबून आलो आहोत. म्हणून आम्ही मागू ते आपण आम्हांला द्यावे. सहनशील माणसे काय सहन करू शकत नाहीत? दुष्ट माणसांना न करण्यासारखे काय असते? उदार पुरुष काय देऊ शकत नाहीत आणि समदर्शी असणा-याला परका कोण आहे? जो मनुष्य स्वत: समर्थ असूनही या नाशवान शरीराने सज्जनांनी वाखाणण्याजोगे अविनाशी यश मिळवत नाही, त्याची निंदा करावी, तेवढी थोडीच. त्याच्याविषयी शोक करणेच योग्य आहे. राजन ! हरिश्चंद्र, रंतिदेव, धान्याचे शेतात पडलेले दाणे वेचून उदरनिर्वाह करणारे मुद्‍गल, शिबी, बली, व्याध, कपोत इत्यादी पुष्कळशा व्यक्तींनी अतिथीला आपले सर्वस्व देऊन या नाशवान शरीराने अविनाशी पद प्राप्त करून घेतले. (१८-२१)

श्रीशुक म्हणतात- जरासंधाने त्या लोकांचा आवाज, त्यांचे रूप, मनगटावर धनुष्याच्या दोरीचे पडलेले घट्टे, ही चिन्हे पाहून ते क्षत्रिय आहेत, हे ओळखले. आता त्यांना पूर्वी कोठे पाहिले असावे, याविषयी तो आठवू लागला. हे खात्रीने क्षत्रिय असून ब्राह्मणाचा वेष घेऊन आले आहेत. म्हणून त्यांना मी याचना केल्यास, देण्यास कठीण असे माझे शरीरही देईन. भगवंतांनी ब्राह्मणाचा वेष धारण करून बलीचे सारे ऐश्वर्य हिरावून घेतले, तरीसुद्धा त्याची सगळीकडे पसरलेली पवित्र कीर्ती आजसुद्धा ऐकिवात आहे. भगवंतांनी इंद्राची राज्यलक्ष्मी बलीकडून काढून घेऊन त्याला परत देण्यासाठीच ब्राह्मणाचे रूप धारण केले होते, हे माहीत असूनही आणि शुक्राचार्यांनी अडवूनही दैत्यराजाने त्यांना पृथ्वीचे दान दिलेच ना ! जो क्षत्रिय ब्राह्मणासाठी आपले जीवन खर्ची घालून या नाशवान शरीराने विपुल यश संपादन करीत नाही, त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे? (२२-२६)

उदार अंत:करणाच्या जरासंधाने असा विचार करून श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमसेनाला म्हटले, " ब्राह्मणांनो ! आपणास पाहिजे ते मागा. मी आपल्याला माझे मस्तकसुद्धा द्यायला तयार आहे. " (२७)

श्रीकृष्ण म्हणाले- राजेंद्रा ! आम्हांला अन्न नको. आम्ही क्षत्रिय आपल्याकडे युद्धासाठी आलो आहोत. आपली इच्छा असेल, तर आपण आम्हांस द्वंद्वयुद्धाची भिक्षा द्यावी. हे पहा ! हा पांडुपुत्र भीमसेन आहे आणि हा याचा भाऊ अर्जुन आहे. मी या दोघांचा मामेभाऊ व तुझा शत्रू कृष्ण आहे. " श्रीकृष्णांनी असे सांगितले, तेव्हा राजा जरासंध खो खो करून हसू लागला. आणि मग चिडून म्हणाला, " अरे मूर्खांनो ! तुम्हांला जर युद्धच हवे असेल तर ते देतो. परंतु कृष्णा ! तू भित्रा आहेस ! युद्धामध्ये तू माझ्या भीतीने मथुरा नगरी सोडून समुद्राला शरण गेलास. म्हणून मी तुझ्याशी लढणार नाही. हा अर्जुनसुद्धा वयाने माझ्यापेक्षा लहान असून माझ्या बरोबरीचा बलवान वीर नाही. म्हणून मी याच्याबरोबर लढणार नाही. हा भीमसेन मात्र माझ्यासारखाच बलवान आहे. " असे म्हणून जरासंधाने भीमसेनाला एक मोठी गदा दिली आणि स्वत: दुसरी गदा घेऊन तो नगराच्या बाहेर आला. नंतर युद्धाची खुमखुमी असलेले दोन्ही वीर सपाट रणभूमीवर येऊन एकमेकांना भिडले आणि आपल्या वज्रासारख्या प्रचंड गदेने एकमेकांवर प्रहार करू लागले. ते डावीकडे उजवीकडे असे वेगवेगळे पवित्रे बदलत असता असे शोभून दिसत होते की, जणू काही दोन श्रेष्ठ नट रंगमंचावर युद्धाचा अभिनय करीत आहेत. परीक्षिता ! जेव्हा एकाची गदा दुस-याच्या गदेला टक्कर देत असे, तेव्हा वाटे की, झुंजणा-या दोन हत्तींच्या दातांचा खटखट आवाज होत आहे किंवा विजांचा कडकडाट होत आहे. (२८-३६)

जेव्हा दोन हत्ती अतिशय रागाने झुंजू लागतात आणि रुईच्या फांद्या तोडून एकमेकांवर त्यांचे तडाखे देतात, त्यावेळी त्या फांद्यांचे तुकडे तुकडे होतात. त्याप्रमाणे जेव्हा जरासंध आणि भीमसेन बाहुबलाने आपापल्या गदांनी एकमेकांचे खांदे, कंबर, पाय, हात, मांड्या आणि खांद्यांचे सांधे यांवर वार करू लागले, तेव्हा त्यांच्या गदांचा चुराडा झाला. अशा प्रकारे जेव्हा गदांचा चक्काचूर झाला, तेव्हा ते दोघेही वीर रागाने ठोसे लगावून एकमेकांचे चूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे ठोसे म्हणजे जणू लोखंडी हातोड्यांचेच वार होते. दोन हत्तींप्रमाणे लढणा-या त्यांच्या थपडा आणि ठोशांचा आवाज विजेच्या कडकडाटाप्रमाणे भासत होता. परीक्षिता ! जरासंध आणि भीमसेन या दोघांचेही युद्धातील कौशल्य, बळ आणि उत्साह सारखाच होता. दोघांची शक्ती जराही कमी झाली नव्हती. त्यामुळे जय-पराजयाचे चिन्ह दिसेना. दोघेही वीर रात्रीच्या वेळी मित्रांसारखे राहात आणि दिवसा अटीतटीने लढत. महाराज ! अशा प्रकारे लढता लढता त्यांचे सत्तावीस दिवस निघून गेले. (३७-४०)

राजा ! अठ्ठाविसव्य दिवशी भीमसेन आपल्या मामेभाऊ श्रीकृष्णाला म्हणाला- " माधवा ! युद्धामध्ये मी जरासांधाला जिंकू शकणार नाही. " श्रीकृष्णांना जरासंधाचे जन्म-मृत्यू माहीत होते. तसेच जरा नावाच्या राक्षसिणीने जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे जोडून त्याला जीवदान दोले आहे, हेही ते जाणत होते. म्हणून त्यांनी भीमसेनाच्या शरीरामध्ये आपल्या शक्तीचा संचार करून त्याला बळ देत जरासंधाच्या वधाच्या युक्तीविषयी विचार केला. त्यांनी त्याच्या मृत्यूचा उपाय म्हणून एक फांदी मधोमध चिरून ती खूण म्हणून भीमसेनाला दाखविली. वीराग्रणी परम शक्तिशाली भीमसेनाने श्रीकृष्णांचा अभिप्राय जाणून जरासंधाचे पाय धरून त्याला जमिनीवर आपटले. नंतर त्याने त्याचा एक पाय आपल्या पायाने खाली दाबत आणि दुसरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला. यानंतर भीमसेनाने हत्ती ज्याप्रमाणे झाडाची फांदी चिरतो, त्याप्रमाणे गुदद्वारापासून त्याला मधोमध चिरले. तेव्हा लोकांना जरासंधाच्या शरीराचे एक पाय, मांडी, अंडकोश, कंबर, पाठ, स्तन, खांदा, भुजा, डोळे, भुवया आणि कान वेगवेगळे झालेले दोन तुकडे दिसले. (४१-४६)

मगधराज जरासंधाचा मृत्यू झाल्यावर तेथील प्रजेमध्ये हाहाकार उडाला. त्याचवेळी श्रीकृष्ण आणि अर्जुनाने भीमसेनाला मिठी मारून त्याचा गौरव केला. सर्वशक्तिमान, ज्यांचे स्वरूप जाणणे कठीण, जे सर्व प्राण्यांचे जीवनदाते आहेत, त्या श्रीकृष्णांनी जरासंधाच्या राज्यावर त्याचा मुलगा सहदेव याला मगधाधिपती म्हणून अभिषेक केला. आणि जरासंधाने ज्या राजांना कैद करून ठेवले होते, त्यांची कारागृहातून सुटका केली. (४७-४८)

अध्याय बाहत्तरावा समाप्त

GO TOP